दिल्लीत आजही आंदोलनाची हाक; सीजेपीनं जंतर मंतरकडे जाण्यासाठी दिली 'ही' वेळ

फोटो स्रोत, ANI
- अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच पोलिसांनी ताब्यात घेतलं
- आंदोलनापूर्वी प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
- जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
- राजधानीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे 25 ते 30 हजार जवान तैनात
- सीजेपीच्या आंदोलनापूर्वी शेकडो जणांना ताब्यात घेतल्याची माहिती
- मेट्रो स्थानकं बंद ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल
- नेहा बोरा, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि दीपंकर भट्टाचार्य यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, नेहा बोरा यांची पोलिसांनी दिवसभरानंतर संध्याकाळी सुटका केली आहे.

फोटो स्रोत, Abhishek Chinnappa/Getty Images
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज (10 ऑक्टोबर) सीजेपीकडून दिल्लीत आंदोलन झालं. मात्र, दिल्ली पोलिसांनी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके, सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेतलं.
याशिवाय दिल्लीसह देशभरात विविध ठिकठिकाणी सीजेपी समर्थकांना देखील मोठ्या संख्येने ताब्यात घेण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सीजेपी नेते अजिंक्य शिंदे यांनी सांगितले, रविवारी जंतर-मंतरवर कधी जाणार?
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अजिंक्य शिंदे यांनी 'एक्स'वर एक व्हीडिओ पोस्ट करून रविवारी (11 ऑक्टोबर) होणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती दिली.
या व्हीडिओत ते म्हणाले, "आज आम्ही जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांनी मतदानाचा अधिकार हिरावून घेतलेल्या 12 कोटी मतदारांच्या हक्कांची मागणी करण्यासाठी गेलो होतो. तरीही मोदींच्या हुकूमशाही सरकारने अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह सर्व विद्यार्थी नेते आणि आंदोलकांना ताब्यात घेतले."

फोटो स्रोत, AjinkyaCJP
ते पुढे म्हणाले, "त्यांना असे वाटले असेल की, आज ताब्यात घेतल्यानंतर सर्वजण घाबरून घरी निघून गेले. मात्र, मोदी-शाह यांना वाटणारी ही भीती दाखवते की, आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे आणि ही एका नव्या लढाईची सुरुवात आहे."
"मागच्या वेळी ज्याप्रमाणे त्यांनी सरकारचा अहंकार चिरडून टाकला होता, त्याचप्रमाणे यावेळीही सरकारचा अहंकार चिरडून टाकतील."
"जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परतणार नाही," असे ते म्हणाले.
रविवारी सकाळी 10 वाजता पुन्हा जंतर-मंतरच्या दिशेने कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मोठ्या संख्येने जंतर-मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
'ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत दररोज जंतरमंतरकडे मोर्चा काढणार'
याआधी CJP आणि SFI सह प्रमुख विद्यार्थी संघटनांनी संयुक्तपणे दिल्लीतील एच.के.एस. सुरजित भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांवर दिवसभर निष्पाप आंदोलकांची अमानुष छळवणूक केल्याचा आणि त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला.
CJP चे नेते अजिंक्य शिंदे म्हणाले, "जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत आतापासून दररोज जंतरमंतरकडे मोर्चे काढले जातील."
दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके आणि इतरांना अमानुष वागणूक दिल्याचाही आरोप केला.
SFI चे सरचिटणीस सृजन भट्टाचार्य यांनी 'हुकूमशाही राजवटीविरुद्ध' शक्य तितकी व्यापक एकता दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, उद्यापासून (11 ऑक्टोबर) विद्यार्थ्यांची ही आंदोलने देशाच्या कानाकोपऱ्यात पसरतील. विद्यार्थी सर्वत्र शांततापूर्ण निदर्शने करतील आणि जिथे त्यांना पोलिसांच्या बॅरिकेड्समुळे अडवले जाईल, तो परिसरच 'जंतरमंतर' बनेल.
या पत्रकार परिषदेत इतर विद्यार्थी आणि युवा नेत्यांनीही सहभाग घेतला. अभिनेता सुधन्वा देशपांडे, इतिहासकार सोहेल हाश्मी आणि प्राध्यापिका नंदिता नारायण हेही या आंदोलनाच्या समर्थनासाठी उपस्थित होते.
पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सुटका केली आहे.
पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सध्या आम्ही काहीही बोलणार नाही, कारण उद्या इंडिया आघाडीने एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मी नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. या बाबतीत मी खूप शिस्तप्रिय आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. चौकशी करायची असेल, तर पुरावे आवश्यक आहेत. आम्ही त्यांना सांगितले की, 'ठीक आहे, आम्ही पुरावे देऊ.'"

फोटो स्रोत, ANI
शनिवारी पोलिसांनी ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पक्षातील पाच नेत्यांना साऊथ अव्हेन्यू येथील बसस्थानकावरून ताब्यात घेतलं होतं.
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांना जंतर-मंतर येथे जायचे होते; मात्र पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. त्यानंतर त्या आपल्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अभिजीत दिपकेंबाबत दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची माहिती देण्यात आली नाही, असे दावे सोशल मीडियावर केले जात होते. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर पसरत असलेले हे दावे फेटाळून लावले आहेत.
दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, "अभिजीत दिपके यांच्या आजीच्या निधनाची माहिती त्यांना तातडीने आणि पूर्ण संवेदनशीलतेने देण्यात आली होती."
अंत्यविधीची नियोजित वेळही त्यांना कळवण्यात आली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांच्या निवेदनानुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अभिजीत दिपके यांना त्यांच्या गावी जाण्यास मदत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दीपके यांचे शनिवारी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी, संतुक पिंपरी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शनिवारी संध्याकाळी सीजेपीने पत्रकार परिषद घेत सांगितलं की, "अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना ही दुःखद बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवू दिली जात नाही."
सीजेपीने अभिजीत दीपके यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे.
'आयसा'च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांची सुटका
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांची पोलिसांनी सुटका केली आहे. बीबीसीचे वार्ताहर दिलनवाज पाशा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नेहा बोरा यांच्यासोबत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि दीपांकर भट्टाचार्य यांना सफदरजंग उड्डाणपुलावरून ताब्यात घेण्यात आले होते.

