You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र असलेले एक डॉलरचे नाणे; लाँचिंगच्या काही तासानंतरच 'आउट ऑफ स्टॉक'
- Author, ऑसमंड चिया
- Role, बिजनेस रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा असलेले एक डॉलरचे नाणे अमेरिकेनी जारी केले आहे. अमेरिकन संस्थांवर आपला प्रभाव टाकण्यासाठीचा हा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.
बुधवारी (2 सप्टेंबर) अमेरिकन युएस मिंट (अमेरिकन टांकसाळ) ट्रम्प यांचा चेहरा असलेले एक डॉलरचे नाणे जारी केले. या नाण्यावर 'लिबर्टी' आणि 'इन गॉड वुई ट्रस्ट' हे शब्द कोरलेले आहेत. अमेरिकेच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त हे नाणे जारी करण्यात आले आहे.
ही नाणी संग्रही ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहेत, ही नाणी रोजच्या व्यवहारासाठी नाहीयेत असे युएस मिंटने सांगितले आहे.
अमेरिकन कायद्यानुसार जिवंत राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा चलनावर असण्याची बंदी आहे. परंतु, या नियमावर मात करण्यासाठी वर्धापन दिनानिमित्तच्या कायद्यातील डिजाईनच्या एका कलमाचा वापर करण्यात आला.
25 नाण्यांचा रोल युएस मिंटकडून 61 डॉलर्सला विकण्यात आला आणि 100 नाण्यांची बॅग ही $154.50 डॉलर्सला विकण्यात आली. नाणी लाँच केल्याच्या काही तासानंतरच ट्रम्प यांची नाणी संपून गेल्याचे युएस मिंटच्या वेबसाईटवर सांगण्यात आले. या प्रकारची आणखी नाणी येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
वॉशिंग्टन डीसीमध्ये युएस मिंट स्टोअरच्या व्हेंडिग मशीन्समध्ये देखील या नाण्यांची विक्री झाली.
अधिक माहितीसाठी बीबीसीने युएस मिंट, अर्थ विभाग आणि व्हाईट हाऊसला संपर्क साधला आहे.
"अमेरिका ज्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहचलाय त्या क्षणाचा गौरव करण्यासाठी या नाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. पिढ्यानपिढ्या ज्याचा उल्लेख केला जाईल अशा वर्धापन दिनानिमित्तच्या खास क्षणासाठी तयार करण्यात आलेले हे डिजाईन संग्रहकांसाठी एक खास ठेवा असेल," असे युएस मिंटने म्हटले आहे.
हे सोनेरी रंगाचे नाणे आहे परंतु त्यात सोनं नाही. युएस मिंटनुसार त्यात 88.5 टक्के तांबे आहे आणि उर्वरित भागात झिंक, निकेल, मँगनिज-ब्रास यांचा थर आहे.
जरी ही नाणी व्यवहारासाठी लाँच करण्यात आली नसली तरी ती 'लिगल टेंडर' आहेत. आणि त्यांचा वापर इतर नाण्यांप्रमाणे किंवा चलनासारखा होऊ शकतो.
याबद्दल केंद्रीय कायदा असे सांगतो की ही नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारायची की नाही याचे स्वातंत्र्य व्यावसायिकांना आहे,
मे महिन्यात अर्थ सचिव स्कॉट बेजंट यांनी सांगितले होते की अर्थ विभाग राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र असलेली 250 डॉलर्सची नोट जारी करणार आहे.
त्यावेळी बेजंट यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले होते की याआधी देखील त्यावेळी जिवंत असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे चित्र चलनावर झळकले.
1926 साली अमेरिकाचा 150 वर्धापन दिन साजरा करण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कॅल्विन कुलिज यांचे चित्र अर्धा डॉलरच्या चलनावर झळकले होते.
ट्रम्प यांच्या प्रशासनाने सर्क्युलेटिंग कलेक्टिबल कॉइन रिडिजाईन अॅक्ट 2020 चा संदर्भ देखील दिला. हा कायदा ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात तयार करण्यात आला होता.
या कायद्यानुसार नाण्याच्या मागील बाजूवर (tails side) हयात व्यक्तीचं छायाचित्र छापण्यास बंदी आहे. मात्र, नाण्याच्या पुढील बाजूवर (heads side) हयात व्यक्तीचं छायाचित्र छापण्यास या कायद्यात स्पष्टपणे बंदी घालण्यात आलेली नाही. नव्या 1 डॉलरच्या नाण्यावर ट्रम्प यांचं छायाचित्र याच पुढील बाजूवर आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)