You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ख्रिश्चन मिशनरी आणि त्यांच्या दोन मुलांच्या हत्येतील दोषी दारासिंह तुरुंगाबाहेर येणार का? तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
- Author, गीता पांडे
- Role, सोशल अफेअर्स एडिटर
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
(महत्त्वाचं : या लेखात हिंसाचार आणि हत्येशी संबंधित माहिती आहे. काही वाचकांना ती अस्वस्थ करू शकते.)
भारतात ख्रिश्चनांविरोधातील हिंसाचाराच्या सर्वात धक्कादायक घटनांपैकी एक घटना 25 वर्षांहून अधिक काळानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. त्यावेळी या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला होता.
8 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार अशी माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय दारासिंहच्या याचिकेवर त्या दिवशी निर्णय देऊ शकते.
या याचिकेत त्याने कारागृहामधून सुटका करण्याची मागणी केली आहे. दारासिंह हा ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन धर्मप्रसारक (मिशनरी) ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या 1999 मधील हत्येप्रकरणी दोषी ठरला आहे.
दारासिंहचं खरं नाव रवींद्र कुमार पाल आहे. 2000 मध्ये अटक झाल्यापासून तो कारागृहात असून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ओडिशातील (पूर्वीचे ओरिसा) एका गावात ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या 6 आणि 10 वर्षांच्या मुलांना जिवंत जाळल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं.
स्टेन्स यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांसोबत काम करताना 30 वर्षे घालवली होती. परंतु, दारासिंह आणि हिंदू कट्टरपंथी संघटनांशी संबंधित त्याच्या साथीदारांचा आरोप होता की, स्टेन्स दलित आणि आदिवासी लोकांचं जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन बनवत होते.
या भयंकर गुन्ह्यामुळे भारतातील अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायाला मोठा धक्का बसला होता आणि जगभरातून संतापाची लाट उसळली होती. आता दारासिंहच्या याचिकेवरील सुनावणीमुळे त्या घटनेच्या कटू आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
स्टेन्स हे मयूरभंज जिल्ह्यातील बारीपदा येथे राहत होते. ते तिथे स्थानिक आदिवासी समाजात काम करत होते.
22 जानेवारी 1999 च्या रात्री त्यांची हत्या झाली होती. स्टेन्स आणि त्यांची मुलं शेजारच्या केओंझर जिल्ह्यातील मनोहरपूर या दुर्गम गावात ख्रिश्चन सभेसाठी गेले होते. ते आपल्या जीपमध्ये झोपले होते. त्याच वेळी दारासिंहच्या नेतृत्वाखाली 60 ते 70 जणांच्या जमावाने त्यांच्या जीपला घेरलं. जमावाने जीपला आग लावली आणि त्यांना बाहेर पडण्यापासून रोखलं.
दारासिंहवर नेमके आरोप काय होते?
दारासिंह गुन्हा केल्यानंतर फरार झाला होता. त्याच्याबद्दल माहिती देऊन त्याला पकडण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. यासाठी संपूर्ण राज्यात पोस्टर लावण्यात आले होते.
त्या काळात विविध प्रसारमाध्यमांध्ये आलेल्या वृत्तांनुसार, गावातील लोक आणि आदिवासींनी दारासिंहला लपून राहण्यास मदत केली होती. ते त्याची प्रशंसा करत आणि त्याला 'आधुनिक काळातील टारझन' म्हणत असत.
तो हत्तींसोबत खेळतो आणि वाघांवर स्वार होतो, असं ते सांगत. एका वर्षानंतर पोलिसांनी जंगलातील त्याच्या ठिकाणावर रात्रीच्यावेळी छापा टाकून त्याला अटक केली होती.
काही महिन्यांनंतर कारागृहामधून 'इंडिया टुडे'चे पत्रकार रुबेन बॅनर्जी यांना दिलेल्या मुलाखतीत दारासिंहने स्टेन्स आणि त्यांच्या मुलांच्या हत्येचा आरोप फेटाळला होता. परंतु, त्याने 'मला ग्रॅहम स्टेन्स आवडत नव्हते आणि 'मी मिशनऱ्यांविरोधातील आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं,' असं सांगितलं.
त्याने म्हटलं होतं, "मिशनरी आमच्या धर्माला लक्ष्य करत आहेत. ते फसवून आणि पैशांचं किंवा इतर गोष्टींचं आमिष दाखवून हिंदूंचं धर्मांतर करत आहेत. आमचा धर्म धोक्यात आहे. एक हिंदू म्हणून त्यांना थांबवणं ही माझी जबाबदारी होती."
"या भागात मी सर्वात प्रसिद्ध व्यक्ती होतो, त्यामुळे कदाचित पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात मला गोवलं."
