You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पायलटनेच विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला', नेतन्याहूंचा दावा; दुबई-इस्रायल फ्लाइटमधील थरार
- Author, हफ्सा खलील
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
दुबईहून इस्रायलला जाणारं एक विमान वैमानिकांमधील वादानंतर सौदी अरेबियात उतरवण्यात आलं.
विमानातील एका इस्रायली प्रवाशाने पत्रकारांना सांगितलं की, क्रूने प्रवाशांकडे मदत मागितली. त्यानंतर प्रवाशांनी एका वैमानिकाला (पायलट) ताब्यात घेऊन त्याला बांधून ठेवण्यासाठी मदत केली.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फ्लाय दुबईच्या या विमानातील घटनेबाबत वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, "ज्या वैमानिकाने चाकूने हल्ला केला होता, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या सौदी अरेबियाचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत."
फ्लाय दुबईचं हे विमान बुधवारी (30 सप्टेंबर) सकाळी रवाना झालं होतं. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडार24 नुसार, उड्डाणानंतर सुमारे 2 तासांनी विमानाने आपत्कालीन संदेश (इमर्जन्सी कोड) दिला.
काही मिनिटांनी विमानाचा हा कोड बदलून अपहरण म्हणजे हायजॅकिंगचा कोड करण्यात आला. मात्र, त्यानंतर पुन्हा तो सामान्य आपत्कालीन संकेतामध्ये बदलण्यात आला.
नाव न सांगण्याच्या अटीवर इस्रायली अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या मते, या वैमानिकाला विमान हायजॅक करायचं होतं किंवा ते पाडायचं होतं.
परंतु, या हल्ल्यामागचा पायलटचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. याबाबत अधिकृत माहितीही अद्यापही समोर आलेली नाही.
नेतन्याहू यांनी आणखी काय म्हटलं?
नेतन्याहू यांनी आपल्या निवेदनात म्हटलं, "विमान इस्रायलजवळ पोहोचले असताना एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकावर चाकूने हल्ला केला. प्रवाशांसह विमान क्रॅश करण्याचा त्याचा प्रयत्न होता, असं दिसून येतं."
"मी विमानातील एका इस्रायली प्रवाशाशी बोललो. त्यानं सांगितलं की, विमान अचानक वळू लागले आणि खाली जाऊ लागलं. त्यानंतर तो एका क्रू मेंबरसोबत कॉकपिटमध्ये जाण्यात यशस्वी झाला. दोघांनी मिळून चाकूने हल्ला करणाऱ्या पायलटला पकडलं. हा वैमानिक विमानाची यंत्रणा निकामी करण्याचा प्रयत्न करत होता."
"विमानातील आणखी एक क्रू मेंबरही कॉकपिटमध्ये पोहोचला आणि त्याने विमानाचा ताबा घेऊन ते स्थिर केले."
"या धाडसी लोकांना मी सलाम करतो. त्यांनी प्रसंगावधान राखत धैर्य दाखवलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टाळली."
"विमान सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षित उतरलं. सर्व प्रवासी आता सुरक्षित आहेत.
"चाकूने हल्ला करणाऱ्या वैमानिकाला अटक करण्यात आली असून, सध्या सौदी अधिकारी त्याची चौकशी करत आहेत," असं पंतप्रधान नेतन्याहूंनी म्हटलं.
हल्ला करणाऱ्या वैमानिकाला 'अशा' प्रकारे ताब्यात घेतलं
विमानातील एका प्रवाशाने इस्रायली वृत्तपत्र 'हारेत्झ'ला सांगितलं की, विमानावरील नियंत्रण सुटलं होतं. ठरलेल्या वेळेच्या सुमारे 1 तास आधी विमान अचानक वेगाने खाली येऊ लागलं होतं.
डालिया श्पीगल नावाच्या या प्रवाशाने वृत्तपत्राला सांगितलं, "अचानक संपूर्ण विमानात भीतीदायक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्यानंतर 3 ते 5 जण कॉकपिटमध्ये घुसले. त्यांनी हल्ला करणाऱ्या पायलटला ताब्यात घेतलं आणि जखमी पायलटवर उपचार सुरू केले."
श्पीगल म्हणाले, "आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे आम्हाला वाटलं, त्यामुळे उड्डाण सुरूच ठेवलं. हळूहळू कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती समोर येऊ लागली."
त्यांनी सांगितलं की, त्यानंतर या 'तरुणांनी' पुढाकार घेतला आणि प्रवाशांना मदत करण्यास सुरुवात केली. दरम्यान, विमानाचा मार्ग बदलण्यात आला आणि ते सौदी अरेबियात उतरण्यासाठी रवाना झाले.
ते म्हणाले, "आता आम्ही सर्वजण टर्मिनलमध्ये आहोत. वैद्यकीय पथक आमची तपासणी करत आहे."
विमानातील व्हीडिओमध्ये काय दिसलं?
इस्रायली प्रसारमाध्यमांनी शेअर केलेल्या एका व्हीडिओमध्ये विमानातील एक प्रत्यक्षदर्शी 'चाकू घेतलेल्या हल्लेखोराने एका वैमानिकावर हल्ला केला', असे सांगताना दिसत आहे.
