युट्यूबवर व्हीडिओ पाहून घरीच प्रसूती; नवजात मुलगी वाचली पण आईचा मृत्यू

    • Author, झेव्हियर सेल्वकुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

(इशारा: या लेखातील माहिती काहीजणांना विचलित करू शकते)

तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये एका महिलेचा घरीच प्रसूतीचा प्रयत्न केल्यानं मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये न जाता किंवा वैद्यकीय सल्ला न घेता युट्यूबवर घरीच प्रसूती करण्याचा व्हीडिओ पाहून प्रसूती करण्याचा प्रयत्न या महिलेनं केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

दरम्यान नवजात मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. तर या मृत्यूप्रकरणी या महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासातून समोर आलं की या जोडप्याला 6 वर्षांपूर्वी मुलगी झाली होती आणि त्यावेळेस सिझेरियनद्वारे प्रसूती झाली होती. त्यामुळे यावेळेस या जोडप्यानं नैसर्गिक प्रसूती करण्याचं ठरवलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की यासंदर्भात या जोडप्यानं नातेवाईकांनी दिलेला कोणताही सल्ला मानला नाही.

असंही आढळून आलं आहे की,काही महिला बाळाचा जन्म झाल्यानंतर 12 आठवड्यांनी आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या लशी, औषधं आणि मदतीबद्दल माहिती असूनदेखील त्या यापैकी कशाचाही लाभ घेत नाहीत. प्रसूतीतज्ज्ञ (ऑबस्टेट्रिशियन) गीता म्हणतात की घरी प्रसूती केल्यास त्यात माता आणि बाळ या दोघांच्याही जीवाला धोका असतो.

वैद्यकीय उपचार नाकारत घरीच प्रसूती (सेल्फ-डिलिव्हरी)

तिरुपूर जिल्ह्यातील उथुकुलीजवळच्या 'पुंचाई थलवईपालयम' गावातील रहिवासी असलेले काटी सामी (40) आणि त्यांच्या पत्नी शशिकला (32) या दोघांनीही इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली आहे. काटी सामी त्यांचे आई-वडील आणि भावाबरोबर शेती करतात. या जोडप्याला 6 वर्षांची मुलगी आहे.

शशिकला या पुन्हा गरोदर होत्या. शशिकला यांना 23 जूनला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी घरीच बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेल्यानं त्यांना कोईम्बतूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे 28 जूनला त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागानं केलेल्या तक्रारीनुसार उथुकुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उथुकुल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पती-पत्नीनं सांगितलं की कोणत्याही नातेवाईकाचा सल्ला न घेता त्यांनी स्वत:च हा निर्णय घेतला होता.

बीबीसीशी बोलताना उथुकुलीचे पोलीस इन्स्पेक्टर सरवनन म्हणाले, "शशिकला यांना 23 जूनला रात्री 9:45 च्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यावेळेस त्यांच्या आई-वडिलांना कळवण्यात आलं आणि ते लगेच तिथे पोहोचले. शशिकला यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ नये असं सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्या स्वत:च प्रसूती करतील. शशिकला यांनी त्यांना असंही सांगितलं की जोपर्यंत त्या फोन करत नाही तोपर्यंत त्यांनी आत येऊ नये. त्यामुळे ते रात्रभर घरात न जाता बाहेरच थांबले."

ते पुढे म्हणाले, "प्रसूतीच्या वेळेस फक्त शशिकला आणि त्यांचे पतीच खोलीत होते. मी जेव्हा शशिकला यांच्या आई-वडिलांना विचारलं, तेव्हा त्यांनीही नैसर्गिकरित्या प्रसूती केली जात असल्याची कल्पना असल्याचं सांगितलं. मात्र त्यांची याला मंजूरी होती की नाही, हे मला माहिती नाही. मी जेव्हा त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी तक्रार करण्यास नकार दिला."

त्यानंतर कुन्नथूरच्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी नित्या यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस इन्स्पेक्टर सरवनन यांनी बीबीसीला सांगितलं की सुरुवातीला नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्टच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यात निष्काळजीपणामुळे मृत्यू होणं आणि कोणतंही योग्य वैद्यकीय शिक्षण आणि नोंदणी नसताना वैद्यकीय उपचार करणं यासारख्या आरोपांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जूनला रात्री 10 च्या सुमारास फक्त भट्टीस्वामी यांनी युट्यूबवर व्हीडिओ पाहून शशिकला यांना प्रसूतीसाठी मदत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी एका मुलीचा जन्म झाला. त्यानंतर शशिकला यांना अती रक्तस्त्राव झाला आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीनं जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना पेरुंदुरईमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.

