कोम्बुचा ड्रिंक: झटपट उत्साह वाढवणाऱ्या या पेयाचे तज्ज्ञांनी सांगितले 'हे' फायदे

    • Author, नताली ग्राईस
    • Role, बीबीसी वेल्स
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक असाल आणि शरीराची तरतरी वाढवण्याचा दावा करणारी उत्पादनं वापरत असाल, तर तुम्ही 'कोम्बुचा'चं सेवन नियमितपणे करू शकता.

कोम्बुचा हे चहा फर्मेंट करुन तयार करण्यात येणारं पेय. त्याचं आशियाच्या काही भागांमध्ये शतकानुशतके सेवन केलं जात आहे.

अलीकडच्या काळात हे पेय फारच चर्चेत आलेलं आहे. भारतातही या पेयाचे अनेक ठिकाणी सेवन केले जात आहे. इ-कॉमर्स वेबसाइटवर, सुपरमार्केटमध्ये ते उपलब्ध असल्याचं देखील दिसतं.

शरीराचं आरोग्य सुधारण्यासाठी, आतड्यातील जीवाणू तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी एक सुपरफूड म्हणून याला प्रोत्साहन दिलं जात आहे.

पण या पेयाला सुपरफूडचा दर्जा खरंच मिळाला आहे का? तुमच्या स्थानिक सुपरमार्केटमध्ये सहज मिळणाऱ्या या पेयात खरंच विशेष असं काही आहे का?

अभ्यासातून काय उघड झालं?

अबेरिस्टविथ विद्यापीठातील संशोधकांनी, दीर्घकाळापर्यंत कोम्बुचाचं सेवन केल्यास व्यक्तीच्या शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी एक अभ्यास केला.

संशोधकांच्या टीमनं 40 निरोगी लोकांवर आठ आठवड्यांची रँडम, नियंत्रित अशी चाचणी घेतली. त्यामध्ये एका गटाला दररोज काळजीपूर्वक नियंत्रित करण्यात आलेलं कोम्बुचा पेय देण्यात आलं आणि दुसऱ्या गटाला स्वादयुक्त पाण्याचा प्लेसिबो देण्यात आला.

एका पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झालेली ही चाचणी डबल-ब्लाइंडेड होती, म्हणजेच सहभागी असलेल्या व्यक्तींना तसेच संशोधन करणाऱ्या टीमला देखील हे माहीत नव्हतं की नक्की कुणाला खरा कोम्बुचा दिला जात आहे.

कोम्बुचामध्ये आढळणाऱ्या पॉलिफेनॉलसारख्या काही ज्ञात संयुगांचा शरीरावर काही परिणाम होतो की नाही हे पाहण्यासाठी, चाचणी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर लघवीच्या आणि रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

ही पद्धत अवलंबल्यामुळे या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. संशोधकांना उत्तम आरोग्याशी संबंधित निर्देशकांच्या पातळीत सुधारणा झाल्याचं आढळून आलं.

मात्र, कोम्बुचा प्यायल्यानं खरंच तणाव कमी होण्यास मदत होते का, हे खऱ्या अर्थानं तपासण्यासाठी करण्यात आलेल्या या चाचणीत असं आढळून आलं की, सहभागींवर घेण्यात आलेल्या स्ट्रेस रिस्पॉन्स टेस्टवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

"चाचणीपूर्वी आणि नंतर होणाऱ्या बदलांमागील रासायनिक स्वरूपावर माझी टीम अभ्यास करत आहे," असं या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक डॉ. अमांडा लॉईड म्हणाल्या.

"मला खाणं आवडतं, मला माणसं आवडतात, मला आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यातील घटक शोधायलाही आवडतं."

"मला चहाचीही प्रचंड आवड आहे. चहा खरोखरच कॉम्प्लेक्स पदार्थ असून विविध गुणधर्मांनी समृद्ध आहे, आणि तुम्ही तो ज्या पद्धतीनं आंबवता, ज्या पद्धतीने बनवता, ज्या पद्धतीने साठवता, त्यामध्ये अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडतात ज्यामुळे त्याची रासायनिक रचना बदलते.

त्यांनी सांगितलं की, स्ट्रेस रिस्पॉन्सचा अभ्यास करण्यासाठी या टीमनं विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनाही सामील करून घेतलं होतं. सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील असे सक्रिय घटक असलेला कोम्बुचा तयार करणं, हे त्यातील एक उद्दिष्ट होतं.

तुम्ही कोम्बुचाचं सेवन केलं पाहिजे का?

या प्रकल्पाला इनोव्हेट यूके या तंत्रज्ञान क्षेत्रातील इनोव्हेशनसाठीच्या शासकीय संस्थेकडून निधी पुरवला जातो.

अमांडा यांच्या टीमनं निरोगी लोकांवर कोम्बुचाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी, कोम्बुचा-आधारित पेयं बनवणाऱ्या उत्तर वेल्समधील 'कॉनवी कोम्बुचा' या कंपनीसोबत काम केलं.

"उत्तम कोम्बुचा बनवण्यासाठी आम्ही एका कोम्बुचा कंपनीकडे अर्ज केला आहे," असंही त्यांनी सांगितलं.

