'दगलबाज शिवाजी' : प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाची चर्चा, शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी केली बंदीची मागणी

  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

'शिवाजी कोण होता?' या गोविंद पानसरे लिखित पुस्तकानंतर आता प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे लिखित 'दगलबाज शिवाजी' हेदेखील पुस्तक बरंच चर्चेत आलं आहे.

अर्थातच, यामागेही कारण आहे ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या दोन्ही पुस्तकावर बंदी घालण्याची केलेली मागणी.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली होती.

त्यावर मोठा वाद झाल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.

या पुस्तकासह 'दगलबाज शिवाजी' या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात करणार असल्याचं वक्तव्य गायकवाड यांनी नुकतंच केलं आहे.

पण, 'दगलबाज शिवाजी' या पुस्तकात नक्की आहे तरी काय? 'प्रबोधनकार' म्हणवल्या जाणाऱ्या केशव सीताराम ठाकरे यांनी नक्की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं आहे? ते पाहूयात.

'शिवाजी कोण होता?' आणि 'दगलबाज शिवाजी'

ही दोन्ही पुस्तके खरं तर फार जुनी आहेत. 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी 1988 साली लिहिलेलं होतं. तर 'दगलबाज शिवाजी' हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी जवळपास 100 वर्षांपूर्वी लिहिलेलं होतं.

विशेष म्हणजे या दोन्हीही छोटेखानी पुस्तिका आहेत. 'शिवाजी कोण होता' हे निव्वळ 76 पानांचं पुस्तक आहे तर दगलबाज शिवाजी' हे साधारणत: 30-40 पानांचं पुस्तक आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या मते, या दोन्ही पुस्तकांच्या शीर्षकात शिवाजी महाराजांचा 'शिवाजी' असा एकेरी असा उल्लेख असून हा अनादर आहे. त्यामुळे, त्यावर बंदी घालण्यात यावी, यासाठी ते आता आग्रही झालेले आहेत.

'शिवाजी कोण होता?' असं नाव पुस्तकाला देण्यामागे गोविंद पानसरेंची भूमिका काय होती? हे तुम्ही इथे वाचू शकता.

मात्र, सुमारे 100 वर्षांपूर्वी लिहिलेलं 'दगलबाज शिवाजी' हे छोटेखानी पुस्तक ज्या केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलं आहे ते कोण होते, हे आधी पाहूयात.

केशव सीताराम ठाकरे कोण होते?

केशव सीताराम ठाकरे यांच्याकडे आजच्या काळाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे यांचे आजोबा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील अशी त्यांची पटकन समजण्यासारखी सोपी ओळख सांगता येईल.

पण, ही ओळख निश्चितच पुरेशी नाही.

'प्रबोधनकार डॉट कॉम' ही केशव सीताराम ठाकरे यांच्याविषयी समग्र माहिती देणारी वेबसाईट आहे. 2010 साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या 125 व्या जन्मदिनी या वेबसाईटचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या हस्ते दादर इथे लोकार्पण झालं होतं.

या वेबसाइटवर लिहिलंय की, "प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव."

"महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहासलेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे."

'प्रबोधन'मधील प्रबोधनकार' या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या आणि पत्रकार सचिन परब यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील निवेदनात मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे लिहितात की, "महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा सुरू असल्यास 'पुरोगामी महाराष्ट्र' हा शब्दप्रयोग हमखास केला जातो. हा पुरोगामी महाराष्ट्र आभाळातून पडला नाही. त्याला पुरोगामी बनवण्याच्या प्रक्रियेत काही विचारवंतांची आयुष्ये खर्ची पडली आहेत."

"लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परंपरेत असणारे अखेरचे नाव म्हणजे अर्थातच केशव सीताराम ठाकरे हे होय. ठाकरे यांनी ज्या माध्यमातून हे कार्य केले त्याचे नाव 'प्रबोधन'. म्हणून तर ठाकरे यांची प्रबोधनकार ठाकरे अशी ओळखच निर्माण झाली."

विशेष म्हणजे, आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट 'आपण बाळासाहेब ठाकरे यांचे वारस' असल्याचा दावा करतात.

प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील होय.

शिवसेना पक्षाचं डरकाळी फोडणारा वाघ हे बोधचिन्हच, 'शिवसेना' आणि 'मार्मिक' ही नावं, 'जय महाराष्ट्र' हे घोषवाक्य, ज्वलंत मराठी अभिमानाची पताका आणि बहुजनी हिंदुत्ववाद हे सारं मुळात प्रबोधनकाराचींच देण आहे.