'हिंदूंच्या हितासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे,' असं दारासिंहने म्हटलं होतं. पण, आपल्याला कधीही दोषी ठरवलं जाणार नाही, असा त्याला विश्वास होता.
त्याचा हा विश्वास चुकीचा ठरला. 2003 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने सिंहला फाशीची शिक्षा सुनावली. तर आणखी 12 जणांना जन्मठेपेची सुनावण्यात आली.
दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने सिंहची फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत केलं. त्याचा साथीदार महेंद्र हेम्ब्रमची जन्मठेप कायम ठेवली. पण, इतर 11 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्याविरोधात शिक्षा देण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं न्यायालयाने सांगितलं.
जानेवारी 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिंहची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तसेच त्याला पुन्हा फाशीची शिक्षा देण्याची सरकारी पक्षाची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.
स्टेन्स यांची हत्या हा दारासिंहचा एकमेव गुन्हा नव्हता. 2007 मध्ये त्याला 1999 मध्ये धार्मिक अल्पसंख्याकांविरोधात केलेल्या आणखी दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं होतं. याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या मुलांची हत्या केली होती.
त्याला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पहिल्या प्रकरणात त्याने एका जमावाचं नेतृत्व केलं होतं. या जमावाने एका चर्चला आग लावली होती. कॅथोलिक पादरी अरुल दास जळत्या चर्चमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांना बाण मारून त्यांची हत्या करण्यात आली होती.
दुसऱ्या प्रकरणात शेख रहमान नावाच्या मुस्लीम कापड व्यापाऱ्याला मारहाण करून जाळून मारण्यात आलं होतं. या प्रकरणातही दारासिंहला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
दारासिंहने याचिकेत काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दारासिंहविरोधात 10 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणांमध्ये त्याच्यावर मुस्लीम व्यापाऱ्यांचे गायी घेऊन जाणारे ट्रक पळवल्याचा आरोप होता.
मुलाखतीत सिंहने या प्रकरणांमध्ये 'स्वतःचा सहभाग' असल्याचं नाकारलं. मात्र, "हे माझ्या समर्थकांनी केलं असावं," असं त्याने म्हटलं. पण त्याने हेही मान्य केलं की, "गायींचा बेकायदा व्यापार आणि गोहत्या रोखण्याच्या आंदोलनात मी सक्रिय होतो. हे कोणत्याही परिस्थितीत थांबवणं गरजेचं होतं."
चर्चच्या नेत्यांनी आरोप केला होता की, हे हल्ले कट्टरपंथी हिंदू संघटना बजरंग दलाच्या सांगण्यावरून करण्यात आले होते. पण, सिंहने आपण बजरंग दलाचा सदस्य असल्याचं नाकारलं. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डी.पी. वाधवा यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगाने हे हल्ले दारासिंहने एकट्याने केल्याचं म्हटलं होतं.
ग्रॅहम स्टेन्स यांच्या पत्नी ग्लॅडिस जुलै 2004 पर्यंत त्यांची मुलगी एस्थरसह भारतातच राहिल्या. त्यांनी 'ख्रिश्चन धर्माच्या शिकवणी'नुसार दारासिंहला 'माफ केलं' असल्याचं म्हटलं होतं.
त्या म्हणाल्या होत्या, "माफीमुळे जखमा भरून येण्याचा मार्ग मोकळा होतो."
जुलै 2024 मध्ये सिंहने सर्वोच्च न्यायालयात शिक्षा कमी करण्यासाठी याचिका दाखल केली. त्याने 25 वर्षांहून अधिक काळ कारागृहात घालवला आहे, त्यामुळे आपली सुटका करावी, अशी मागणी केली. कारागृहामध्ये आपलं वर्तन चांगलं राहिलं असून, केलेल्या गुन्ह्याचा आपल्याला पश्चात्ताप आहे, असंही त्याने म्हटलं.
लवकर सुटकेची मागणी करणाऱ्या याचिकेत 62 वर्षीय दारासिंहने आप
ल्या गुन्ह्यासाठी 'तारुण्यातील अतिउत्साहा'ला जबाबदार ठरवलं.
त्याच्या याचिकेत म्हटलं आहे, "याचिकाकर्ता दोन दशकांहून अधिक काळापूर्वी केलेल्या आपल्या गुन्ह्याची कबुली देतो आणि त्याचा मनापासून पश्चात्ताप करतो."
"तारुण्यातील जोशात आणि भारताच्या क्रूर इतिहासाबद्दलच्या भावनिक प्रतिक्रियांमुळे याचिकाकर्त्याचा काही काळ संयम सुटला. कोर्टाने केवळ त्याने काय केलं हे पाहू नये, तर त्यामागचा हेतूही पाहावा. तसेच, कोणत्याही पीडित व्यक्तीशी त्याचे वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं, हेही लक्षात घेतलं जावं."
