मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; पुण्यात वारकऱ्यांची शाळांमध्ये व्यवस्था, तर काही भागांतून नागरिकांचे स्थलांतर

Published
वाचन वेळ: 8 मिनिटे

सलग सहाव्या दिवशी राज्यात पावसाचा जोर कायम आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक सेक्शनवर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतूक प्रभावित झाली आहे.

पुढील सूचना येईपर्यंत मुंबई-पुणे प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या घाट विभागात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई विभागाच्या 'अप मेन लाइन'वर ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान दरड कोसळली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंक सेक्शन या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतूक देखील ठप्प आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे रद्द झाल्या आहेत. रद्द झालेल्या रेल्वेंची यादी येथे वाचू शकता.

भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.

पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना विनंती आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यान कोणताही प्रवास करू नये.

ज्यांचा प्रवासाचा बेत आहे, त्यांनी आपला प्रवास पुढे ढकलावा आणि सरकारी यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या वाहतूकविषयक सूचनांचे पालन करावे.

आळंदी-देहूमधील मंदिर परिसरात पाणी शिरले, पोलिसांचे वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन

आळंदी व देहू येथील मंदिर परिसर आणि धर्मशाळांमध्ये इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढून पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख व भाविकांना आवाहन केले आहे.

पोलिसांनी म्हटले, "आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विनंती आहे की, आपण सध्या ज्या ठिकाणी आहात, तेथेच सुरक्षित थांबा. कृपया पुढील प्रवास करू नका. नदी, पूल किंवा पाण्याने भरलेल्या मार्गांवरून जाण्याचा प्रयत्न करू नका. पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करा."

"परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतर व मार्ग मोकळे झाल्यावर पुढील प्रवासाबाबत अधिकृत सूचना तात्काळ देण्यात येईल," असंही त्यांनी नमूद केलं.

वारकऱ्यांची पुण्यातील शाळांमध्ये राहण्याची सोय

इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे तिकडचे सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्व वारकऱ्यांची पुण्यात राहण्याची सोय करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी निवेदन जारी करत म्हणाल्या, "वारकऱ्यांनी आळंदी देवस्थानाकडे न जाता त्यांनी पुण्यात यावं आणि इथेच थांबावं. येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची पुण्यात राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

"महानगरपालिकेच्या 101 शाळांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्या सर्व शाळांना 12 जुलैपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण पुणे शहरातील पाणीकपातही रद्द करण्यात येणार आहे.

पूरस्थितीमुळे पुण्यात नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पुणे शहराच्या काही भागांतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

यामध्ये येरवडा, नगर रोड, ढोले पाटील रोड आणि औंध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकूण 75 कुटुंबांतील सुमारे 300 नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आलीय.

याशिवाय, पुणे शहरात सुरू असलेल्या सतत पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली आहे. शहरातील पावसाची स्थिती, धरणांतील पाणीसाठा, साचलेले पाणी, पूरस्थिती तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 24 तास लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.

पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि इतर आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवली आहे. हवामान विभाग, जलसंपदा विभाग, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, पथ विभाग, मलनिस्सारण विभाग तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत आहे. महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी संबंधित ठिकाणी उपस्थित राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पुणे महानगरपालिका, हवामान विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

नदी, नाले, ओढे, पूल, सखल भाग तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे टाळावे. झाडाखाली किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक (24 तास कार्यरत)

  • पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : 020 25501269, 020 25506800

आपत्ती व्यवस्थापन विभाग संपर्क अधिकारी :

  • गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी : 9689931511
  • केदार वझे, उप अभियंता : 9689931287
  • प्रकाश कोतवाल, शाखा अभियंता : 9850920714

एनडीआरएफकडून 37 प्रवाशांची सुखरूप सुटका

मावळ (पुणे) येथील घोरावाडी रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे अडकलेल्या एका खाजगी बसमधील सर्व 37 प्रवाशांची एनडीआरएफच्या 5 व्या बटालियनच्या '5-एचक्यूआर' पथकाने सुखरूप सुटका केली आहे.

पुणे जिल्ह्यातील पाटणमध्ये घरावर कोसळली दरड

पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

NDRFने दिलेल्या माहितीनुसार, एकाच घरातील 4-5 सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी (डीडीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. तसेच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील 5 व्या बटालियनची मदत मागविण्यात आली होती.

