नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, तीव्रता 4.3 रिश्टर स्केल; दोन आठवड्यांमध्ये 20 हून अधिक वेळा झाला भूकंप

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 10 वाजून 1 मिनिटाच्या सुमारास 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार हा भूकंप रात्री 10 वाजून 0 मिनिटे आणि 59 सेकंदांनी झाला.
NCS च्या नोंदीनुसार या भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती. भूकंपाचं केंद्र नाशिक शहराच्या सुमारे 48 किलोमीटर उत्तर-वायव्य दिशेला असल्याचं NCS ने सांगितलं आहे.
याआधी 6 ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर 25 जुलैपासून आतापर्यंत 22 वेळा नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं समोर आलंय.
'नागरिकांनी अजिबात घाबरू नका, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वांनी फक्त सतर्क रहा,' असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे.
जिल्ह्यात कुठे कुठे जाणवले धक्के?
शनिवार-रविवार च्या रात्री झालेल्या या भूकंपाचे धक्के नाशिक शहरातील काही भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांत जाणवले. जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
तसेच, नाशिकमधील इंदिरानगर, पंचवटी, पाथर्डी, हिरावाडी, नाशिक रोड, द्वारका, म्हसरूळ, जेल रोड आणि दिंडोरी रोड परिसरातील नागरिकांनी कंपन जाणवल्याचं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नाशिकच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या हालचालींची नोंद होत आहे. NCS च्या नोंदीनुसार 25 जुलैपासून नाशिक परिसरात 3.6, 2.9, 3.9, 3.7, 2.8 आणि 3.5 मॅग्निट्यूडचे भूकंप नोंदवले गेले आहेत.
6 ऑगस्टलाही नाशिक परिसरात 3.6 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला होता. त्याच दिवशी NCS च्या नोंदीनुसार 2.5, 2.8, 2.7, 3.0 आणि 3.0 मॅग्निट्यूडचे इतर धक्केही नोंदले गेले आहेत.
पहाटे पुन्हा तीन धक्के
8 ऑगस्टच्या रात्री 4.3 मॅग्निट्यूडच्या भूकंपानंतर 9 ऑगस्टच्या पहाटे नाशिकमध्ये आणखी तीन धक्के नोंदवण्यात आले.
NCS च्या माहितीनुसार पहिला धक्का रात्री 1 वाजून 34 मिनिटांनी 3.1 मॅग्निट्यूडचा, त्यानंतर 1 वाजून 43 मिनिटांनी 2.9 मॅग्निट्यूडचा आणि सकाळी 5 वाजून 33 मिनिटांनी 3.3 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला.
दरम्यान, नाशिक जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, NCS च्या नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता 4.3, तर MERI, नाशिकच्या नोंदीनुसार 4.1 मॅग्निट्यूड होती. भूकंपाची खोली सुमारे 5 किलोमीटर असल्याचंही या आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कुठेही जीवितहानी झालेली नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावं, विशेषतः कच्च्या अथवा दगड-मातीच्या बांधकामाच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती किंवा संदेश पुढे पाठवू नयेत, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गरज भासल्यास नागरिकांनी जवळच्या तहसील कार्यालय, पोलीस पाटील, तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असं प्रशासनानं सांगितलं आहे.
सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
'सतर्क राहण्याची गरज' - जिल्हाधिकारी
नागरिकांनी घाबरून जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, तर केवळ सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना त्यांच्या घराची किंवा इमारतीची पाहणी करण्याचे आवाहन केले आहे. भूकंपामुळे इमारतीला तडे गेले आहेत का किंवा इतर कोणताही धोका निर्माण झाला आहे का, याची खात्री करून घ्यावी. अशा प्रकारचा धोका आढळल्यास तातडीने स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधावा आणि संबंधित इमारतीत राहणे टाळावे, असे त्यांनी सांगितले.

फोटो स्रोत, Getty Images
घाट परिसरातील भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांतील नागरिकांनीही विशेष सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीला तडे गेले आहेत का किंवा जमिनीखालून पाणी वाहण्याचे आवाज येत आहेत का, याची पाहणी करावी. अशा प्रकारची चिन्हे दिसल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि स्थानिक प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले.
सध्या जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्रशासनाकडे आलेली नाही. सर्व संबंधित यंत्रणांना पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असून परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. घाबरण्याचे कारण नसले, तरी सतर्क राहण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमध्ये एवढे भूकंप का होत आहेत?
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मग हे धक्के का होत आहेत आणि त्यांची तीव्रता तुलनेने कमी असूनही ते इतके जाणवत का आहेत?
