अवघ्या 10 लोकांची वस्ती असलेल्या गावात जाण्यासाठी जगभरातील लोकांमध्ये चढाओढ, पण कशासाठी?

    • Author, ऋषिका शर्मा
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

या गावात माणसांची वस्ती अगदी नावालाच उरली आहे, जिथे एकही हॉटेल नाही आणि पर्यटकांची पावलं तर इथे क्वचितच पडतात. तेच गाव एका विशेष रात्रीच्या स्वागतासाठी अगदी उत्सुकतेने सज्ज होत आहे.

हे वर्णन आहे उत्तरी स्पेनच्या बुर्गोस प्रांतात वसलेल्या 'अवेलेनोसा डे मुन्यो' या अगदीच छोट्या आणि शांत गावाचं.

या गावात एक बार आहे, ज्याचं शटर कधीच उघडत नाही. आणि दारूचं एक असं कोठार आहे, जे आता भविष्यात पुन्हा कधीच उघडणार नाही.

पण जर तुम्ही कान देऊन ऐकलं, तर तुम्हाला एक मंद धून ऐकू येते. रखरखत्या उन्हात तापलेल्या लॅव्हेंडरच्या झाडांवर भिरभिरणाऱ्या मधमाशांचा तो हळुवार गुणगुणणारा आवाज.

वर दगडांच्या छतांमध्ये वेगाने उडणाऱ्या काळ्या-पांढऱ्या स्वॅलो (अबाबिल) पाखरांचा चिवचिवाट त्या रिकाम्या रस्त्यांवर घुमत राहतो. घराच्या बाहेर उभ्या असलेल्या एखाद्या ट्रॅक्टरचा आवाज एवढीच काय ती मानवी वस्तीची धुसर खूण तिथे ऐकू येते.

जवळच्या बेकरीतून एक साधी पांढरी व्हॅन आठवड्यातून एकदा तिथल्या काही लोकांना ब्रेड द्यायला येते, तेव्हाच काय तो बदल होतो. त्या काही वेळेसाठी गावची ती सुस्तावलेली शांतता थोडीशी ढळते.

या मोजक्या लोकांसाठी हीच ती गोष्ट आहे, जी त्यांच्या दैनंदिन आयुष्याला आकार देते. एका अशा ठिकाणी जिथे एरवी काहीच घडत नाही.

पण तरीही नेहमी शांतता अन् ओसाडपणासाठी ओळखलं जाणारं हे छोटसं गाव या कडक उन्हाळ्यात अचानक संपूर्ण जगातील सर्वात थरारक आणि उत्सुकता वाढवणाऱ्या ठिकाणांपैकी एक बनणार आहे.

'डबल ट्विलायट'

12 ऑगस्ट 2026 रोजी अटलांटिक महासागराच्या वरून एक खग्रास सूर्यग्रहण जाणार आहे. 1999 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा संपूर्ण युरोपमधून हे खग्रास सूर्यग्रहण दिसेल.

मॅड्रिडच्या भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मारिया तेरेसा लोपेझ सांचेझ यांच्या मते, 1912 नंतर मुख्य स्पेनमधून दिसणारं हे पहिलेच खग्रास सूर्यग्रहण ठरणार आहे.

तसं पाहिलं तर हे पूर्ण सूर्यग्रहण युरोपमधील एका लहानशा भागातूनच स्पष्ट दिसणार आहे आणि 'अवेलेनोसा डे मुन्यो' हे गाव अगदी त्याच मार्गावर वसलेले आहे.

पण या छोट्या गावाला भेट देण्यासाठी आकर्षक बनवणारी गोष्ट म्हणजे पश्चिमेकडे दूरवर पसरलेली गव्हाची सोनेरी शेते आणि टुमदार टेकड्या. शिवाय, इथे इमारती फारशा नाहीत आणि कृत्रिम प्रकाशाचा झगमगाटही नाही. इतर प्रसिद्ध ठिकाणांसारखी पर्यटकांची गर्दी तर इथे अजिबात नसते.

ग्रहणाची हीच वेळ या घटनेला अधिक खास बनवते. कारण हे ग्रहण सूर्यास्ताच्या अगदी काही क्षण आधी होणार असल्याने, अवकाशात 'डबल ट्विलायट' म्हणजेच दुहेरी संध्याकाळचा अद्भूत सोहळा पाहायला मिळेल.

यावर लोपेझ म्हणतात, " हे अगदी काही मिनिटांच्या अंतरात दोनदा सूर्यस्त पाहण्यासारखे आहे."

याच रात्री नंतर 'पर्सिड्स' या उल्कावर्षावाचा अद्भुत नजराणाही पाहायला मिळेल. यामुळे खगोलीय घटनांचा एक दुर्मिळ संगम अनुभवता येईल.

तिथे राहणाऱ्या सारा अल्वारेझ रॉड्रिग्ज यांना लोकांना कुठं पाठवायचं याबद्दल कोणतीही शंका नाही. त्या म्हणतात, "गुंफेच्या दिशेने वर जा, तिथून तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसेल."

