'200 रुपये नाहीत, मुलीला ऑक्सिजन कुठे मिळणार?' त्र्यंबकेश्वर रुग्णालय स्थलांतराची गोष्ट

अफसाना शेख
फोटो कॅप्शन, अफसाना शेख
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"माझ्या मुलीचं अंग निळं पडलंय म्हणून तिला घेऊन इथं आले. वाटलं होतं ऑक्सिजन दिला तर बरं होईल पण आता हा दवाखानाच बंद आहे म्हणतायत. आता बसची वाट बघून तिकडं जावं लागेल, फाट्यावर उतरून मुलीला घेऊन चालावं लागेल. बहुतेक तिथं मिळेल ऑक्सिजन..." अफसाना शेख सांगत होत्या.

त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणारी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत हलवण्यात आली आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून प्रस्तावित दर्शन पथासाठी उपजिल्हा रुग्णालयाची सुस्थितीतली इमारत पाडण्यात येणार आहे.

आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे मोठा गोंधळ उडाला होता. मंदिरात येणाऱ्या भाविकांना फुलं, फळं, फुगे आणि इतर वस्तू विकून गुजराण करणाऱ्या महिलांनी तिथं एकच गर्दी केली होती.

जमलेल्या लोकांना रुग्णालयातले डॉक्टर, नर्स, सामान शिफ्टिंगचं कंत्राट असलेले कंत्राटदार समजावत होते.

हळूहळू गर्दी वाढत होती आणि वाढणारी गर्दी बघून पोलिसही तिथे आले होते. रुग्णालय स्थलांतरित करायला विरोध करणाऱ्यांमध्ये गिरजबाई होत्या.

त्या म्हणाल्या, "दवाखाना तोडूनच नाही द्यायचा, बुलडोझर आलं तर बुलडोझर खालीच झोपून घ्यायचं. दवाखाना हलवायला आमची परवानगी घेतली का? आम्ही गोरगरीब लोक इथं हक्कानं येतो, उपचार घेतो आणि आज हे म्हणतायत इथून दुसरीकडं जा? तिथे जायचा खर्च कोण देईल? दोनशे रुपये घेतात रिक्षावाले."

आंदोलकांच्या रिक्षाभाड्याच्या तक्रारी ऐकून कोणीतरी म्हणालं, "दवाखाना लांब गेला, थोडा त्रास होणारच आहे. आणि रिक्षावाले पण तुमचेच आहेत, कमावू द्या त्यांना दोन पैसे."

त्र्यंबकेश्वरच्या मुख्य वस्तीत असणारं हे रुग्णालय आता नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच्या अंजनेरी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आलं आहे. जुन्या जागेपासून हे ठिकाण साडेचार किलोमीटर अंतरावर आहे.

या स्थलांतराबाबत त्र्यंबकेश्वर उपरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार यांनी सांगितलं की, ही व्यवस्था कायमस्वरूपी नसून पुढील तीन वर्षांसाठी भाडेतत्वावर करण्यात आली आहे.

"नवीन इमारत तीन वर्षांसाठी भाड्याने घेण्यात आली आहे. जुन्या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा तिथेही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन ठिकाणी पोहोचायला थोडी अडचण आहे, हे खरं आहे. पण रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे," असं डॉ. पवार म्हणाले.

'दर्शन नाही पेशंट महत्त्वाचा'

त्र्यंबकेश्वर हा नाशिकचा आदिवासीबहुल तालुका आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 15 हजार असली तरी संपूर्ण तालुक्यात दीड लाख लोक राहतात. या रुग्णालयाचा उपयोग दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी रुग्णांना होत असल्याचं इथे जमलेल्या स्थानिकांनी सांगितलं.

एक कागद घेऊन डॉक्टरांची सही घ्यायला आलेल्या मीराबाई वाडगे म्हणाल्या, "मी मेठघर किल्ल्यावरून इथे आले. आम्हाला सातशे पायऱ्या उतरून यावं लागतं. दवाखान्यात एक सही घेऊन मला नाशिकला जायचं होतं पण इथे आल्यावर कळलं दवाखानाच नाही. हा दवाखाना खूप महत्त्वाचा आहे. माझ्या वाडवडिलांपासून आम्ही इथे उपचार घेतो. 1988 साली माझी प्रसूती याच दवाखान्यात झाली आहे."

मीराबाई वाडगे
फोटो कॅप्शन, मीराबाई वाडगे

फुलं विकणाऱ्या गिरिजाबाई झोले म्हणाल्या, "याआधी चार-पाच कुंभमेळे झाले. तरी पण हा दवाखाना इथून हलला नाही. मग आता का बरं मोडू राहिले? आमचे लहान पोरं डिलिव्हरीच्या बाया आम्ही इथे आणतो. एखाद्या म्हाताऱ्या माणसाची तब्येत बिघडली तर खाजगी दवाखाने उघडे राहत नाहीत. मग आम्हाला इथं जवळ पडतं म्हणून येतो. आम्ही हा दवाखाना मोडू देणार नाही. बुलडोझर आला तर त्याच्याखाली झोपून घेऊ."

