मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; रायगडमधील शाळा-महाविद्यालयांना सुटी

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार मुसंडी मारली असून मुंबईसह कोकण पट्ट्यात बुधवारी (1 जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत अवघ्या काही तासांत 100 ते 165 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघर, ठाणे येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

मात्र मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने 2 ते 5 जुलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी काढलेल्या आदेशानुसार, संबंधित भागांमध्ये सतत पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या इशाऱ्यांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली आहे.

मात्र, या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा तसेच व्यावसायिक आणि प्रशिक्षण संस्थांनाही 2 जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. रायगड जिल्ह्यात 2 ते 5 जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पनवेल आणि परिसरात गेल्या 24 तासांत लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागांत 70 ते 230 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद असून काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनानेही 1 ते 5 जुलैदरम्यान ऑरेंज आणि रेड अलर्टचा इशारा लक्षात घेऊन शाळांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आवश्यक ते निर्णय घ्यावेत, असे निर्देश दिले आहेत.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलाशयातील साठा वाढला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये 2 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 1,17,532 दशलक्ष लिटर (एमएल) इतका पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या 8.12 टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये 6,29,031 एमएल (43.46 टक्के) पाणीसाठा होता. सध्या भातसा तलावात 40,983 एमएल, मोडक सागरमध्ये 28,814 एमएल, मध्य वैतरणामध्ये 23,950 एमएल, विहारमध्ये 15,837 एमएल, तानसामध्ये 5,216 एमएल आणि तुळशीमध्ये 2,733 एमएल पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा तलावाची पातळी एलडीएलच्या खाली गेल्याने त्यातील उपयुक्त पाणीसाठा शून्य मानण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत तलाव परिसरात चांगला पाऊस झाला असून तुळशी येथे 207 मिमी, विहार येथे 195 मिमी, मध्य वैतरणा येथे 70 मिमी, मोडक सागर येथे 67 मिमी, भातसा येथे 52 मिमी, तानसा येथे 51 मिमी आणि अप्पर वैतरणा येथे 22 मिमी पावसाची नोंद झाली. भांडुप संकुल परिसरात गेल्या 24 तासांत 219 मिमी पाऊस झाला असून हंगामातील एकूण पाऊस 763 मिमी इतका झाला आहे.

दरम्यान, 23 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मध्य वैतरणा जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते, तर 22 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून अप्पर वैतरणा येथून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच अप्पर वैतरणा तलावाची पातळी किमान उपसा पातळीपेक्षा (एलडीएल) खाली गेल्याने त्याखालील 12,995 एमएल पाणी वापरण्यात आले असल्याची नोंद जलअभियंता विभागाने केली आहे.

मुंबईत 1 जुलै रोजी सकाळी साडेआठ ते 2 जुलैच्या पहाटे साडे पाचदरम्यान सांताक्रूझ येथे सर्वाधिक 165.9 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जुहू विमानतळावर 164.5 मिमी, विक्रोळी येथे 163 मिमी, राम मंदिर परिसरात 157 मिमी आणि वांद्रे येथे 141.5 मिमी पाऊस झाला. याशिवाय विद्याविहार (132 मिमी), सायन (115 मिमी), टाटा पॉवर-चेंबूर (99.5 मिमी), कुलाबा (99 मिमी) आणि भायखळा (97.5 मिमी) येथेही जोरदार पाऊस झाला.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक तेवढेच घराबाहेर पडावे, तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईसह कोकण आणि आसपासच्या भागात पावसाचा जोर कायम असून 1 जुलै 2026 रोजी सकाळी 08:30 ते 2 जुलै 2026 रोजी सकाळी 08:30 या 24 तासांत मुंबईत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक पाऊस जुहू विमानतळ येथे 205.0 मिमी पडला, तर सांताक्रूझ येथे 204.6 मिमी पावसाची नोंद झाली. विक्रोळी येथे 192.5 मिमी, वांद्रे येथे 183.5 मिमी, राम मंदिर परिसरात 178.0 मिमी, भायखळा येथे 171.5 मिमी, टाटा पॉवर चेंबूर येथे 165.5 मिमी, सायन येथे 163.5 मिमी, विद्याविहार येथे 162.0 मिमी आणि कुलाबा येथे 158.2 मिमी पाऊस झाला. दरम्यान, कुलाबा येथे किमान तापमान 23.9 अंश सेल्सियस तर सांताक्रूझ येथे 23.0 अंश सेल्सियस नोंदवले गेले.

रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली असून माथेरान येथे सर्वाधिक 208 मिमी पाऊस पडला. पनवेलमध्ये 191.4 मिमी, कर्जतमध्ये 152 मिमी, श्रीवर्धनमध्ये 139 मिमी, म्हसळा येथे 138 मिमी, तळा येथे 135 मिमी, माणगाव येथे 123 मिमी, पेण आणि खालापूर येथे प्रत्येकी 120 मिमी, उरणमध्ये 104 मिमी, सुधागड येथे 102 मिमी, महाडमध्ये 97 मिमी, मुरुडमध्ये 90 मिमी, पोलादपूरमध्ये 62 मिमी आणि रोहा येथे 48 मिमी पाऊस झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली. राजापूर येथे सर्वाधिक 170 मिमी पावसाची नोंद झाली. मंडणगड येथे 125 मिमी आणि गुहागर येथे 124 मिमी पाऊस झाला. दापोली येथे 108 मिमी, लांजा येथे 107 मिमी, खेड येथे 87 मिमी, वाकवली येथे 70.2 मिमी, चिपळूण येथे 55 मिमी आणि संगमेश्वर येथे 48 मिमी पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील अनेक भागांत जोरदार पावसाची स्थिती कायम आहे.

कोकणात जोरदार पाऊस

ठाणे जिल्ह्यात ठाणे शहरात 135 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय उल्हासनगरमध्ये 124 मिमी, भिवंडीत 109 मिमी, मुरबाडमध्ये 101 मिमी, अंबरनाथमध्ये 96 मिमी, कल्याणमध्ये 87 मिमी आणि शहापूरमध्ये 44 मिमी पाऊस झाला. पालघर जिल्ह्यात पालघर कृषी केंद्र येथे 126 मिमी पाऊस झाला, तर तलासरीमध्ये 110 मिमी, विक्रमगडमध्ये 109.6 मिमी, वसईमध्ये 108 मिमी, जव्हारमध्ये 87 मिमी आणि वाडा येथे 84 मिमी पावसाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झाला असला तरी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला. दोडामार्ग आणि सावंतवाडी येथे प्रत्येकी 90 ते 95 मिमी दरम्यान पाऊस झाला. कणकवलीमध्ये 86 मिमी, वेंगुर्ल्यात 67 मिमी, कुडाळमध्ये 60 मिमी, मुलदे कृषी केंद्रात 58.6 मिमी, मालवणमध्ये 45 मिमी, रामेश्वर कृषी केंद्रात 37.8 मिमी, वैभववाडीत 33 मिमी आणि देवगडमध्ये केवळ 4 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे उत्तर कोकणात विशेषतः मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र दिसून आले.

इतर जिल्ह्यांत काय स्थिती?

जळगाव जिल्ह्यात 2 जुलै रोजी अमळनेर येथे 32 मिमी, भडगाव येथे 22 मिमी, रावेर येथे 16 मिमी, पारोळा आणि धरणगाव येथे प्रत्येकी 11 मिमी, पाचोरा येथे 6 मिमी, यावल येथे 3 मिमी तर भुसावळ येथे 0.8 मिमी पावसाची नोंद झाली. बोदवड, जामनेर, चाळीसगाव आणि जळगाव येथे अत्यल्प किंवा शून्य पाऊस झाला.

पुणे विभागात सकाळी 03 UTC पर्यंतच्या नोंदीनुसार गिरीवन येथे सर्वाधिक 59.5 मिमी पाऊस झाला. त्यानंतर माळीण येथे 32.5 मिमी, निमगिरी येथे 23.5 मिमी, तळेगाव येथे 17.5 मिमी, चिंचवड येथे 17 मिमी, पाषाण येथे 13.2 मिमी, दापोडी येथे 12 मिमी, राजगुरूनगर येथे 11 मिमी आणि एनडीए येथे 8 मिमी पावसाची नोंद झाली. हवेली आणि दुधुळगाव येथे प्रत्येकी 6 मिमी, नारायणगाव आणि शिरूर येथे प्रत्येकी 5.5 मिमी, तर बारामती आणि दौंड येथे अनुक्रमे 0.6 मिमी आणि 0.5 मिमी पाऊस झाला.

नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

हवामान विभागाच्या 30 जून ते 4 जुलै या कालावधीसाठी जारी केलेल्या कृषी हवामान सल्ला पत्रकानुसार, 2 आणि 3 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तसेच एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भातही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता असून मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका -

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुसळधार पावसामुळे शहरी भागांतील सखल रस्त्यांवर पाणी साचणे, स्थानिक पातळीवर पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे, दृश्यमानता कमी होणे आणि कमकुवत बांधकामांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा किंवा भूस्खलनाचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांना सावधगिरीचे आवाहन -

जोरदार पावसाच्या काळात वाहतूक कोंडीची माहिती घेऊनच प्रवास करावा, पाणी साचणारे भाग टाळावेत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या मैदानात किंवा शेतात काम करू नये तसेच विद्युत उपकरणे वीजपुरवठ्यापासून वेगळी करावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना -

कोकण, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाट परिसरात भात आणि नाचणीच्या रोपवाटिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. नव्याने लागवड केलेल्या फळबागा, भाजीपाला पिके तसेच वेलवर्गीय पिकांना आधार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात पावसाचा जोर पाहता भुईमूग, काकडीवर्गीय पिके आणि काही रोपवाटिकांची पेरणी पुढे ढकलण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच खतांचा वापर व कीटकनाशक फवारणी काही दिवस पुढे ढकलण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोणत्या भागांत सर्वाधिक पाऊस?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर व दक्षिण कोकणात 4 जुलैपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा भाग, विशेषतः पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.