तंदुरुस्त दिसणाऱ्या काही बॉडीबिल्डर्सचा कमी वयात मृत्यू का होतो? अभ्यासातून समोर आली कारणं

    • Author, स्टीफन रॉड्रिग्ज
    • Role, बीबीसी न्यूज ब्राझील
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

या महिन्याच्या सुरुवातीला मेल्सन अरौजोने नेहमीप्रमाणे जिममधील स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. व्यावसायिक बॉडीबिल्डर आणि फिटनेस इन्फ्लूएन्सर म्हणून ओळख असलेल्या मेल्सनचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स होते. मेहनतीने कमावलेली शरीरयष्टी त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत होती.

लाल रंगाची जिमची बनियन घातलेल्या मेल्सनचे हात इतके मोठे आणि मजबूत म्हणजेच मस्क्युलर दिसत होते की, तो एखाद्या सुपरहिरोसारखाच वाटत होता.

परंतु, काही तासांतच ब्राझीलमधील 35 वर्षीय बॉडीबिल्डरचा उत्तर-पूर्वेकडील बाहिया राज्यातील त्याच्या घरी प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला.

मेल्सनच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, अचानक मृत्यू झालेल्या अनेक बॉडीबिल्डर्समध्ये आता त्याचाही समावेश झाला आहे.

मे महिन्याच्या शेवटी ब्राझीलमधील प्रसिद्ध युवा बॉडीबिल्डर गॅब्रिएल गॅन्लीचा वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याआधी गेल्या वर्षीही ब्राझीलमधील 30 आणि 40 वर्ष वयाच्या दोन बॉडीबिल्डर्सचा हृदयविकाराशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला होता. यापैकी एकाचा तर स्पर्धा सुरू असतानाच मृत्यू झाला होता.

अशा प्रकारचे अचानक मृत्यू केवळ ब्राझीलमध्येच नाही, तर जगभरातही झाले आहेत. अमेरिकेतील बॉडीबिल्डर डॅलस मॅककार्व्हरचा 2017 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी मृत्यू झाला होता.

तर जर्मनीतील फिटनेस इन्फ्लूएन्सर आणि बॉडीबिल्डर जो लिंडनरचा 2023 मध्ये अवघ्या 30 व्या वर्षी मृत्यू झाला होता.

मग दिसायला तंदुरुस्त आणि मजबूत असलेल्या काही बॉडीबिल्डर्सचा तुलनेने कमी वयात अचानक का मृत्यू होत आहे?

व्यावसायिक बॉडी बिल्डर्सला धोका जास्त

2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात स्पर्धात्मक बॉडीबिल्डिंगचे धोके समोर आले. या अभ्यासात 2005 ते 2020 दरम्यान खेळाच्या अधिकृत संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सुमारे 20 हजार हौशी आणि व्यावसायिक बॉडीबिल्डर्सचा अभ्यास करण्यात आला.

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, हौशी बॉडीबिल्डर्सच्या तुलनेत व्यावसायिक बॉडीबिल्डर्सना अचानक हृदय बंद पडून (सडन कार्डियाक डेथ) मृत्यू होण्याचा धोका पाचपटीहून जास्त होता.

सामान्यपणे तरुण आणि निरोगी लोकांमध्ये अचानक हृदय बंद पडून मृत्यू (कार्डियाक डेथ) होण्याच्या घटना फार कमी असतात. अशा मृत्यूमागे अनेकवेळा हृदयाशी संबंधित एखादा लपलेला आजार कारणीभूत असू शकतो.

या अभ्यासात एकूण 121 बॉडीबिल्डर्सचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यापैकी 46 जणांचा मृत्यू कार्डियाक डेथमुळे झाला होता.

या अभ्यासात मृत्यू झालेल्या बॉडीबिल्डर्सचे सरासरी वय 45 वर्षे होते. पण, जे त्या वेळी सक्रियपणे स्पर्धांमध्ये भाग घेत होते, त्यांचं सरासरी वय अवघं 34.7 वर्षे इतके होतं.

या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि इटलीतील पादोवा विद्यापीठाचे डॉ. मार्को वेकियाटो यांनी सांगितलं की, बॉडीबिल्डर्सच्या मृत्यूमागे अनेक कारणं असू शकतात. त्यात 'शरीराची क्षमता वाढवणाऱ्या म्हणजेच कामगिरी उंचावणाऱ्या औषधांचा (परफॉर्मन्स-एन्हान्सिंग ड्रग्स) मोठ्या प्रमाणावर वापर', स्पर्धांसाठी 'कमी वेळात झपाट्याने वजन कमी करणे आणि अतिशय कठोर ताकदीचा व्यायाम' (एक्स्ट्रिम स्ट्रेंथ ट्रेनिंग) यांचा समावेश आहे.

2025 मध्ये सर्क्युलेशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या डेन्मार्कमधील संशोधकांच्या आणखी एका अभ्यासात ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स वापरणाऱ्या 1,189 पुरुषांचा 11 वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यांची तुलना सर्वसामान्य लोकसंख्येतील जवळपास 60 हजार पुरुषांशी करण्यात आली.