सोमवारी (6 जुलै) दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली एकाच कुटुंबातील 4 ते 5 सदस्य अडकले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

तर आतापर्यंत या गावातील 23 लोकांना वाचवण्यात आले आहे. NDRFचे बचावकार्य अजूनही सुरू आहे.

NDRFचे निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे (1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 27 जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सोमवारी सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले होते.

मुंबई, पुण्यासाठी रेड अलर्ट

मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊसाची आणि काही तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, ताशी 70-80 किमी वेगाने अधूनमधून जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यासाठीही आज (6 जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 तासांसाठी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आणि ताशी 60-70 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता आहे.

लोणावळ्यात 24 तासात 670 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भिरातही यात काळात 608 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी काही ठिकाणच्या वार्षिक पर्जन्यमानापेक्षा अधिक आहे. अहिल्यानगरचे वार्षिक पर्जन्यमान 382 मिमी आहे, तर संभाजीनगरचे वार्षिक पर्जन्यमान 734 इतके आहे.

रायगड जिल्ह्यातील रोहा शहर जलमय

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे शहराजवळील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागलीय. नदीचं पाणी शहरात शिरल्यानं सर्वत्र अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

रोहा बस स्थानक, बाजारपेठेसह अनेक ठिकाणी पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ उडालीय.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यानं कुंडलिका नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

"रोहा शहरातील नागरिकांसह कुंडलिका नदीच्या काठावर असलेल्या सर्व गावांतील नागरिकांना नदीच्या पात्राजवळ जाऊ नये. तसेच, कोणताही धोका उद्भवल्यास तातडीने प्रशासनास संपर्क साधावा," असं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे.

तसंच, रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने 6 आणि 7 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलीय. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोणावळ्यात 24 तासात 670 मिमी पाऊस, धरण भरले, पाणी पातळीत झपाट्याने वाढ

लोणावळा धरण 100 टक्के भरले आहे. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

लोणावळा धरणाच्या अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू झालेला आहे. पाऊस चालू/वाढत राहिल्यास आणि पाण्याची आवक वाढत गेल्यास विसर्ग पुढे चालू राहील.

सर्वांना विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असं आवाहन टाटा पॉवरचे सुरेश कोंडूभैरी यांनी केले आहे.

मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना 6 जुलैला सुट्टी जाहीर

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी (6 जुलै) मुसळधार पाऊस व सोसाट्याचे वारे वाहणार आहे. तसेच पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; शाळांना सुट्टी जाहीर

हवामान विभागाने 6 जुलैला पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 जण जखमी आहे.

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यही सुरू आहे. याबाबत एएनआय आणि आयएएनएस या वृत्तसंस्थांनी वृत्त दिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयानेही याबाबत मध्यरात्री माहिती देताना म्हटलं की, मानखुर्दमध्ये घर कोसळून 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महापौर कार्यालयाने म्हटलं, "मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात रविवारी (5 जुलै) रात्री 8.30 वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या 3 मजली कच्चा चाळीतील 2 ते 3 घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत 5 लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत."

"घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले," अशी माहिती देण्यात आली.

"या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते," असंही त्यांनी नमूद केलं.

महापौर कार्यालयाने पुढे म्हटलं, "डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल 1 महिला, 3 लहान मुली आणि 1 लहान मुलगा अशा 5 जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात 1 लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि 1 तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी महापौरांना दिली."

"या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार अबू असीम आझमी, रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते," असंही त्यांनी नमूद केलं.

विदर्भात पावसाची काय स्थिती?

विदर्भात मागील 24 तासात किती पाऊस पडला याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.

त्यानुसार, अकोलामध्ये 0.8 मिमी, भंडाऱ्यात 7 मिमी, ब्रह्मपुरीत 9.6 मिमी, चंद्रपूरमध्ये 1 मिमी, गडचिरोलीत 5.6 मिमी, गोंदियात 72.8 मिमी, वाशिममध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये 0 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कालपर्यंत (5 जुलैपर्यंत) वर्ध्यात 96 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक :

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916

पालघर: 02525-297474 / +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827

ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101

पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)