You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
गणेशोत्सवात लावण्यात येणारे डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडीविरोधात बोलणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (3 सप्टेंबर) पुण्यातील टिळक रोड परिसरात घडली.
विद्यानंद बापट यांच्या मारहाणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशापद्धतीने मारहाण करणं योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यापद्धतीने मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
"मला असं वाटतं की, एकमेकांना समजून, एकमेकांच्या भावना समजून पुण्यासारख्या ठिकाणी मला असे वाद हे योग्य वाटत नाही. मी आधी देखील सांगितलं, आपला गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेला पाहिजे, त्यादृष्टीने काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, कदाचित पहिल्या वर्षी 100 टक्के होणार नाही. पण 100 टक्के जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
काय घटना घडली?
एका वृत्तवाहिनीशी विद्यानंद बापट हे बोलत होते, त्याचवेळी तिथे आलेल्या एका व्यक्तीने अचानक त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बापट यांना तिथून बाहेर काढलं आणि नंतर सुरक्षित ठिकाणी नेलं.
गेल्या काही दिवसांपासून विद्यानंद बापट हे त्यांच्या गणेशोत्सवात लावण्यात येणाऱ्या डीजे विरोधातील भूमिकेमुळे चर्चेत आहेत. टिळक रोड परिसरात टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी ते याचविषयी बोलत होते. त्यावेळी एक व्यक्ती अचानक तिथे आला आणि त्याने विद्यानंद बापट यांच्या कानशिलात लगावली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बापट हे मागे असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गेले. तिथेही ती व्यक्ती त्यांच्या अंगावर धावून गेली.
त्यावेळी उपस्थित लोक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच झटापटीत त्या व्यक्तीने पुन्हा एकदा बापट यांना कानशिलात लगावली.
त्यानंतर काही व्यक्तींनी बापट यांना तिथून सुरक्षित ठिकाणी नेलं. उपस्थित लोकांनी मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीला रोखून धरलं. मारहाण करताना तो व्यक्ती बापट यांच्याबद्दल अपशब्द वापरत होता. मारहाण करणाऱ्या व्यक्तीबरोबर तिथे उपस्थित असलेल्या इतर काही लोकांनीही बापट यांच्यावर शिवीगाळ केली.
नंतर पोलीस तिथे आले आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्थेत बापट यांना त्या परिसरातून नेलं. दरम्यान मारहाणीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बापट यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी त्यावर काही भाष्य केलं नाही.
मारहाण करणारा म्हणतो, 'बापट गणेशोत्सवविरोधी'
पुण्याचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी विद्यानंद बापट यांची तक्रार घेऊन गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, विद्यानंद बापट हे नास्तिक आहेत, ते गणेशोत्सवाविरोधात बोलतात. ते चुकीचं करत आहेत, असं बापट यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती म्हणत होता.
प्रसारमाध्यमांनी त्याला याबाबत विचारणा केली असता, 'माझी कोणतीही भूमिका नाही, बापट हे गणेशोत्सवाविरोधात बोलत आहेत,' असं तो म्हणत होता.
महापालिकेच्या बैठकीतही बापटांना झाला होता विरोध
काही दिवसांपूर्वीही पुणे महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष, नागरिक, महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन या सगळ्यांसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीतही राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बापट यांना मोठा विरोध होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याभोवती सुरक्षेचं कडं करून त्यांना सभा स्थळावरून बाहेर काढलं होतं.
या बैठकीत गणेशोत्सवाबद्दल नागरिकांना काही मुद्दे मांडायचे आहेत का असं जेव्हा विचारलं गेलं. तेव्हा या बैठकीत उपस्थित असलेल्या विद्यानंद बापट यांनी उभं राहून डीजे बंद करा अशी भूमिका मांडली होती.
मात्र बापट यांच्या भूमिकेनंतर उपस्थित गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वाद वाढला आणि शेवटी बापट यांना पोलिसांच्या उपस्थितीत सभागृहाच्या बाहेर काढलं गेलं.
एकीकडे बापट यांना बाहेर काढलं जात असतानाच सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी महापौर बोलतील असं जाहीर केलं.
महापौरांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी भूमिका घेतली. तर पाठोपाठ भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्याच्या गणेशोत्सवासाठी कोणतेही निर्बंध नको, असं समाज माध्यमांवर पोस्ट करत जाहीर केलं. तर भाजपचे नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी जर डीजेवर बंदी घातली तर गणपती बाहेरच काढणार नाही अशी भूमिका घेतली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.