सीपीआय (एमएल) ने दावा केला होता की, आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांना ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीतील मैदान गढी येथील नजरकैद केंद्रात नेण्यात आले होते.
ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरा यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं, "मी ताब्यात आहे. आंदोलन नाही. लोक सध्या सफदरजंग उड्डाणपुलावर जमू लागले आहेत. तुम्हाला शक्य असल्यास, तिथे पोहोचा. तुम्हाला रोखण्यात आल्यास, तिथेच बसा आणि ठामपणे डटून राहा. आम्हाला ताब्यात घेतले आहे, पण त्यामुळे काहीही फरक पडत नाही."
नेहा बोरा यांच्यासोबत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि दीपांकर भट्टाचार्य यांनाही सफदरजंग उड्डाणपुलावरून ताब्यात घेण्यात आले होते.
'देशात आता लोकशाही उरलेली नाही' - प्रियांका गांधी
दिल्लीतील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेत्यांसह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले, "सर्वप्रथम 254 खासदारांना त्यांच्या मूलभूत घटनात्मक हक्कांचे उल्लंघन करून त्यांना बेकायदेशीर पद्धतीने धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आले. यामुळे त्यांच्या मूलभूत घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले. विरोधी पक्षांच्या इतर आंदोलकांसोबतही असेच वर्तन करण्यात आले."
"त्यानंतर देशाची राजधानी चारही बाजूंनी घेरून आणि बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली. रेल्वे आणि मेट्रो सेवा थांबवण्यात आल्या, इंटरनेट बंद करण्यात आले आणि ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले. आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून आंदोलन करणाऱ्या तरुणांना, महिला आणि पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आले."

फोटो स्रोत, ANI/Ritesh Shukla/Getty Images
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, "निवडणूक आयोगाच्या संगनमताने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आणि आपली वैधता धोक्यात आल्याने सरकार घाबरले असून, त्यांना जाब विचारला जात असल्याची भीती सरकारला वाटते, याचा हा पुरावा नसेल, तर मग आणखी काय आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
"भारतात आता लोकशाही उरलेली नाही", असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.
"ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून चालवली जाणारी हुकूमशाही आहे. लोकशाही कमकुवत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करणारे लोक राष्ट्राशी विश्वासघात करत आहेत", अशी टीका त्यांनी केली.
'आप'साठी सीजेपीचं 'शॅडो बॉक्सिंग', भाजपचा आरोप
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजपने कॉक्रोच जनता पार्टी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आहे.
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सीजेपी आम आदमी पार्टीसाठी 'शॅडो बॉक्सिंग' करत असल्याचा आरोप केला.
रविशंकर प्रसाद म्हणाले, "आमचा आंदोलनाला विरोध नाही. मात्र, पराभवामुळे त्यांनी रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनांना एक हत्यार बनवले आहे. यामध्येही कमालीची स्पर्धा सुरू आहे."

फोटो स्रोत, Bharatiya Janata Party
ते पुढे म्हणाले, "सुरुवातीचे तीन दिवस राहुल गांधी होते. त्यानंतर ते निघून गेले. मग आम आदमी पार्टीसाठी 'शॅडो बॉक्सिंग' करणारी सीजेपी आली.
सीजेपी ही आम आदमी पार्टीसाठी शॅडो बॉक्सिंग करते. सकाळपासून त्यांचे (सीजेपीचे) नाटक सुरू होते. नंतर अरविंद केजरीवाल आणि इतर लोकही आले. त्यानंतर ममताजींना वाटलं की, आपण तरी मागे का राहायचे? म्हणून त्याही आल्या. त्यानंतर सीपीआय आणि सीपीएमचे नेतेही आले."
सीजेपी विरोधकांकडून आंदोलकांना मारहाणीचा आरोप
दिल्लीतील कनॉट प्लेस येथे आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) समर्थक आणि सीजेपीविरोधी आंदोलक यांच्यात झटापट झाल्याची घटना समोर आली आहे.
बीबीसी प्रतिनिधी विष्णुकांत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीचे समर्थक आणि सीजेपीविरोधक आमनेसामने आले. यावेळी सीजेपीविरोधकांनी आंदोलन करणाऱ्या सीजेपी समर्थकांना धक्काबुक्की केली, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि आक्रमक भाषेचा वापर केला.
या वेळी पोलिसांनी सीजेपीविरोधकांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, असा आरोप आहे.
बीबीसीने याबाबत पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

