You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मुलगी मिळत नाही', पण प्रश्न फक्त मुलींचा आहे का? जळगावमधल्या 29 आत्महत्यांच्या आकडेवारीपलीकडची गोष्ट
जळगाव जिल्ह्यात 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्यांत 383 पुरुषांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या आत्महत्यांच्या कारणांच्या पोलिसांनी केलेल्या विश्लेषणात व्यसन, नैराश्य, कौटुंबिक कारणं आणि कर्जबाजारीपणाबरोबरच लग्न न होणं हाही एक घटक असल्याचं समोर आलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, 29 पुरुषांच्या आत्महत्यांमध्ये लग्न न जुळणं हा एक कारणीभूत घटक होता.
ही संख्या समोर आल्यानंतर जळगावमध्ये एकच चर्चा वारंवार ऐकायला मिळते आहे आणि ती म्हणजे 'आजकाल मुलांना मुली मिळत नाहीत.'
पण जळगावच्या गावांमध्ये फिरताना ही गोष्ट वारंवार गुंतागुंतीची होत गेली.
लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांशी, त्यांच्या कुटुंबीयांशी, महिलांशी आणि या विषयावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांशी बोलताना हा प्रश्न इतका सोपा नसल्याचं जाणवतं.
कारण जळगावमध्ये लग्न हा फक्त 2 व्यक्तींचा निर्णय राहिलेला नाही. तो नोकरी, जमीन, जात, कुटुंबाची जबाबदारी, स्थलांतर, महिलांच्या बदललेल्या अपेक्षा आणि पुरुषांवरच्या सामाजिक अपेक्षांचा गुंता बनला आहे.
'योग्य वयात लग्न झालं पाहिजे'
जळगावमध्ये भेटलेले विशाल पाटील 30 वर्षांचे आहेत. ते प्राध्यापक आहेत आणि लग्नाबद्दल त्यांचा विचार अनेक तरुणांच्या अनुभवासारखाच आहे.
"माझ्याही आई-वडिलांची इच्छा होती की, लग्न कर, लग्न कर. मात्र, मीच थोडं लांबवतोय. मला करियरवर लक्ष द्यायचं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे आणि मनासारखी, मला समजून घेणारी मुलगी भेटली की मग करेन की लग्न," असं ते सांगतात.
मात्र त्याच वेळी समाजाने लग्नासाठी एक ठरावीक वय ठरवलं आहे. विशाल यांच्या शब्दांत, "भारतीय समाजात 24-25-26 पर्यंत लग्न व्हायला हवं, 28-29 पर्यंत ते झालं पाहिजे आणि 30 ओलांडलं की लोक वेगळ्या नजरेने पाहू लागतात. हा दबाव केवळ लग्न न झाल्याचा नसतो. लग्न झालं नाही म्हणजे काहीतरी कमी आहे, अशी भावना हळूहळू तयार होऊ शकते."
मानसिक आरोग्य सल्लागार मुकेश यांच्या मते, जेव्हा लग्नाची सांगड प्रतिष्ठा आणि यशाशी घातली जाते, तेव्हा लग्न न होणं काही तरुणांसाठी वैयक्तिक अपयशासारखं वाटू शकतं.
जळगाव पोलिसांच्या आकडेवारीकडे पाहताना ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. लग्न न होणं हे 29 आत्महत्यांमध्ये नोंदवलेलं एक कारण आहे; या आत्महत्यांमागे तेच एकमेव कारण आहे, असं पोलिसांचं म्हणणं नाही.
व्यसन, नैराश्य, कौटुंबिक तणाव आणि कर्जबाजारीपणासारखे इतर घटकही मोठ्या प्रमाणात आहेत.
मात्र लग्न न होण्याच्या प्रश्नामागची कारणं समजून घेतली, तर या आकडेवारीचा दुसरा पैलू दिसतो.
'महाराष्ट्रात अविवाहित मुलींपेक्षा पुरुषांची संख्या जास्त'
महाराष्ट्रातील आकडेवारी या प्रश्नाला आणखी एक वेगळा संदर्भ देते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या (NFHS-5) 2019-21 च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 20 ते 49 वयोगटातील सुमारे 11 टक्के महिला अविवाहित होत्या, तर पुरुषांचं हे प्रमाण सुमारे 30 टक्के होतं.
म्हणजे महाराष्ट्रात महिलांच्या तुलनेत अविवाहित पुरुषांचं प्रमाण खूप जास्त आहे. पण या तफावतीमागे फक्त मुलींची संख्या कमी असणं हे कारण आहे का?
जळगावमध्ये कौस्तुभ पोतदार यांच्या बाबतीत घडलेली घटना हा प्रश्न किती गंभीर असू शकतो, ते दाखवते.
बी. फार्मसीचं शिक्षण घेतल्यानंतर ते नाशिकमधल्या एका खासगी कंपनीत काम करत होते. आईच्या निधनानंतर त्यांच्या लग्नासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात झाली.
