छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोधात असलेला हा 'खालिद' महाराष्ट्राला का पचला नसावा?

  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

'सर, पोट्टे म्हणतात, मुसलमान अफझलखानच असतात.'

'असं काही नसतं हिंदू-मुसलमान.'

'मग तुम्ही तसं का नाही सांगितलं वर्गात? तुम्ही तर आतडं-कोथळ्याचंच सांगितलं.'

'शिवाजी महाराज आपले होते की त्यांचे?'

'खालिद का शिवाजी' हा चित्रपट आता 'खालिद के शिवाजी' या नावानं ॲपल टीव्ही, बुक माय शो आणि यूट्यूब मूव्हीवर प्रदर्शित झालाय. पण, वर उल्लेख केलेल्या आणि ट्रेलरमध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या संवादांमध्ये बदल करून.

ज्याला या चित्रपटाची पार्श्वभूमी माहिती नाही, त्याला अशा प्रकारचे बदल करण्यात आलेत, ते चित्रपट पाहताना तोंडात एखादा खडा लागावा तसे लागतात. मला तरी लागले.

चित्रपट पाहताना, मला त्या-त्या क्षणी प्रचंड उत्सुकता वाटली की, या ठिकाणी लेखकानं पटकथा लिहिताना लिहिलेली मूळ वाक्यं काय असावीत? ती याहून अधिक ताकदीची आणि परिणामकारक असतील का?

निरागसपणे प्रश्न विचारणारा आणि 'इतिहासाशी इमान असणाऱ्या' शिवाजी महाराजांच्या शोधात असलेला इयत्ता पाचवीमधला हा खालिद महाराष्ट्राला का पचला नसावा?

महाराष्ट्राची पचनशक्ती इतकी खराब का झाली असावी की, चित्रपटातल्या इयत्ता पाचवीतल्या या खालिदचे भाबडे प्रश्न हे प्रत्यक्षातल्या सार्वजनिक सुव्यवस्थेसमोरचाच मोठा प्रश्न ठरावेत?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून 7 ऑगस्ट 2025 रोजी म्हटलं होतं की, 'खालिद का शिवाजी' सिनेमांमधून असत्य इतिहास आणि धार्मिक भावनांना दुखावणे या बद्दलची तक्रार दाखल झाली आहे, म्हणून याचा फेरविचार व्हावा हे निर्देश मी दिले आहेत.'

ज्या चित्रपटाची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'मार्शे दु फिल्म' (Marché du Film) या विभागासाठी निवड झाली होती, असा हा महाराष्ट्राची मान आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावून आलेला चित्रपट 8 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार होता.

पण, निव्वळ ट्रेलरवरूनच आक्षेप घेण्यात आला आणि चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं. तो रिसेन्सॉर करून घ्यावा लागला. अखेर हा चित्रपट आता युट्यूबवर रेंटने उपलब्ध झाला आहे.

शिवरायांच्या इतिहासाविषयी मांडणी करणारा चित्रपट

हे खरंय की, नुसता ट्रेलर पाहिला तरी हा चित्रपट 'छत्रपती शिवाजी महाराज', 'मुसलमान', 'हिंदू', 'इतिहास', 'अफझलखान', 'मस्जीद' अशा शब्दांभोवती गुंफलेला आहे, हे लक्षात येतं.

हे सगळेच शब्द सद्यपरिस्थितीत वादग्रस्ततेचं मोठं ओझं पाठीवर वागवणारे आहेत. आणि ते सगळेच शब्द ट्रेलरमध्ये आल्यानंतर हा चित्रपट चर्चेत येणार नाही, असं होणारच नाही.

हा चित्रपट शिवरायांच्या पर्यायी इतिहास मांडणीविषयी काही एक भाष्य करणारा आहे, हेदेखील पटकन लक्षात येतं.

पण, एखादा खालिद शिवाजी महाराजांचा शोध घेऊ शकतो वा खालिदचाही शिवाजी असू शकतो, असं पडद्यावर दर्शवणं देखील अमान्य ठरावं, इतकी संकुचितता खुद्द शिवाजी महाराजांना तरी मान्य असती का? हा प्रश्न मला राहून राहून खातो.

म्हणजे, अगदी यालाच समांतर असं अलीकडचंच उदाहरण. सिंहगड किल्ल्यावर तेरा वर्षांच्या मुलीनं बरमोडा घालून तानाजी मालुसरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं म्हणून तिच्या वडिलांना झुंडीनं मारहाण करण्याची घटना अगदी ताजी आहे.