तिथे शशिकला यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यावर त्यांना कोईम्बतूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र शशिकला यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कोईम्बतूरमधील एक खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

तिथे शशिकला यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यादरम्यान 28 जूनला त्यांचा मृत्यू झाला. नवजात बालिकेवर सध्या पेरुंदुरईमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

शशिकला आणि कुदंथाईस्वामी यांचं लग्न 23 फेब्रुवारी 2019 ला झालं होतं. त्याच्या पुढील वर्षी त्यांना पहिलं अपत्य झालं, ती एक मुलगी होती. तिचा जन्म सिझेरियन म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे झाला होता. त्यानंतर विविध कारणांमुळे शशिकला यांचा ॲलोपॅथिक उपचार पद्धतीवरील विश्वास उडाला होता, असं कुदंथाईस्वामी यांनी सांगितल्याची माहिती उथुकुली पोलिसांनी दिलेल्या निवदेनात दिली आहे.

शशिकला त्यांच्या दुसऱ्या गरोदरपणात तपासणीसाठी हॉस्पिटलमध्येही न जाता घरीच राहिल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकला यांनी त्यांच्या सासू-सासरे आणि स्वत:च्या आई-वडिलांना आधीच सांगितलं होतं की त्या घरीच बाळाला जन्म देणार आहेत. आरोग्य विभागानंही अशीच माहिती दिली आहे.

ज्या तिरुपूरमध्ये हा मृत्यू झाला तिथे तामिळनाडूचे आरोग्यमंत्री अरुणराज जिल्ह्याचे प्रभारी मंत्री आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग या प्रकरणाकडे बारकाईनं लक्ष देऊन तपास करत आहे. या घटनेचा संबंध 3 जिल्ह्यांशी असल्यामुळे, तिन्ही जिल्ह्यांमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले जातील, असं तिरुपूर जिल्ह्याचे सहसंचालक कन्नन महाराजन यांनी सांगितलं.

बीबीसीशी बोलताना कन्नन महाराजन म्हणाले, "बाळाचा जन्म झाल्यानंतर वार (प्लासेन्टा) बाहेर आली नव्हती. यामुळे रक्तस्त्राव वाढला. त्यानंतर शशिकला यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यावर तिथे फक्त प्लासेन्टा काढून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांना पेरुंदुरई वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथे असताना शशिकला यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना कोईम्बतूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर ते खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. मृत शशिकला यांचं घर तिरुपूरमध्ये आहे. तर त्यांच्यावर ज्या पेरुंदुरई वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात होते ते इरोड जिल्ह्यात आहे. तर पुढील उपचारांनंतर ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला ते कोईम्बतूरमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तिन्ही जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे."

तामिळनाडूत गरोदर महिलांची नोंदणी आणि देखरेख कशी केली जाते?

तामिळनाडूत गरोदर महिलांनी जर राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि लसीकरण संचालनालयाच्या पीआयसीएमई वेबसाईटवर त्यांच्या नावाची नोंदणी केली, तर त्यांना रिप्रोडक्टिव्ह चाईल्ड हेल्थ (आरसीएच) नंबर दिला जातो. स्थानिक आरोग्य अधिकारी या नंबरची नोदणी करतात. ते गरोदर महिलेवर गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून लक्ष ठेवतात. ते त्या महिलेला औषधं, गोळ्या पुरवतात आणि त्यांची तपासणी करतात.

आरोग्य अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली की तामिळनाडू सरकार महिलांना गर्भधारणेच्या विविध टप्प्यांवर 12,000 ते 18,000 रुपयांपर्यंतचे प्रसूतीविषयक लाभ देतं. या नोंदीच्या आधारे, त्या गरोदर महिलेची एक स्वतंत्र फाईल बनवली जाते. या महिलेला गरोदरपणात योग्य ते उपचार दिले जातात. तसंच बाळाचा जन्म झाल्यानंतर या फाईलचा उपयोग जन्म दाखला देण्यासाठी आणि लसीकरणासाठी केला जातो.

