तूप तेलापेक्षा उत्तम आहे का? रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने चरबी कमी होते का? जाणून घ्या 8 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

    • Author, शारदा व्ही,
    • Role, बीबीसी तमिळ
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"तूप खाल्ल्याने वजन वाढतं."

"सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्लं तर चरबी कमी होते."

"तूप खाल्ल्याने पोटातील अल्सर बरा होतो."

"तूपामुळे हार्ट अटॅकचा धोका असतो."

तुपाविषयी आपण नेहमीच अशा उलट-सुलट गोष्टी ऐकत असतो. आपण या गोष्टी फक्त ऐकत नाही तर काही लोक तर यानुसार वागायलाही लागतात.

तुपात 60 ते 65 टक्के सॅच्युरेटेड फॅट, 20 ते 25 टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, 3 ते 4 टक्के पॉलियनसॅच्युरेटेड फॅट आणि काही जीवनसत्त्वे असतात.

यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या फॅट्ससोबतच असं सॅच्युरेटेड फॅटही असतं, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल, विशेषतः हानिकारक मानले जाणारे बॅड कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.

तूप खाण्याच्या नुकसानाबद्दल तर नेहमीच चर्चा होत आली आहे, पण आता त्याचे फायदेही मोठ्या प्रमाणावर सांगितले जात आहेत.

यापैकी कोणती गोष्ट खरी आहे आणि कोणती खोटी?

तुपाबद्दल असलेले गैरसमज आणि योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही डॉक्टरांशी संवाद साधला.

1. तूप खाल्ल्याने वजन वाढतं का?

फक्त तूप खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही, असे अनेक डॉक्टर सांगतात.

बीबीसीशी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रिफाई शौकत अली म्हणाले, "कोणतेही जेवण अमृत किंवा विष नसते. आपण तो किती प्रमाणात खातो यावर सर्व काही अवलंबून असते."

ते पुढे म्हणाले, "जर तूप खाल्ल्याने वजन वाढते का? असा प्रश्न विचारला तर याचे थेट उत्तर 'नाही' असे आहे. परंतु जास्त प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते."

2. तूप खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात का?

तुपामुळे शरीरात वाढलेली चरबी हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे डॉ. रिफाई सांगतात.

डॉ. रिफाई म्हणतात, "तूप खाल्ल्यावर ते थेट जाऊन हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचत नाही किंवा त्यामुळे लगेच हृदयरोग होत नाही. आपण खाल्लेले अन्न थेट नसांमध्ये जात नाही.

पण जास्त तूप खाल्ल्यास शरीराची चरबी नक्कीच वाढू शकते. आणि शरीरात चरबी वाढल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवण्याचा आणि हृदयाला इजा पोहोचण्याचा धोका वाढतो हे सिद्ध झालेले आहे."

3. एका व्यक्तीने दिवसाला किती तूप खाल्ले पाहिजे?

आहारतज्ज्ञ मीनाक्षी बजाज यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं की, "ICMR 2024 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार , एक निरोगी प्रौढ व्यक्ती दिवसाला एकूण 27 ते 30 ग्रॅमपर्यंत फॅट किंवा तेलाचा वापर करू शकते."

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, आपल्या रोजच्या एकूण कॅलरीजपैकी सॅच्युरेटेड फॅटपासून मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण 6 टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

तूप, लोणी, पनीर, रेड मीट आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या इतर पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते.

सॅच्युरेटेड फॅटमुळे शरीरातील LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, हे गेल्या काही दशकांतील संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

LDL ला आपण 'बॅड कोलेस्ट्रॉल' म्हणून ओळखतो. शरीरात ते वाढल्यामुळे हृदयाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

ते उदाहरण देऊन सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला दिवसाला 2000 कॅलरीजची गरज असेल तर त्यातील 120 पेक्षा जास्त कॅलरीज सॅच्युरेटेड फॅटपासून मिळता कामा नयेत.