नाशिक जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये या भूकंपांमागील संभाव्य कारणांची माहिती दिली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, तांत्रिकदृष्ट्या हे कमी तीव्रतेचे भूकंप आहेत. मात्र, 8 ऑगस्टच्या भूकंपाचा धक्का जमिनीखाली अवघ्या 5 किलोमीटर खोलीवर झाला. भूकंपाची खोली जितकी कमी असेल, तितका त्याचा हादरा जमिनीवर अधिक जाणवू शकतो.
मग या धक्क्यांमागे जमिनीखाली नेमकं काय घडतंय?
जिल्हा प्रशासनाच्या स्पष्टीकरणानुसार, भारतीय टेक्टॉनिक प्लेट उत्तरेकडे सरकत असून तिची युरेशियन प्लेटशी सतत टक्कर होत आहे. हिमालयात होणाऱ्या या टकरीमुळे निर्माण होणारा भौगोलिक ताण शेकडो किलोमीटर दूर असलेल्या दख्खनच्या पठारापर्यंत आणि नाशिकपर्यंत पोहोचतो. भूगर्भशास्त्रात याला intraplate stress म्हटलं जातं.
सोप्या भाषेत सांगायचं तर, एका कठीण टेक्टॉनिक प्लेटच्या आत हा ताण साठत जातो. नाशिकच्या पश्चिमेकडील भागात जमिनीखाली जुन्या भेगा म्हणजेच faults आहेत. या भेगांवर या ताणाचा परिणाम होत राहतो.
मात्र, या प्रक्रियेत पावसाचीही भूमिका असू शकते, असं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, सुरगाण्यासारख्या भागात मुसळधार पाऊस पडल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत झिरपतं. हे पाणी बेसॉल्ट खडकांमधील भेगांमधून जमिनीखाली पोहोचू शकतं. त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा दाब, म्हणजेच fluid pore pressure, वाढू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हा वाढलेला पाण्याचा दाब आधीच ताण असलेल्या भेगांमधील घर्षण कमी करू शकतो. परिणामी या भेगांमध्ये हालचाल होऊन भूकंपाचे धक्के निर्माण होऊ शकतात. नाशिक जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाने दिलेल्या तांत्रिक स्पष्टीकरणानुसार, सध्याच्या भूकंपांच्या मालिकेमागे पावसामुळे जमिनीत झिरपलेल्या पाण्याची ही भूमिका असण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी परिसरात जाणवत असलेल्या या धक्क्यांना earthquake swarm म्हणूनही संबोधलं जात आहे.
Earthquake swarm म्हणजे कमी कालावधीत एका विशिष्ट परिसरात कमी तीव्रतेचे अनेक भूकंप होणे. यात एखादा एकच मोठा किंवा विनाशकारी main shock असणं आवश्यक नसतं.
अशा परिस्थितीत भूगर्भातील साठलेला ताण एकाच मोठ्या धक्क्याऐवजी छोट्या-छोट्या भूकंपांच्या मालिकेतून बाहेर पडू शकतो.
मग हे धक्के कमी तीव्रतेचे असूनही इतके जोरात का जाणवतात?
यामागे दोन कारणं असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. पहिलं म्हणजे या भूकंपांची खोली तुलनेने कमी आहे. 8 ऑगस्टच्या भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती.
दुसरं कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे जमिनीत वाढलेलं पाणी. पाण्याने भरलेल्या मातीमधून भूकंपाच्या लाटा प्रवास करताना त्यांचा परिणाम काही ठिकाणी अधिक जाणवू शकतो.
नाशिकमध्ये याआधीही भूकंप झाले आहेत का?
नाशिक परिसरात भूकंपीय हालचाली यापूर्वीही नोंदवल्या गेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या भागात 1869 आणि 1935 मध्ये सुमारे 5.0 तीव्रतेचे भूकंप नोंदले गेले होते.
त्यानंतर 2022 मध्येही नाशिक परिसरात भूकंपांच्या धक्क्यांची नोंद झाली होती आणि आता 2026 मध्ये पुन्हा अशा प्रकारची भूकंपीय हालचाल दिसत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मते, या भागात भूकंपाच्या हालचालींचा इतिहास जुना आहे. त्यामुळे सध्याची भूकंपांची मालिका पूर्णपणे नवीन घटना नाही.
नाशिकचा समावेश Seismic Zone III मध्ये होतो. याचा अर्थ हे केवळ मध्यम धोक्याचं क्षेत्र आहेत्यामुळे इथे अतिप्रचंड किंवा सर्वनाश करणारा भूकंप होण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच विनाकारण पॅनिक होण्याचं काहीच कारण नाही असं प्रशासनाने म्हटलं आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि भूकंपासंदर्भातील माहिती केवळ अधिकृत यंत्रणांकडून घ्यावी, असंही प्रशासनाने आवाहन केलं आहे.