अशा प्रकारच्या वैद्यकीय नोंदी आणि उपचारांची सुविधा निलगिरी जिल्ह्यातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात असलेल्या विविध आदिवासी गावांमध्येही पुरवली जाते.

बीबीसीशी बोलताना मसिनागुडी गावातील ग्रामआरोग्य परिचारिका श्रीदेवी म्हणाल्या, "एकदा का आरसीएच नंबर मिळाला की आम्ही पहिल्या महिन्यापासूनच त्या महिलेवर देखरेख करतो. महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीच्या दिवसापासूनच आमची ही देखरेख सुरू होते आणि बाळाचा जन्म झाल्यानंतरदेखील ती सुरू राहते."

"आम्ही गरोदर महिलांच्या घरी जाऊन त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी तपासतो. आम्ही त्यांना ग्लुकोज देतो आणि रक्ताची तपासणी करतो. आम्ही त्यांना विविध टप्प्यांनुसार पोषक गोळ्या, डास प्रतिबंधक कीटकनाशकं, लोहाच्या गोळ्या, कॅल्शियम आणि बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या यासारख्या औषधं देतो. त्याचप्रमाणे, गर्भातील बाळाचं आरोग्य, बाळाचे अवयव, वजन आणि त्याची वाढ तपासण्यासाठी आम्ही या महिलांची 3 टप्प्यांवर स्कॅन म्हणजे सोनोग्राफी करून घेतो. यातून त्याच्या प्रसूतीची तारीख निश्चित केली जाते. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवतो आणि प्रसूतीसाठी आवश्यक ती मदत पुरवतो," असं आरोग्य परिचारिका श्रीदेवी म्हणाल्या.

गरोदर महिलांना चौथ्या आणि सहाव्या महिन्याच्या शेवटी तामिळनाडू सरकारकडून एक 'किट' दिलं जातं. या किटमध्ये विविध वस्तू असतात. त्यात 2000 रुपये किंमतीचं पोषक द्रव्य, कीटक निरोधक, खजुराचे 2 बॉक्स, आयर्न सप्लिमेंट्स आणि तूप यांचा समावेश असतो, असं त्यांनी सांगितलं.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अगदी बाळाचा जन्म झाल्यानंतर देखील आरोग्य विभाग लसीकरणावर लक्ष ठेवतो. यात पोलिओचे डोस ते वयाच्या 5, 6, आणि 16 व्या वर्षापर्यंतच्या लसीकरणाचा समावेश असतो.

मात्र शशिकला या गुप्तपणे राहत होत्या आणि त्यांची गर्भधारणा त्यांनी लपवून ठेवली होती. त्यामुळे कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्याला त्यांच्या गरोदरपणाविषयी माहित नव्हतं, असं तिरुपूरच्या जिल्हा उपसंचालक जयंती यांनी सांगितलं.

उपसंचालक असेही म्हणाले, गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून ते प्रसूतीपर्यंत कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता, तसंच कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याशी सल्लामसलत न करता त्यांनी हा विचित्र निर्णय घेतला होता.

बीबीसीशी बोलताना तिरुपूरच्या आरोग्य उपसंचालक जयंती म्हणाल्या, "जेव्हा या महिलेला पहिलं अपत्य झालं होतं, तेव्हा त्यांना आरसीएच नंबर मिळाला होता. त्यांची प्रसूती सिझेरियनद्वारे झाली होती. त्यानंतर त्यांना आवश्यक ते सर्व उपचार मिळाले होते. त्यांना पुन्हा नोंदणी करून त्याआधारे उपचार घेता आले असते. मात्र या जोडप्यानं ॲलोपॅथिक उपचार घेणं नाकारलं. ते स्वत:च प्रसूतीबद्दलचे उपचार करत होते."

"ते दोघेही इंजिनीअरिंगचे पदवीधर होते. मात्र तरीदेखील त्यांनी गर्भधारणा लपवून ठेवली. असं करण्याचा सल्ला त्यांना कोणी दिला हे आम्हाला समजू शकलेलं नाही. मात्र जर ते आमच्यासमोर आलं तर आम्ही संबंधितांविरोधात देखील तक्रार दाखल करू. मात्र महिलेच्या कुटुंबातील कोणीही या प्रकरणात माहिती देण्यास नकार दिलेला नाही. कायदेशीर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे," असं डॉ. जयंती यांनी सांगितलं.

