You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतिन यांची सुरक्षा भेदणं कठीण का आहे? त्यांचं अन्न-पाणी कोण तपासतं?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 18 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत.
12 ते 13 सप्टेंबरदरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी ते आधीच भारतात येत आहेत. पुतिन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तब्बल 4 वर्षांनंतर द्विपक्षीय परिषदेसाठी भारतात आले होते.
या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आणखी एक द्विपक्षीय बैठक होण्याची अपेक्षा आहे. ही बैठक शुक्रवारी (11 सप्टेंबर) होणार आहे असं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी मंगळवारी सांगितलं .
नेहमीप्रमाणे दोन्ही देश द्विपक्षीय अजेंड्यावर चर्चा करतील, असं पेस्कोव्ह म्हणाले.
ते पुढं म्हणाले, "अनेक मुद्द्यांवर सार्वजनिकपणे चर्चा करता येत नाही, कारण काही देश आमच्या सहकार्याला आणखी पुढे नेण्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा विषयांवर गोपनीयपणे, पण अत्यंत रचनात्मक पद्धतीने चर्चा होत आहे."
पुतिनच्या प्रत्येक हालचालीवर शेकडो अंगरक्षकांची नजर
व्लादिमिर पुतिन हे 2000 पासून सत्तेत आहेत. जोसेफ स्टालिन यांच्यानंतर क्रेमलिनमधील कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक राहिला आहे.
सुमारे 73 वर्षांच्या पुतिन यांचा सध्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचवा कार्यकाळ सुरू आहे. त्यांच्या सत्तेला विरोध करणारी फारशी ताकद आता उरलेली नाही आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली तर 2036 पर्यंत सत्तेत राहण्यापासून त्यांना रोखणं अवघड मानलं जातं.
पुतिन यांच्या सुरक्षेबाबत बोलायचं झाल्यास, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर शेकडो अंगरक्षक बारकाईने नजर ठेवून असतात. हे अंगरक्षक 24 तास त्यांच्या सोबत असतात.
बीबीसी न्यूजच्या एका बातमीनुसार, पुतिन यांच्यासाठीचं अन्न अत्यंत गोपनीय पद्धतीनं तयार केलं जातं आणि ते जे काही पेय पिणार असतील, त्याची आधी त्यांच्या निकटवर्तीय सल्लागारांकडून तपासणी केली जाते.
केजीबीचे माजी अधिकारी असलेले पुतिन आपल्या भोवती असलेल्या धोक्याविषयी चांगलेच सजग आहेत.
पुतिन यांचं संरक्षण कोण करतं?
रशियातील अनेक सुरक्षा यंत्रणांपैकी एक संस्था विशेषतः राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी समर्पित करण्यात आलेली आहे. तिला 'रशियन राष्ट्राध्यक्ष सुरक्षा सेवा' (SBP) म्हणून ओळखलं जातं.
ही संस्था रशियाच्या फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसला (FSO) अहवाल देते. FSO ची स्थापना रशियाची गुप्तचर संस्था केजीबीमधून झाली आहे. काळे सूट परिधान केलेले आणि कानात इयरपीस असलेले SBP चे सुरक्षारक्षक सावलीप्रमाणे दिवस-रात्र पुतिन यांच्यासोबत असतात.
रशियाच्या सरकारी मालकीच्या Russia Beyond या माध्यमानुसार, "जेव्हा हे एजंट परदेशातील कार्यक्रमांदरम्यान पुतिन यांच्यासोबत जातात, तेव्हा ते त्यांचं चार संरक्षण कड्यांत विभाजन होतं."
"पहिलं आणि सर्वांत जवळचं कडं हे त्यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकांचं असतं."
"ज्यांच्याकडे सामान्य लोकांचं लक्ष सहसा जात नाही अशा सुरक्षारक्षकांचं दुसरं कडं असतं "
"तिसरं कडं गर्दीच्या परिघाभोवती तैनात असतं आणि संशयास्पद व्यक्तींना जवळ येण्यापासून रोखतं."
"चौथं आणि सर्वांत बाहेरचं कडं आसपासच्या इमारतींच्या छतांवर तैनात असलेल्या स्नायपर्सचं असतं."
मार्क गेलिओटी हे रशियन सुरक्षा व्यवस्थेचे तज्ज्ञ आहेत. तसेच रशियातील सुरक्षा विषयांचं विश्लेषण करणाऱ्या Mayak Intelligence या सल्लागार संस्थेचे संचालक आहेत.
बीबीसी मुंडोशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, "पुतिन यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करणं विशेष आवडत नाही. ते सामान्यतः मोटारसायकलस्वार, अनेक मोठ्या काळ्या गाड्या आणि इतर सुरक्षायुक्त वाहनांसह मोठ्या ताफ्यातून प्रवास करतात. अशा वेळी अनेकदा हवाई क्षेत्रात ड्रोन उडवण्यास बंदी घातली जाते. वाहतूकही थांबवली जाते."
राष्ट्राध्यक्षांची 'वैयक्तिक सेना'
'रशियन राष्ट्राध्यक्ष सुरक्षा सेवा' (SBP) ला 'रशियन नॅशनल गार्ड' अर्थात रोसग्वार्दिया यांचंही समर्थन मिळतं. काही जण या दलाला राष्ट्राध्यक्षांची "वैयक्तिक सेना" असंही संबोधतात.
हे दल रशियन सशस्त्र दलांपासून स्वतंत्र आहे. अधिकृतरीत्या रशियाच्या सीमांचं संरक्षण करणं, दहशतवादाचा सामना करणं आणि सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.