भूकंप कशामुळे येतात?
पृथ्वीचं कवच एकसंध नाही तर अनेक टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे भूपट्टांनी मिळून बनलं आहे. या भूपट्टांच्या सीमा जिथे एकमेकांना भिडतात, तिथे भूगर्भीय हालचालींची तीव्रता जास्त असते.
या प्लेट्स एकमेकांशी घासतात, एकमेकांपासून दूर जातात किंवा कधी एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते.
वर्षाला जास्तीत जास्त 1 ते 10 सेंटीमीटर एवढ्या मंद गतीनं ही हालचाल होत असते. पण कधीकधी त्यातही अडथळा येऊन दबाव निर्माण होतो. मग अचानक तो दबाव मोकळा होतो, तेव्हा त्यातून मोठा भूकंप येऊ शकतो.
पृथ्वीवर असे तीन मुख्य प्रदेश आहेत जिथे मोठ्या भूपट्टांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायर, मिड अटलांटिक रिज आणि अल्पाईड बेल्ट म्हणजे आल्प्सपासून हिमालयापर्यंतचा पट्टा.

अल्पाईड बेल्टच्या पूर्व भागात भारतीय भूपट्ट ही युरेशियन प्लेटखाली जाते आहे, त्यातून हिमालय पर्वत आणि उत्तर भारताचा भाग, अंदमान आणि कच्छचं रण तसंच तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये भूकंप होतात.
युरोपचा दक्षिण भाग, तुर्की, सीरिया, इराण हे देशही याच अल्पाईड बेल्टमध्ये आहेत.
पण भूपट्टांच्या हालचाली कमी असलेल्या ठिकाणीही भूकंप येऊ शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लातूर आणि कोयनानगरला झालेले भूकंप.
खडक आणि मातीतले बदल, ज्वालामुखी आणि लाव्हा रसाच्या हालचाली, जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह अशा गोष्टींमुळे असे भूकंप निर्माण होऊ शकतात.
कधीकधी अणुस्फोट खाणकाम, तेलासाठी केलं जाणारं उत्खनन, मोठ्या धरणांमुळे तयार झालेले तलाव अशा मानवनिर्मिती गोष्टींमुळे भौगोलिक रचनांवर परिणाम होऊन भूकंप येऊ शकतात.
भूकंप आला तर काय करायचं?
भूकंप सुरू झाला की तडक घराबाहेर पडा, असा सल्ला अनेकजण देतात.
पण यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे या अमेरिकेतील सरकारी वैज्ञानिक संस्थेचे तज्ज्ञ सांगतात, की जमिनीचं थरथरणं थांबेपर्यंत तुम्ही असाल तिथेच सुरक्षितरित्या थांबलात इजा होण्याचा धोका कमी होतो.
'ड्रॉप, कव्हर अँड होल्ड ऑन' असा मंत्र ते देतात. हात आणि गुडघे खाली टेकून राहा - म्हणजे तुम्ही स्वतः पडणार नाही.
टेबलासारख्या वस्तूंखाली आश्रय घ्या आणि टेबल वगैरे नसेल तर डोकं कव्हर करून कंपनं थांबेपर्यंत फार हालचाल न करता स्थिर राहायचा प्रयत्न करा.
काहीजण दरवाजात उभं राहायचा सल्ला देतात, पण सगळेच दरवाजे सुरक्षित नसतात.

भूकंप थांबल्यावर काय करायचं?
तुम्ही ज्या इमारतीत आहात ती मजबूत असेल तर तिथेच थांबा, पण झुंबरं, खिडक्या किंवा गॅलरीपासून दूर राहा कारण असे भाग लवकर कोसळण्याची शक्यता असते.
इमारत धोकादायक झाली असेल तर कंपनं थांबल्यावर लवकरात लवकर मैदानात किंवा अशा उघड्या जागी जा. कारण अनेकदा मोठ्या भूकंपानंतर आफ्टरशॉक म्हणजे छोटे भूकंप येण्याची शक्यता असते.
पण उंच इमारती, इलेक्ट्रिक तारा, झाडं किंवा कुठल्या पिलर्स किंवा पोल्सपासून दूर राहा. भूकंपादरम्यानही तुम्ही रस्त्यावर किंवा कुठे मोकळ्या जागी असाल, तर या गोष्टींपासून दूर राहायचं लक्षात ठेवा.
भूकंपानंतर गॅसपाईपलाईन फुटून गळती होण्याचा धोकाही असतो. तसंच आगीचा धोका असलेल्या जागांपासून दूर राहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