उपसंचालकांनी सांगितलं की धाकट्या भावाचं कुटुंबदेखील त्याच घरात राहतं. धाकट्या भावाच्या पत्नीवर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि त्यांची प्रसूतीही झाली. त्या बाळाला पोलिओचे डोस दिलेले असूनही आरोग्य विभागाने त्यांना या प्रकरणाची माहिती दिली नाही, याची त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांनी बीबीसीला सांगितलं की या जोडप्यानं त्यांना त्यांच्या खासगी बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्यास सांगितलं असल्यामुळे त्यांनी ही माहिती दिली नाही.

तिरुपूर जिल्हा आरोग्य विभागाच्या सहसंचालकांनी सांगितलं की "सध्या तामिळनाडूत कुठेही घरीच प्रसूती होण्याचे प्रकार घडत नाहीत. असं प्रकरण वर्षातून एखाद-दुसऱ्या ठिकाणीच घडतं. एखादी महिला गरोदर झाल्यापासून आणि नंतर बाळाचा जन्म झाल्यानंतरही त्यांच्यावर सतत देखरेख केली जात असते. आमच्या राज्यात आहे तशी यंत्रणा इतरत्र कुठेही नसली तरीदेखील कोणालाही कळू न देता अशाप्रकारे लपून राहण्यांचा शोध घेणं शक्य होत नाही. असं करणं बेकायदेशीर आहे."

घरीच प्रसूती करणं, माता आणि बाळ दोघांच्याही जीवासाठी धोकादायक!

गीता, कोईम्बतूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी महिलांना प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीच्या वेळेस उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबद्दल सांगितलं. तसंच, हॉस्पिटलऐवजी महिलेनं घरातच प्रसूती करणं किती धोकादायक ठरू शकतं हेदेखील त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.

बीबीसीशी बोलताना डॉ. गीता म्हणाल्या, "सर्वसाधारणपणे प्रसूतीच्या वेळेस अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जेव्हा एखादी महिला गरोदर असते, तेव्हा तिला उच्च रक्तदाब, ॲनिमिया आणि मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच आम्ही दर महिन्याला गरोदर महिलांची रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि हिमोग्लोबिन यांची तपासणी करतो. या समस्यांचं निदान जर सुरुवातीच्या टप्प्यावरच झालं, तरच त्यावर उपचार करणं आम्हाला शक्य होतं."

"जर या आजारांचं निदान झालं नाही तर त्या महिलेची प्रसूती कशी होईल याबद्दल अंदाज वर्तवणं कठीण असतं. जर या समस्या नियंत्रणात नसल्यास तर परिस्थिती कठीण होऊ शकते. प्रसूतीच्या वेळेस गर्भाशयाचं आकुंचन होणं आवश्यक असतं. यासाठी ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ द थर्ड स्टेज ऑफ लेबर (एएमटीएसएल) नावाचे उपचार केले जातात. त्यासाठी योग्य ती इंजेक्शन आणि औषधं दिली जातात. हे सर्व उपचार करणं फक्त हॉस्पिटलमध्येच शक्य असतं," असं त्यांनी पुढे सांगितलं.

"असं दिसतं की मृत्यू झालेल्या महिलेला पहिलं अपत्य सिझेरियनद्वारे झालं होतं. जर एखाद्या महिलेचं एकदा सिझेरियन झालं असेल, तर पुढील वेळेस सुरक्षितपणे प्रसूती होण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. मागील प्रसूतीच्या वेळेस घातलेले टाके असू शकतात. ते टाके तुटण्याची आणि गर्भाशय फाटण्याची शक्यता असते. जर तसं झालं तर माता आणि बाळ या दोघांचा जीव वाचवणं कठीण होतं. जर ते हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवता येतं आणि त्यानुसार योग्य ते उपचार करता येतात," असं डॉ. गीता म्हणाल्या.

"एखाद्याला कार चालवता येत असेल म्हणून ती व्यक्ती जशी ट्रक चालवू शकत नाही. त्याचप्रमाणे युट्यूबवर पाहून विमान उडवण्याइतकंच घरीच प्रसूती करणंदेखील धोकादायक आहे. अलीकडे अनेकजणांना वाटतं आहे की नैसर्गिक प्रसूती (सिझेरियन नसलेली) हीच सर्वोत्तम असते. मात्र ते चुकीचं आहे. जर माता निरोगी असेल तरच बाळदेखील निरोगी जन्माला येऊ शकतं," असं प्रसूतीतज्ज्ञ गीता म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.