You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आंतरजातीय प्रेम, एक फोन कॉल आणि दलित तरुणाचा मृत्यू: नेमकं काय घडलं?
- Author, आसिफ अली
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, डेहराडून
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात एका 17 वर्षीय दलित तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलं आहे.
मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, सोमवारी (8 जून) त्या तरुणाला आणि त्याच्या मित्राला एका कुटुंबातील लोकांनी घरात डांबून मारहाण केली. त्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी हत्या आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून 2 संशयित आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, उत्तराखंड अनुसूचित जाती आयोगानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन पोलिसांकडून अहवाल मागितला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत तरुणाचे वडील धनपाल लाल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, 8 जूनच्या सकाळी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव यशवीर सिंह पंवार असं सांगितलं.
एफआयआरमध्ये धनपाल लाल यांनी आरोप केला आहे की, फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की त्यांचा मुलगा केतन लाल आणि त्याचा मित्र दिवाकर डिमरी रात्रभर त्यांच्या ताब्यात होते आणि त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
माहिती मिळताच धनपाल लाल आणि इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. तिथे केतन आणि दिवाकर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. केतनची प्रकृती गंभीर होती आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक पातळीवरून मिळालेली माहिती आणि प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, केतनची एका अल्पवयीन मुलीशी मैत्री होती. रविवारी (7 जून) रात्री त्या मुलीच्या फोनवरून कॉल करून केतनला बोलावण्यात आलं होतं.
केतन आपला मित्र दिवाकर डिमरीसोबत तिथे गेला होता. ही गोष्ट मुलीच्या कुटुंबीयांना समजली, असं सांगितलं जात आहे.
मृत केतनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर दोन्ही तरुणांना डांबून मारहाण करण्यात आली. जिल्हा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेचं संपूर्ण सत्य तपासानंतरच समोर येईल.
याप्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही.
पोलिसांनी म्हटलं - 'हे प्रेमप्रकरण आहे'
हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे, असं टिहरी गढवालच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) श्वेता चौबे यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं
त्या म्हणाल्या, "मुलगीही अल्पवयीन आहे. हे प्रेमप्रकरण आहे. दोघेही फोनवर बोलायचे. मुलीच्या फोनवरूनच त्या मुलाला फोन आला होता. त्यानंतर तो आपल्या मित्रासोबत तिथे गेला होता."
एसएसपी चौबे यांच्या म्हणण्यानुसार, त्या तरुणाला ठरवून बोलावण्यात आलं होतं का, की मुलगी आणि त्या तरुणाला एकत्र पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला होता, हा तपासातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनपाल लाल यांच्या तक्रारीच्या आधारे लंबगांव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2026 दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी हत्या आणि जात किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर झालेल्या गुन्ह्याबाबत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 103(1), 3(5) तसेच एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(2)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी चंबा येथील क्षेत्राधिकारी महेश लखेडा यांना देण्यात आली आहे.
घटनास्थळावरून वैज्ञानिक (फॉरेन्सिक) आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले असून साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
एसएसपी श्वेता चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुलीचे वडील यशवीर सिंह पंवार आणि आजोबा विद्या सिंह पंवार यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहाचे पोस्टमार्टम 3 डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे करण्यात आले असून त्याचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.
'अनुसूचित जातीमुळे हत्या करण्यात आली'
धनपाल लाल सांगतात की, मुलगा केतन हा 12वीचा विद्यार्थी होता आणि भावंडांमध्ये सर्वात मोठा होता.
"मुलगा गमावल्याचं दुःख शब्दांत सांगता येणार नाही," असं ते बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले.
अनुसूचित जातीचा असल्यामुळेच आपल्या मुलाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप धनपाल लाल यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री केतन नेहमीप्रमाणे घरात होता आणि पालकांना सांगून तो झोपायला गेला होता.
धनपाल लाल म्हणतात, "त्यानंतर तो घरातून कधी बाहेर गेला, हे आम्हाला माहीत नाही. मला वाटतं की, हा सुनियोजित कट असून मुलीकडून फोन करून माझ्या मुलाला बोलावण्यात आलं होतं."
धनपाल लाल यांचा आरोप आहे की, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना यशवीर सिंह पंवार यांचा फोन आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केतनचे हात-पाय तोडले आहेत, असं फोनवर सांगण्यात आलं.
ते सांगतात, "मी त्याला विचारलं की तुला अशा प्रकारे मारण्याचा अधिकार कुणी दिला? काही करायचंच होतं तर तू त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकला असतास."
धनपाल लाल यांचा दावा आहे की, बोलताना फोन कॉल सुरूच ठेवला गेला होता आणि त्यांना त्यांच्या मुलाचा आवाज ऐकू येत होता.
"माझा मुलगा ओरडत ओरडत म्हणत होता, 'पप्पा, या, मला वाचवा.'"
धनपाल लाल सांगतात की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा केतनची अवस्था खूप गंभीर होती.
आयोगाकडून दखल, सामाजिक कार्यकर्त्यांनीही उठवला आवाज
टिहरी येथील घटनेची उत्तराखंड अनुसूचित जाती आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. दलित तरुणाच्या हत्येचं हे प्रकरण गांभीर्याने घेऊन टिहरी गढवालच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे, असं आयोगाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
आयोगाने पोलिसांना निष्पक्ष आणि जलद तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आयोगाचे सदस्य राजेश सिंह राजा कोली म्हणाले, "अनुसूचित जाती समुदायातील लोकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचार आणि भेदभावाच्या प्रकरणांमध्ये आयोग संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करेल. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयोग परिस्थितीवर लक्ष ठेवेल."
'इन्सानियत मंच' या सामाजिक संस्थेशी संबंधित कार्यकर्ते रवी चोप्रा म्हणतात, "समाजातील कोणत्याही वर्गातील व्यक्तीची हत्या करणे हा गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये न्याय्य कारवाई होणे गरजेचं आहे."
रवी चोप्रा म्हणाले, "समाजातील दुर्बल घटकातील वर्गांवर, मग ते जातीनुसार असो किंवा धर्मानुसार, होणाऱ्या हिंसा आणि छळाच्या घटना चिंतेचा विषय आहेत."
तर सामाजिक कार्यकर्ता अनूप नौटियाल हे या घटनेकडे समाजासाठी एक इशारा म्हणून पाहतात.
ते म्हणाले, "या घटनेमुळे मी खूप व्यथित झालो आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून या घटनेचा निषेध केला पाहिजे. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही आपल्या समाजात अशा स्वरुपाच्या घटना घडतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे."
नौटियाल यांच्या मते, ही घटना केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही, तर समाजासमोर उभ्या असलेल्या व्यापक सामाजिक प्रश्नांकडेही इशारा करते.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात जी तथ्यं समोर येतील, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)