AK-47: सुरक्षा दलांपासून ते कट्टरतावाद्यांपर्यंत या बंदुकीलाच का दिली जाते 'पसंती'; काय आहे या शस्त्राचा इतिहास?

    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

क्लाश्निकोव्ह एके-47 ही जगातील सर्वाधिक प्रसिद्ध शस्त्रांपैकी एक आहे. तिची किंमत तुलनेने कमी आहे. त्याचबरोबर, तिचे उत्पादन करणे आणि तिची देखभाल करणंही सोपे आहे.

त्यामुळेच आशिया आणि आफ्रिकेतील अनेक गुरिल्ला संघटना (गनिमी काव्याने लढणारे) तसेच अनेक देशांच्या सैन्यदलात एके-47 चा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो.

जगभरात 10 कोटींपेक्षा जास्त क्लाश्निकोव्ह रायफल्सची विक्री करण्यात आल्याचे सांगितले जाते.

बिहारमधील सिवान येथे एका पोलिसाने एके-47 मधून हवेत गोळीबार केल्याच्या घटनेनंतर ही रायफल सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

बिहारमधील सिवान जिल्ह्यात 25 जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यावेळी बिहार पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलने एके-47 मधून गोळीबार केला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

एके-47 मधून गोळीबार केल्याच्या या प्रकरणानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर बिहार पोलिसांच्या एसआयटी पथकातील सदस्य अभिषेक पटेल यांना निलंबित करण्यात आलं.

हे शस्त्र अतिशय महत्त्वाचे आणि विशेष मानले जाते. त्यामुळे इतर सामान्य बंदुकांप्रमाणे त्याचा वापर केला जात नाही. अशा परिस्थितीत नागरी पोलिसाने एके-47 मधून गोळीबार केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

सिवानमध्ये एके-47 मधून गोळीबार झाल्याप्रकरणी जिल्हाधिकारी विवेक रंजन मैत्रेय यांनी सांगितलं की, "त्यांना गोळीबार करण्याचा कोणताही आदेश देण्यात आला नव्हता. त्यांनी हवेत गोळीबारही करायला नको होता. असे शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी त्यांनी जायलाही नको होतं. ते अडकले होते. त्यांना दुसरीकडे जायचं होतं, पण ते तिथे अडकले."

परंतु, हा वाद अद्यापही संपलेला नाही. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षातील इतर नेतेही या प्रकरणावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.

या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही एके-47 वापरण्याचा अनुभव असलेल्या काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ही रायफल इतकी लोकप्रिय का आहे, भारतात तिचा वापर कधी सुरू झाला आणि नागरी पोलिसांना (सिव्हिल पोलीस) एके-47 वापरण्याबाबत काही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अरुण कुमार हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. कुख्यात गुन्हेगार श्रीप्रकाश शुक्लला पकडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसटीएफच्या पथकाचे नेतृत्वही त्यांनी केले होते.

अरुण कुमार म्हणतात, "आंदोलन किंवा जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांना कमीत कमी बळाचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आधी इशारा देण्याची पद्धत असते. अशा परिस्थितीत बंदुकीचा वापर हा नेहमीच अखेरचा पर्याय असतो."

ते सांगतात, "सर्वात आधी लोकांना तिथून निघून जाण्याचा इशारा दिला जातो. त्यानंतर वॉटर कॅननचा (पाण्याचा फवारा) वापर केला जातो. यामुळेही जमाव नियंत्रणात आला नाही, तर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात. त्यानंतर गरज भासल्यास लाठीचार्ज केला जातो."

ते म्हणाले, "जमाव हिंसक झाला, हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला आणि यामुळे जीवाला धोका निर्माण झाला, तर जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार केला जाऊ शकतो. त्यामुळे जमाव पांगण्यास मदत होते. परंतु, हा उपाय नेहमीच अखेरचा पर्याय असतो."

दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे म्हणाले, "सिवानमध्ये जे घडलं ते योग्य नव्हतं. नैतिकदृष्ट्याही ते चुकीचं होतं. आंदोलन करणारा जमाव निःशस्त्र होता, त्यांच्याकडे शस्त्रं नव्हती. त्यामुळे अशा वेळी गोळीबार करणं कोणत्याही पोलिसासाठी योग्य नाही."

एके-47 ला खास शस्त्र का म्हटलं जातं?

