You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गरम चहा किंवा कॉफी प्यायल्यास कॅन्सरचा धोका? हे संशोधन वाचल्यावर फुंकूनच प्याल
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अतिशय गरम चहा, कॉफी यांसारखी पेयं नियमितपणे पिल्यास अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असं ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे.
या कर्करोगाला इसोफेजियल कॅन्सर (Oesophageal Cancer) म्हटलं जातं.
संशोधकांच्या मते, जवळपास 10 लाख लोकांवर करण्यात आलेला हा अभ्यास या विषयावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास आहे.
"अतिशय गरम" पेयं पिणाऱ्या लोकांमध्ये "कोमट" चहा किंवा कॉफी पिणाऱ्यांच्या तुलनेत कर्करोगाचा धोका जवळपास तिप्पट होता, असं या अभ्यासात दिसून आलंय.
मात्र, अशा प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता एकूणात खूपच कमी असते, यावरही तज्ज्ञ आवर्जून भर देतात.
अतिशय गरम द्रवपदार्थ अन्ननलिकेतील पेशींना इजा पोहोचवू शकतात. या पेशी अन्ननलिकेपासून पोटापर्यंत जाणाऱ्या मार्गात असतात.
हा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठातील इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सरमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात 65 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान असलेल्या कोणत्याही द्रवपदार्थाला "अतिशय गरम" आणि संभाव्य धोका निर्माण करणारा मानण्यात आलं आहे.
9,77,282 मध्यमवयीन पुरुष आणि महिलांच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून असं आढळलं की दररोज 6 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त गरम पेयं पिल्यानेही धोका वाढू शकतो.
थंड झाल्यावर पिणंच अधिक शहाणपणाचं
दुधामुळे पेयाचं तापमान काही प्रमाणात कमी होऊ शकतं. मात्र, पेय पिण्यापूर्वी ते आणखी थंड होण्याची वाट पाहणं अधिक योग्य ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
पाणी पूर्ण उकळल्यानंतर लगेच तयार केलेल्या चहाचं तापमान साधारणपणे उत्कलन बिंदूजवळ, म्हणजे सुमारे 100 डिग्री सेल्सियस असतं.
तो चहा कपात ओतल्यानंतर त्याचं तापमान सुमारे 90 ते 95 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली येतं.
पेय पिण्यापूर्वी काही मिनिटं थांबावं, ज्यामुळे त्याचं तापमान सुरक्षित पातळीपर्यंत कमी होईल, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
पण गरम पेय किती वेळ थंड होण्यासाठी ठेवावं, याबाबत नेमका कालावधी सांगणं कठीण आहे, असं कॅन्सर रिसर्च यूकेचं म्हणणं आहे.
"पण जर तुम्हाला याबाबत चिंता वाटत असेल, तर पेय अतिशय गरम असतानाच पिण्याऐवजी ते आरामात पिता येईल इतपत थंड होईपर्यंत थांबण्याचा आम्ही सल्ला देतो." असं या संस्थेनं सांगितलं आहे.
या संशोधनाच्या प्रमुख संशोधक डॉ. केरेन पपीर यांनी सांगतात, दक्षिण अमेरिकेतील संशोधनांमध्ये, अनेक लोक 'माते' (Mate) नावाचं अतिशय गरम हर्बल पेय पितात, तिथंही गरम पेय आणि अन्ननलिकेच्या कर्करोगामधील असाच संबंध आढळून आला होता.
त्या म्हणतात, "मात्र नेमक्या किती तापमानापासून पेय कर्करोगाचा धोका वाढवतं, हे समजून घेण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे."
एका स्वतंत्र अभ्यासात 118 तरुण प्रौढांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लॅक कॉफी अनेकवेळा प्यायली. त्यातून असं आढळलं की बहुतांश लोकांना कॉफीचं तापमान 70 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावर ती "अतिशय गरम" वाटते.
एका टेकअवे कॉफी कप उत्पादक कंपनीनुसार, चालता-बोलता पिण्यासाठी योग्य गरम असण्यासाठी कॉफीचं तापमान 49 ते 60 डिग्री सेल्सियस दरम्यान असतं.
एमटीपीके कॉफीच्या म्हणण्यानुसार, बरिस्ताला कॉफी अधिक वेळ गरम ठेवायची असल्यास किंवा एखाद्या ग्राहकाने अतिरिक्त गरम कॉफीची मागणी केल्यास ती 82 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानावर दिली जाऊ शकते.
एकूण धोका कमीच
संशोधकांचं म्हणणं आहे की, लोकांनी अतिशय गरम पेय पिणं बंद केल्यास अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या प्रत्येक 10 प्रकरणांपैकी साधारण 1 ते 2 प्रकरणं टाळता येऊ शकतात.
स्क्वॅमस सेल इसोफेजियल कॅन्सर हा तुलनेने दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे. दरवर्षी याचा परिणाम केवळ काही हजार लोकांवर होतो. ब्रिटनमध्ये, सुमारे 1% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
म्हणूनच, अतिशय गरम पेय पिण्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये कर्करोगाचा धोका वाढू शकतो, तरीही प्रत्यक्षात कर्करोग होण्याची शक्यता कमीच असते.
याशिवाय धूम्रपानासारखे इतर घटक अन्ननलिकेच्या कर्करोगासाठी अधिक धोकादायक मानले जातात.
या अभ्यासाला निधी देणाऱ्या कॅन्सर रिसर्च यूके संस्थेच्या फियोना ओसगुन यांनी यावर भर देत म्हटलं, "या प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे धूम्रपान टाळणं आणि मद्यपानाचं प्रमाण कमी करणं."
अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणं, अपचन, घसा किंवा छातीत वेदना होणं, तसेच वजन कमी होणं यांचा समावेश असू शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)