पश्चिम घाटातील 'चतुर' आणि 'टाचणी'सारखे कीटक नामशेष होण्याचा धोका

फोटो स्रोत, Chatur Ullu Lab
- Author, शर्लिन मोलन
- Role, मुंबई
- वाचन वेळ: 5 मिनिटे
भारताच्या पश्चिम घाटातील 'चतुर' (ड्रॅगनफ्लाय) आणि 'टाचणी' (डॅमसेलफ्लाय) या कीटकांच्या प्रजातींवर करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष एकाच वेळी लक्षवेधी आणि चिंताजनक आहे. या प्रकारचं हे पहिलंच संशोधन आहे.
पश्चिम घाट हा जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या जैवविविधता असणाऱ्या आणि तिथल्या विविध प्रजाती धोक्यात आलेल्या प्रदेशांपैकी (बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स) एक आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं या संशोधनाला अर्थसहाय्य केलं होतं. हा अभ्यास भारतातील 5 राज्यांमध्ये 2 वर्षांच्या (2021-2023) कालावधीत करण्यात आला.
या अभ्यासातून समोर आलं की, भारताच्या पश्चिम घाटात चतुर (ड्रॅगनफ्लाय) आणि टाचणी (डॅमसेलफ्लाय) या कीटकांच्या 143 विविध प्रजातींचं वास्तव्यं आहे. यातील किमान 40 प्रजाती या प्रदेशातील स्थानिक प्रजाती आहेत. त्याचा अर्थ, या प्रजाती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत.
कीटकांच्या प्रजातींमध्ये मोठी घट
या अभ्यासातून संशोधकांना एक चिंताजनक गोष्टही आढळली. ती म्हणजे या प्रदेशात यापूर्वी नोंदवण्यात आलेल्या किमान 79 अतिरिक्त प्रजाती यावेळेस आढळल्या नाहीत. तसंच पश्चिम घाटात, चतुर आणि टाचणी या कीटकांच्या प्रजातींच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांची घट झाली आहे.
पंकज कोपर्डे, उत्क्रांती पर्यावरणशास्त्रज्ञ (इव्होल्युशनरी इकॉलॉजिस्ट) आहेत. त्यांनी या अभ्यासाचं नेतृत्व केलं.
प्रजातींची संख्या कमी होण्यामागच्या कारणाबद्दल पंकज म्हणाले की, यातील काही प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहेत किंवा त्या विशिष्ट ऋतूंमध्येच सक्रिय असतात. त्यामुळे संशोधकांच्या नजरेतून त्या सुटल्या असल्या असाव्यात किंवा त्यांना त्या दिसल्या नसाव्यात.
मात्र ते असंही म्हणाले की प्रजातींच्या संख्येतील ही घट होण्यामागे, कदाचित प्रजातींचा संभाव्य ऱ्हास म्हणजेच त्यातील काही प्रजाती नामशेष होणं, हे कारण असावं.

