डिलिमिटेशनचा भाजपला फायदा होऊ शकतो का? जाणून घ्या राजकीय विश्लेषक काय म्हणतात

केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे.
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 27 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत डिलिमिटेशनशी (मतदारसंघ पुनर्रचना) निगडित नव्या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार हे विधेयक मांडणार आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने पंतप्रधान कार्यालयाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत हे विधेयक मांडण्यात आलं. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोणत्याही राज्याचं लोकसभेतील प्रतिनिधित्व इतर राज्यांच्या प्रमाणात कमी होणार नाही, याची खात्री करण्यासाठी या विधेयकात काही सुधारणा करण्यात आल्याची माहिती आहे.

महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबंधित 131 वी घटनादुरुस्ती करण्यासाठीचं विधेयक 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत मंजूर होऊ शकलं नव्हतं. मात्र, यावेळी सरकारने 2 मोठे बदल केले आहेत: पहिला बदल म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना नवीन जनगणनेपासून वेगळी केली आहे आणि दुसरे म्हणजे सर्व राज्यांसाठी लोकसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे.

गेल्या एप्रिलमध्ये संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं.
फोटो कॅप्शन, गेल्या एप्रिलमध्ये संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं.

दरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. 30 नोव्हेंबरला लोकसभेचे अधिवेशन, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचं विशेष अधिवेश होणार आहे. 3 डिसेंबरला हे अधिवेशन संपणार आहे.

या अधिवेशनाच्या घोषणेनंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकार या विधेयकाच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. दुसरीकडे हे विधेयक पारित करण्यासाठी सरकारने आपली पूर्ण शक्ती लावलेली दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी या डिलिमिटेशन विधेयकाबाबत (मतदारसंघ पुनर्रचना) काय आक्षेप घेतले आहेत, यामुळे नेमके काय बदल होतील? भाजपला याचा फायदा होऊ शकतो का? याबाबत जाणून घेऊयात.

डिलिमिटेशनमुळे भाजपला फायदा होईल, विरोधकांचा आरोप

राहुल गांधी यांनी डिलिमिटेशनमुळे भाजपचा फायदा होईल असा आरोप करताना म्हटलं, "असं केल्यामुळे सरकारला देशाच्या राजकीय नकाशात मोठे बदल करण्याची संधी मिळेल. जणू कोऱ्या कागदावर आपल्या मनाप्रमाणे चित्र काढता येतं."

"त्याचप्रमाणे, लोकसभेतील जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यानंतर सरकारला आपल्या मर्जीनुसार राजकीय बदल करता येतील," असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

"त्यांना भारतीय लोकशाहीचा नकाशा आपल्या मनाप्रमाणे बदलण्याची आणि ती उद्ध्वस्त करण्याची संधी मिळेल," असंही त्यांनी नमूद केलं.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, या प्रक्रियेत मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवल्या जातील. त्यावेळी सरकार आपल्या सोयीनुसार भाग आणि मतदारांची निवड करू शकेल.

"लोकसभेच्या जागा 850 केल्यानंतर सरकारला ब्लँक चेक मिळेल. त्यानंतर सरकारला लोकशाहीत आपल्या मनाप्रमाणे कोणतेही बदल करता येतील," असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी डिलिमिटेशन (पुनर्रचना) प्रक्रियेच्या संभाव्य निवडणूक परिणामांबाबत एक पोस्ट केली आहे.

मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल झाल्यास भाजपला नव्या मतांशिवायही जागांचा फायदा होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

शनिवारी अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात एक्सवर एक सविस्तर पोस्ट लिहिली.

त्यांच्या मते, "जर 1,000 मतदारांचा एखादा मतदारसंघ असेल आणि त्या मतदारसंघात भाजपला 400 तर विरोधकांना 600 मतं मिळत असतील, तर ती जागा विरोधक जिंकतील."

"मात्र डिलिमिटेशन (पुनर्रचना) प्रक्रियेनंतर हाच मतदारसंघ 500-500 मतदारांच्या दोन मतदारसंघांत विभागला गेला, तर निकाल बदलू शकतो. पहिल्या मतदारसंघात भाजपला 260 आणि विरोधकांना 240 मतं मिळतील. त्यामुळे भाजप ही जागा जिंकेल. दुसऱ्या मतदारसंघात भाजपला 140 आणि विरोधकांना 360 मतं मिळतील. येथे विरोधक विजयी होतील."

अशा प्रकारे ज्या ठिकाणी पूर्वी विरोधकांकडे एक जागा होती, तेथे डिलिमिटेशननंतर भाजप आणि विरोधक या दोघांकडे प्रत्येकी एक जागा जाईल, असं दिपके म्हणतात.

दिपके पुढे म्हणाले, "या परिस्थितीत विरोधक आपली सध्याची जागा कायम राखतात. कदाचित त्यामुळेच काही पक्ष डिलिमिटेशनला पाठिंबा देत असावेत. मात्र त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, ज्या भागात भाजपकडे यापूर्वी एकही जागा नव्हती, तिथेही भाजपला एक जागा मिळू शकते."