बीबीसी व्हेरिफायने या व्हीडिओची तपासणी केली. व्हीडिओमध्ये एआयच्या मदतीने फेरफार केल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. तसेच, ही घटना घडण्यापूर्वी हा व्हीडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता, असेही दिसून आले नाही.
व्हीडिओमध्ये विमानाच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसतो. तो म्हणतो, "आम्ही विमानावर नियंत्रण मिळवलं आहे. चाकू घेतलेल्या एका हल्लेखोराने एका वैमानिकावर हल्ला केला होता."
तो सांगतो की, कथित हल्लेखोराला कॉकपिटमधून बाहेर काढण्यात आलं असून आता सर्व काही 'ठीक' आहे.
तो म्हणतो, "एक वैमानिक गंभीर जखमी आहे."
"दुसरा वैमानिकही जखमी झाला आहे. पण, तो विमान उतरवण्याच्या स्थितीत आहे. त्याच्यासोबत क्रूचे दोन सदस्य आहेत. कॉकपिटचा दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे, याची आम्ही खात्री केली. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. आता सर्व काही ठीक आहे."
तो पुढे सांगतो की, या घटनेतील संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
इस्रायली प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, विमानात पायलट आणि को-पायलट यांच्यात भांडण झालं. त्यानंतर विमानातून आपत्कालीन संदेश पाठवण्यात आला. त्यामुळे काही काळासाठी विमान हायजॅक झाल्याची शक्यता निर्माण झाली.
फ्लाइट FZ1073 ने संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. या विमानात सुमारे 150 ते 180 प्रवासी होते. यातील बहुतांश प्रवासी हे इस्रायली नागरिक होते.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट 'फ्लाइटरडार24' नुसार, उड्डाणानंतर साधारण 2 तासांनी विमानाने आधी 'स्क्वॉक कोड 7700' हा कोड पाठवला. हा सामान्य आपत्कालीन स्थितीचा संकेत असतो.
काही मिनिटांनी विमानाने 7500 कोड पाठवला. हा विमान हायजॅक झाल्याचा किंवा त्यात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचा संकेत असतो. त्यानंतर विमानाने पुन्हा 7700 कोड पाठवला.
विमानाचा कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर जखमी
फ्लाय दुबई कंपनीने सांगितलं आहे की, या घटनेत कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.44 वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरला विमानाच्या आपत्कालीन लँडिंगचा संदेश मिळाला.
यानंतर सुमारे एक तासानंतर विमान सुरक्षितपणे रनवेवर उतरले.
प्रवाशांनी इस्रायली प्रसारमाध्यमांना सांगितलं की, सौदी अरेबियाकडे विमान वळवण्यापूर्वी एका पायलटला चाकूने जखमी करण्यात आलं होतं.
इस्रायली प्रसारमाध्यमांमध्ये एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. बीबीसी व्हेरिफायने तपासणी केल्यानंतर हा व्हीडिओ खरा असल्याचे आढळून आले आहे.
या व्हीडिओत एक व्यक्ती सेल्फी व्हीडिओ करताना म्हणतो, "आम्ही इथे आहोत. विमानातील दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवलं आहे. आम्ही लवकरच लँडिंग करणार आहोत. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि कोणालाही दुखापत झालेली नाही. केवळ वैमानिक जखमी आहे. आम्हाला मदतीची गरज आहे."
वाचवणारा वैमानिक ब्रिटिश वंशाचा
एल्मोग इताली नावाच्या एका प्रवाशाने प्रसारमाध्यमांना सांगितलं की, विमानाचा ताबा घेणारे दोन्ही वैमानिक हे रिलीफ पायलट होते. त्यांना पुढची फ्लाइट चालवायची होती.
इताली यांनी सांगितलं, "यापैकी एक वैमानिक ब्रिटिश होता. दुसरा वैमानिक युरोपियन होता, मात्र त्याचं नेमके राष्ट्रीयत्व माहीत नाही."
इताली म्हणाले की, कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, हे समजलं नाही. मात्र, दुसऱ्या वैमानिकांनी विमानाचा ताबा घेतला, ते स्थिर केलं आणि सौदी अरेबियात सुरक्षित उतरवलं.
इताली यांनी सांगितलं, "दोन वैमानिकांसमोर चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेला एक वैमानिक पडला होता, हे अगदी स्पष्ट आहे."
इस्रायली प्रसारमाध्यमांनी शेअर केलेला एक व्हीडिओ बीबीसी व्हेरिफायने तपासला असून, तो खरा असल्याचे आढळले आहे.
या व्हीडिओमध्ये विमानाच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बोलताना म्हणतो, "आम्ही विमानाचा ताबा घेतला. चाकू घेतलेल्या एका हल्लेखोराने एका वैमानिकावर हल्ला केला आहे."
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
यास्मिन नावाच्या एका महिलेनं सांगितलं की, दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानात त्यांची मुलगीही होती.