फोटो स्रोत, Chatur Ullu Lab
"चतुर आणि टाचणी हे कीटक या प्रदेशातील पर्यावरणाची स्थिती चांगली आहे की नाही याचे उत्तम निदर्शक आहेत. त्यामुळेच जेव्हा या कीटकांची संख्या घटते, तेव्हा इतल्या परिसंस्थेत संभाव्य ऱ्हास किंवा हानी झाल्याचा तो संकेत असू शकतो," असं कोपर्डे म्हणाले.
पश्चिम घाटातील अद्भूत जैवविविधता
पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर पसरलेली 1,600 किलोमीटरची पर्वतरांग आहे. पश्चिम घाटाला युनेस्कोनं 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून जाहीर केलं आहे.
हा प्रदेश भारतातील सर्वात महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांपैकी एक आहे. इथे जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या किमान 325 प्रजाती राहतात. तसंच भारतात आढळणाऱ्या वनस्पती, झाडं आणि प्राण्यांच्या 30 टक्क्यांहून अधिक प्रजातीचं इथे वास्तव्य आहे.
स्थानिक किंवा विशिष्ट स्थानाशी निगडीत प्रजातींच्या बाबतीतदेखील हा प्रदेश विशेषकरून समृद्ध आहे. या प्रजातींमध्ये झालेली उत्क्रांती वैशिष्ट्यपूर्ण अनोखी आहे.
ती या प्रजातींच्या अधिवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रदेश किंवा भागातील हवामानाचं नियमन करण्यामध्ये किंवा परागीकरणाद्वारे जैवविविधता टिकवून ठेवण्यात या प्रजाती मदत करू शकतात.
पश्चिम घाटातील प्रजाती आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त करणारे विविध अहवाल
दुर्दैवानं, पश्चिम घाटदेखील धोक्यात आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन)नं त्यांच्या 2025 च्या अहवालात या प्रदेशाचं वर्गीकरण 'अत्यंत चिंताजनक' या प्रकारात केलं होतं.
"शेतीच्या विस्तारासह शहरीकरण, पशुधनाला चरण्यासाठी कुरणं, पायाभूत सुविधांचा विकास (पवनचक्क्या आणि धरणं), परकीय किंवा इतर प्रदेशातील आलेल्या प्रजाती आणि खाणकाम यामुळे या प्रदेशाला गंभीर धोका निर्माण होतो आहे," असं त्या अहवालात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Chatur Ullu Lab
तसंच 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या चिंता व्यक्त करणाऱ्या एका अभ्यासातून आढळलं होतं, की गॅलेक्सी फ्रॉग्स किंवा दीर्घिका बेडूक ही दुर्मिळ प्रजाती पश्चिम घाटातून नाहीशी झाली. फोटोग्राफर्सनं या प्रजातीच्या नाजूक नैसर्गिक अधिवासाला म्हणजे जंगलातील जमिनीवरच्या त्यांच्या अधिवासाला पायाखाली चिरडल्यामुळे हे बेडूक नाहीसे झाले.
तर 2024 मध्ये केलेल्या एका अभ्यासातून आढळलं की, पश्चिम घाटातील कृषी पद्धतींमुळे तिथल्या बेडकांच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. तसंच 2023 मध्ये या प्रदेशात पक्षांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात नोंदवण्यात आलं की पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती असलेल्या पक्षांच्या 12 प्रजातींमध्ये 75 टक्क्यांची घट झाली आहे.
कोपर्डे म्हणाले की त्यामुळेच पश्चिम घाटात राहणाऱ्या प्रजातींचा मागोवा घेणं, त्यांची नोंद ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र आतापर्यंत, या प्रदेशातील चतुर आणि टाचणी या कीटकांच्या संख्येची योग्यप्रकारे नोंद करण्यात आलेली नाही.
संशोधकांची पायपीट आणि नवीन प्रजातींचा शोध
हा अभ्यास करण्यासाठी, कोपर्डे आणि त्यांच्या टीमला पश्चिम घाटातील दुर्गम ठिकाणी डोंगरावर चढावं लागलं. त्यांना कठीण भागातून जावं लागलं. शेवाळानं झाकलेले नदीकाठ आणि खारफुटीच्या दलदली अशा भागांमधून जावं लागलं. ते या भागात पहाटेच्या वेळेस जायचे आणि कीटकांना शोधण्याचं, त्यांची नोंद घेण्याचं आणि गोळा करण्याचं काम अनेक तास करत असत.
त्यांनी चतुर आणि टाचणी या कीटकांच्या 7 नवीन प्रजाती शोधल्या, असं कोपर्डे म्हणाले. त्यातील एका प्रजातीला त्यांनी 'प्रोटोस्टिक्टा आर्मागेडोनिया' असं नाव दिलं. 'इकॉलॉजिकल आर्मागेडन' म्हणजे पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास या संदर्भात त्यांनी हे नाव दिलं आहे. जगभरातील कीटकांच्या संख्येत विनाशकारी घट होते आहे, त्याचं वर्णन करण्यासाठी ही संज्ञा वापरली जाते.
कोपर्डे आणि त्यांची टीम सध्या, त्यांनी या भागात नोंद केलेल्या सर्व प्रजातींची जेनेटिक लायब्ररी म्हणजे जनुकीय ग्रंथालय तयार करण्याचं काम करते आहे. ते म्हणाले की कोणत्या भागात कोणती विशिष्ट प्रजाती विकसित किंवा उक्रांत झाली असावी, हे ओळखण्यास यामुळे मदत होऊ शकेल.

फोटो स्रोत, Chatur Ullu Lab
पश्चिम घाटाची उत्पत्ती आणि इथल्या प्रजातींमधील उक्रांती
पश्चिम घाट ज्याप्रकारे निर्माण झाला, ते लक्षात घेता या प्रदेशातील चतुर आणि टाचणी या कीटकांचं उत्क्रांतीविषयक जीवशास्त्र विशेषकरून रंजक ठरतं, असं कोपर्डे म्हणाले.
ज्युरासिक कालखंडात 'गोंडवाना' या महाकाय खंडाची विभागणी झाली. म्हणजे त्यातून अनेक खंड वेगळे झाले. या महाकाय खंडात आजचे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका हे भूभाग एकत्र होते. गोंडवानाच्या या विभागणीतूच किंवा विखंडित होण्यातूनच तेव्हा पश्चिम घाटाची निर्मिती झाली.
भारत जेव्हा आफ्रिका खंडापासून वेगळा झाला, तेव्हा भारताच्या पश्चिम कडेवर निर्माण झालेल्या भेगांमुळे एक पर्वतरांगेची निर्मिती सुरू झाली. या पर्वतरांगेला आज 'पश्चिम घाट' असं म्हटलं जातं.
"पश्चिम घाट साधारणपणे 15 कोटी वर्षे जुना आहे. तो हिमालयापेक्षाही प्राचीन आहे. ज्या प्रजाती आज पश्चिम घाटात आढळतात, त्यांच्या उत्क्रांतीची मूळं गोंडवानाच्या महाखंडामध्ये रुजलेली असू शकतात," असं कोपर्डे म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























