You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बारामती विमानतळावर धावपट्टीवरून विमान घसरलं; नेमकं काय घडलं?
बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर एका प्रशिक्षणार्थी विमानाला सरावादरम्यान अपघात झाला आहे.
व्हीटी-एसईएक्स हे सेसना प्रकारचं विमान इथे एक खासगी प्रशिक्षण संस्था सरावासाठी वापरते. सरावादरम्यान हे विमान रनवेवरून खाली घसरल्याची माहिती मिळते आहे.
स्थानिक वेळेनुसार, दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. त्यात कुणी दुखापतग्रस्त झाल्याचं वृत्त नाही.
याच विमानतळावर उतरताना महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला होता, ज्यात त्यांचं निधन झालं होतं.
बारामती विमानतळावर आज काय घडलं?
IANS या वृत्तसेवा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, व्हीटी-एसईएक्स या विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे प्रवास करत होते.
विमानात सर्किट आणि लँडिंगच्या आपत्कालीन परिस्थितीचा सराव सुरू होता. याचदरम्यान, रनवे 29 वर उतरल्यानंतर विमान पूर्णपणे थांबू शकले नाही. विमान रनवेच्या शेवटच्या भागाच्या पुढे गेले आणि बाहेर फेकलं गेलं.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं, "व्हीटी-एसईएक्स विमान प्रशिक्षणाच्या सरावादरम्यान बारामती एअरफिल्डवरील रनवेवरून बाहेर गेले. विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)