You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उभं राहून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की धोकादायक? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
- Author, शारदा व्ही
- Role, बीबीसी तमिळ
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
उभं राहून पाणी पिऊ नये, बसूनच पाणी प्यावं, असं सांगणारे अनेक व्हीडिओ तुम्ही इंटरनेटवर पाहिले असतील.
उभं राहून पाणी पिण्यामुळे शरीरातील द्रवांचं संतुलन बिघडू शकतं, अपचन होऊ शकतं आणि सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो, असं सांगितलं जातं.
त्याचबरोबर, उभं राहण्यापेक्षा बसलेली अवस्था अधिक शांत आणि स्थिर असते. त्यामुळे पाणी बसूनच प्यावं, असं घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगत असतात.
परंतु, यातील नेमकं काय खरं, गैरसमज काय आणि विज्ञान काय सांगतं? याबाबत डॉक्टरांचं मत आपण जाणून घेऊया.
'पाणी न पिणे हेच जास्त धोकादायक'
अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि सिद्ध डॉक्टरही उभं राहून पाणी पिण्यापेक्षा बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.
पण, उभं राहून पाणी पिल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो, सांधेदुखी किंवा इतर त्रास होतात, असे दावे सिद्ध करणारे ठोस वैज्ञानिक पुरावे किंवा संशोधन उपलब्ध नसल्याचेही डॉक्टर सांगतात.
पचनसंस्थेच्या कॅन्सरवरील शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर सर्जन) डॉ. सेंथिल कुमार गणपती सांगतात की, पाणी न पिणं हेच जास्त धोकादायक आहे. पाणी न पिण्यापेक्षा उभं राहून पाणी पिणं कधीही चांगलं आहे.
मात्र, "पाणी उभं राहून प्यावं की बसून?" या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, "बसून पाणी पिणं अधिक चांगलं म्हणजेच सर्वोत्तम पर्याय आहे."
डॉ. गणपती सांगतात, "उभं राहण्यापेक्षा बसलेल्या अवस्थेत व्यक्ती अधिक शांत आणि स्थिर असते. त्यामुळे बसून हळूहळू पाणी पिल्यास ते अन्ननलिकेतून व्यवस्थित पोटात म्हणजे आतड्यांपर्यंत पोहोचतं."
त्यांच्या मते, जेवताना बसून पाणी पिणं फायदेशीर असतं. यामुळे पचनाला मदत होते. जेवताना मध्ये-मध्ये थोडं-थोडं पाणी पिल्याने अन्न अन्ननलिकेतून सहजपणे सरकण्यास मदत होते.
'घोट घोट घेत हळूहळू पाणी प्यावं'
डॉक्टरांच्या मते, उभं राहून किंवा बसून पाणी पिण्यापेक्षा झोपून म्हणजेच झोपलेल्या स्थितीत पाणी पिणं जास्त धोकादायक ठरू शकतं.
शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखरन सांगतात, "झोपून पाणी पिल्यास पाणी अन्ननलिकेतून जाण्याऐवजी श्वसननलिकेत जाऊ शकतं. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो."
"पाणी पिताना साधारण 45 अंशामध्ये सरळ बसलेलं असणं चांगलं. यामुळे पाणी व्यवस्थित पोटात पोहोचतं. पण, उभं राहून पाणी प्यायल्याने धोका किंवा आरोग्याच्या समस्या होतात, या दाव्याला ठोस असा पुरावा नाही."
त्याचबरोबर, पाणी डोकं मागे करून एकदम गटागट न पिता, घोट घेत हळूहळू प्यावं, असा सल्लाही ते आवर्जुन देतात.
ते सांगतात, "साधारण तापमानाचं पाणी डोकं मागे करून एकदम गटागट न पिता, थोडं-थोडं करून घोट घेत प्यावं. एकाच वेळी खूप पाणी प्यायल्यास श्वास अडकण्याचा धोका किंवा ठसका लागू शकतो."