फोटो स्रोत, Arun SANKAR / AFP via Getty Images
बीबीसीशी बोलताना एका सीजेपी आंदोलकाने सांगितलं, "ते लोक आमच्याविरोधात अपमानास्पद भाषेचा वापर करत आहेत. हिंसक घोषणा देत आहेत. आम्हाला मारहाण करत आहेत, पण पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत."
"हा कसला दुजाभाव आहे? पोलीस आम्हाला रोखत आहेत, पुढे जाऊ देत नाहीत; मात्र, त्या लोकांना पूर्ण मोकळीक दिली जात आहे", असा आरोप या आंदोलकाने केला.
दुसरीकडे मुंबई-पुण्यातही सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलक एकवटले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, Prabhat Kumar
राहुल गांधींनी दिल्लीतील आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हीडिओ संदेश जारी करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
ते म्हणाले, "मी नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरोधात दशकाहून अधिक काळ लढत आहे. एखादी व्यक्ती आपल्या प्रतिस्पर्ध्याला जितक्या चांगल्या प्रकारे ओळखू शकते, तितक्याच चांगल्या प्रकारे मी माझ्या विरोधकांना ओळखतो. मी त्यांना आतून-बाहेरून ओळखतो, मला त्यांच्या प्रत्येक हालचालीची जाणीव आहे. या लोकांची सर्वांत मोठी ओळख म्हणजे त्यांचा भित्रेपणा."
"नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोभाल हे या कथेतले खलनायक आता हळूहळू घेरले जात आहेत. त्यांच्या सभोवतालचा फास आवळला जात आहे," असेही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Screen Grab
पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना ताब्यात घेत केलेल्या कारवाईवर राहुल गांधी म्हणाले, "तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. जितके पोलीस बोलवायचे आहेत, तितके बोलवा. 10 हजार, 20 हजार किंवा 50 हजार. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना अटक करा. आम्हा सर्वांना अटक करा. घाबरू नका, आम्ही तुम्हाला चारही बाजूंनी घेरलं आहे आणि आम्ही मागे हटणार नाही."
ते पुढे म्हणाले, "माझे शब्द लक्षात ठेवा. आम्हाला जी माहिती हवी आहे, ती आमच्याकडे आधीपासूनच आहे. आम्ही आपल्या संविधानाचे रक्षण करू. भारतातील जनतेच्या आवाजाचे रक्षण करू. तसेच, गेल्या 10 ते 15 वर्षांत भारतासोबत जे घडले, त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, याची आम्ही खात्री करू."
राहुल गांधी तरुणांना उद्देशून म्हणाले, "भारताच्या तरुणांनो, मला तुमचा अभिमान आहे. तुमचे आंदोलन सुरू ठेवा. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. या सरकारला आणि आपल्या संविधानावर हल्ला करणाऱ्यांना पराभूत केले जाईल, याची आम्ही खात्री करू."
अभिजीत दिपकेंच्या गैरहजेरीत अजिंक्य शिंदेंकडे नेतृत्व
दरम्यान, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिघे पोलिसांच्या ताब्यात असेपर्यंत जंतर-मंतरवरील या आंदोलनाचे नेतृत्व सीजेपीचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत. अभिजीत दिपके यांनी संभाव्य अटकेची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारी रात्रीच हा व्हीडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता, अशी माहिती सीजेपीकडून देण्यात आली आहे.
पक्षानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, दिल्ली पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या कारवाईचा उद्देश आजच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या नेतृत्वाला आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ करणे हा आहे, असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Ajinkya Shinde/Instagram
सीजेपीने याला नागरिकांच्या मुक्त संचाराच्या अधिकाराचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले असून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.
ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके म्हणाले की, त्यांना अटकेची भीती वाटत नाही आणि ते त्यासाठी तयार आहेत.
मुंबई-पुण्यात सीजेपी आंदोलकांची धरपकड
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही सीजेपी समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात सीजेपी समर्थक जमले होते.
दरम्यान, पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदानाबाहेरून आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam
या आंदोलनात सहभागी अभिनेता इम्रान खान, वरुण सरदेसाई यांनाही ताब्यात घेतलं आहे.
आतापर्यंत जवळपास 400 जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
अभिनेता इम्रान खान काय म्हणाला?
ताब्यात घेतले जाण्यापूर्वी अभिनेता इम्रान खान पत्रकारांशी बोलताना म्हणाला, "माझी कोणतीही मागणी नाही. मी येथे एक नागरिक म्हणून आलो आहे, या शहरात राहणारी एक व्यक्ती म्हणून आलो आहे. लोकांच्या मुक्त संचाराच्या अधिकारावर निर्बंध का घातले जात आहेत आणि लोकांचा आवाज का दाबला जात आहे, हे पाहण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यामुळेच मी येथे आहे."
'मी कोणाकडेही कोणतीही मागणी करण्याच्या स्थितीत नाही आणि मी कोणत्याही संघटनेचाही भाग नाही', असंही त्याने यावेळी नमूद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तुषार गांधी यांच्या सुटकेसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब डी.एन. नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
तुषार गांधी यांच्या सुटकेची मागणी करत शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.
'त्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही', अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. मुंबईतील सर्व शिवसैनिक पोलीस ठाण्याबाहेर जमतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबईप्रमाणे पुण्यातही आंदलनाची हाक देण्यात आली होती, येथेही सीजेपी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे.
पुण्यात लाल महाल ते कलेक्टर ॲाफिस असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यात सहभागी झालेल्यांना ताब्यात घेऊन लष्कर पोलीस ठाण्याला नेण्यात आलं आहे.

सोनम वांगचूक यांनी सरकारला काय इशारा दिलाय?
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला. त्यात त्यांनी सरकारने ताब्यात घेतलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.
या व्हीडिओमध्ये ते म्हणाले, "काही वेळापूर्वी परत आल्यानंतर मला समजलं की, आज दिल्लीत अनेकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी नेते, युवा नेते, वकील, पत्रकार आणि अगदी खासदारांचाही समावेश आहे."
"कालपर्यंत त्यांना वाटत होते की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत शांततेत आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, आता देशभरात जणू अघोषित आणीबाणी लागू झाली आहे, असं चित्र आहे."