या अभ्यासात असं आढळून आलं की, स्टिरॉइड्स वापरणाऱ्या पुरुषांना हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करणारा आजार (कार्डिओमायोपॅथी) होण्याचा धोका जवळपास नऊ पट जास्त होता. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका तीन पटींनी होता, तर हृदय निकामी होण्याचा धोका तीन पटीपेक्षा जास्त होता.

अॅनाबॉलिक स्टिरॉइड्समुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे आणि लैंगिक समस्या म्हणजे स्तंभन दोष यांसारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात. याशिवाय, यामुळे रक्तदाब वाढू शकतो, रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर (प्लाक) जमा होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते आणि हृदयाच्या रचनेतही बदल घडवून आणू शकतात.

युरोपियन हार्ट जर्नलमधील या अभ्यासात मृत्यू झालेल्या बॉडीबिल्डर्सच्या शवविच्छेदन अहवालांचा अभ्यास करण्यात आला.

हृदयाचा आकार वाढतो

बऱ्याच प्रकरणांमध्ये या बॉडीबिल्डर्सच्या हृदयाचा आकार वाढलेला दिसून आला. तसेच, हृदयाच्या मुख्य रक्त पंप करणाऱ्या भागाच्या स्नायूंची जाडी वाढलेली (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी) आढळून आली.

या बदलांमुळे हृदयाची धडधड अनियमित होण्याचा (ॲरिथमिया) आणि हृदय निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.

काही प्रकरणांमध्ये, विषारी घटकांची तपासणी (टॉक्सिकॉलॉजिकल ॲनालिसिस) आणि उपलब्ध अहवालांमधून ॲनाबॉलिक औषधांचा गैरवापर झाल्याचे समोर आले. शवविच्छेदनाच्या नियमित तपासणीत अशा औषधांची तपासणी सहसा केली जात नाही.

तरुण वयात मृत्यू झालेल्या अनेक बॉडीबिल्डर्सच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचं हृदय नेहमीपेक्षा मोठं झाल्याचे आढळून आलं आहे.

सर्वाधिक गाजलेल्या प्रकरणांपैकी एक म्हणजे अमेरिकेतील प्रसिद्ध बॉडीबिल्डर डॅलस मॅककार्व्हर याचे. 2017 मध्ये वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालात त्याच्या हृदयाचं वजन 833 ग्रॅम असल्याचे आढळून आले, जे एका सामान्य प्रौढ पुरुषाच्या हृदयाच्या अपेक्षित वजनापेक्षा दुप्पटीहून जास्त होते.

2022 मध्ये एक आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अमेरिकेतील बॉडीबिल्डर्सच्या शवविच्छेदन अहवालांचा अभ्यास करण्यात आला. त्यात असं दिसून आलं की, या बॉडीबिल्डर्सचे हृदय सामान्य लोकांपेक्षा सरासरी 74 टक्क्यांनी जास्त वजनाचे होते. तसेच, हृदयाच्या डाव्या भागातील स्नायूंची जाडीही अपेक्षेपेक्षा 125 टक्क्यांपर्यंत वाढलेली होती.

आणखी एका स्वतंत्र अभ्यासात संशोधकांनी इटली आणि स्पेनमधील अशा बॉडीबिल्डर्सच्या फॉरेन्सिक अहवालांचा अभ्यास केला, ज्यांचा संबंध ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सच्या वापराशी होता.

अनेक प्रकरणांमध्ये विशीतील तरुण खेळाडूंच्या हृदयाचा आकार वाढलेला, हृदयाच्या स्नायूंची जाडी जास्त वाढलेली आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये (कोरोनरी धमनी) गंभीर आजार आढळून आला.

एका 24 वर्षीय बॉडीबिल्डरच्या तपासणीत हृदयाच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त अडथळे (ब्लॉकेज) आढळून आले. विशेष म्हणजे, त्याच्या कुटुंबात हृदयविकाराशी संबंधित आजाराचा कोणताही इतिहास नव्हता.

"हृदय हे देखील इतर स्नायूंप्रमाणेच एक स्नायू आहे," असं एंडोक्रायनोलॉजिस्ट आणि स्पोर्ट्स फिजिशियन क्लेटन मॅसेडो सांगतात.

"मी नेहमी सांगतो की, रुग्णाच्या दंडाच्या स्नायूंकडे (बायसेप्स) पाहूनच मला त्याच्या हृदयाच्या आकाराचा अंदाज येतो. कारण शरीरातील इतर स्नायूंबरोबरच व्यायामामुळे हृदयाचाही आकार वाढू शकतो."

स्टिरॉइड्स न वापरता केलेल्या वजनाच्या व्यायामामुळेही हृदयाचा आकार वाढू शकतो. पण, शरीरात होणारा हा एक सामान्य आणि फायदेशीर बदल असतो.

ब्राझिलियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या बाहिया शाखेचे अध्यक्ष लुईझ एडुआर्डो फोंटेलेस रिट्ट सांगतात की, तीव्र वजनाचा व्यायाम करताना स्टिरॉइड्सचा वापर केल्यास हृदयाचा आकार वाढण्यासोबतच त्याची योग्य प्रकारे आकुंचन पावण्याची (रक्त पंप करण्याची) क्षमता देखील कमी होऊ शकते.

