विजय यांना सरकार बनवण्यासाठी का बोलावलं जात नाहीये? तामिळनाडूच्या राज्यपालांनी सांगितलं कारण

फोटो स्रोत, ANI
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत तामिळनाडू वेत्री कळघमने (टीव्हीके) सर्वाधिक जागा जिंकून द्रविड पक्षांचा पराभव केला आहे. मात्र, 234 जागा असलेल्या विधानसभेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 जागा मिळवण्यात ते कमी पडले.
द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) सोबत युती करून निवडणूक लढवलेल्या काँग्रेसने पाच जागा जिंकल्या आहेत.
गेल्या दशकामध्ये अनेक निवडणुका एकत्र लढलेली द्रमुक-काँग्रेस आघाडी आता तुटली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याचे काँग्रेसनं म्हटलं आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या एका गटानं टीव्हीकेसोबत युती करण्याची उघडपणे इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता डीएमके-काँग्रेस आघाडीकडे पूर्ण बहुमत नसल्याने काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे.
अशा परिस्थितीत, 108 जागा जिंकलेल्या टीव्हीकेला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे, पण बहुमताचा जादुई आकडा अद्यापही दूरच आहे.
आवश्यक बहुमत मिळवण्यासाठी विजय यांनी द्रमुक आघाडीतील इतर काही पक्षांकडून पाठिंबा मागितला आहे. बुधवारी (6 मे) टीव्हीकेचे नेते विजय यांनी तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
परंतु, सरकार स्थापन करण्याचा दावा करूनही, तामिळनाडूच्या राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलेलं नाही. हा आता तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यपालांनी काय कारण सांगितलं?
राजभवनाने गुरुवारी (7 मे) जारी केलेल्या निवेदनात म्हटले, "तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी 7 मे रोजी टीव्हीकेचे अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांना चेन्नई येथील लोकभवनात आमंत्रित केले होते. या बैठकीदरम्यान राज्यपालांनी माहिती दिली की, सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले तामिळनाडू विधानसभेतील बहुमत अद्याप मिळालेले नाही."
विजय यांच्यासमोर काय पर्याय आहेत?
जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा आघाडी बहुमत मिळवू शकत नाही, तेव्हा त्यास 'त्रिशंकू विधानसभा' असं म्हटलं जातं.
अशा परिस्थितीमध्ये, तामिळनाडूच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. राज्यपाल सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देणं जाणीवपूर्वक टाळत आहेत का? किंवा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले द्रमुक आणि एआयएडीएमके हे दोन पक्ष एकत्र येत आघाडीचं सरकार स्थापन होणं शक्य आहे का?
टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्यासाठी काही पर्याय असू शकतात.
यापैकी एक म्हणजे इतर पक्षांकडून पाठिंबा मिळवणं. पण, सध्या केवळ काँग्रेसचा पाठिंबा पुरेसा ठरणार नाहीये. त्यामुळे, प्रत्येकी दोन जागा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही टीव्हीकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
इंडियन युनियन मुस्लीम लीगनेही (आययूएमएल) दोन जागा जिंकल्या आहेत. त्यांनीही सत्तेवर येणाऱ्या सरकारला 'रचनात्मक' पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे टीव्हीके आणि पाठिंबा दिलेल्या इतर पक्षांच्या एकूण जागांची संख्या 119 पर्यंत पोहोचू शकते. हा आकडा नक्कीच बहुमताच्या आकड्याच्या खूप पुढे जाणारा आहे.

फोटो स्रोत, Lokbhavan
दुसरा पर्याय अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचा आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून, राज्यपाल टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात आणि त्यानंतर टीव्हीके पक्ष राज्यातील इतर राजकीय पक्षांमधून सहकारी शोधण्यासाठी पावलं उचलू शकतो. मात्र, द्रमुक किंवा एआयएडीएमके या दोन्हीही पक्षांकडून याबाबतचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
'बीबीसी तामिळ'च्या वृत्तानुसार, तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, एआयएडीएमकेच्या अनेक आमदारांना पुदुचेरीमधील एका खासगी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, एआयएडीएमकेच्या एका गटाचं मत आहे की, पक्षानं टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यावा, तर दुसरा गट याला विरोध करत आहे. या विषयावर पक्षाचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक बैठक झाली.
मात्र, टीव्हीकेला एआयएडीएमकेचा पाठिंबा मिळत असल्याची बातमी खोटी आहे, असं एआयएडीएमकेचे माजी मंत्री केपी मुनुस्वमी यांनी स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "एआयएडीएमके टीव्हीकेला पाठिंबा देत असल्याच्या बातम्या येत आहेत, पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. महासचिव पलानीस्वामी यांच्या परवानगीनेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एआयएडीएमकेने कोणत्याही परिस्थितीत टीव्हीकेला पाठिंबा दिलेला नाही."
विजय यांच्या विजयामुळे कशा अडचणी वाढल्या?
जरी टीव्हीकेला बहुमतासाठी केवळ 10 जागांची कमतरता असली तरी, सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला प्रत्यक्षात किमान 12 अतिरिक्त आमदारांची गरज भासेल.
याचं कारण म्हणजे विजयच्या पक्षाने जिंकलेल्या 108 जागांपैकी दोन जागा या स्वत: विजयने जिंकल्या आहेत. त्या दोन जागा म्हणजे तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेरांबूर होय.

फोटो स्रोत, Sanchit Khanna/Hindustan Times via Getty Images
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, विजयला एक जागा रिक्त करावी लागेल, त्यामुळे पक्षाने जिंकलेल्या जागांची संख्या 107 होईल.
याव्यतिरिक्त, पक्षाला अध्यक्षांची निवड करणे देखील आवश्यक आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अध्यक्षांना मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे टीव्हीकेची प्रभावी संख्याबळ 106 पर्यंत कमी होते.
राज्यघटनेत काय म्हटलं आहे?
बीबीसी तामिळच्या वृत्तानुसार, निवृत्त न्यायाधीश हरिपरंथमन म्हणतात की, "पूर्ण संख्याबळ दिसल्यासच शपथविधीला परवानगी देऊ, असं राज्यपाल म्हणू शकत नाहीत."
बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले की, "सरकार स्थापन करण्यासाठी कुणालाही आमंत्रित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. जेव्हा कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसते, तेव्हा दावा करणाऱ्या पक्षाला आपलं संख्याबळ सिद्ध करण्यास सांगणं चुकीचं नाही."
ते पुढे म्हणाले की, "परंतु त्याच वेळी असंही म्हणता येणार नाही की, पूर्ण संख्याबळ दाखवल्यानंतरच शपथ घेण्यास परवानगी दिली जाईल. बहुमत सिद्ध करण्याचं योग्य ठिकाण म्हणजे विधानसभा."

फोटो स्रोत, Lokbhavan
सर्वोच्च न्यायालयाचे वकील कर्पका विनायगम म्हणतात की, "जर राज्यपालांचा दावा करणाऱ्या पक्षावर विश्वास असेल, तर ते त्याला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावतील."
बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले की, "सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या पक्षाला राज्यपालांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करता येणार नाही, पण दुसऱ्या बाजूला, ते खूप जास्त वेळही घेऊ शकत नाहीत."
ते म्हणाले की, "विधानसभा विसर्जित झाल्यानंतर ती जास्त काळ रिक्त ठेवता येणार नाही. त्यामुळे राज्यपालांनी या प्रकरणी तातडीनं निर्णय घ्यावा."
सरकार स्थापनेवर हक्क सांगणाऱ्या पक्षाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर शपथविधी सोहळा पार पडेल. राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदाची शपथ देतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