फोटो स्रोत, ANI
पुढे सरकारला उद्देशून ते म्हणाले, "पुढील 24 तासांतही अटक केलेल्या लोकांची सुटका झाली नाही, तर मलाही शांततापूर्ण आंदोलन करण्याचा विचार करावा लागेल."
आपण धरणे आंदोलन, उपोषण किंवा पदयात्रा यांपैकी कोणताही मार्ग निवडू शकतो. तसेच हे आंदोलन दिल्ली किंवा लेहमध्ये कुठेही होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वकिलांना त्यांच्या चेंबरमधून ताब्यात घेतलं, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून टीका
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप राय यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवर टीका केली आहे.
त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं, "सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना त्यांच्या चेंबरमधून ताब्यात घेणे ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी बाब आहे. आम्ही हा मुद्दा तातडीने भारताच्या सरन्यायाधीशांसमोर मांडत आहोत."

फोटो स्रोत, ANI
वकिलांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेणे आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदीप राय यांनी ताब्यात घेतलेल्या सर्व वकिलांची तातडीने सुटका करण्याची मागणी केली.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाजवळून अनेक वकिलांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या वकिलांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (एओआर) सुमिता हजारिका यांचाही समावेश आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत सीजेपीने नव्या व्हीडिओत काय म्हटलं?
कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आपल्या समर्थकांना जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन करत एक व्हिडिओ जारी केला आहे.
या व्हीडिओमध्ये सीजेपीचे नवनियुक्त नेते अजिंक्य शिंदे म्हणाले, "जर दिल्ली पोलिसांनी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर जिथे तुम्हाला रोखले जाईल, तीच जागा तुमच्यासाठी जंतर-मंतर बनेल."
सामाजिक कार्यकर्त्या नेहा बोरा यांनी केलेल्या आवाहनानंतर सीजेपीने हे आवाहन केले आहे. नेहा बोरा यांनी लोकांना जिथे रोखले जाईल, तिथेच विरोध प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते.
त्यामुळे जंतर-मंतरवर एकाच ठिकाणी मोठे आंदोलन होण्याऐवजी दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत निदर्शने होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, ANI
पोलिसांच्या कारवाईदरम्यान सीजेपीने एक प्रसिद्धिपत्रक जारी करून सांगितलं की, पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे जंतर-मंतरवर नियोजित आंदोलनाचे नेतृत्व करतील.
दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सौरव दास आणि आशुतोष रांका यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) विमानातून उतरताच ताब्यात घेतले. त्यानंतर सीजेपीने आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते साकेत गोखले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
त्यांनी लिहिले, "ममता दीदी यांच्यासह आम्हा पाच जणांना दिल्ली पोलिसांनी आणि सीआरपीएफने दीदी यांच्या निवासस्थानाबाहेरून ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले आहे. आम्हाला कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी नेले जात आहे. ही भारतातील लोकशाहीची हत्या आहे."