"भविष्यात डिलिमिटेशनमुळे भाजपला असाच निवडणुकीचा फायदा होऊ शकतो. मतदार तेच राहतात आणि त्यांच्या मतदानाचा कलही बदलत नाही. पण मतदारसंघांच्या नव्या सीमा निवडणुकीचे निकाल बदलू शकतात," असंही त्यांनी म्हटलं.

डिलिमिटेशनमुळे शहरी मतदारसंघाच्या संख्येत कसा बदल होईल?

डिलिमिटेशनमुळे मतदारसंघाची रचना बदलून राजकीय फायदा भाजपला होईल, असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे.

याबाबत राजकीय विश्लेषक नितीन बिरमल म्हणतात, "डिलिमिटेशनचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर होणारा परिणाम वेगवेगळा असेल. विधानसभा मतदारसंघांच्या बाबतीत पाहिले, तर एका मतदारसंघातील मतदारसंख्या साधारण 2 ते 2.5 लाखांपर्यंत येऊ शकते. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये सध्या 6 ते 8 लाख मतदारसंख्या असलेले मोठे मतदारसंघ आहेत."

"पुनर्रचनेनंतर अशा मतदारसंघांची विभागणी होऊन लहान मतदारसंघ निर्माण होऊ शकतात. याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे."

डिलिमिटेशन

मतदारसंघाच्या रचनेवर याचा कसा आणि काय परिणाम होईल यावर बोलताना नितिन बिरमल सांगतात, "सध्याच्या जागांच्या संख्येत साधारण 50 टक्के वाढ प्रस्तावित आहे. मात्र, या जागांचे मतदारसंघांमध्ये विभाजन कसे केले जाणार, हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी भाजपकडे आसाम मॉडेल असल्याचे दिसते."

"आसाममध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करताना विशिष्ट धार्मिक गटांचे वर्चस्व असलेल्या भागांमधील मतदारसंघांच्या सीमा बदलण्यात आल्या. काही मतदारसंघ तोडून इतर मतदारसंघांना जोडण्यात आले. या प्रक्रियेचा भाजपला राजकीय फायदा झाल्याचं म्हटलं जातं. अशाच प्रकारची पुनर्रचना पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्येही होऊ शकते," असं मत नितिन बिरमल व्यक्त करतात.

डिलिमिटेशन

बिरमल पुढे म्हणाले, "मतदारसंघांची संख्या वाढवणे हा एक भाग आहे, पण कोणत्या भागातील लोकसंख्या कोणत्या मतदारसंघात समाविष्ट करायची, एका मतदारसंघाचा काही भाग तोडून दुसऱ्या मतदारसंघाला जोडायचा का, यामध्येही राजकीय गणितं असतात. त्यामुळे मतदारसंघांच्या सीमांची नव्याने आखणी हा स्वतंत्र राजकीय मुद्दा ठरू शकतो."

"देशातील नागरीकरणाचा वेग पाहता राज्यांमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे राजकारणही त्यानुसार बदलेल. मात्र, जनगणनेनंतर ग्रामीण भागातील मतदारसंघांची संख्या कमी होईल, असे नाही. जागांची वाढ प्रामुख्याने शहरी भागांमध्ये होण्याची शक्यता आहे."

"उदाहरणार्थ, पुण्यात जर सध्या 6 ते 7 लाख मतदारसंख्या असलेले 3 मोठे मतदारसंघ आहेत. त्यांची विभागणी होऊन प्रत्येकी निम्म्या मतदारसंख्येचे मतदारसंघ तयार झाले, तर नवीन मतदारसंघ निर्माण होईल. मात्र, ग्रामीण भागातील मतदारसंघांची संख्या तितकीच राहू शकते. त्यामुळे भारतीय राजकारणातील शहरी भागांचे वर्चस्व आणखी वाढण्याची शक्यता आहे," असं बिरमल नमूद करतात.

भाजपला कसा फायदा होऊ शकतो?

भाजपला या बदलांमुळे होणारा फायदा आणि त्यामागील राजकीय गणितं यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार महेश सरलष्कर म्हणाले, "गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर लोक शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे शहरी लोकसंख्येत वाढ झाली असून त्याचा परिणाम मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर होईल."

"शहरी भागातील अनेक मतदारसंघ सध्या लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहेत. त्यामुळे त्यांची विभागणी होऊन नवीन मतदारसंघ निर्माण होऊन शहरी मतदारसंघांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. शहरी भागात भाजपचा मतदारवर्ग आहे आणि या मतदारवर्गातून भाजपला तुलनेने अधिक मतदान होते. त्यामुळे शहरी मतदारसंघांची संख्या वाढल्यास भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो."

"दुसरं म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेसाठी आयोगाची नियुक्ती केली जाणार असली, तरी या संपूर्ण प्रक्रियेवर केंद्र सरकारचा प्रभाव असणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीनेही हा मुद्दा उपस्थित केला होता. या पुनर्रचनेचा भाजपला राजकीय फायदा होण्याची शक्यता असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती," असंही ते नमूद करतात.