एके-47 (अव्तोमत क्लाश्निकोव्ह) या रायफलचा शोध रशियाचे मिखाईल कलाश्निकोव्ह यांनी 1947 मध्ये लावला. ही रायफल जगभरातील सुरक्षा दलं, सशस्त्र गट आणि अनेक कुख्यात गुन्हेगार टोळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

राजेश पांडे सांगतात, "मी वर्ष 2008-09 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी कोसोवोला गेलो होतो. आम्हाला तिथे अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. परंतु, एके-47 ला तोड नाही. तिची मारक क्षमता अत्यंत घातक आहे आणि ती वापरायलाही सोपी आहे. त्याचा नेम अचूक आहे."

त्यांचं म्हणणं आहे की,"एके-47 मधून झाडलेली गोळी 200 ते 300 मीटर अंतरावरूनही अचूक लागली, तर एखाद्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. याउलट, जुन्या प्रकारच्या छोट्या शस्त्रांची रेंज साधारण 30 ते 40 मीटरपर्यंतच असते."

अरुण कुमार सांगतात, "एके-47 मध्ये गोळीबारासाठी दोन मोड असतात. रायफल 'एस' (सिंगल) मोडवर ठेवली, तर एका ट्रिगरवर केवळ एकच गोळी सुटते. याला नियंत्रित (कंट्रोल्ड) गोळीबार म्हणतात."

तर 'आर' (रिपीट) मोडवर ठेवलं, तर ट्रिगर दाबून ठेवल्यास किंवा ट्रिगर एकदाच ओढल्यास संपूर्ण मॅगझिन रिकामे होते. .

एके-47 च्या ऑटोमॅटिक मोडमध्ये एका मॅगझिनमधील 30 गोळ्या सलग झाडता येतात. काही ठिकाणी दोन मॅगझिन एकत्र जोडून वापरले जातात. अशा वेळी एकूण 60 गोळ्या झाडता येतात.

राजेश पांडे सांगतात, "एके-47 चा आवाजही खास असतो. या रायफलची माहिती असलेली व्यक्ती केवळ आवाज ऐकून गोळीबार एके-47 मधून झाला आहे, हे ओळखू शकते."

अरुण कुमार म्हणाले, "एका वेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्याची गरज विशेष मोहिमांमध्येच भासते. उदाहरणार्थ, युद्ध, दहशतवादी हल्ला किंवा अपहरणाच्या प्रकरणात, जेव्हा समोरच्या गुन्हेगारांकडेही अत्याधुनिक आणि प्राणघातक शस्त्रे असतात."

त्यांचं म्हणणं आहे की, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कारवाईत एके-47 चा 'आर' मोड कधीही वापरला जात नाही. आम्हाला 'एक गोळी, एक शत्रू' या तत्त्वाचे प्रशिक्षण दिले जाते. गोळ्या वाया घालवायच्या नसतात. सामान्य नागरिक शत्रू नसतात, त्यामुळे त्यांच्यावर याचा वापर केला जात नाही."

भारतात एके-47 कधी आली?

राजेश पांडे सांगतात, भारतात एके-47 लोकप्रिय होण्याचा इतिहास सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानातील लष्करी कारवाईशी जोडलेला आहे. 1970 च्या दशकाच्या अखेरीस सोव्हिएत सैन्य एके-47 रायफलसह अफगाणिस्तानात दाखल झाले.

भारताच्या शेजारील अफगाणिस्तानात एके-47 पोहोचल्यानंतर तिची ताकद आणि प्रभाव पाहिला. त्यानंतर ही रायफल भारतातही लोकप्रिय होऊ लागली.

सुरुवातीला एके-47 रायफल भारतीय लष्कर, निमलष्करी दले, सीमावर्ती राज्यांतील पोलीस आणि ईशान्य भारतातील उग्रवादग्रस्त भागातील सुरक्षा दलांना देण्यात आली. त्यानंतर नक्षलग्रस्त भागात सशस्त्र गटांचा सामना करण्यासाठी पोलिसांनाही एके-47 उपलब्ध करून देण्यात आली.

राजेश पांडे म्हणाले, "1980 च्या दशकाच्या अखेरीस पंजाब पोलीस आणि ईशान्येकडील राज्यांतील पोलिसांना एके-47 देण्यात आली. त्यानंतर नक्षलग्रस्त भागातील पोलिसांनाही ही रायफल देण्यात आली. पुढे जम्मू-काश्मीर पोलिसांनाही एके-47 उपलब्ध करून देण्यात आली."