फोटो स्रोत, SaketGokhale
दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी साऊथ अॅव्हेन्यू येथील एका बसस्थानकावर धरणे आंदोलन केले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, ArvindKejriwal
अरविंद केजरीवाल हे पक्षाच्या अन्य नेत्यांसह जंतर-मंतरच्या दिशेने मोर्चा काढत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.
याबाबतचा एक व्हीडिओही समोर आला असून यामध्ये पोलीस केजरीवाल यांना घेऊन जाताना दिसत आहेत.
आम आदमी पार्टीचे नेते सौरभ भारद्वाज यांनी हा व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, "निर्लज्ज दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकांसोबत धक्काबुक्की केली."
या व्हिडिओमध्ये केजरीवाल यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार संजय सिंह हे देखील दिसत आहेत.
गुरुद्वारा बंगला साहिबजवळ आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप
शनिवारी (10 ऑक्टोबर) गुरुद्वारा बंगला साहिबपासून जंतर-मंतरपर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अनेकांना बसमध्ये बसवून ताब्यात घेतलं, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपासून दिल्लीला येणारे अनेक जण गुरुद्वारा बंगला साहिबमध्ये थांबले होते. तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा दावा आहे की, शनिवारी सकाळपर्यंत गुरुद्वारामध्ये सुमारे 600 आंदोलक उपस्थित होते. त्यापैकी जवळपास 300 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
हैदराबादहून आलेले सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय जिंगाडे यांनी आरोप केला की, सकाळपासून आंदोलक जंतर-मंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मोठ्या संख्येने तैनात असलेले पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नव्हते.
आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांच्याशी कठोर वर्तन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, आंध्र प्रदेशातील वारंगल येथून आलेले सीजेपीचे सदस्य चेतन प्रमोद यांनी आरोप केला की, पोलीस गुरुद्वाराच्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून आत येऊन आंदोलकांना जबरदस्तीने बाहेर घेऊन जात होते. शांततेत बसलेल्या लोकांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
गुरुद्वारा बंगला साहिबच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे (आरएएफ) कर्मचारी तैनात करण्यात आले होते. परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच, दंगल नियंत्रणासाठी वापरली जाणारी वाहनेही तैनात होती.
यादरम्यान, काही ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये झटापटी झाल्या. मात्र, जंतर-मंतरवर पोहोचून आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम असल्याचे आंदोलकांनी सांगितलं.
अजय जिंगाडे म्हणाले, "इतक्या मोठ्या संख्येने पोलीस दल पाहून भीती नक्कीच वाटते. मात्र, आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू आणि जंतर-मंतरवर पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू."
दिपके यांचे आई-वडील काय म्हणाले?
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके म्हणाले, "मला इंदिरा गांधींबद्दल फारशी माहिती नाही. मात्र एवढं माहिती आहे की त्यांच्या कार्यकाळात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि त्यानंतरही त्या पुन्हा सत्तेत परतल्या होत्या."
अभिजीत दिपके यांनी ताब्यात घेतले जात असताना, "असं तर इंदिरा गांधींच्या काळातही होत नव्हतं," असं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या आई अनीता दिपके म्हणाल्या, "अभिजीत देशासाठी चांगलं काम करत आहे आणि सरकार चुकीचं वागत आहे."
आंदोलनादरम्यान वकीलही ताब्यात
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सर्वोच्च न्यायालय परिसरातून अनेक वकिलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेल्या वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (एओआर) सुमिता हजारिका यांचाही समावेश आहे.
बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, वकिलांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या संदेशांच्या आधारे ही माहिती दिली आहे. यात सर्वोच्च न्यायालय परिसर आणि वकिलांच्या चेंबर्सजवळून किमान चार वकिलांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्डचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांना एका पोलीस वाहनातून नेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या एका वकिलाने आरोप केला की, त्यांना कुठे नेले जात आहे याची कोणतीही माहिती पोलिसांनी दिली नाही.
दरम्यान, वकिलांकडून शेअर करण्यात आलेल्या एका छायाचित्रात तीन महिला पोलीस वाहनात बसलेल्यांचे दिसत असून त्यांच्यासोबत गणवेशधारी पोलीस कर्मचारीही उपस्थित आहेत.
वकिलांमध्ये प्रसारित होत असलेल्या इतर काही संदेशांमध्ये सुमारे 100 वकिलांना ताब्यात घेऊन यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या वकिलांची नेमकी संख्या आणि पोलिसांच्या कारवाईमागील कारणांची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.
लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने सरन्यायाधीशांकडे (सीजेआय) हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांची सुटका करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.
नेहा बोरा यांचं आंदोलनकर्त्यांना आवाहन; 'आज दिल्ली हाटच जंतर-मंतर'
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा)च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्ली हाट येथे जमण्याचं आवाहन केलं आहे.
सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नेहा बोरा यांनी हे आवाहन केलं आहे.
नेहा बोरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिलं, "आज दिल्ली हाटच जंतर-मंतर बनलं आहे! तिथे भेटूया!"

आज सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान नेहा बोरा नेमक्या कुठे आहेत, याबाबत सातत्याने चर्चा आणि शोध सुरू होता.
त्यांच्या या एक्स पोस्टनंतर त्या दिल्ली हाट येथे आंदोलनात सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थी संघटना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.
पत्रकारांना घेतलं ताब्यात
या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांसह काही पत्रकारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ताब्यात घेतलेल्या पत्रकारांमध्ये न्यूजलॉन्ड्री, स्क्रोल डॉट इन आणि नवभारत टाइम्सशी संबंधित पत्रकारांचा समावेश आहे.
न्यूजलॉन्ड्रीने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे, "पत्रकारांनी आपण प्रसारमाध्यमांशी संबंधित असल्याचं सांगितल्यानंतर त्यांना 'इथे कोणीही मीडिया नाही' असं सांगण्यात आलं. पत्रकारांचे मोबाईल फोनही काढून घेण्यात आले. सुमारे 30 जणांना एकाच बसमध्ये बसवण्यात आलं असून त्यामध्ये आंदोलनकर्ते आणि पत्रकार दोघांचाही समावेश आहे."

फोटो स्रोत, Getty Images
न्यूजलॉन्ड्रीने पुढे म्हटलं, "पत्रकारांचं काम वृत्तांकन करणं आहे, आंदोलन करणं नाही. ते पोलिसांच्या कामात कोणतीही अडचण निर्माण करत नव्हते. मग त्यांना कोणत्या आधारावर ताब्यात घेतलं जात आहे आणि त्यांचे फोन जप्त केले जात आहेत? दिल्ली पोलिसांनी या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं आणि पत्रकारांना कोणतीही भीती न बाळगता आपलं काम करू द्यावं."
स्क्रोल डॉट इननेही सांगितलं की, त्यांच्या एका पत्रकाराला दिल्ली पोलिसांनी आयटीओ परिसरातून ताब्यात घेतलं आहे.
स्क्रोलच्या अधिकृत निवेदनानुसार, "ते जंतर-मंतरवरही नव्हते. त्यांचं प्रेस कार्ड स्पष्टपणे दिसत होतं. त्यांनी अनेकदा पोलिसांना आपण पत्रकार असल्याचं सांगितलं. तरीदेखील त्यांना जबरदस्तीने एका व्हॅनमध्ये बसवून तिथून नेण्यात आलं."
नवभारत टाइम्सचे संपादक आशिष पांडे यांनीही सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या संस्थेच्या दोन पत्रकारांना ताब्यात घेतलं होतं.
ते म्हणाले, "पोलीस त्यांना दर्यागंजकडे घेऊन जात होते. आमच्या टीमकडे प्रसारमाध्यमांचे ओळखपत्र होते आणि ती स्पष्टपणे दिसत होती."

