IPL 2026 ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीला मोठा झटका, 'या' खेळाडूविरोधात निलंबनाची कारवाई

आरसीबी

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आयपीएल 2026 चा अंतिम सामना जिंकून किताब आपल्या नावावर केला.

पण, विजयानंतर संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फलंदाज टिम डेव्हिडवर कारवाई करण्यात आली असून, त्याला आयपीएल 2027 मधील पहिल्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या डावातील 10व्या षटकात टिम डेव्हिडने अंपायर नितीन मेनन यांच्या दिशेने आइस बॅग (बर्फाची पिशवी) फेकली होती. हा प्रकार आयपीएलच्या आचारसंहितेचा लेव्हल-1 नियमभंग मानला गेला.

डेव्हिडला आयपीएलच्या आचारसंहितेतील कलम 2.9 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

या नियमानुसार, "सामन्यादरम्यान चेंडू किंवा कोणतेही उपकरण (पाण्याच्या बाटलीसारखी कोणतीही वस्तू) खेळाडू, टीम अधिकारी, अंपायर किंवा सामनाधिकारी यांच्या दिशेने चुकीच्या किंवा धोकादायक पद्धतीने फेकणे हा गुन्हा किंवा नियमभंग मानला जातो."

यानंतर टिम डेव्हिडवरवर मॅच फीच्या 50 टक्के दंडाची कारवाईही करण्यात आली. तसेच, या प्रकरणात त्याला दोन डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले. त्यामुळे या हंगामात त्याचे एकूण डिमेरिट पॉइंट्स पाच झाले आहेत.

नियमानुसार, एखाद्या खेळाडूचे पाच डिमेरिट पॉइंट्स झाल्यास त्याला पुढच्या हंगामातील पहिल्या सामन्यात खेळण्यास बंदी घातली जाते म्हणजेच निलंबित केले जाते.

आरसीबीचे सगल दुसरे विजेतेपद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गुजरात टायटन्सचा पाच विकेट राखून पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. गुजरातनं आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. कोहलीनं नाबाद केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीनं हे आव्हान सहज पार केलं.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आरसीबीच्या गोलंदाजांचा पहिल्या इनिंगमध्ये दबदबा राहिला.

तर दुसऱ्या इनिंगमध्येही कोहलीसह आरसीबीच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवत सलग दुसऱ्या विजेतेपदाची कामगिरी सहज शक्य करून दाखवली.

विराट कोहलीनं 42 चेंडूंमध्ये नाबाद 75 धावा केल्या.

गुजरातची फलंदाजी

फायनल सामन्यामध्ये गुजरातची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीने वाहवा मिळवलेल्या गुजरात टायटन्सची सलामीची जोडी स्वस्तात परतली.

तिसऱ्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलला हेझलवूडनं बाद केलं. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं त्याचा उत्तम झेल घेतला.

त्याच्या पाठोपाठ साई सुदर्शनला भुवनेश्वरनं जितेश शर्माच्या हाती झेलबाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. त्यानं 12 धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर आलेला निशांत सिंधू रसीख डारच्या गोलंदाजीवर पडीक्कलला झेल देऊन बसला. त्यानं संघासाठी 20 धावा केल्या.

या तीन विकेटनंतर सर्वाधिक मदार असलेल्या जोस बटलरला कृणाल पांड्यानं एका चेंडूवर चकवलं आणि जितेश शर्मानं अत्यंत चपळाईनं स्टंपिंग करत त्याला 19 धावांवर बाद केलं.

त्यामुळं आरसीबीची अवस्था 4 बाद 73 अशी झाली.

रजत पाटीदारने घेतलेला झेल.

फोटो स्रोत, ANI

त्यानंतर अर्शद खानला बाद करत हेझलवूडनं त्याची दुसरी आणि संघासाठी पाचवी विकेट घेतली. त्यावेळी गुजरातची अवस्था 5 बाद 99 धावा अशी झाली होती.

त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजीसाठी ओळखला जाणार राहुल तेवतियाही अवध्या 7 धावा करून परतला. रसीख डारनं त्याला बाद करत दुसरी विकेट घेतली.

त्यानंतर जेसन होल्डरला भुवनेश्वरनं आणि राशिद खानला रसीख डारनं बाद केलं. त्या दोघांनीही 7-7 धावाच केल्या.

गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदरनं एकाकी झुंज देत नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याजोरावर गुजरातनं आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं.

आरसीबीची फलंदाजी

आरसीबीनं 156 धावांच्या आव्हानाचा सामना करण्याची सुरुवात त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत केली.

विराट कोहलीसह सलामीला आलेल्या व्यंकटेश अय्यरनं सुरुवातीपासूनच चांगली फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

व्यंकटेश अय्यरनं पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीचा प्रयत्न केला. त्यानं काही चांगले फटकेही लगावले. पण त्याला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी त्यानं 16 चेंडूत 32 धावा करत संघाची धावांची गती चांगलीच वाढवून ठेवली.

पाचव्या ओव्हरमध्ये सिराजनं अय्यरला जाळ्यात अडकवलं आणि रबाडाच्या हाती तो झेलबाद झाला.

त्यानंतर आलेला देवदत्त पडिक्कल अवघे चार चेंडू खेळून एका रनवर बाद झाला. रबाडानं अर्शद खानच्या हातून त्याला परत पाठवलं.

दुसऱ्या बाजूनं विराट कोहलीनं मात्र मोर्चा सांभाळलेला पाहायला मिळाला. त्यानं गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली होती.

विराट कोहली

फोटो स्रोत, ANI

त्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनं काही फटके मारले, पण तोही 15 धावा करून बाद झाला. रशीद खाननं त्याला बाद केलं.

त्यानंतर त्याचओव्हरमध्ये राशिद खाननं कृणाल पांड्याला बाद करत आरसीबीला चौथा धक्का दिला. त्यामुळं एका पाठोपाठ मिळालेल्या विकेटमुळं जीटीनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

पण नंतर आलेल्या टीम डेव्हीडनं कोहलीच्या साथीने डाव सावरला. त्याने काही चांगले फटके लगावले. पण 17 चेंडूमध्ये 24 धावा करून तो बाद झाला. अर्शद खाननं त्याची विकेट घेतली.

त्यानंतर आलेल्या जितेश शर्मा आणि कोहलीनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

आरसीबीकडे बाँलिंग कॉम्बिनेशन उत्तम आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आरसीबीकडे बाँलिंग कॉम्बिनेशन उत्तम आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघानं इतिहास रचला. त्यांनी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला हरवले आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यानंतर आयपीएल विजेतेपद यशस्वीपणे राखणारा हा तिसरा संघ ठरला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)