'दगलबाज शिवाजी' पुस्तकाच्या जन्माची कथा

हे पुस्तक कसं जन्माला आलं, याची माहिती स्वत: केशव सीताराम ठाकरे यांनी 'माझी जीवनगाथा' या पुस्तकात दिली आहे.

1926 च्या मे महिन्यात वसंत व्याख्यानमाला जागोजागी चालू असताना भोर येथे ठाकरे यांचे स्नेही गोपीनाथराव पोतनवीस आणि भोरचे शिवप्रेमी शेटेबंधू यांच्या आग्रहानंतर त्यांनी हे व्याख्यान दिलेलं होतं.

तेव्हाही शिवरायांना 'दगलबाज' हे विशेषण लावणं काहींना रूचणार नाही, यांची कल्पना असूनही त्यांनी हेच विशेषण कायम ठेवण्याचा ठाम निर्णय घेऊन हे व्याख्यान दिलं.

हा किस्सा सांगताना प्रबोधनकार लिहितात की, "'दगलबाज' आणि 'दगाबाज' यातील भेदच लोकांना समजत नाही. 'दगलबाज' म्हणजे 'डिप्लोमॅट.' 'दगाबाज' म्हणजे 'ट्रेचरस'."

पुढे, शिवरायांच्या अनुषंगाने उल्लेख करत ते लिहितात की, "इरसाल मुत्सद्दी दगलबाजच असावा लागतो. कळले?"

पण, या विषयामुळे भोर शहरात खळबळ उडाली होती. तिथल्या व्याख्यानमालेच्या बोर्डावर 'वक्ते - प्रबोधनकार ठाकरे', 'विषय - दगलबाज शिवाजी.' असं खडूने लिहिण्यात आलेलं होतं.

काही चीड आलेल्या मंडळींनी तो क्रम बदलून 'वक्ते - दगलबाज ठाकरे' आणि 'विषय - प्रबोधनकार शिवाजी' असं दोनतीनवेळा बदल केला. व्यवस्थापकांनी लिहावं आणि चिडखोरांनी ते बदलावं असा प्रकार सायंकाळपर्यंत चालल्याचं ठाकरे सांगतात.

शेवटी 'भाषण ऐकणारे न्याय देतील,' असं म्हणत ठरवलेलं हे व्याख्यानही सुरळीत पार पडलं आणि ते गाजलंही.

या व्याख्यानानंतर ते समग्र छापून प्रसिद्ध करण्याचे आवाहन अनेकांनी केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी पुण्यास आल्यावर लगेच येणाऱ्या अंकात समग्र लिहून छापलं.

याबद्दल प्रबोधनकार लिहितात की, "तेव्हा मागणीचे तोंड मिटवण्यासाठी, तयार असलेल्या कंपोजवरून क्रौन 16 पानी फर्म्यात 49 पानांची एक पुस्तिका छापण्यासाठी कोकाटे छापखान्यात पाठवली. 5 हजार प्रती छापून, एक आणा किमतीला विक्रीला काढली."

'पुण्यातल्या पुण्यात एकाच दिवशी 5 हजारांची आवृत्ती खलास झाली', असंही ते सांगतात.

'दगलबाज शिवाजी' पुस्तकात नक्की काय आहे?

'दगलबाज शिवाजी' पुस्तकातील पहिलंच वाक्य असं आहे, "महाराष्ट्रापुरता विचार केला, तर आज हिन्दूंची तेहतीस कोटी देवांची फलटण पेन्शनींत निघून, त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मऱ्हाठ्यांच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे."

खरं तर प्रबोधनकारांची भाषा रांगडी होती आणि मांडणी थेट होती. त्यांच्या कुठल्याही लिखाणात कुठेही भीड अथवा आडून केलेली टीका दिसत नाही.

ही मांडणी आपण का केली, याचंही उत्तर या पुस्तिकेत सुरुवातीलाच त्यांनी देऊन ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे ही मांडणी आजच्या काळालाही लागू पडते.

ते लिहितात की, "कालौघाने शिवरायाच्या शिव चारित्र्यावर लौकिकी कल्पनांनी जर भलभलत्या रंगांचा मारा करून, त्याचे खरे उज्वल रूप विकृत केले असेल, अगर ते तसे झाले असेल, तर त्याचा सप्रमाण मुद्देसूद निरास करून, लोकमताच्या वाजवी प्रबोधनासाठी प्रबोधनकाराने आपले शिवप्रासादिक कलमास्त्र परजणे, त्याचे कर्तव्यच आहे."