फोटो स्रोत, Getty Images
अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन

फोटो स्रोत, UGC
सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे.
त्या हिंगोली जिल्ह्यातील सांतुक पिंपरी या गावात राहत होत्या. हे अभिजीत दिपके यांचे मूळ गाव आहे.
सावित्रीबाई दिपके यांनी सीजेपीच्या पहिल्या आंदोलनादरम्यान नातू अभिजीतच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता.
जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या, बॅरिकेड्स उभारू नका- शशी थरूर
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिल्लीतील आंदोलनावरून केंद्र सरकार आणि प्रशासनावर टीका केली असून, बॅरिकेड्स उभारून निवडणूक आयोगावरील लोकांचा विश्वास परत मिळणार नाही, असे म्हटले आहे.
शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांची तैनाती जणू काही युद्धजन्य परिस्थिती असल्याप्रमाणे करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "रात्री 2 नंतर मी दिल्लीत परतलो आणि आज राजधानीत जे दृश्य पाहायला मिळत आहे, तसं मी यापूर्वी क्वचितच पाहिलं आहे. काहीशे मीटर अंतरावर पोलीस तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. रस्त्यांवर काँक्रीटचे बॅरिकेड्स आणि टोकदार अडथळे लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात 22 हजार पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत, जणू काही युद्धजन्य परिस्थिती आहे."
ते पुढे म्हणाले, "250 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि मेट्रोची 45 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. दिल्ली आणि आसपासच्या भागांत युवकांना त्यांच्या घरांतून आणि रस्त्यांवरून ताब्यात घेतलं जात असल्याच्या बातम्या आहेत. हे सर्व केवळ नागरिकांनी निवडणुकांच्या निष्पक्षतेबद्दल शांततेत प्रश्न विचारू नयेत म्हणून केलं जात आहे. राष्ट्रीय राजधानीच्या मध्यभागी इंटरनेट सेवा बंद करणं हे सर्वांत मागास आणि दडपशाहीचं पाऊल आहे."

फोटो स्रोत, Getty Images
शशी थरूर लिहितात, "ये-जा करण्याचं स्वातंत्र्य जवळपास पूर्णपणे रोखण्यात आलं आहे. जंतर-मंतर हे विशेषतः नागरिकांना राजधानीच्या मध्यभागी मतभेद व्यक्त करता यावेत म्हणून निश्चित करण्यात आलं होतं. मात्र आज तिकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही प्रवेश दिला जात नाही. आपल्या राजधानीत महिलांच्या सुरक्षेची गरज भासते तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस आणि एवढी तत्परता कुठे गायब होते, हा प्रश्न विचारणं रास्त आहे."
ते म्हणाले, "बॅरिकेड्स उभारून निवडणूक आयोगावरील लोकांचा विश्वास परत मिळणार नाही. जनतेच्या प्रश्नांची उत्तरं जितक्या लवकर दिली जातील, तितक्या लवकर परिस्थिती शांत होईल. लोकशाहीची ताकद ही आपल्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांशी ती कशी वागते यावर मोजली जाते. त्या निकषावर आज जे काही घडलं आहे, ते अत्यंत लाजिरवाणं असून त्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही."
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर दिपके काय म्हणाले?
दिपके म्हणाले , "देश कोणत्या दिशेने जात आहे हे तुम्ही पाहू शकता. आम्हाला विमानातच ताब्यात घेतले जात आहे, इंदिरा गांधींनीसुद्धा असे कधी केले नव्हते. ही हुकूमशाही आहे, पण आम्ही त्यांना घाबरत नाही."
अभिजीत दिपके अटक करायला आलेल्या पोलिसांना म्हणाले, "आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही अटकेसाठी तयार आहोत."
तुषार गांधी मुंबई पोलिसांच्या ताब्यात
सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी आणि फिरोज मिठीबोरवाला यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर नियोजित आंदोलनाच्या आयोजकांनी दिली आहे. शनिवारी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
'अराजकता पसरवू देणार नाही'; भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पार्टीचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या हाकेला "देश अस्थिर करण्याचा प्रयत्न" असे संबोधले आहे.

फोटो स्रोत, Mayank Mongia/BBC
शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन नवीन म्हणाले, "आज देशात अत्यंत धोकादायक आणि गंभीर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुख-शांतीत राहून भारताच्या विकासाला हातभार लावणाऱ्या 140 कोटी जनतेला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे कोण करत आहे? हे दोन अराजकतावादी गट आहेत. यापैकी एका गटाचे नेतृत्व 'इंडी आघाडी'चे नेते राहुल गांधी करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व अरविंद केजरीवाल यांचे सहकारी असलेल्या सीजेपीकडे आहे."

फोटो स्रोत, BJP
नितीन नवीन म्हणाले, "मी या दोन्ही गटांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की भारतातील जनता तुमचे हेतू ओळखून आहे. देशात अधिक अस्थिरता कोण निर्माण करू शकतो, याची जी स्पर्धा तुम्ही सुरू केली आहे, ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही."
ते पुढे म्हणाले, "गेल्या 12 वर्षांत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढलं. दहशतवाद मुळापासून संपवण्याचा प्रयत्न केला. नक्षलवादमुक्त भारत घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अजूनही अर्बन नक्षल विचारसरणीचे काही लोक देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
नितीन नवीन म्हणाले, "राहुल गांधीजी, तुमचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि इंडी आघाडीचे नेते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, तसेच तथाकथित युवा नेतृत्व जे बोलत आहे, ते देशातील युवक पाहत आहेत."
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
राहुल गांधी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील आपल्या भाषणाचा व्हीडिओ एक्सवर शेअर करत लिहिलं, "ज्ञानेश कुमार जाणार. हे सरकार जाणार. त्यानंतर लोकशाहीची दुरुस्ती करण्याचं काम सुरू होईल."

