मुंबई अंतराळातून कशी दिसते? पृथ्वीवर परतल्यावर सुनीता विल्यम्सची पहिली मुलाखत

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी पहिल्यांदाच आपले अंतराळातील विविध अनुभव सांगितले आहेत.

त्यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्याशिवाय निक हेग हे अंतराळवीरदेखील उपस्थित होते.

ह्यूस्टनमधील (टेक्सास) जॉनसन स्पेस सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात 9 महिन्यांहून अधिक काळ कसा घालवला, त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा अनुभव कसा होता याविषयी आपली मतं मांडली. यासोबतच, त्यांनी भारताबाबतही चर्चा केली.

त्यांनी स्पेस स्टेशनमध्ये असताना शरीरावर पडणारा प्रभाव तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर होणाऱ्या परिणामांविषयीही भाष्य केलं.

यासोबतच, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून (आयएसएस) भारत आणि हिमालय कसा दिसतो, याबाबतही त्यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भाष्य केलंय.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून कसा दिसतो भारत?

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये राहत असताना अंतराळातून भारताकडे पाहतानाचा एखादा क्षण आपल्या स्मरणात आहे का?

आणि, अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्नावर बोलताना सुनीता विल्यम्स यांनी म्हटलं की, "भारत शानदार दिसतो. जेव्हा केव्हा आम्ही हिमालयावरुन जायचो, त्यादरम्यानच बुचने हिमालयाचे काही जबरदस्त फोटो घेतले आहेत. ते दृश्य थक्क करणारं असायचं."

पुढे त्यांनी म्हटलं की, "मी याआधीही सांगितलं होतं तसं भूपट्टं एकमेकांवर आदळताना उमटलेले तरंग तिथे दिसतात. खाली भारतात अनेक रंगांची उधळण दिसते. मला वाटतं पूर्वेकडून येताना, गुजरात आणि मुंबईवरुन जाताना किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या बोटी दिसतात. ते एखाद्या मार्गदर्शक किंवा आशेच्या किरणासारखं दिसतं."

"मला लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतभर दिसणारं प्रकाशाचं जाळं. मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत. रात्रीच नाही तर दिवसाही ते दृश्यं विहंगम दिसतं. त्यात हिमालय उठून दिसतो. तो भारतात जाताना आघाडीवर उभा असल्यासारखा भासतो," असंही त्या म्हणाल्या.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) सोबत आपलं ज्ञान आणि कौशल्य शेअर करण्याबाबत तसेच भारत भेटीबद्दल विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "मला आशा आणि खात्री आहे की मी बाबांच्या देशाला पुन्हा भेट देईन. तिथल्या लोकांना भेटेन. Axiom मोहिमेसोबत भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार आहेत, त्याविषयीही मला उत्सुकता आहे. त्यांच्यासोबत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधील अनुभव शेअर करणं आनंददायी ठरेल."

पुढे त्या असंही म्हणाल्या की, "हे खूप छान आहे. भारतीयांना त्यांच्या देशातले नायक मिळतील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किती छान आहे, याविषयी ते स्वत: त्यांच्या नजरेतून जाणून घेऊ शकतील. मलाही आशा आहे की, मी लवकरच भारताला भेट देईन आणि भारतातील अधिकाधिक लोकांना माझ्या अनुभवाविषयी सांगू शकेन. कारण, तो एक महान देश आहे. एक सुंदर लोकशाही जी अंतराळात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांना मदत करायला मला नक्कीच आवडेल."

सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही पाच जून रोजी बोइंगच्या स्टारलायनर अंतराळ यानातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेले होते. ते तिथून आठवडाभरातच पृथ्वीवर परतणार होते.

मात्र, त्यांच्या यानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे, त्यांना पृथ्वीवर परत आणण्यामध्ये 'नासा'ला जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लागला.

सुनीता विल्यम्स यांचे कुटुंबीय, अमेरिकेतील लाखो लोक यासोबतच भारतातील गुजरातमधील त्यांच्या मूळ गावातले लोकदेखील त्यांच्या परतीकडे आशेने डोळे लावून बसले होते.