"यामुळे हृदय निकामी होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते आणि काही वेळा ही स्थिती इतकी गंभीर होते की, ती पुन्हा पूर्ववत करणे शक्य नसते," असंही ते सांगतात.

परंतु, काही प्रकरणांमध्ये हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढण्यामागे आनुवंशिक कारणंही असू शकतात.

रिट सांगतात, "यात नेमका फरक ओळखणं कधी-कधी कठीण असते."

"हे आनुवंशिक हृदयविकारामुळे असू शकते, ॲनाबॉलिक स्टिरॉइड्समुळे असू शकते, व्यायामाच्या प्रशिक्षणामुळेही असू शकते किंवा या तिन्ही कारणांचा एकत्रित परिणाम असू शकतो."

'अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड्स वापरण्याचा कोणताही सुरक्षित मार्ग नाही'

माजी बॉडीबिल्डर रॉड्रिगो गोएस यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलला सांगितलं की, वयाच्या 30 वर्षांपर्यंत त्यांनी कोणत्याही स्टिरॉइड्सशिवाय स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांनी स्टिरॉइड्सचे 'सायकल्स' सुरू केले.

'सायकलिंग' म्हणजे काही आठवडे चालणारा असा कालावधी, ज्यात ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स घेणं आणि त्यानंतर शरीराला विश्रांती मिळावी म्हणून काही काळ ते घेणं थांबवणं.

"याचा शरीरावर होणारा परिणाम खूप मोठा असतो," असं गोएस म्हणतात.

"नैसर्गिक पद्धतीने जेवढ्या वेगाने शरीर बनत नाही, त्यापेक्षा स्टिरॉइड्समुळे शरीर खूप वेगाने वाढते. शरीरातील चरबी कमी होते, अधिक सुडौल बनते आणि स्नायू लवकर बरे होतात. त्यामुळेच अनेकांना याचे आकर्षक वाटते."

डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि कमी प्रमाणात स्टिरॉइड्स घेत असूनही, गोएस यांना केस गळणे, तणाव, झोप न येणं आणि रात्री खूप घाम येणं यांसारख्या दुष्परिणामांचा सामना करावा लागला.

पण ते सांगतात की, सर्वात गंभीर परिणाम त्यांच्या मनावर झाले.

"मला सतत इंजेक्शन घेण्याची ही सवय कधीच योग्य वाटली नाही. एका अर्थाने मला वाटायचं की, मी एखाद्या अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन व्यक्तीसारखं वागत आहे. हे मान्य करणं कठीण आहे, पण मी काहीतरी चुकीचं करत आहे, असं मला वाटायचं."

गोएस आता स्टिरॉइड्सच्या गैरवापराविरोधात जनजागृती करतात.

"ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स वापरण्याचा कोणताही सुरक्षित मार्ग नाही. डॉक्टर केवळ त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु काही ना काही नुकसान होण्याची शक्यता ही असतेच."

'बायसेप्स पाहूनच मला हृदयाच्या आकाराचा अंदाज येतो'

स्टिरॉइड्समुळे होणाऱ्या आरोग्याच्या नुकसानीचा नेमका अंदाज घेणं आव्हानात्मक आहे, कारण अनेक देशांमध्ये स्टिरॉइड्सशी संबंधित मृत्यूंची पद्धतशीरपणे नोंद ठेवली जात नाही.

ब्राझीलमध्ये ॲनाबॉलिक स्टिरॉइड्समुळे झालेल्या मृत्यूंची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्याचबरोबर, अनेक देशांमध्ये मृत्यूच्या नोंदी करताना स्टिरॉइड्सचा वापर हे कारण म्हणून नियमितपणे नोंद केले जात नाही.

याऐवजी, मृत्यूचे कारण सहसा हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हृदयाच्या आजारासारखे तात्कालिक कारण मानले जाते. शरीराची कामगिरी वाढवण्यासाठी घेतलेल्या स्टिरॉइड्सचा त्यामागे किती वाटा होता, हे अनेकदा नोंदवलं जात नाही.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मृत्यूनंतर तपासणी करतानाही स्टिरॉइड्सचा वापर अनेकदा लक्षात येत नाही. कारण ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या हार्मोन्ससारखेच दिसतात. त्यामुळे ते ओळखणं कठीण जातं.

या सर्व कारणांमुळे शरीराची कामगिरी वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे नेमके किती मृत्यू झाले, हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे.

"मी दररोज अशा प्रकरणांवर काम करतो," असं मॅसेडो म्हणतात.

"एखाद्याचे बायसेप्स पाहिले की त्याच्या हृदयाच्या स्थितीची मला कल्पना येते. दुर्दैवाने, अशा अनेक लोकांच्या हृदयावर आधीच परिणाम झालेला असतो किंवा तो होण्यास सुरुवात झालेली असते. त्याचे दुष्परिणाम नंतर दिसून येतात," असे मॅसेडो सांगतात.

(लुईस बारुचो यांचे अतिरिक्त वार्तांकन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.