फोटो स्रोत, Getty Images
अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, "हे आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. आता हे अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे की आपण मोदींच्या राजवटीत पूर्णपणे हुकूमशाहीच्या काळात जगत आहोत. विमानातून उतरताच लोकांना अटक करणं म्हणजे भीतीच्या अशा पातळीचं प्रदर्शन आहे, जी याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती."
ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांना चांगलंच माहीत आहे की ते निवडणुका केवळ मतांची चोरी करून जिंकतात आणि आता ते लोकशाही पूर्णपणे चिरडून हा फसवणुकीचा खेळ वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्ञानेश यांना जावंच लागेल आणि मोदींनाही जावंच लागेल."
शुक्रवारी इंडिया गेटवर रील, शनिवारी पोलिसांच्या ताब्यात; ध्रुव राठी चर्चेत
प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ध्रुव राठी यांच्या एका जवळच्या व्यक्तीने आणि गुरुग्राम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ध्रुव राठी यांना गुरुग्राममधील सेक्टर-56 परिसरातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती बीबीसीचे वार्ताहर दिलनवाज पाशा यांनी दिली आहे.
याआधी शुक्रवारी उशिरा सायंकाळी ध्रुव राठी यांनी सोशल मीडियावर एक रील पोस्ट केलं होतं. यामध्ये ते इंडिया गेटसमोर फिरताना दिसत होते.
दरम्यान, पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून अनेक जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
लाइव्ह लॉ या वृत्तसंकेतस्थळानुसार, शनिवारी सर्वोच्च न्यायालयात एक अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही दिल्ली मेट्रोची अनेक स्थानके बंद ठेवण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
ही अवमान याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव आयएएस गोविंद मोहन, दिल्ली पोलीस आयुक्त आयपीएस अनुराग कुमार आणि डीएमआरसीच्या अध्यक्षा आयएएस डी. थारा यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Sandeep Yadav
कोणतेही योग्य कारण नसताना रेल्वे सेवा रद्द केल्या जात आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले असून सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं यात म्हटलं आहे.
राजकारणापलीकडेही अनेक संकटं आहेत'- सोनम वांगचूक
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनातील प्रमुख चेहरा होते.
त्या आंदोलनादरम्यान त्यांनी 23 दिवस उपोषण केलं होतं.
यावेळीही ते जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

फोटो स्रोत, Prabhat Kumar
मात्र, त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, "तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं की आम्ही कुठे आहोत, शांत का आहोत, दिल्लीतील या लढ्यात सहभागी का नाही आहोत? देशावर घोंघावत असलेल्या राजकीय संकटांना तोंड देण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आला आहात. त्याचं मी कौतुक करतो. पण मी एवढंच सांगू इच्छितो की धोके केवळ राजकीयच नाहीत, तर नैसर्गिकही आहेत. फैज साहेबांच्या शैलीत सांगायचं झालं तर ...'और भी ग़म हैं ज़माने में सियासत के सिवा, राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा.'"

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "आपल्याला हवी असलेली सुटका केवळ भेटीगाठींमधून मिळणारी नाही, तर नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचीही गरज आहे. त्यामुळे 'तो मुझसे पहली सी मोहब्बत मेरी महबूब न मांग.'"
ते म्हणाले, "पूर्वीप्रमाणे यावेळी कदाचित मी येऊ शकणार नाही. कारण चूल पेटवायची असेल तेव्हा काडीपेटीतील काडीची गरज असते. पण एकदा चूल पेटली की मग स्वयंपाक सुरू होतो आणि सगळं सुरळीत चालू लागतं. त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही सर्वजण राजकीय समस्यांशी दोन हात कराल आणि आम्ही इथे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यांशी लढू."
सोनम वांगचूक म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही महिन्यांत नेपाळमध्ये किती मोठी आपत्ती आली. भोटेकोशी परिसरातील एका हिमनदीचा तलाव फुटल्याने मोठं नुकसान झालं आणि हजारो लोकांचे जीव गेले. त्याआधी सिक्कीममधील लोनाक तलाव फुटल्यामुळे किती मोठा विध्वंस झाला होता, हेही तुम्हाला आठवत असेल."
ते पुढे म्हणाले, "या धोक्यांपासून देशाचं संरक्षण करणंही तितकंच आवश्यक आहे, जितकं तुम्ही सध्या राजकीय आणि लोकशाहीविषयक धोक्यांविरोधात लढत आहात. त्यामुळे शेवटी मी एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करा. जे नेतृत्व करत आहेत, त्यांनी एकजुटीने संघर्ष करावा. एकतेत ताकद असते. वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून नव्हे, तर एकसंघ होऊन लढा."
"आणि जनतेला, विशेषतः तरुणांना मी एवढंच सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत शांततेचा मार्ग सोडू नका."
ते म्हणाले, "बापूंनी दिलेली एक भेट मी दिल्लीत तुमच्यासाठी आणली होती. ती भेट कधीही हातातून जाऊ देऊ नका. कोणतीही आपत्ती आली तरी शांतता कायम ठेवा. विजय तुमचाच होईल. आणि कधीतरी चूल विझलीच, तर त्या काडीपेटीची आणि या नगण्य व्यक्तीची आठवण जरूर काढा."
कॉक्रोच आंदोलनामुळे दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त; काही आंदोलक ताब्यात
जंतर-मंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोक जमू लागले आहेत. दुसरीकडे, पोलीस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेल्वे स्थानके, हॉटेल्स आणि महत्त्वाच्या सीमावर्ती भागांमध्ये देखरेख वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या प्रवाशांची आणि हॉटेलमध्ये थांबणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे. याशिवाय आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे.