1937 मध्ये अवेलेनोसा डे मुन्यो इथे जन्मलेल्या अल्वारेझ कधीही दुसरीकडे राहायला गेल्या नाहीत. इथे घालवलेल्या आपल्या जवळपास नऊ दशकांच्या आयुष्यात त्यांनी या गावाचे रूप पूर्णपणे बदलताना पाहिले आहे.

या सांगतात की, 1950 च्या सुमारास या गावात सुमारे 200 लोकांची वस्ती होती आणि छोटी-मोठी दुकानेही होती. इथले मासे विक्रेते सायकलीवरून शेजारच्या गावांमध्ये मासे विकायला जायचे.

राऊल ग्रँडे रेव्हिला यांचा जन्म 73 वर्षांपूर्वी याच गावात झाला, पण ते बालपणीच मॅड्रिडला निघून गेले. गाढवावर बसून चिठ्ठ्या-पत्रे आणि वर्तमानपत्रे पोहोचवणारा एक पोस्टमन त्यांना अजूनही चांगलाच आठवतो.

गाढवाच्या पाठीवर बसलेला पोस्टमन अर्ध्या गुंगीत असला तरी ते गाढव आपल्याला बरोबर योग्य ठिकाणी घेऊन जाईल याची त्याला खात्री असायची. अगदी गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा पोस्ट ऑफिसपर्यंतसुद्धा.

दुसऱ्या देशांमधून लोक इथे येतील

पिढ्यानपिढ्या या गावातील लोकांचा उदरनिर्वाह कोरडवाहू शेती, भाजीपाल्याच्या बागा, द्राक्षांच्या बागा आणि पशुपालनावर चालत होते. यानंतर शेतीत मशिन्सचा वापर सुरू झाला. आसपास रोजगाराच्या जास्त संधी नसल्यामुळे लोक माद्रिद, बिल्बाओ, बार्सिलोना आणि इतर शहरांमध्ये निघून गेले.

गावात कायम राहणाऱ्या रहिवाशांपेक्षा तिथल्या टेकड्यांवर चरणाऱ्या शेळ्यांची संख्या जास्त आहे. जिथे एकेकाळी शेकडो ग्रामस्थ शेतात राबायचे तिथे आज सूर्यफुलांची अथांग शेते पसरलेली दिसतात.

पण या उन्हाळ्यात होणाऱ्या सूर्यग्रहणामुळे त्यापैकी काही कुटुंबे पुन्हा आपल्या गावाकडे परतत आहेत.

या कार्यक्रमासाठी ग्रँडे आपल्या पार्टनर, मुलगा, नातवंडे आणि मित्रांच्या मोठ्या ग्रुपसोबत परत येणार आहेत. त्यांचे भाऊसुद्धा त्यांची तीन मुले, नातवंड आणि बहिणीला सोबत घेऊन येणार आहेत. अशा प्रकारे सुमारे 20 जणांची एक टोळीच जमेल आणि एका रात्रीपुरती या गावाची लोकसंख्या थेट दुप्पट होऊन जाईल.

गोष्ट एवढ्यावरच थांबणार नाही. अल्व्हारेझ सांगतात की इतर शेजारीही आपल्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे स्वागत करणार आहेत जे संपूर्ण स्पेनमधून आणि अगदी ब्रिटन, फ्रान्स तसेच व्हेनेझुएलामधूनही येथे येणार आहेत.

सँटियागो डी कॉम्पोस्टेला विद्यापीठातील भूगोल विभागाच्या प्राध्यापक डॉ. लुकेझिया लोपेझ सांगतात की, ग्रहणासारख्या खास प्रसंगांमुळे लोकांना "ज्या ठिकाणाशी आपले जुने नाते आहे तिथे पुन्हा जाऊन त्या आठवणी नव्याने जगण्याची प्रेरणा लोकांना मिळू शकते."

अवेलेनोसा गावाला पुन्हा नव्याने भेट देण्याचा हा उत्साह आता केवळ तिथल्या मूळ रहिवाशांपुरता किंवा त्यांच्या कुटुंबापुरताच मर्यादित राहिलेला नाही.

'ड्युक ऑफ लेर्मा' यांच्या ऐतिहासिक पॅलेसमध्ये सुरू असलेल्या जवळच्या पॅराडोर डी लेर्मा हॉटेलमध्ये या इव्हेंटसाठी 2022 सालापासूनच बुकिंग झाले आहे.

कॅस्टिला वाय लिऑन टूरिझम मंडळाचे अल्बेर्टो बॉस्क्यु कोएलो सांगतात की, संपूर्ण भागात असाच ट्रेंड पाहायला मिळत आहे.

ते सांगतात, "आमच्याकडील राहण्याच्या बहुतांश जागा पूर्णपणे बुक झाल्या आहेत. खरं तर यांची बुकिंग खूप आधीच झाली होती."