मात्र प्रत्यक्षात पाहिल्यास, पुतिन यांचं विविध धोक्यांपासून संरक्षण करणं हेच या दलाचं सर्वांत महत्त्वाचं काम मानलं जातं.
ब्रिटनमधील बाथ विद्यापीठाचे रशियाविषयक अभ्यासक स्टीफन हॉल यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं, "रशियन नॅशनल गार्ड मोठ्या प्रमाणात पुतिन यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकच आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि राष्ट्राध्यक्ष त्यांच्या इतर सुरक्षा यंत्रणांच्या संरक्षण कवचामध्ये अत्यंत सुरक्षित आहेत."
सध्या नॅशनल गार्डचं नेतृत्व पुतिन यांचे माजी अंगरक्षक विक्टर झोलोतोव करत आहेत. त्यांची राष्ट्राध्यक्षांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख आहे.
अलिकडच्या वर्षांत या सुरक्षा दलातील सैनिकांची संख्या सुमारे 400,000 ने वाढवण्यात आली आहे.
हॉल म्हणतात, "ही अत्यंत मोठी संख्या आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या रक्षकांची संख्या याच्या जवळपासही पोहोचत नाही."
पुतिन यांच्या सुरक्षेची व्यवस्था कशी केली जाते?
पुतिन यांच्या सुरक्षेसाठी नेमक्या कोणकोणत्या उपायांचा किती प्रमाणात वापर केला जातो, हे जाणून घेणे कठीण आहे. मात्र, क्रेमलिन आणि रशियातील सुरक्षा तज्ज्ञांनी याबाबत काही माहिती दिली आहे.
पुतिन यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सर्वाधिक कडक खबरदारी घेतली जाते ती त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत.
मार्क गेलिओटी यांच्या मते, विषबाधेच्या भीतीमुळे पुतिन यांच्याकडे एक वैयक्तिक फूड टेस्टर असतो. राष्ट्राध्यक्षांसाठी येणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाची तो तपासणी करतो.
त्यांनी बीबीसी मुंडोला सांगितले होते, "ही पद्धत आधुनिक राष्ट्राध्यक्षांपेक्षा मध्ययुगीन सम्राटासारखी आहे."
तसंच, पुतिन जेव्हा रशियाबाहेर प्रवास करतात, तेव्हा त्यांच्या टीमकडून ते वापरणार असलेल्या प्रत्येक वस्तूची तपासणी केली जाते.
गेलिओटी सांगतात, "पुतिन जे काही खाणार किंवा पिणार असतात, ते सर्व त्यांच्या टीमकडून आणले जाते. उदाहरणार्थ, एखादा अधिकृत शॅम्पेन टोस्ट असेल, तर पुतिन त्यांच्यासाठी त्यांच्या टीमने आणलेल्या बाटलीतूनच शॅम्पेन घेतात. इतर बाटल्यांमधून नाही."
स्मार्टफोनचा वापर नाही
पुतिन यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा आणखी एक उपाय म्हणजे क्रेमलिनमध्ये स्मार्टफोनचा वापर रोखणे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्वतःच एकदा सांगितलं होतं की, ते स्मार्टफोन वापरत नाहीत. 2020 मध्ये रशियन वृत्तसंस्था 'तास'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितलं होतं.
एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधायचा असल्यास त्यासाठी अधिकृत दूरध्वनी व्यवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
त्यांच्या सल्लागारांनीही याला दुजोरा दिला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी वारंवार म्हटले आहे की, पुतिन मोबाइल फोन वापरत नाहीत, कारण त्यांच्याकडे त्यासाठी वेळ नसतो.
मात्र, पुतिन स्मार्टफोनचा वापर न करण्यामागे इंटरनेटवर त्यांचा विश्वास नसणं हेही कारण आहे.
यापूर्वी त्यांनी अप्रत्यक्षपणे इंटरनेटला "सीआयए" (अमेरिकन गुप्तचर संस्था) असं म्हटले होतं.
तसंच, रशियन नागरिकांनी गुगल सर्चचा वापर करू नये, असे आवाहनही केलं होतं. अमेरिकेकडून सर्व माहितीवर नजर ठेवली जाते, असा त्यांचा समज आहे.
गेलिओटी म्हणतात, "पुतिन इंटरनेटचा क्वचितच वापर करतात. त्यांना फोन आवडत नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि ते ठीक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ते प्रामाणिक आहेत. पुतिन अगदी बरोबर आहेत. स्मार्टफोन फारसे सुरक्षित नसतात."
तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांना कागदी फाइल्सच्या माध्यमातून माहिती दिली जाते. या फाइल्स त्यांचे सल्लागार त्यांच्यापर्यंत पोहोचवतात.
हॉल सांगतात, "पुतिन आपल्या दिवसाची सुरुवात तीन सुरक्षा ब्रीफिंग्सने करतात. त्यापैकी एक संपूर्ण जगाशी संबंधित असते. दुसरे रशियामध्ये काय घडत आहे याबाबत असते आणि तिसरे देशातील अभिजन वर्गात काय सुरू आहे याबाबत असते. त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची माहिती असते आणि त्यावरून त्यांच्या दिवसाचे अजेंडा ठरते."
ते पुढे सांगतात, "मला आठवते, मी राजनयिक आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी बोललो होतो. त्यांनी मला सांगितले होते की, त्यांच्या गुप्तचर यंत्रणांना योग्य वाटत नसलेली माहिती त्यांच्याकडे असेल, तर पुतिन असे गृहीत धरतात की त्यांचे गुप्तहेर बरोबर आहेत आणि राजनयिक चुकीचे आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)