फोटो स्रोत, VIDEO GRAB
जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनापूर्वी फिरोज शाह रोड आणि मंडी हाऊस परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) तैनात करण्यात आली आहे. तसेच दिल्ली-नोएडा सीमेवरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अनंत मित्तल यांनी सांगितले की, आंदोलनाच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण जिल्ह्यासह संपूर्ण दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, तपासणी मोहिमांद्वारे अनधिकृत व्यक्तींना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
डीसीपी अनंत मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे हे पोलिसांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध सीमावर्ती भागांमध्ये सुमारे 12 पोलीस पिकेट्स उभारण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिरिक्त पोलीस पिकेट्स तैनात करण्यात आले असून बाहेरील पोलीस चौक्यांचाही वापर करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, ANI
अभिजीत दिपके शनिवारी सकाळी मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलन करणे हा आपला मूलभूत अधिकार असल्याचं म्हटलं.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, "मला आश्चर्य वाटतं की पंतप्रधान या देशातील युवा आणि जनतेला इतकं का घाबरत आहेत. सर्व रेल्वे सेवा आणि मेट्रो स्थानकं बंद करण्याची गरज काय होती? त्यांनी इंटरनेट बंद केलं आहे आणि रस्तेही रोखले आहेत."
ते पुढे म्हणाले, "जम्मू-काश्मीरमधून सैन्य आणून दिल्लीत तैनात करण्यात आलं आहे. नक्षलग्रस्त भागांमधून सीआरपीएफचे जवान बोलावून दिल्लीत तैनात करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपल्या देशातील जनतेविरुद्ध युद्ध छेडू इच्छितात का? ज्ञानेश कुमार त्यांना इतके प्रिय आहेत का की ते स्वतःच्या जनतेवर पोलीस आणि सैन्याचा वापर करत आहेत?"

फोटो स्रोत, Getty Images
दिपके म्हणाले, "पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. त्यांना भीती वाटते की या घटनेनंतर या देशातील जनता त्यांना मतदान करणार नाही. त्यामुळे केवळ सत्तेत राहण्यासाठी लोकांना रेल्वेमधून ताब्यात घेतलं जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घोषणा करून लोकांना आंदोलनात सहभागी होऊ नये असं सांगितलं जात आहे."
"दिल्ली पोलीस घराघरांत जाऊन लोकांना आंदोलनात सहभागी होऊ नका असं सांगत आहेत. पण आम्ही का सहभागी होऊ नये? आंदोलन करणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे. संविधानातील कलम 19 आम्हाला लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार देतं आणि आम्ही तेच करणार आहोत."
दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना अटक होऊ शकते का, असा प्रश्न दिपके यांना विचारण्यात आला.
त्यावर ते म्हणाले, "जर मला ताब्यात घ्यायचं असेल किंवा अटक करायचं असेल तर करा. मी त्यासाठी तयार आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. यूएपीए लावा, एनएसए लावा. पण आम्ही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी तसेच या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी लढत राहू."
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर आणि आसपासच्या परिसरात दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा दलांचे जवान आणि पोलीस व्हॅन तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे.
सीजेपीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मिळालेली नाही. मात्र, सीजेपीच्या नेत्यांनी आपण जंतर-मंतरवर पोहोचणार असल्याचा दावा केला आहे.

फोटो स्रोत, ANI
पक्षाचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी शुक्रवारी रात्री आपण इतिहास घडवणार असल्याचे म्हटले होते.
आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले होते, "प्रिय कॉक्रोच मित्रांनो! आपण आतापर्यंत किती मोठा प्रवास केला आहे, याचा मला अभिमान आहे. काहीही झाले तरी आपण इतिहास रचणारच!"
ते पुढे म्हणाले, "फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा - हातात संविधान आणि हृदयात गांधी. काहीही झाले तरी आपला हात उचलला जाणार नाही. भारत माता की जय."
याशिवाय, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते योगेंद्र यादव, आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा आणि प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनीही लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
250 हून अधिक रेल्वे रद्द
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवरून ये-जा करणाऱ्या 250 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असं पीटीआयनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
तसेच दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होणार नाहीत याची खात्री करण्यास सांगितले. तसेच मेट्रो सेवा नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवण्याचा विचार करण्याचे निर्देश देत नागरिकांच्या गैरसोयीचा मुद्दाही उपस्थित केला.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडताना रेल्वे गाड्या रद्द करणे आणि मेट्रो स्थानके बंद ठेवणे यामुळे सामान्य नागरिकांच्या हालचालींवर मोठा परिणाम होत असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निर्बंध आवश्यक असले तरी ते प्रमाणबद्ध असावेत, असे सांगितले.
इंटरनेट सेवेवर परिणाम
केंद्रीय गृह मंत्रालयाने जनपथ-कर्तव्य पथ परिसराच्या चार किलोमीटरच्या हद्दीत इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यास मंजुरी दिली आहे. हे निर्बंध 9 ऑक्टोबर रात्रीपासून लागू झाले असून 10 ऑक्टोबर रात्रीपर्यंत कायम राहणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी समर्थकांना शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की आंदोलनाची माहिती वेळेत देण्यात आलेली नव्हती. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्यांमधील अटींचे पालन न केल्यामुळे यावेळी परवानगी नाकारण्यात आली आहे.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी बीएनएसएस कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सीआरपीएफच्या सुमारे 70 कंपन्याही दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. राजधानीतील परिस्थिती लक्षात घेता आज दिवसभर सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


