"प्रत्यक्षात, तिथं काय आहे, काय बदलत आहे आणि कालांतरानं जैविक दृष्ट्या सक्रिय रसायनांचं काय होतं, हे शोधून काढण्यासाठी आम्ही आमच्या काही वैज्ञानिक तंत्रांचा वापर केला."

अमांडा म्हणतात की त्यांनी स्वतःच्या आयुष्यात कोम्बुचासारखे 'फंक्शनल फूड्स' वापरले आहेत आणि या दाव्यांमागे तथ्य-आधारित विज्ञान असेल तर त्या या कल्पनेबद्दल सकारात्मक आहेत.

मात्र, त्या या गोष्टीवर देखील जोर देतात की कोणताही एक पदार्थ स्वतःहून निरोगी आणि संतुलित आहाराची जागा घेऊ शकत नाही.

"तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर चांगलं अन्न खा. मला ऑफिसमध्ये माझ्या डेस्कवर फक्त ही महागडी पेयं नको आहेत. मला मूलभूत गरजांची काळजी घ्यावी लागेल," असं त्या सांगतात.

"मला पुरेसं प्रोटिन मिळतंय का? त्यात पुरेशी कार्बोहायड्रेट्स आहेत का? त्यात मीठ आणि साखर कमी आहे का? घरी बनवलेलं जेवण किंवा अगदी कमी घटक असलेले जेवण. तुम्ही असं अन्न घ्यायला हवं ज्यावर कमीत कमी प्रक्रिया करण्यात आली असेल."

कोम्बुचाबाबत त्या एक विशेष सल्ला देतात, "जिवंत सूक्ष्मजीव असलेला पारंपरिक लाइव्ह कोम्बुचा शोधा. त्याची चव बाजारात उपलब्ध असलेल्या पेयापेक्षा वेगळी असेल. तुम्ही असं पेय घ्या, जे नैसर्गिकरीत्या कार्बनयुक्त असेल. ते कृत्रिमरित्या कार्बनयुक्त केलेलं नसावं."

अत्यंत चांगली उत्पादनं ओळखणं नेहमीच सोपं नसतं, असं त्या सांगतात.

"मार्केटिंगमध्ये कधीकधी नेमकं काय होईल हे कळणं खरंच खूप अवघड असतं," असंही त्या सांगतात.

"मी अनेकदा सोशल मीडियावर काहीतरी पाहते आणि ते विकत घेते. पण जेव्हा ती वस्तू हातात येते, तेव्हा मला वाटतं, 'अरे देवा, मी काय विचार करून हे घेतलं?'"

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि सॉफ्ट टिश्यू पॅथॉलॉजीमध्ये विशेषज्ञ असलेल्या सल्लागार हिस्टोपॅथॉलॉजिस्ट डॉ. एम्मा शॉर्ट, आतड्यांचे आरोग्य आणि मायक्रोबायोम या विषयांवरही लिहितात.

त्या सांगतात की, "आतड्यातील मायक्रोबायोम हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे आणि आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपण त्यात कशाप्रकारचे बदल करू शकतो व ते कसे वाढवू शकतो, हा माझ्या आवडीचा मुख्य विषय आहे."

कोम्बुचावर बरंच संशोधन झालेलं आहे. पण, अगदी अलीकडेपर्यंत त्यातील बहुतेक संशोधनं प्रयोगशाळांमध्येच करण्यात आलेली आहेत.

2025 पूर्वी, या पेयासंदर्भात माणसांवर 10 पेक्षा कमी अभ्यास करण्यात आले होते, असं त्या सांगतात.

"पण हे प्रयोगशाळेवर आधारित अभ्यास आहेत," असं त्या सांगतात.

"हे संशोधन माणसांवर करणं खरोखरच महत्त्वाचं आहे. जेणेकरून प्रयोगशाळेतील निष्कर्ष आपण माणसांना कितपत लागू करू शकतो हे आपल्याला पाहता येईल."

औषधांपेक्षा, कोम्बुचामध्ये आरोग्यावर परिणाम करणारे अनेक वेगवेगळे घटक असतात आणि अनेक घटकांनुसार त्यांची पातळी बदलू शकते.

"त्यात ऑरगॅनिक अॅसिड (सेंद्रिय आम्ल), काही बी जीवनसत्त्वे, क जीवनसत्त्व आणि मॅंगनीज व झिंकसारखी खनिजं असतात," असं एमा सांगतात.

फर्मंटेशनचा कालावधी, तापमान आणि SCOBY मध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांनुसार कोम्बुचाची नेमकी रचना बदलू शकते.

त्यांनाही कोम्बुचा आवडतो आणि त्यांनी याआधी स्वतःच कोम्बुचा बनवला आहे. तसेच, केफिर, सॉरक्रॉट आणि किमची यांसारखे इतर आंबवलेले पदार्थही बनवले आहेत.

पण त्यांच्या मते काही व्यावसायिक कोम्बुचाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

"आदर्शपणे पहायचं झाल्यास, तुमच्या कोम्बुचामध्ये फक्त चहा, साखर आणि स्कोबी (बॅक्टेरिया आणि यीस्ट यांचे मिश्रण) असायला हवे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)