डॉ. गणपती म्हणतात, जेवणाच्या वेळी नाही, तर तहान लागल्यावर पाणी प्यायचं असेल तर उभं राहूनही तुम्ही पाणी पिऊ शकता.
त्यांच्या मते, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी उभं राहून पाणी पिऊ शकता. उदाहरणार्थ, मॅरेथॉन धावल्यानंतर खूप तहान लागली असेल, तर उभं राहून पाणी पिल्याने शरीराला गमावलेलं पाणी (हायड्रेशन) लवकर मिळण्यास मदत होऊ शकते.
'घाईघाईने नको हळूहळू प्या'
डॉ. गणपती सांगतात, "आतडे सरळ नळीसारखं नसल्यामुळे पाणी उभं राहून किंवा बसून पिल्याने त्यावर फारसा फरक पडत नाही. लहान आतडे साधारण 6 मीटर आणि मोठं आतडे सुमारे 2 मीटर लांब असतात. ही आतडी शरीरात सरळ नसून वेटोळे घातलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे व्यक्ती उभी आहे की बसली आहे, याचा पाणी आतड्यांपर्यंत पोहोचण्यावर फारसा परिणाम होत नाही."
पण, पाणी कसं प्यावं यावरही डॉ. गणपती यांनी भर दिला आहे. ते पाणी हळूहळू आणि थोडं-थोडं घोट घेत पिण्याचा सल्ला देतात. ते सांगतात, "पाणी घाईघाईने पिल्यास घशाच्या स्नायूंवर ताण येऊन अस्वस्थता जाणवू शकते. घाईने पाणी पिल्याने घशाचे स्नायू त्याला वेगाने आत घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही थेंब चुकून श्वसननलिकेत जाऊन ठसका लागू शकतो."
सरकारी आयुर्वेदिक डॉ. बालमुरुगन सांगतात की, आयुर्वेदात पाणी बसून प्यावं की उभं राहून, याबाबत ठोस नियम सांगण्यात आलेला नाही. परंतु, पाणी हळूहळू आणि घोट-घोट करून प्यावं, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
डॉ. बालमुरुगन सांगतात, "आयुर्वेदानुसार तोंड बंद ठेवून, विशेषतः ओठांना पाणी लावून थोडं-थोडं घोट घेत पाणी प्यावं. आयुर्वेदात शरीराच्या 13 गरजांपैकी तहान ही एक महत्त्वाची गरज मानली आहे. तहान भागवली नाही तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पाणी उभं राहून प्यावं की बसून, यापेक्षा तहान लागल्यावर पाणी न टाळता ते पिणं खूप महत्त्वाचं आहे."
डॉ. बालमुरुगन पुढे सांगतात, "तोंड उघडून पाणी पिल्यास पाण्यासोबत हवा देखील पोटात जाऊ शकते. ती शरीरासाठी चांगली नसते. त्यामुळे ओठ बंद ठेवून, हळूहळू पाणी प्यावं. शरीरात जास्त हवा गेल्याने लगेच त्रास जाणवणार नाही. परंतु, ही सवय दीर्घकाळ राहिल्यास गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात."
इस्लाममध्येही पाणी पिण्याबाबत काही मार्गदर्शक नियम, तत्त्वे आहेत.
याबाबत बीबीसी तमिळशी बोलताना मनिथनेय मक्कल काचीचे अध्यक्ष आणि इस्लामी अभ्यासक जवाहरुल्ला यांनी सांगितलं की, प्रेषित बसून पाणी प्यायचे. त्यामुळे त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करायचे असल्यास बसून पाणी प्यावं. पण, उभं राहून पाणी पिण्यावर कोणतीही बंदी नाही. मक्केतील पवित्र जमजम विहिरीचं पाणी ते उभं राहूनच प्यायचं. यासोबतच पाणी हळूहळू घोट घेत प्यावं आणि पाणी पिताना त्यात श्वास सोडू नये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)