प्रत्यक्ष जगण्यातलीच संकुचितता इतकी टोकाला गेलेली असताना पडद्याबाबतच्या संकुचिततेबाबत कुणी बोलावं, अशी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विदारक परिस्थिती आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरेदेखील हीच खंत व्यक्त करतात.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "निव्वळ ट्रेलर पाहून मुद्दामहून वादंग उठवण्यात आलं. सेन्सॉर करण्यात आलेला आणि कानसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचलेल्या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठीचं संरक्षण सरकारनं देणं अपेक्षित होतं. दोन-तीन ज्यूरींच्या प्रक्रियेतून गेलेला आणि चोखंदळ प्रेक्षकांकडून नावाजलेला हा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज करण्यासाठी मात्र बराच संघर्ष करावा लागला. सेन्सॉर बोर्ड आणि इन्फोर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीच्या पायऱ्या अनेकदा चढाव्या लागल्या."

निरागस खालिदच्या शिवप्रेमाची कथा

या चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे या कलाकारांनी मुख्य भूमिका वठवल्या आहेत. खालिदचं पात्र क्रिश मोरे याने साकारलं आहे.

'फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2026' मध्ये या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मुख्य पात्र असलेल्या क्रिश मोरेला मिळाला.

त्याव्यतिरिक्त कोणत्याही अवॉर्ड फंक्शननं या चित्रपटाची दखल घेतली नाही, तसेच चित्रपटसृष्टीतीलही इतर कुणी आमच्यासाठी भूमिका घेताना दिसलं नाही, अशी खंतही राज मोरे व्यक्त करतात.

या चित्रपटातल्या लहानग्या खालिदच्या हातात एक राक्षसी मुखवटा आहे. हे खेळणं त्याच्या हातात सतत दिसतं. तो त्याच्याशी सतत संवाद करतानाही दिसतो.

'मुसलमानांचं करण्यात आलेलं राजकीय राक्षसीकरण' दर्शवणं हा त्यामागचा हेतू असावा, असं मला सतत जाणवत राहिलं.

कारण, या राक्षसी मुखवट्यामागे खालिदच्या मनातले बालसुलभ प्रश्न प्रेक्षकांसमोर येत राहतात.

इयत्ता पाचवीतला हा खालिद इतिहासाच्या तासाला त्याच्या शिक्षकांकडून अफझल खानाच्या वधाची घटना अगदी रमून जाऊन ऐकतो. अगदी इतर हिंदू मुलं ऐकतात तशीच.

पण त्याच्या वर्गातले इतर विद्यार्थी जेव्हा त्यालाच 'अफझलखान' म्हणून चिडवायला लागतात, तेव्हा आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत, याची जाणीव खालिदला व्हायला लागते.

खालिदला आपण 'खालिद' आहोत, हे जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुसतं खालिदच नाही, तर आपल्याच वर्गमित्रांच्या दृष्टीकोनातून आपण 'अफझलखान' आहोत, हेदेखील जाणवण्याची ही पहिलीच वेळ.

या जाणीवेतूनच शिवाजी महाराजांचा त्याचा शोध सुरू होतो आणि या शोधाचीच ही कथा आहे. ती फक्त खालिद या पात्राची कथा आहे.

शिवाजी महाराजांविषयीच्या वास्तवाचं दर्शन

विदर्भातल्या एका लहानशा खेड्यात सायकलवरून 'बुड्डी के बाल' विकणाऱ्या हातावर पोट असलेल्या मुस्लीम कुटुंबातला हा खालिद. त्याची आई घरकाम आणि तंगीच्या परिस्थितीला वैतागलेली आणि वडिल आर्थिक परिस्थितीमुळे बेजार.

अशा पार्श्वभूमीवर, यातला खालिद शिवाजी महाराजांचा शोध फार निरागसतेनं घेतो. त्याची निरागसता हीच त्याची आणि त्याच्या पात्राच्या निमित्तानं या चित्रपटाचीही ताकद आहे.

कारण, एरव्ही 'शहाणे' आणि 'मोठे झालेले लोक' जे दाखवलं जातं, सांगितलं जातं वा वारंवार आदळवलं जातं, तेच मुकाट्यानं स्वीकारण्याची भूमिका घेतात.

पण, खालिद 'आपण आणि ते' अशी उभी फट असणाऱ्या मांडणीच्या पसाऱ्यात मध्यभागी उभा राहून खरा शिवाजी शोधत राहतो.

शाळेत शिवाजी महाराजांचं पात्र साकारायची संधी जेव्हा त्याला मिळते, तेव्हा तो प्रचंड आनंदी होतो.

तो स्वत:चा शिवाजी स्वत: उभा करतो. जिरेटोप, तलवार, सदरा अशा साऱ्या वस्तू तो स्वत:चं तयार करतो.

शिवाजी महाराजांना साकारायची त्याची धडपड आणि त्यातून स्वत: शिवाजी महाराज होण्याचे त्याचे प्रयत्न हाच या चित्रपटाचा प्रवास आहे.

'वेलांटी चुकली तर इतिहास पण बदलतो का?'