ते पुढे म्हणाले की, ग्रहणाचा अभ्यास करणारे आणि जाणकार लोक "सर्वात जास्त गर्दीची किंवा प्रसिद्ध जागा शोधण्याऐवजी सर्वात स्पष्ट दृश्य दिसेल अशी सर्वोत्तम जागा" शोधत होते जेणेकरून त्यांना ग्रहणाचा अनुभव उत्तम प्रकारे घेता येईल.

कॅलिफोर्नियातील एक कुटुंब ग्रहण पाहण्यासाठी थेट स्पेनला येण्याच्या तयारीला लागले आहे असं ग्रांडे यांनी मला सांगितलं. मॅड्रिडमधील या पूर्ण ग्रहणाचा नजराणा पाहण्याची संधी त्या कुटुंबाने गमावू नये, असं त्यांना मनापासून वाटत होतं.

यामुळेच अवेलेनोसामध्ये त्यांना राहण्यासाठी कोणी जागा देईल का, याची चौकशी ते घराघरांत जाऊन करत होते. जेणेकरून त्यांना अशा ठिकाणाहून ग्रहण पाहता येईल, ज्याला ग्रांडे हे स्पेनमधील सर्वात उत्तम 'व्ह्यूइंग पॉइंट' मानतात.

"अवघ्या 10 लोकांची वस्ती असलेलं हे गाव अचानक प्रसिद्धीच्या झोतात तूरआल्यावर त्यांना कसं वाटतं, g नक्की कसं वाटतंय?" असा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा ग्रांडे हसले आणि मान हलवत म्हणाले, "हे अगदी असंच आहे"

आपले एवढेसे छोटे गाव, भले काही दिवसांसाठी असो, पण जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत आहे.

संपूर्ण बुर्गोस शहरात लोक ग्रहण पाहण्यासाठी खास जागा आणि कार्यक्रम आयोजित करत आहेत. मात्र अवेलेनोसा डी मुन्योमध्ये स्थानिक रहिवासी आणि बाहेरून आलेले पर्यटक गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या गुंफेच्या दिशेने जातील.

हे गाव बनणार जगाचे केंद्र

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य क्षितिजापासून अवघ्या 8 अंश वर असेल. त्यामुळे पश्चिमेकडचे दृश्य स्पष्ट दिसणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी उंचावर असलेल्या या गुंफा हा अनोखा खगोलीय नजराणा पाहण्यासाठी सर्वात उत्तम जागा ठरतात.

पण या गुंफा म्हणजे फक्त ग्रहण पाहण्यासाठीची छान जागा नव्हे. वर्षानुवर्षे, गावात कमी-कमी होत चाललेले लोक एकत्र येऊन संध्याकाळचा सूर्य मावळताना पाहण्यासाठी याच ठिकाणी जमायचे. एका जुन्या रहिवाशाने तर मृत्यूनंतर आपल्या अस्थीही याच ठिकाणी विसर्जित करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळेच या ठिकाणाशी गावकऱ्यांचे खूप खोल भावनिक नाते जुळलेले आहे.

अवेलेनोसा हे अल्व्हारेझ यांच्यासाठी असे ठिकाण आहे जे त्यांनी कधीच सोडले नाही आणि ते कधी सोडणारही नाहीत. तर दुसरीकडे ग्रांडे आयुष्यात जवळजवळ दरवर्षी येथे परत येत राहिले आहेत. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत अल्व्हारेझ यांच्या मुली आपल्या मूळ घरी परत येतात आणि आईच्या जाण्यानंतरही ते इथे येणं असेच चालू ठेवणार आहेत.

ग्रांडे आता आपल्या मुलांना, नातवंडांना आणि मित्रांनासुद्धा इथे सोबत घेऊन येतात. लहानपणी या मातीशी आपले जसे भावनिक नाते जुळले होते तसेच नाते त्यांच्याही मनात निर्माण व्हावे अशी त्यांची इच्छा आहे जेणेकरून उद्या त्यांच्या नातवंडांनाही या गावी परत येण्याचे वेध लागतील.

ते मला म्हणाले, "माझ्या मनामध्ये या गावासाठी जे प्रेमाचे आणि आपुलकीचे स्थान आहे तसेच नाते माझ्या मुलांचे आणि नातवंडांचेही या गावाशी जुळावे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे."

ग्रहणाच्या त्या दिवशी अवेलेनोसा डी मुन्यो हे गाव पुन्हा एकदा माणसांनी आणि त्यांच्या गप्पांनी गजबजणार आहे.

या जागांवर कधीकाळी हॉटेल्स असायचे तिथे आता ग्रील केलेल्या मटणाच्या खमंग धुराने भरून जातील आणि जिथे पूर्वी शाळा भरायची तिथे पुन्हा एकदा लहान मुलांची मुलांच्या हसण्याचा आणि किलबिलाटाचा आवाज घुमू लागेल.

यानंतर अवघ्या काही मिनिटांसाठी दोन वेळेस असा काळोख दाटून येईल. आणि भूगोलाच्या एका अद्भुत योगायोगाने स्पेनमधील हे आजवर दुर्लक्षित राहिलेलं अगदी छोटंसं गाव काही क्षणांसाठी संपूर्ण जगाचं केंद्रबिंदू बनेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)