त्यांच्या मुलीने फोन करून सांगितलं की, विमानात कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. एक पायलट मदतीसाठी हाक मारत होता.
यास्मिन यांनी एपी या वृत्तसंस्थेला सांगितलं, "विमानावरचं नियंत्रण सुटल्यासारखं वाटू लागलं. सर्व प्रवासी ओरडू लागले. आता आपला जीव वाचणार नाही, असं त्यांना वाटलं."
यास्मिन यांनी रॉयटर्सला सांगितलं की, इतर दोन पायलटांनी विमानाचा ताबा घेतला. त्याच वेळी काही प्रवासी चाकू हातात असलेल्या एका व्यक्तीच्या दिशेने धावले.
"एक मोठा आणि गंभीर अपघात टळला", असं एका इस्रायली अधिकाऱ्याने चॅनेल 12 सांगितलं.
'द जेरुसलेम पोस्ट'नेही एका निनावी इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'एक मोठा अपघात थोडक्यात टळला' असल्याचं सांगितलं.
'दोन मिनिटांत विमान 17 हजार फूट खाली आलं'
फ्लाइटरडार24च्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीमध्ये विमानाने अचानक दिशा बदलली आणि ते वेगाने खाली येऊ लागलं. दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात विमान 17 हजार फूट म्हणजेच 5 हजार मीटरपेक्षा जास्त खाली आलं.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.21 वाजता हे विमान 34 हजार फूट उंचीवर उड्डाण करत होते.
अचानक खाली आल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी विमानाने 7 मिनिटांपर्यंत आपत्कालीन संदेश पाठवला.
सकाळी 5.40 वाजता विमान काही वेळासाठी जॉर्डनच्या हवाई हद्दीत गेलं. काही मिनिटांनी ते पुन्हा सौदी अरेबियाच्या दिशेने वळलं आणि त्यानंतर खाली उतरण्यास सुरूवात केली.
विमानाला तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर उतरायचं होतं. पण, ते उत्तर-पूर्व (ईशान्य) सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर उतरलं.
प्रवाशांनी नंतर स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं की, विमान अचानक खाली येऊ लागल्याने त्यांना आपल्या जीवाची भीती वाटू लागली होती.
'हाणामारी झाली अन्'
एका इस्रायली अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, पायलटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर दोघांनीही आपत्कालीन सिग्नल पाठवले होते.
पण हा सिग्नल दोघांपैकी कोणत्या पायलटने जाणूनबुजून पाठवला होता की नाही, हे लगेचच स्पष्ट झालेलं नाही.
इस्रायली वृत्तवाहिनी एन12 न्यूजचे मुख्य राजकीय विश्लेषक अमित सेगल यांनी 'एक्स'वर लिहिलं की, उड्डाणादरम्यान दोन्ही पायलटांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून येतं. यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.
सेगल यांची पोस्ट रिपोस्ट करताना इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माइक हकबी यांनी म्हटलं की, या घटनेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये, विशेषतः इस्रायलमध्ये, लोक आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पण, ही घटना यापेक्षा गंभीर निघाली नाही, हे चांगलं झालं, असंही त्यांनी म्हटलं.
'जेरुसलेम पोस्ट'च्या वृत्तानुसार, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी इस्रायली हवाई दलाने सतर्कतेचा आपला स्तर वाढवला होता.
याआधी इस्रायलच्या 3 सुरक्षा अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं होतं की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या विमानाच्या घटनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
इस्रायली लष्कराने सांगितलं की, लष्करप्रमुख अयाल जमीर यांनी हवाई दलाचे कमांडर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला.
फ्लाय दुबईच्या प्रवक्त्यांनी काय सांगितले?
फ्लाय दुबईच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "30 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB) ते बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ (TLV) या मार्गावर उड्डाण करणाऱ्या FZ 1073 या विमानाच्या कॉकपिटमध्ये वाद झाला.
"या विमानातून प्रवास करणाऱ्या फ्लायदुबईच्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले. त्यानंतर विमानाचा मार्ग वळवून ते ताबूक विमानतळावर (TUU) सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित असून त्यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे.
"प्रवासी आणि क्रू सदस्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दोन पर्यायी विमाने ताबूक येथे पाठवली आहेत.
"या घटनेचा फ्लायदुबईच्या नेटवर्कमधील इतर नियोजित विमानसेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही.
"घटना नुकतीच घडल्याने तिच्यामागची कारणे आणि उद्देश अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. याबाबत अधिकृत चौकशी सुरू असून, संबंधित अधिकारी वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी घाईघाईने कोणतेही अंदाज किंवा निष्कर्ष काढू नयेत, असे आम्ही आवाहन करतो," असे फ्लाय दुबईच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
"या घटनेत सहभागी असलेल्या सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे, तसेच अधिकृत तपासाला सहकार्य करणे, हे आमचे सध्या सर्वोच्च प्राधान्य आहे," असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फ्लाय दुबई, दुबई आणि तेल अवीवदरम्यान दररोज विमानसेवा चालवते. हा मार्ग इस्रायली नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.