तुपात जवळपास 60 ते 65 % सॅच्युरेटेड फॅट असते त्यामुळे जास्त तूप खाल्ल्यास शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

4. तूप खाल्ल्याने पोटातील अल्सर बरा होतो का?

एका सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि प्रोफेसर चंद्रशेखर सांगतात की, तुपामध्ये असणारे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलियनसॅच्युरेटेड फॅट्स शरीराला गरजेचे असतात.

"तुपात लिनोलेइक ॲसिड, ब्युटिरिक ॲसिड यांसारखे काही फायदेशीर घटक असतात, जे अन्न पचायला मदत करतात," असे ते स्पष्ट करतात.

पण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रिफाई शौकत अली सांगतात की, तुपाचा वापर औषधासारखा करू नये.

ते सांगतात, "तुपात सॅच्युरेटेड फॅट जास्त असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे जरी यात काही चांगले घटक असले तरी एका वेळी अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त तूप खाऊ नये."

तसेच तूप खाल्ल्यामुळे पोटातील अल्सर पूर्णपणे बरा होतो या दाव्याला पाठिंबा देणारा कोणताही ठोस मेडिकल किंवा वैज्ञानिक पुरावा नाही.

5. सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने चरबी कमी होते का?

डॉ. रिफाई यांच्या मते हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

ते म्हणतात, "तूप खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होत नाही. तुपात 60% ते 65% पर्यंत सॅच्युरेटेड फॅट असते, जे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढवू शकते."

यामुळे तूप खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होईल असं मानण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे डॉ. रिफाई यांनी स्पष्ट केले.

6. मुलांना तूप देणे फायदेशीर आहे का?

डॉक्टरांच्या मते, लहान मुलांना तूप दिल्याने त्यांच्या वाढीला उत्तम मदत होते.

डॉ. चंद्रशेखर सांगतात, "मुलांची नर्व्हस सिस्टीम, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरू शकते."

डॉ. रिफाई म्हणतात, "लहान मुलांची मेटाबॉलिझम क्षमता मोठ्यांपेक्षा वेगळी असते. तुपातील काही चांगले घटक मुलांचे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात."

"याशिवाय तुपामध्ये व्हिटॅमिन-E आणि व्हिटॅमिन-K यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात जी मुलांच्या योग्य वाढीसाठी अतिशय उपयोगी ठरतात," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

7. तूप हे तेलापेक्षा जास्त चांगले असते का?

डॉ. रिफाई यांच्या मते, तूप हे तेलापेक्षा चांगले आहे असे अजिबात म्हणता येत नाही.

तेलाऐवजी रोज तुपामध्येच जेवण बनवून खाणे आरोग्याला महागात पडू शकते. तूप-डोसा किंवा तुपासोबत इडली यांसारखे पदार्थ जिभेच्या चोचल्यांसाठी कधीतरी खाणे ठीक आहे. पण हेच पदार्थ वारंवार खाणे शरीरासाठी हानीकारक ठरू शकते."

"तूप हे तेलापेक्षा नक्कीच चांगले आहे हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

त्यामुळे जसा तुपाचा वापर कमी आणि ठराविक असावा, तसाच तेलाचा वापरही अगदी प्रमाणातच केला पाहिजे," असं त्यांनी स्पष्ट केलं.

8. मधुमेह असलेल्या लोकांनी तूप खावे का?

डायबिटीजचे रुग्ण, अतिरिक्त चरबी आणि हाय बीपीची समस्या असणाऱ्यांनी तूप खाऊ नये, असा सल्ला डॉ. रिफाई देतात.

"अशा लोकांनी तुपाचा वापर पूर्णपणे बंद करणे जास्त फायदेशीर ठरेल. तुपात काही चांगले घटक असले, तरी कोणत्याही अन्नाचा विचार करताना त्याच्या फायद्यांसोबतच होणारे नुकसानही पाहिले पाहिजे," असे ते सांगतात.

"यामुळेच मधुमेह आणि हाय बीपीच्या रुग्णांनी तूप खाणे टाळलेलेच चांगले," असेही त्यांनी सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)