You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फ्रान्स आणि स्पेनमध्ये भीषण वणवा, लाखो लोक बेघर; पाहा अग्नितांडवाचे 11 फोटो
फ्रान्स आणि स्पेनमध्ये भीषण वणव्यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वणव्यांमुळं तीन लाखांहून अधिक लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं आहे.
फ्रान्समध्ये गेल्या दोन दशकांतील सर्वात भीषण वणव्यांची नोंद झाली आहे. तर स्पेनची राजधानी माद्रीदमधील अधिकाऱ्यांच्या मते, या भागानंही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भीषण वणव्यांचा सामना केला आहे.
अशाप्रकारे वणवे भडकण्यापूर्वी संपूर्ण युरोपमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा (हीटवेव्ह) आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा (104 फॅरेनहाइट) अधिक नोंदवण्यात आलं.
माद्रीदबाहेरील विविध भागांत लागलेल्या वणव्यांमुळं मिळून सुमारे 770 चौरस किलोमीटर (297 चौरस मैल) परिसर जळून खाक झाल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. हे क्षेत्रफळ माद्रीद शहरापेक्षाही मोठं आहे.
फ्रान्समध्ये सर्वाधिक फटका बोर्दो शहराजवळील जिरोंडे (Gironde) या भागाला बसला आहे. याठिकाणी दोन लाखांहून अधिक लोकांना घरं सोडावी लागली आहेत.
फ्रान्सच्या प्रसिद्ध द्राक्षबागांच्या प्रदेशातील जंगलं आणि शेती वणव्यांनी वेगाने भस्मसात केली आहेत. अवघ्या चार दिवसांपेक्षा कमी कालावधीत सुमारे 420 चौरस किलोमीटर (162 चौरस मैल) पेक्षा अधिक परिसर जळून खाक झाला आहे. हे क्षेत्रफळ पॅरिसच्या सुमारे चारपट आहे.
या आगींमुळे परिसरातील अनेक संवेदनशील लष्करी आणि औद्योगिक प्रकल्पांनाही धोका निर्माण झाला आहे. यामध्ये फ्रान्सच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित सुविधा, रॉकेट मोटर्स तयार करणारे प्रकल्प आणि धोकादायक रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणांचा समावेश आहे.
वणव्यांची तीव्रता एवढी वाढली आहे की त्यामुळं वणव्यांचं स्वतःचं असं अग्निवादळ निर्माण झालं आहे.
ही एक दुर्मिळ हवामानविषयक घटना आहे. वणव्यांमधून निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे आगीवरील हवा अतिशय वेगाने वरच्या दिशेने झेपावते आणि तिच्यासोबत धूर, राख तसेच पाण्याची वाफ वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये पोहोचते.
ही हवा वर गेल्यानंतर थंड होते आणि त्यातील पाण्याच्या वाफेमुळं ढग तयार होतात. आग अत्यंत तीव्र असेल आणि वातावरण अस्थिर असेल, तर हे ढग वाढत जाऊन क्युम्युलोनिंबस (Cumulonimbus) प्रकारच्या ढगांमध्ये रुपांतरित होतात. हेच ढग सामान्यतः मेघगर्जनेसह होणाऱ्या वादळांशी संबंधित असतात.
हे ढग मोठे झाले तर ते स्वतः विजा निर्माण करू शकतात. या विजांमुळे नवीन ठिकाणीही वणवे भडकू शकतात. काही वेळा या ढगांमधून गारपीट आणि पाऊसही पडू शकतो.
अशाप्रकारच्या तीव्र परिस्थितीमुळं वणव्यांवर नियंत्रण मिळवणं आणखी कठीण ठरत असल्याचं चित्र आहे.
या वणव्यांचा सामना करण्यासाठी फ्रान्समधील अग्निशमन दलाकडून अग्निरोधक रसायनं (फायर रिटार्डंट) भरलेली विमानं वापरली जात आहेत. तसंच कॅनडेअर (Canadair) सारखी विशेष विमानंही तैनात करण्यात आली आहेत. ही विमानं अवघ्या 12 सेकंदांत तलाव किंवा समुद्रातून 6,000 लिटर पाणी उचलू शकतात आणि ते थेट आगीवर टाकू शकतात.
वणव्यांचा धोका अधिक असलेल्या दिवसांमध्ये, आग लागल्याची माहिती मिळण्यापूर्वीच ही विमानं संभाव्य धोक्याच्या भागांवर गस्त घालत असतात. त्यामुळे आग दिसताच काही मिनिटांत ती घटनास्थळी पोहोचून पाणी किंवा अग्निरोधक रसायन टाकू शकतात. अनेकदा ही विमानं सतत फेऱ्या मारत असतात. तसंच आगीच्या कडेला अग्निरोधक रसायनाची फवारणी केली जाते आणि जमिनीवरील अग्निशमन पथक थेट आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतं.
जिरोंडे भागात वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 2500 अग्निशमन कर्मचारी, 1500 लष्करी जवान आणि 1200 पोलीस आणि जेंडार्म (फ्रेंच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी) तैनात करण्यात आले आहेत. पण तरी मनुष्यबळ अपुरं पडत असल्याचं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
फ्रेंच माध्यमांच्या वृत्तानुसार, लाकानो शहराजवळ बुलडोझर, इतर खोदकामाची यंत्रे याच्या साहाय्याने काही ठिकाणी 100 मीटर (328 फूट) रुंदीचा 'फायरब्रेक' तयार करण्यात आला आहे.
फायरब्रेक म्हणजे आग पसरण्यापासून रोखण्यासाठी तयार केलेला असा पट्टा, जिथे सर्व झाडं, झुडपं आणि वनस्पती पूर्णपणे हटवली जातात. त्यामुळं आगीला पुढं जाऊन जळण्यासाठी इंधनच मिळत नाही आणि तिचा वेग कमी होतो किंवा ती थांबते.
स्पेनमध्येही वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या दोन दशकांतील देशातील सर्वात भीषण वणवे ठरण्याची चिन्हे या आगींमध्ये दिसत आहेत.
माद्रीदमधील केंद्र सरकारचे प्रतिनिधी फ्रान्सिस्को मार्टिन यांनी यापैकी एका वणव्याचं वर्णन करताना,"हा माद्रीदच्या परिसरातील इतिहासातील सर्वात मोठा वणवा असल्याबद्दल कोणतीही शंका नाही," असं म्हटलं.
यंदाच्या उन्हाळ्यातील वणवे हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या अधिक उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे अधिक वेगाने पसरत आहेत आणि अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहेत.
स्पेन आणि फ्रान्समधील अनेक स्थानिकांना भीती आहे की, पुढील आठवड्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. कारण हवामान खात्याने उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे कोरडे, स्थिर आणि अधिक उष्ण हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामुळे वणव्यांचा धोका आणखी वाढू शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)