You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महिला अँकरसह 12 जणांना मृत्युदंडाची शिक्षा; इजिप्तमधील हे प्रकरण काय आहे?
- Author, पॉलिन कोला
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अंमली पदार्थांशी संबंधित एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इजिप्तमधील टीव्ही अँकर सारा खलिफा आणि इतर 11 जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इजिप्तचं सरकारी वृत्तपत्र 'अल-अक्रम'च्या वृत्तानुसार, हे सगळे आरोपी एका गुन्हेगारी टोळीचा भाग होते.
या टोळीवर परदेशातून अंमली पदार्थांसाठी लागणारा कच्चा माल आयात करणे, त्याचा वापर अंमली पदार्थ बनवण्यासाठी करणे आणि त्यांची विक्री करणे, असे आरोप होते.
आरोपींकडे बेकायदेशीर शस्त्रं आणि दारूगोळाही सापडला.
39 वर्षीय सारा खलिफा तिच्या 'मिशन इम्पॉसिबल' या टीव्ही शोमुळे ओळखली जाते.
तिच्या या टीव्ही शोमध्ये फौजदारी खटल्यांशी संबंधित प्रकरणांना दाखवलं जायचं.
सारा खलिफाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
या प्रकरणामध्ये निकाल पहिल्यांदा गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आला होता. मात्र, एका महिन्यानंतर त्याला औपचारिकपणे दुजोरा देण्यात आला. कारण न्यायालयाला इजिप्तच्या ग्रँड मुफ्तींकडून धार्मिक मत घ्यायचं होतं.
ग्रँड मुफ्तींकडून असं धार्मिक मत घेणं, हे इजिप्तमधील मृत्युदंडाच्या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रियेचाच एक भाग आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध अपील करता येऊ शकतं.
ड्रग्स तस्करीशी संबंधित आहे प्रकरण
खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आलं की, अधिकाऱ्यांनी परदेशातून आयात केलेली 750 किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जप्त केला होता.
'अल-अक्रम' या सरकारी वृत्तपत्रानुसार, 20 साक्षीदारांनी फिर्यादी पक्षाला जबाब दिले.
याव्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील सादर करण्यात आले. त्यामध्ये संभाषणं आणि व्हीडिओ क्लिप्सचा समावेश होता.
सरकारी वृत्तपत्र 'अल-यौम'च्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यायालयात हजर असताना, जेव्हा न्यायाधीशांनी सारा खलिफाला या प्रकरणातील तिच्या कथित भूमिकेबद्दल विचारलं, तेव्हा तिनं सांगितलं की तिने यापूर्वी कधीही ड्रग्स पाहिलेलेच नव्हते.
तिनं सांगितलं की, अंमली पदार्थ विरोधी संस्थेच्या कार्यालयात जेव्हा तिचा ड्रग्ससोबत फोटो काढण्यात आला, तेव्हा तिनं पहिल्यांदा ड्रग्स पाहिले.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या 2025 च्या अहवालानुसार, त्या वर्षी 492 लोकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी 23 जणांना मृत्युदंड देण्यात आला.
या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, हे आरोपी अमली पदार्थांची तस्करी आणि बलात्कार या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले.
पण हे अशा स्वरूपाचे गुन्हे होते जे 'जाणूनबुजून केलेला खून' या प्रकारच्या श्रेणीत मोडत नव्हते.
आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानकांनुसार, मृत्युदंडाचा वापर हा फक्त 'जाणूनबुजून केलेला खून' यांसारख्या गुन्ह्यांपुरता मर्यादित असावा.
गुन्हेगारांकडे आता कोणते पर्याय आहेत?
मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतरही, सारा खलिफा आणि इतर दोषींनी अद्याप त्यांचे कायदेशीर पर्याय वापरलेले नाहीत. ते या निकालावर अपील करू शकतात.
हे प्रकरण इजिप्तच्या सर्वोच्च अपील न्यायालयात म्हणजेच 'कॅसेशन कोर्टा'त जाऊ शकतं. तिथं बचाव पक्ष कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आणि त्यामागील कायदेशीर आधाराला आव्हान देऊ शकतो.
या प्रकरणात, न्यायालयानं आपला निकाल देण्यापूर्वी इजिप्तच्या ग्रँड मुफ्तींचं मतही मागितलं. मृत्युदंडाशी संबंधित प्रकरणांमध्ये ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे. मात्र, ग्रँड मुफ्तींचं मत न्यायालयावर बंधनकारक नसतं.
याचा अर्थ असा की, न्यायालयाचा सध्याचा निकाल मृत्युदंडाचा आहे. परंतु, त्याची अंतिम अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे. अपील प्रक्रियेमुळे ही शिक्षा कायम ठेवली जाऊ शकते, बदलली जाऊ शकते किंवा प्रकरणाची पुन्हा सुनावणी होऊन निर्णयाचा पुनर्विचार देखील होऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)