या चित्रपटातली खालिदची स्वगतं, त्याने आज्जीला, वडीलांना तसेच आपल्या शिक्षकांना विचारलेले प्रश्न आणि राक्षसी मुखवट्यासोबतचा स्वसंवाद अत्यंत विचारप्रवर्तक आहेत.

या चित्रपटाचं लेखन अभिनेता कैलास वाघमारे यांनी केलंय. यातल्या शिक्षकाची भूमिकाही त्यांनीच केली आहे.

साध्या साध्या प्रसंगातून अत्यंत खोलवर विचार करायला भाग पाडतील, असे संवाद असणं, हेच या चित्रपटाच्या लेखकाचं यश आहे.

साधंच उदाहरण घेऊ. सतत अफजलखान म्हणून चिडवला जाणारा खालिद तसा वर्गातला चुणचुणीत मुलगा आहे.

त्याच्या मनातल्या प्रश्नांच्या काहूराच्या पार्श्वभूमीवर जेव्हा फळ्यावर तो इतिहास हा शब्द 'इतीहास' असा लिहितो आणि शिक्षक त्याची चूक दुरूस्त करतात, तेव्हा तो इतकंच विचारतो, 'सर, वेलांटी चुकली तर इतिहास पण बदलतो का?'

सिनेमा अशा अर्थपूर्ण संवादातूनच पुढे सरकत जातो. तो प्रेक्षक म्हणून आपल्याला अंतर्मुख करतो. आपल्या प्रस्थापित धारणा, भूमिका, विचार, मतं यांची पुनर्पडताळणी करायला भाग पाडतो.

पण, चित्रपटात खालिदचे शिक्षक साळवे सर आणि शहाणे सर तसेच शिक्षकांमधील राजकारण अधिक चांगल्या प्रकारे दाखवता आलं असतं.

त्याला जात-वास्तवाचेही कंगोरे देण्याचा प्रयत्न निर्मात्यांचा आहे. पण तो पुरेसा पोहोचत नाही. पात्रांच्या सकस संवादातून ही खोली अधिक देता आली असती. ती वरवरची झाली आहे.

या चित्रपटाचा शेवटदेखील अनपेक्षित असा आहे. त्या शेवटाची रचना थोडी ओढून-ताणून केली आहे, असंही जाणवतं. त्याची परिणामकारकता तशीच ठेवून तो अधिक चांगल्या प्रकारे करता आला असता, असं राहून राहून वाटतं.

पण तरीही जो काही शेवट केलाय तो प्रचंड विचारात पाडतो. तो वस्तुस्थितीचंही 'दर्शन' घडवतो. वास्तवाचं वर्णन करण्यापेक्षा त्याचं दर्शन घडवण्यात यशस्वी होणं, हेच चांगल्या साहित्याचं वा कलाकृतीचं लक्षण असतं.

शिवाय, इतक्या सेन्सॉरशीपच्या कचाट्यातून पुढे आलेला हा सिनेमा शिवाजी महाराजांविषयीच्या वास्तवाचं असं दर्शन घडवण्यात नक्कीच यशस्वी ठरलाय, असं म्हणता येईल.

पण, सांस्कृतिक राजकारणाला बळी पडून कलाकृतीचं नुकसान होणं, कधीही वाईटच.

ज्या काळात 'पानसरे कोण? त्याचं काय हाल केलंय माहिती आहे ना तुला? तुझेही तेच हाल करू,' असं म्हणत एक सत्ताधारी आमदार प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी देत आपली बौद्धिक कुवत दाखवतो, तिथं 'खालिद का शिवाजी'पासून 'खालिद के शिवाजी' असं चित्रपटाचं नाव करावं लागणं, हेही ओघानं आलंच.

कुणाच्या मनात शिवाजी महाराजांविषयी आदर आहे आणि कुणाच्या नाही, हे परस्पर ठरवण्याचं सांस्कृतिक राजकारण जोवर मोडीत निघत नाही, तोवर महाराजांना अभिप्रेत स्वराज्य दुरापास्तच म्हणावं लागेल.

म्हणूनच, अशी पर्यायी मांडणी करणारं अथवा आहे त्या धारणांना किमान हलवणारं वा त्यासमोर प्रश्न उभं करणारं साहित्य-नाटक-चित्रपट येणं महत्त्वाचं.

'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'पासून अगदी अलीकडच्याच 'स्टोरी शिवराज्याभिषेकाची'पर्यंत असे धाडसी प्रयोग सादर होतच आहेत.

वर्तमानात हा चित्रपट ओटीटीपुरता मर्यादित करण्यात आला असेलही, पण भविष्यात तो 'शिवरायांच्या एकसाची आणि समकालीन राजकारणाला सोयीचं ठरणाऱ्या अनैतिहासिक मांडणी'ला आव्हान देणारा एक मैलाचा दगड ठरेल, अशी आशा करूया!

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)