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्याच्या याचिकेवर निर्णय घेण्यास सांगितलं होतं. परंतु, अधिकाऱ्यांनी अद्यापही न्यायालयाला याबाबत काय निर्णय घेणार आहेत, हे सांगितलेलं नाही.
19 ऑगस्ट रोजी झालेल्या मागील सुनावणीत अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं की, दारासिंहच्या याचिकेवर विचार करणारे शिक्षा पुनरावलोकन मंडळ (सेंटेन्स रिव्ह्यू बोर्ड) काही कागदपत्रांची वाट पाहत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
न्या. मनोज मिश्रा आणि न्या. विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने राज्य सरकारकडून वारंवार सुनावणी पुढे ढकलली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटलं की, 2 सप्टेंबरपर्यंत मंडळाने दारासिंहच्या याचिकेवर निर्णय घेतला नाही, तर न्यायालय स्वतःच निर्णय घेईल.
न्यायालयाने म्हटलं, "तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो घ्या. तुम्ही निर्णय घेतला नाही, तर आम्ही घेऊ."
स्टेन्स यांच्या पत्नीने काय म्हटलं होतं?
दारासिंहच्या सुटकेच्या शक्यतेच्या वृत्तांमुळे भारतातील अनेक ख्रिश्चन बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतात साधारण 3 कोटी ख्रिश्चन राहतात.
राज्य सरकार किंवा न्यायालयाने त्याची शिक्षा कमी करण्याची याचिका मंजूर केली, तर तो कारागृहामधून बाहेर येऊ शकतो. दारासिंहने पूर्वी दिलेली काही वक्तव्येही या चिंतेचं एक कारण आहेत.
2000 मध्ये 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, स्टेन्स यांच्या मुलांच्या हत्येबद्दल त्याला 'कोणताही पश्चात्ताप नाही' आणि 'कधी वाटणारही नाही'.
त्याने म्हटलं होतं, "हिंदू मरतात तेव्हा इतर लोक रडत नाहीत. मग इतरांच्या मृत्यूवर आम्ही का रडायचं? जे झालं, ते योग्यच झालं. पुढे जे होईल, तेही योग्यच होईल."
त्याने म्हटलं होतं की, जर तो कारागृहामधून बाहेर आला, तर तो 'पुन्हा तेच काम करेल जे तो आधी करत होता'-'गोहत्या आणि धर्मांतराला विरोध करेल'.
त्याने म्हटलं होतं, "सरकारने हे थांबवायला हवं. हे थांबलं नाही, तर आणखी लोक मारले जाऊ शकतात. काहीही घडू शकतं."
'यूनियन ऑफ कॅथोलिक न्यूज'च्या (यूसीएन) वेबसाइटवर नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात मानवाधिकार कार्यकर्ते आणि ख्रिश्चन राजकीय कार्यकर्ते जॉन दयाल यांनी म्हटलं की, भारतात अनेक वर्षे कारागृहामध्ये राहिल्यानंतर शिक्षा कमी होणं ही 'असामान्य गोष्ट' नाही.
यामागचा विचार माणुसकीचा आहे. म्हणजेच, शिक्षेचा उद्देश व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्याला नंतर समाजात परतण्याची संधी देणे हा असायला हवा.
परंतु, ओडिशातील धार्मिक अल्पसंख्याकांची चिंता 'केवळ काल्पनिक नाही.' दयाल यांनी ओडिशातील ख्रिश्चनांविरोधातील हिंसाचाराचा इतिहास सांगताना 2008 मधील कंधमाल दंगलींचं उदाहरण दिलं. या दंगलींत अनेक लोक मारले गेले आणि हजारो लोकांना आपली घरं सोडून जाण्यास भाग पाडलं गेलं होतं.
त्यांनी लिहिलं, "स्टेन्स यांची हत्या ही सामान्य हत्या नव्हती. ही लोकांसमोर करण्यात आलेली हिंसक घटना होती. लोकांना घाबरवणे, दहशत निर्माण करणं आणि इशारा देणे हा त्यामागचा उद्देश होता. पादरी अरुल दास आणि शेख रहमान यांच्या हत्यांमधूनही हाच संदेश देण्यात आला."
दयाल यांनी पुढे लिहिलं, "आता सिंह जेलमधून बाहेर येईल की नाही, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की, सरकार हा निर्णय कशा पद्धतीने घेते आणि अल्पसंख्याक समाजाला सरकारकडून विश्वास दिला जाईल का."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)