रायगड-रत्नागिरीत 'यलो अलर्ट', तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज? जाणून घ्या

    • Author, छाया काविरे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पावसांच्या सरींचा खेळ सुरू आहे.

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि त्याला लागून असलेल्या उत्तर ओडिसा किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे.

पुढच्या 24 तासांत हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. तर दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मूच्या काही भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तर-पश्चिम भारत, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढच्या 2-3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो? महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल? जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात काय स्थिती असेल?

कोकण आणि गोव्याच्या बहुतांश ठिकाणी 16 आणि 17 ऑगस्टदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यताय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस, तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची चिन्हे आहेत.

तुमच्या भागात नेमकं हवामान कसं असेल?

भंडारा, गोंदिया, गडचिरोली विदर्भातल्या या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्याचा व साताऱ्याचा घाट परिसरही यलो अलर्टवर आहे. म्हणजे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

जळगाव, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि वारे वाहण्याची शक्यता आहे.

17 ऑगस्टला रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटाच्या भागात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे. तर, जळगाव, धुळे, संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

हे जिल्हे वगळता विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

18 ऑगस्टला 16 आणि 17 तारखेच्या तुलनेने कमी पावसाची शक्यता आहे. नाशिकचा घाटाचा भाग, ठाणे, पुणे आणि साताऱ्याचा घाट, जालना, परभणी, हिंगोली इथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

शेतकरी आणि नागरिकांसाठी काय सूचना?

मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील भात, भुईमूग आणि भाजीपाल्याच्या शेतातून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. पावसादरम्यान खतं किंवा कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

याचबरोबर मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट असताना झाडांखाली आश्रय घेणं टाळावं.

तसेच, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)