'चार किलोमीटरचं अंतर म्हणजे दोनशे रुपयांचा खर्च'

त्र्यंबकेश्वर हे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे इथं दुसऱ्या शहरांपेक्षा रिक्षाचा प्रवास थोडा महाग आहे. आम्ही चौकशी केली तेव्हा जुन्या दवाखान्यापासून नवीन ठिकाणी जायला दोनशे रुपये लागतील असं एका रिक्षावाल्याने सांगितलं.

लक्ष्मीबाई झोले म्हणाल्या, "आजच मी माझ्या सुनेला आणि माझ्या नातीला दवाखान्यात घेऊन गेले होते. तिला रात्री ताप येत होता म्हणून आम्ही तिला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो. रिक्षावाल्याने आमच्याकडून दोनशे रुपये घेतले. आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. खाजगी दवाखान्यात हजार-दोन हजार रुपये सहज लागतात. नवीन दवाखाना खूप लांब पडतो आम्हाला."

गिरिजाबाई झोले
फोटो कॅप्शन, गिरिजाबाई झोले

मुलीला ऑक्सिजन मिळावा म्हणून जुन्या इमारतीत आलेल्या अफसाना शेख यांच्याकडे दोनशे रुपयेही नव्हते.

त्या म्हणाल्या, "दोनशे? साहेब शंभर रुपये आहेत जवळ. इथं फुकट उपचार होतो म्हणून आले. आता बसने जाते, अर्धं तिकीट लागेल. तुपादेवी फाट्यावर उतरून दोघी चालत जातो."

रुग्णालय शहराबाहेर गेल्यामुळे सर्वाधिक फटका दुर्गम आणि आदिवासी भागातील रुग्णांना बसेल, अशी भीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले, "हे रुग्णालय शहरापासून सुमारे पाच किलोमीटर दूर आणि मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर आत नेलं जात आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरासह आसपासच्या आदिवासी भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जाण्यापासून वंचित राहू शकतात. अशा परिस्थितीत काही लोक उपचाराऐवजी बुवाबाजीकडे वळतील, अशी आम्हाला भीती आहे."

'दर्शनपथासाठी रुग्णालयाची जागाच का?'

उपजिल्हा रुग्णालय हलवू नये, या मागणीसाठी तिथं आलेले स्वप्नील पाटील म्हणाले. "मी त्र्यंबकेश्वरचा रहिवासी आहे. हे रुग्णालय दर्शनपथासाठी हलवणार आहेत असं म्हणतायत. पण मुळात आमच्या मंदिराची रचना लक्षात घेता इथं दिवसभरात फक्त 20 हजार भाविकांनाच दर्शन दिलं जाऊ शकतं. तासाचं उदाहरण घेतलं तर 1200-1500 जणांनाच दर्शन दिलं जाऊ शकतं. मग एवढ्या लोकांसाठी एवढा मोठा दर्शन पथ गरजेचं आहे का?"

"हे स्थलांतर होणार आहे, याची नोटीस गावकऱ्यांना दिली नाही. अचानक 15 ऑगस्टला बॅनर लावून सांगण्यात आलं की, इथलं उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित झालं आहे. तेव्हापासून लोक इथे येतायत आणि इथून मग त्यांना चार किलोमीटर रिक्षा करून जावं लागत आहे. हा दवाखाना अत्यंत सोयीस्कर आहे. इथून जवळच एसटी स्टॅन्ड आहे. तिथून उतरुन रुग्ण चालत इथे येऊ शकतात. नवीन रुग्णालय गावाच्या बाहेर एका शेतात आहे."

स्वप्नील पाटील सांगतात, नवीन रुग्णालय ज्या इमारतीत आहे त्याच्या आजूबाजूला किमान एक किलोमीटरपर्यंत कुठलंही हॉटेल, चहाचं दुकान किंवा काहीही नाही.

त्र्यंबकेश्वरसाठी 1200 कोटींचा आराखडा

कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर. काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वरला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुमारे 1,200 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यात दर्शन पथ, नवीन रस्ते, घाटांचे नूतनीकरण, स्वागत कमानी, सुशोभीकरण आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे.

प्रशासनाच्या आराखड्यानुसार, मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा, व्यापारी संकुल आणि इतर सुविधा उभारण्यासाठी दर्शन पथ विकसित केला जाणार आहे.

उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत
फोटो कॅप्शन, उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत

उपजिल्हा रुग्णालयाची विद्यमान इमारत या प्रस्तावित मार्गात येत असल्याने ती जागा प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बांधलेली ही रुग्णालयाची इमारत पाडली जाणार असून रुग्णालयाचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

आम्ही या प्रश्नावर त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्याशी बोललो.

त्या आंदोलकांसोबत बोलायला तिथे आल्या होत्या. "मी प्रशासनाकडे नगराध्यक्ष या नात्याने पाठपुरावा करतेच आहे. आता पालकमंत्री साहेबांसोबत मीटिंग आहे, कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग आहे तर मागच्या काही महिन्यांपासून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणीच असावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, आम्ही प्रयत्न करणार आहोत," असं तुंगार यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.