कुटुंबीयांच्या मते, सरकारी नोकरी नसणं, स्वतःचं घर नसणं आणि वयस्कर वडील सोबत राहणार या कारणांमुळे त्यांना अनेक ठिकाणी नकार मिळाला. फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी आत्महत्या केली.
कौस्तुभ यांच्या बाबतीतला हा अनुभव म्हणजे प्रत्येक नकाराचं कारण असंच असतं, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा नाही. पण तो लग्नाच्या बाजारात आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबाची रचना किती महत्त्वाची झाली आहे, याकडे नक्कीच लक्ष वेधतो.
जळगावमध्ये भेटलेल्या एका वृद्ध महिलेनं मला सांगितलं की, तिच्या मुलाचं वय आता 40 वर्षं आहे. गेली अनेक वर्षं त्याच्यासाठी मुलगी शोधली जातेय. अनेक ठिकाणी मुलींकडून नकार मिळाल्यानंतर आता ती स्वतःच पक्कं घर बांधत आहे. "घर झालं तर मुलगी मिळेल," अशी तिची आशा आहे.
ही आई हे सांगताना घाबरलेली होती. तिच्या बोलण्यात मुलाचं लग्न न होण्याची चिंता होती, पण त्याहून जास्त वर्षानुवर्षं प्रयत्न करूनही काही बदलत नसल्याची हतबलता होती.
याच बदलाचा अभ्यास मयूर कुडुपले आणि जोएल कॅबालिऑन यांच्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागावरील संशोधनातही दिसतो. त्यांच्या अभ्यासानुसार, ग्रामीण विवाहव्यवस्थेत जमीन, शिक्षण, जात आणि वय हे जोडीदाराच्या निवडीवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत.
संशोधक मयूर कुडुपले सांगतात, "एक काळ असा होता, जेव्हा मुलीचे वडील मुलाकडे किती जमीन आहे हे पाहायचे. आता जमीन आहे की नाही यापेक्षा नोकरी आहे का, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न झाला आहे."
त्यांच्या मते, "ग्रामीण अर्थव्यवस्था बदलली आहे, पण विवाहाच्या अपेक्षा त्या बदलाबरोबर बदलताना सगळ्यांसाठी सारख्या झालेल्या नाहीत. जमीन असणं पूर्वी सामाजिक आणि आर्थिक स्थैर्याचं प्रतीक होतं. आता त्याच जागी नियमित उत्पन्न, नोकरी, शहरात राहण्याची शक्यता आणि स्वतःचं घर यांसारख्या गोष्टी आल्या आहेत."
जात संपली नाही; फक्त विवाहाच्या अपेक्षा बदलल्या
या सगळ्यात आणखी एक मोठी मर्यादा आहे ती म्हणजे 'जात'.
मयूर कुडुपले यांच्या मते, "जात आणि उपजात विवाहाची मोबिलिटी मर्यादित करतात. म्हणजे मुलगी किंवा मुलगा शोधताना आपण आपल्या जातीच्या आणि उपजातीच्या चौकटीतच शोध घेत राहतो."
जेंडर इक्वालिटी ट्रेनर दर्शना पवार या जातीय चौकटीचा आणखी एक विरोधाभास समोर आणतात. "मुलाला गरज असेल तर तो अगदी कुठल्याही जातीची मुलगी करायला तयार असतो, पण ती मुलगी लग्न करून घरात आल्यानंतर तिच्या जातीचा, तिच्या आई-वडिलांचा आणि तिच्या नातलगांचा स्वीकार खरंच केला जाईल का?" हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे.
दर्शना यांच्या मते, "एखाद्या पुरुषाला स्वतःपेक्षा सामाजिकदृष्ट्या खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलगी स्वीकारणं सोपं वाटू शकतं; पण स्वतःपेक्षा वरच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलगी, विशेषतः गरीब मुलगी, स्वीकारण्याचा प्रश्न आला की ही तयारी दिसत नाही."
म्हणजे विवाहाच्या बाजारात जात अजूनही संपलेली नाही; फक्त तिचं स्वरूप बदललं आहे.
महिलांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत?
जळगावमध्ये बोलताना अनेक पुरुषांकडून एक तक्रार वारंवार ऐकायला मिळाली 'मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.'
अनेकांच्या मते, मुलींना नोकरी करणारा मुलगा, शहरात घर आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं.
पण महिलांशी बोलताना चित्र थोडं वेगळं दिसतं. एका 20-22 वर्षांच्या तरुणीशी आम्ही मुलांच्या विवाहाबाबत आणि तिच्या स्वतःच्या अपेक्षांबाबत बोललो. मुलगा स्वतःच्या पायावर उभा असावा, कमीत कमी स्वतःचा खर्च चालवण्याइतका कमवत असावा, अशी तिची अपेक्षा होती.