पुढे ते लिहितात की, "हे कटू कर्तव्य आहे. कल्पनेने किंवा अंधश्रद्धेने काढलेले शिवरायाचे चित्र बाजूला सारून, त्या राष्ट्रवीराची खरीखुरी प्रतिमा धीटाईने लोकांपुढे मांडणे, म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम शआहे. पण ते कोणी तरी केव्हा तरी करणेच प्राप्त असल्यामुळे, लोकक्षोभाची पर्वा न बाळगता हौसेने ते आम्ही आपल्या शिरावर घेतले आहे."

या पुस्तकात त्यांनी इंग्रजी इतिहासकारांनी केलेल्या शिवचरित्राच्या मांडणीचाही समाचार घेतला आहे. तत्कालीन इतिहासकारांनी शिवाजी महाराजांवर राजद्रोह, दगलबाजी, विश्वासघात असे आरोप लावण्यावरूनही त्यांनी प्रत्युत्तरदाखल सडेतोड मांडणी केली आहे.

या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे शिवाजी महाराजांचा गौरव करत त्यांच्या असीम पराक्रमाची मांडणी तर करतातच, पण तेही वेगळ्या दृष्टीकोनातून.

जगभरातील तत्कालीन तसेच भूतकाळातील सत्तांची आणि सत्ताधीशांची उदाहरणं देऊन ते पटवून द्यायचा प्रयत्न करतात की, 'शिवाजी दगलबाज ठरला तर त्यातही त्या राष्ट्रवीराचा सन्मानच होत आहे.'

पुढे ते लिहितात की, "कारण, शिवाजी विजयी दगलबाज होता. हिंदुस्थानांत एक वेळ दगलबाज आर्यांनी कम-दगलबाज अनार्यांना पादाक्रांत केले. त्यानंतर, हिंदू राज्यकर्त्यांची दाणादाण उडवून मोंगलांनी आपली दगलबाजी वरचढ ठरविली. पोर्तुगेज, फ्रेंच, डच व इंग्रेज यांमध्येही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लागून, त्यात अखेर इंग्रेजांचा घोडा पहिला आला. काही वर्षे दख्खनच्या मुसलमानीशाह्या 'आम्ही पट्टीचे दगलबाज' म्हणून महाराष्ट्रभर आपल्या सत्तेचा धुमाकूळ घालीत होत्या. शिवाजीने बोलबोलता त्या सत्तेला उद्ध्वस्त करून खुद्द दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही मऱ्हाठे दिढी दुपटी दगलबाज आहोत, याची जाहीर नौबद रायगडावरून ठोकली."

शिवचरित्राच्या 'अवतारी' मांडणीला प्रखर विरोध

'शिवाजी कोण होता' आणि 'दगलबाज शिवाजी' या दोन्हीही पुस्तिका शिवाजी महाराजांच्या चरित्राला अवतारी पद्धतीनं मांडण्याला विरोध करतात.

प्रबोधनकार आपल्या पुस्तिकेत लिहितात की, "शिवाजीचा स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेताने आणि `समर्थांच्या' कृपेमुळे सहजगत्या घडून आलेला एक नवलाईचा चमत्कार, इतक्या हलक्याफूल भावनेने आम्ही त्या प्रचंड प्रबोधनाकडे पाहत आहो. पुराणांच्या पारायणाने पंगु बनलेल्या आमच्या मनोवृत्तीला, शिवचरित्राची कमावणी होईनाशी झालेली आहे. शिवचरित्रातील मोठमोठे प्रसंग म्हणजे बाल-कृष्णाच्या पूतनाकर्णाप्रमाणे `ईश्वरलीला' वाटतात. कोणत्याही पुरुषोत्तमाच्या चारित्र्यावर एकदा का अवतार कल्पनेचा सफेदा चढला आणि त्याची सर्व लहानमोठी बरीवाईट कृत्ये `ईश्वरीलीला' सदरात पडली की त्या चरित्रापासून आत्मोद्धारार्थ लागणारे स्पिरिट मनुष्याला केव्हावी प्राप्त होत नसते. रामकृष्णांची उज्वल चरित्रे आज आमच्या व्यवहारात कवडीमोल होऊन बसली आहेत, याचे तरी कारण हेच."