पंजाब आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही राज्ये आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहेत. 1980 च्या दशकात पंजाबमध्ये परिस्थिती अतिशय संवेदनशील होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही सशस्त्र फुटीरतावादी गट सक्रिय झाले.

राजेश पांडे सांगतात, "दक्षिण भारतात चंदन तस्कर वीरप्पनला पकडण्यासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्यात आले होते. त्या पथकालाही एके-47 देण्यात आली होती."

"उत्तर प्रदेशातील तराई भागात शीख अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी राज्य पोलिसांनाही एके-47 देण्यात आली. त्यावेळी प्रकाश सिंग हे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक होते."

भारतातील एके-47 शी संबंधित सर्वात गाजलेली घटना

खासगीरित्या क्लाश्निकोव्ह रायफल बाळगल्याच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे अभिनेता संजय दत्त.

12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत अनेक जणांचा बळी गेला होता. तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी 19 एप्रिल 1993 रोजी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक केली.

संजय दत्तच्या घराच्या झडतीदरम्यान पोलिसांनी एक एके-56 रायफल जप्त केली होती. 28 नोव्हेंबर 2006 रोजी त्याला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं. पण, टाडा कायद्याअंतर्गत असलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

राजेश पांडे म्हणाले, "एके-56 ही रायफलही एके-47 सारखीच क्लाश्निकोव्ह प्रकारातील आहे. ती थोडी अधिक प्रगत मानली जाते. या रायफलची लोकप्रियता इतकी आहे की, आजही अफगाणिस्तान किंवा इतर देशांतील सशस्त्र गटांचे फोटो किंवा व्हीडिओ पाहिल्यास त्यांच्या हातात अनेकदा एके-47 दिसून येईल."

ते म्हणाले, "एके-47 चा वापर केवळ हल्ल्यांसाठीच होत नाही, तर शक्तीप्रदर्शनासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठीही केला जातो. आम्ही कोसोवोमध्ये असताना त्या देशाने स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यावेळी अनेक लोक घरांच्या छतावर चढले आणि कलाश्निकोव्ह रायफलमधून हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केला होता."

भारतात AK-47 शी संबंधित आणखी एक गाजलेली घटना 17 डिसेंबर 1995 रोजी घडली. त्या रात्री रशियन अँटोनोव्ह एएन-26 हे विमानाने कराचीहून ढाक्याच्या दिशेने उड्डाण केले होते.

त्या विमानात आठ जण प्रवास करत होते. या विमानाने वाराणसीतील बाबतपूर विमानतळावर इंधन भरून घेतले.

यानंतर विमानाने पश्चिम बंगालमधील पुरुलियाच्या आकाशातून पॅराशूटच्या साहाय्याने तीन मोठे लाकडी खोके खाली टाकले. या खोक्यांमध्ये शेकडो एके-47 रायफल होत्या. या घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती.

नंतरच्या तपासात या एके-47 रायफलपैकी काही बिहार आणि उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले होते.

यात उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार श्रीप्रकाश शुक्ल याचाही समावेश होता. त्याला पकडण्यासाठी 1998 मध्ये विशेष कृती दलाची (एसटीएफ) स्थापना करण्यात आली होती. त्या पथकालाही एके-47 रायफल देण्यात आली होती.

अरुण कुमार यांनी सांगितलं की, "पूर्वी पोलिसांकडे थ्री नॉट थ्री रायफल असायची. हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील शस्त्र होते. त्या वेळी सामान्य लोक किंवा गुन्हेगारांकडे बंदुका फारशा नसत. त्याचबरोबर 'दहशतवादाचाही' प्रश्न आजच्या इतका गंभीर नव्हता."

ते म्हणाले, काळानुसार सुरक्षा दलांना एसएलआर आणि इतर अत्याधुनिक रायफल्स देण्यास सुरुवात झाली.

सुरुवातीला एके-47 ही रायफल विशेष मोहिमा राबवणाऱ्या लष्कर आणि निमलष्करी दलांना देण्यात आली होती. त्यानंतर ठराविक उद्देशांसाठी नागरी पोलिसांनाही हे शस्त्रे देण्यास सुरुवात झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)