मात्र दुसऱ्या दिवशी तिच्या कुटुंबीयांनी मुलाखत काढून टाकण्याची विनंती केली. शेवटी ती मुलाखत आम्हाला डिलीट करावी लागली.
महिलांच्या अपेक्षा बदलल्या आहेत, पण त्या अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त करण्याची जागा अजूनही सगळ्यांना मिळालेली नाही.
दर्शना पवार म्हणतात, "नवऱ्याशी बोलता यावं, त्याच्यासोबत फिरता यावं, त्याच्यासोबत वेळ घालवता यावा, एवढी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. या अपेक्षा 'वाढलेल्या' नसून मूलभूत आणि रास्त आहेत आणि आता त्यांना त्याची जाणीव होऊ लागली आहे एवढंच."
जळगावमध्ये फिरताना आणखी एक गोष्ट वारंवार जाणवली. विवाह न जुळण्याच्या प्रश्नाकडे पाहताना अनेक पुरुष अजूनही महिलांनाच त्यासाठी जबाबदार धरत होते.
मयूर कुडुपले यांच्या अभ्यासातही ग्रामीण पुरुषांमध्ये महिलांच्या बदलत्या पसंतीबद्दल अशाच तक्रारी आढळतात. मात्र संशोधनाचं निरीक्षण असं आहे की, या बदलांकडे केवळ महिलांच्या इच्छांमधला बदल म्हणून पाहता येत नाही; त्यामागे शेतीची घसरण, बेरोजगारी, शिक्षण, जात आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बदलत्या कल्पना आहेत.
या सगळ्यात पुरुष कुठे उभे आहेत?
जळगावच्या गावांमध्ये फिरताना लग्नाचा विषय निघताच अनेक तरुणांचा आवाज बदलत होता. काही जण कॅमेऱ्यासमोर बोलायलाच तयार नव्हते. एका तरुणानं मला स्पष्ट सांगितलं, "कॅमेऱ्यावर माझ्याबद्दल बोललो तर माझ्याशी कोण लग्न करेल?"
अनेक कुटुंबांनी आता मुलावर लग्नासाठी दबाव टाकणंही कमी केलं आहे. कारण वर्षानुवर्षं प्रयत्न करूनही लग्न जमत नसल्याने त्यांनीही आशा सोडल्यासारखी झाली आहे.
तर काही कुटुंबं अजूनही मुलाचं लग्न जमावं म्हणून घर बांधत आहेत, जमीन विकत घेत आहेत किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक कुटुंबं आता मध्यस्थ आणि लग्न जुळवणाऱ्या दलालांची मदत घेत आहेत. काही पालकांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.
काही जण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन स्थळं शोधतात, तर काही कुटुंबं मुलीसाठी पैसे देण्याची तयारीही दाखवत आहेत.
लग्नासाठीचा शोध आता नातेवाईकांच्या चौकटीपलीकडे जाऊन मध्यस्थ, पैशांचे व्यवहार आणि दूरच्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे.
स्त्री भ्रूणहत्येपासून बदलत्या विवाहसंस्थेपर्यंत
दर्शन पवार यांच्या मते, "मागच्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या स्त्री भ्रूणहत्येचा परिणाम आज विवाहयोग्य वयातील पुरुषांच्या पिढीवर दिसतो."
"आज 30-35 वयोगटातील ज्या पुरुषांना लग्नासाठी जोडीदार मिळत नाही, त्यांच्या जन्माच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्भात मुली मारल्या गेल्या होत्या. पण मुलींची संख्या कमी झाली म्हणजे महिलांच्या हातात विवाहाचा संपूर्ण निर्णय गेला, असंही नाही," असं दर्शना नमूद करतात.
मयूर कुडुपले आणि जोएल कॅबालिऑन यांच्या अभ्यासानुसार, महिलांची निवड करण्याची क्षमता काही प्रमाणात वाढली असली, तरी ती अजूनही कुटुंब, जात आणि सामाजिक दबावाच्या चौकटीतच आहे.
नोकरी, उत्पन्न, जात, कुटुंबाच्या अपेक्षा आणि बदलती विवाहसंस्था या सगळ्यांमध्ये पुरुषही स्वतःची जागा शोधत आहेत.
विशाल पाटील म्हणतात, "लग्न म्हणजेच आयुष्य नसतं." कदाचित जळगावच्या या 29 आत्महत्यांकडे पाहताना सर्वात आधी हीच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल.
कारण लग्न न जमणं हा या 29 आत्महत्यांमध्ये नोंदवलेला एक घटक आहे. पण जळगावची ही गोष्ट सांगते की, हा प्रश्न फक्त मुलींचा नाही; बदलती अर्थव्यवस्था, जातव्यवस्था, स्त्रियांच्या बदलत्या अपेक्षा आणि पुरुषांवरच्या सामाजिक अपेक्षांचा हा गुंता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)