प्रबोधनकार ठाकरे आपल्या पुस्तिकेत याला 'पौराणिक दृष्टीचा अडथळा' असं संबोधतात.

"जिकडे पहाल तिकडे पौराणिकी दृष्टीचा अडथळा," असं म्हणत ते कोणत्याही महान व्यक्तीमत्त्वाच्या चरित्राची 'ईश्वरलीले'प्रमाणे मांडमी करण्याला विरोध करताना दिसतात.

ते लिहितात की, "पौराणिक साच्याशिवाय त्यांची विद्वत्ता कशातही ठाकठीक बसायची नाही. प्रथम शिवाजीला ते परमेश्वराचा अवतार बनवतील, कौसल्येप्रमाणे जिजाबाईला दिल्लीपती मोंगलाच्या वधाचे डोहाळे पाडतील, तेव्हा कोठे त्यांना `शिवसंभव' दिसायचा. थोडासा सत्याचा धागा, त्यांवर यांच्या कल्पनेच्या कोलांट्या उड्या! ना त्यात विवेक, ना चिकित्सा, ना साक्षेप. येथून तेथून भावनावशतेचा खरकटवाडा, शक्याशक्यतेचा विचार नाही, परिस्थिती-परीक्षणाची दृष्टी नाही, फार काय पण, मानवी स्वभाव ओळखण्याचीही अक्कल नाही."

पुढे ते लिहितात की, "आमच्या लाडक्या हीरोबद्दल कोणी वाईट बोलला तर त्याच्या विधानाला समर्पक प्रत्युत्तर देण्याऐवजी आम्ही नुसत्या शिव्याश्रापांवरच आमच्या इतिहास-विषयक प्राविण्याचे प्रदर्शन करतो. नाहीतर आमचा हीरो ईश्वरावतारच असल्यामुळे त्याच्या सर्व ब-यावाईट कृत्यांना पुराणांच्या पोतड्यातील रामकृष्णांच्या तत्सम कृत्यांचा पाठपुरावा दाखवून, `या देवाच्या लीला, माणसांना कसच्या कळणार!' म्हणून शेरा ठोकून स्वस्थ बसतो. शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले की आमच्या नाकाचा शेंडा फुरफुरू लागतो.पण शिवाजी दगलबाज कसा नव्हे? का असू नये? याचा मात्र विवेकशुद्ध विचार आम्हाला कधी सुचायचा नाही. रूढ पौराणिकी मताची पर्वा न करता हा विचार खुलासेवार आज चर्चेला घेतला आहे."

'मुसलमानविरोधी शिवराय' अशा सरधोपट मांडणीला विरोध

प्रबोधनकार आपल्या पुस्तकात लिहितात की, "शिवाजीचे ध्येय काय होते? शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून, तिला रसातळाला नेण्याचा यत्न करणे, हा तर प्रत्येक मनष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्रस्वातंत्र्याचा धर्म उद्दिपित करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय. शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे होते."

"महाराष्ट्र मऱ्हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? मऱ्हाठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी मऱ्हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्त्वाकांक्षेने बालवयातच फुरफुरलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणा-या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारीकडे काग्र लक्ष ठेवून, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्यप्राप्तच होते. त्याने अफझुलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय."

पुढे ते लिहितात की, "अफझुलखानाच्या स्वारीचा उद्देश, त्याने विजापुरास मारलेली पैज. येताना वाटेत केलेले अत्याचार, आणि शिवाजीविरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. अफझुलखान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित अदिलशाही सत्तेने फेकलेला बांबगोळाच होय, ही त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच, शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच, त्याच्या डावाशी प्रतिडाव खेळला, आणि अखेर अतुल्य प्रसंगावधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद करून, शिवाजीचा महाराष्ट्र – स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहजगत्या टाचेखाली विझणारी ठिणगी नव्हे, हे त्याने विजापूरच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले."

या पुस्तकाच्या अखेरीस प्रबोधनकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना महाभारतातील अर्जुनासोबत करून शिवरायांना अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ ठरवलं आहे.

'बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी' या मुद्द्यामध्ये ते लिहितात की, "भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो, काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पाहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल."

संदर्भ

  • प्रबोधनकार डॉट कॉम - संपादक - सचिन परब
  • 'प्रबोधन'मधील प्रबोधनकार - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळ
  • दगलबाज शिवाजी - प्रबोधनकार ठाकरे - मधुश्री पब्लिकेशन
  • माझी जीवनगाथा - प्रबोधनकार ठाकरे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)