झुलासण असं त्यांच्या गावाचं नाव आहे. हे गाव गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरपासून जवळपास 40 किलोमीटर दूर आहे. हे त्यांच्या वडिलांचं मूळ गाव आहे.

सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पंड्या यांचा जन्म याच गावात झाला होता. 1957 साली ते वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांनी उर्सलीन बोनी यांच्यासोबत विवाह केला.

सुनीता या त्या दोघांच्या कन्या आहेत. सुनीता यांचा जन्म 1965 साली झाला होता.

सुनीता यांच्या मूळ गावाची लोकसंख्या जवळपास सात हजार आहे. तिथे वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात.

सुनीता विल्यम्स यांनी दोनवेळा म्हणजेच 2007 आणि 2013 ला आपल्या गावाला भेट दिली आहे. दोन्हीही वेळेला त्यांनी आपला अंतराळ दौरा पूर्ण केल्यानंतरच गावी भेट दिली होती.

सुनीता विल्यम्स जेव्हा 2013 मध्ये भारतात आल्या होत्या तेव्हा त्या दर्शनासाठी प्रसिद्ध अशा दाला माता मंदिरात गेल्या होत्या. यावेळी, सुनीता सुखरुपपणे पृथ्वीवर परताव्यात यासाठी गावकऱ्यांनी या मंदिरात प्रार्थनाही केली होती.

शरीरावर काय झाला परिणाम?

अंतराळात दीर्घकाळ राहण्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, या प्रश्नांचही उत्तर सुनीता विल्यम्स यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिलं.

अनुभवी अशा अंतराळवीरांनाही अंतराळात दीर्घकाळ राहताना काही आव्हानांचा निश्चितच सामना करावा लागतो.

ट्रेनिंगच्या दरम्यान जो अनुभव प्राप्त होतो, तो खऱ्याखुऱ्या मिशनच्या तीनचतुर्थांश इतकाच असतो.

तसेच, निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ अंतराळात घालवावा लागला तर अंतराळवीरांच्या उत्साहामध्येही घट होऊ शकते.

अंटार्कटिकामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांनाही कधीकधी अशा मानसिक अवस्थेमधून जावं लागतं. याला 'सायकोलॉजिकल हिबरनेशन' असं म्हणतात. या अवस्थेमध्ये व्यक्ती भावनाशून्य आणि पूर्णपणे अलिप्त झाल्यासारखा होतो.

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांची तसेच पृथ्वीच्या ध्रुवीय भागात जाणाऱ्या संशोधकांची अवस्था एकसारखीच होऊ शकते आणि चांगली झोप घेऊन या अडचणी कमी केल्या जाऊ शकतात.

सुनीता विल्यम्स यांनी म्हटलं की, "आपलं शरीर एखाद्या बदलासोबत स्वत:ला ऍडजस्ट करुन घेतं, हे खरंच अगदी एखाद्या चमत्कारासारखं आहे. जेव्हा मी परत आले तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही सगळेच थोडंसं धडपडत चालत होतो."

"मात्र, फक्त 24 तासांत आपल्या शरीरातील नर्व्हस सिस्टीम काम करायला लागते, ही कमाल अशी गोष्ट आहे. नेमकं काय घडतंय, हे आपल्या मेंदूला समजायला लागतं."

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणामध्ये राहिल्याने शरीरातील स्नायू तसेच हाडे कमकुवत होण्याचा धोका असतो.

त्यामुळेच, तिथे राहताना अंतराळवीरांना दररोज चार तास व्यायाम करावा लागतो.

या दोन्ही अंतराळवीरांनी दररोज 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला आहे. त्यामुळे, या एका गोष्टीवरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, या सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक ठरलं असेल.

सुनीता विल्यम्स या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तिथे निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ रहावं लागलं.

286 दिवसांपर्यंत स्पेसमध्ये राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही 19 मार्च रोजी पृथ्वीवर परतले.

या दौऱ्यामध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 900 तासांपर्यंत संशोधन केलं आणि 150 वैज्ञानिक प्रयोगही केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)