You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बेबी पावडरमुळे कॅन्सरच्या आरोपावर जॉन्सन अँड जॉन्सनचा मोठा प्रस्ताव
- Author, ऑस्मंड चिया
- Role, बिझनेस रिर्पोटर
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अमेरिकेतील हजारो खटले मिटवण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने 5.5 अब्ज डॉलर (सुमारे 52,635 कोटी रुपये) देण्याची तयारी दाखवली आहे.
या खटल्यांमध्ये कंपनीच्या बेबी पावडर आणि इतर उत्पादनांमुळे अंडाशयाचा कर्करोग (ओव्हरियन कॅन्सर) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रस्तावित तडजोडीमुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला कायदेशीर वाद संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. या वादामुळे न्यू-जर्सी येथील आरोग्य क्षेत्रातील या मोठ्या कंपनीवर अनेक वर्षे दबाव होता.
ही उत्पादनं वापरल्यावर कॅन्सर होतो असा आरोप जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने फेटाळला आहे. त्याचबरोबर कंपनीने आपल्या बेबी पावडरचा फॉर्म्युला बदलण्यात आल्याचेही सांगितलं आहे.
कॅन्सरचे आरोप कंपनीने फेटाळले
कंपनीचे कायदेशीर बाबींचे व्हाईस प्रेसिडेंट एरिक हास यांनी कंपनीवर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. या आरोपात काही तथ्य नाहीये आणि हे प्रकरण कायमचं संपवण्यासाठी जॉन्सन एँड जॉन्सन तडजोड करण्यास तयार आहे, असं त्यांनी म्हटलं.
कंपनीने म्हटलं की, या तडजोडीमुळे पावडरशी संबंधित सुमारे 76 हजार खटले निकाली निघतील.
कंपनी पुढील वर्षी 3 अब्ज डॉलरपर्यंतची (अंदाजे 28,722 कोटी रुपये) रक्कम देणार आहे. तसेच 2028 पूर्वी यासाठी आणखी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ओव्हरियन कॅन्सरचे दावे अमेरिकेच्या राज्य आणि केंद्रीय न्यायालयात केले आहेत त्यांच्यापैकी 95 टक्के दावेदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लॉ फर्म्सनी या प्रस्तावांना मान्यता दिली तरच तो अंतिम स्वरूपात येईल असे कंपनीने म्हटले.
एरिक हास यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, कंपनीला विश्वास आहे की पुढेही न्यायालयीन लढा सुरू ठेवला असता तर अखेरीस कंपनीचाच विजय झाला असता.
आतापर्यंत न्यायालयात झालेल्या बहुतांश प्रकरणांमध्येही कंपनीच्या बाजूने निकाल लागल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
...तर कंपनीला उत्पादनांवर लक्ष केंद्रित करता येईल
त्यांनी पुढे असं म्हटलं की, या प्रस्तावित तोडग्यामुळे कंपनीला हे प्रकरण मागे टाकून पुढे जाता येईल. लोकांचे जीव वाचवणारी औषधं आणि उपकरणं तयार करण्याचं कंपनीचं जे ध्येय आहे, त्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करता येईल.
'केनव्यू' ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची कंज्युमर हेल्थ विभाग कंपनी होती. 2022 नंतर ही कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनपासून पूर्णतः वेगळी झाली. उत्तर अमेरिकेबाहेर जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या दाव्यासंबंधित उत्तरदायित्व याच कंपनीकडे आहे.
केनव्यू या कंपनीची बँड-एड, लिसरिन आणि कालपोलसारखी उत्पादनं आहेत.
2009 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरसबंधित दावे येण्यास सुरुवात झाली होती.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय न्यायालयाने एका दाव्यात कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने पक्षकाराला विचारले होतं की, त्यांना ओव्हरियन कॅन्सर थेट पावडरमधील टॅल्कमुळेच झाला हे वैयक्तिकरीत्या सिद्ध करता येईल का?
टॅल्क हे मॅग्नेशियम, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांपासून बनलेलं नैसर्गिक खनिज आहे. त्याचा स्पर्श साबणासारखा गुळगुळीत असल्यामुळे त्याचा वापर बेबी पावडरमध्ये केला जातो.
कॉर्न स्टार्च बेस्ड बेबी पावडर आणण्याचा कंपनीचा विचार
कंपनीची टॅल्क बेस्ड उत्पादन वापरणाऱ्या ग्राहकांनी असे दावे केले होते की टॅल्कबेस्ड पावडरचा संपर्क अॅस्बेस्टॉसशी आला त्यातून कॅन्सर झाला. असे या याचिकाकर्त्यांतर्फे सांगण्यात आले होते.
टॅल्कचे उत्खनन जमिनीतून केले जाते आणि त्याचा थर अॅस्बेटॉसच्या थराजवळ असतो. अॅस्बेस्टॉसमुळे कॅन्सर होतो असं मानलं जातं.
कंपनीने हे आरोप वारंवार फेटाळले आहेत. कंपनीने आपल्या ताज्या निवेदनात म्हटलं आहे की, "अभ्यासांमधून असं दिसून आले आहे की, पावडर सुरक्षित आहे, त्यात ॲस्बेस्टॉस नाही आणि त्यामुळे कर्करोग होत नाही."
2022 मध्ये 'जे अँड जे'ने जगभरात टॅल्कयुक्त बेबी पावडरचं उत्पादन आणि विक्री बंद करण्याची घोषणा केली होती.
अमेरिकेत या उत्पादनाची विक्री बंद केल्यानंतर दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर ही घोषणा करण्यात आली होती.
जागतिक स्तरावर कंपनीची कोणती उत्पादनं असावीत यावर कंपनीने विचार केला आणि कंपनीने व्यावसायिक पाऊल उचलताना कॉर्न स्टार्च बेस्ड बेबी पावडर आणण्याचा निर्णय घेतला, असं कंपनीने त्यावेळी म्हटलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.