शहा आणि मोदी

याबाबत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव म्हणाले, "डिलिमिटेशनच्या नावावर भाजप मोठा डाव साधू पाहत आहे. डिलिमिटेशनच्या बहाण्याने दक्षिण भारत आणि पूर्वेकडील राज्यं जेथे भाजपचा फार प्रभाव नाही. त्या राज्यांमधील सीट्स कमी करून टाकण्याचा प्रयत्न आहे."

"त्यांनी एप्रिलमध्ये तसा प्रयत्न करून पाहिला होता, पण त्यात त्यांना अपयश आलं. मग आता ते दुसरी पद्धत वापरत आहेत. मात्र, यात 3 संभाव्य धोके आहेत. पहिलं म्हणजे, डिलिमिटेशनच्या आधारे देशातील प्रत्येक विधानसभा, लोकसभेची नव्याने आखणी केली जाईल. ही मतदारसंघाची रचना करताना भाजपला फायदा देणाऱ्या भागांचा समावेश केला जाईल," असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.

हे सांगताना त्यांनी आसाम राज्याचा उदाहरण दिलं.

यामुळे विरोधी पक्षांच्या जागेवर होणाऱ्या परिणामावर बोलताना ते म्हणाले, "विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जागाच धोक्यात येतील अशाप्रकारे एससी, एसटी आणि महिला आरक्षण हाताळलं जाईल. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन आणलं जाईल."

ठसंसदेतील जागांची संख्या वाढवून ती 850 करता येईल. मात्र, ते अशाप्रकारे साधलं जाईल की भाजपच्या पुरुष नेत्यांना आपली जागा जाण्याची भीती राहणार नाही. अशाप्रकारे देशातील संपूर्ण निवडणुकीच्या पद्धतीलाच बदलण्याचा हा कट रचला जातोय," असा आरोप त्यांनी केला.

डिलिमिटेशनमुळे महाराष्ट्राची राजकीय गणितं कशी बदलू शकतात?

सध्या महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेतील एकूण जागांच्या निम्म्यापेक्षा अधिक जागा आवश्यक असतात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर विधानसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ झाली, तर हा आकडा 432 होईल. याशिवाय सध्याच्या लोकसभेच्या 48 जागा वाढून 72-73 होऊ शकतात.

यामुळे सत्तेचं राजकीय गणित कसं बदलेल? पक्षफोडीच्या राजकारणावर कसा परिणाम होईल? यावर राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक प्रकाश मा. पवार म्हणाले, "महाराष्ट्राचा विचार केला, तर 288 सदस्यांच्या विधानसभेत 1990 नंतर कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर 145 जागांचा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. राज्यात सरकार स्थापन करताना आघाड्या, युती आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. सत्तेचं गणित जुळवण्यासाठी अनेकदा पक्षांतर आणि पक्षफुटीचं राजकारणही झालं आहे."

व्हीडिओ कॅप्शन, भाजपला डिलिमिटेशन विधेयक पास करायला काय करावं लागेल? | डिलिमिटेशन बील

"आता विधानसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ झाली आणि सदस्यसंख्या 288 वरून 432 झाली, तर बहुमताचा आकडा 217 वर जाईल. एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आणणं आणि बहुमत टिकवणं हे राजकीय पक्षांसमोरचं मोठं आव्हान असेल."

"उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातही एखाद्या पक्षाला 200 पेक्षा अधिक जागा मिळवण्यासाठी मोठी राजकीय ताकद लावावी लागते. अशा वेळी विधानसभेची सदस्यसंख्या 300 ते 350 किंवा त्यापुढे गेल्यास राजकीय पक्षांसमोरचं गणित आणखी गुंतागुंतीचं होऊ शकतं."

"त्यामुळे भविष्यात सत्तास्थापनेसाठी कोणत्या प्रकारचं राजकारण केलं जाईल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. केवळ निवडणूक जिंकणं नव्हे, तर बहुमत टिकवणंही राजकीय पक्षांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं," असंही पवार नमूद करतात.

उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांवर काय परिणाम होऊ शकतात?

मतदारसंघ पुनर्रचनेचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतातील राज्यांमधील लोकसभेच्या जागांचं संभाव्य फेरवाटप. कारण उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भाजपची मजबूत राजकीय उपस्थिती आहे. मतदारसंघांच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय देशाच्या संघराज्यीय रचनेवरही परिणाम करणारा ठरू शकतो, असं डॉ. प्रकाश पवार सांगतात.

ते म्हणाले, "या जागा वाढल्यामुळं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारसारख्या मोठ्या राज्यांचा दिल्लीच्या राजकारणावर प्रभाव राहील आणि त्याचा दक्षिणेकडील राज्यं किंवा नॉर्थ इस्टच्या राज्यांवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल.

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे प्रश्न अजूनही आहेत. या परिस्थितीचं सामाजिक आणि राजकीय प्रतिबिंब राष्ट्रीय धोरणांमध्ये पडत असतं. याचा परिणाम भारताच्या संपूर्ण राजकारणावर होऊ शकतो. आजही अनेक राष्ट्रीय धोरणं आखताना उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचा विचार प्राधान्याने करावा लागतो. त्यामुळे केंद्र-राज्य संबंधांमधील तणावाचे मुद्दे भविष्यात याच्यातून आणखी जास्त प्रकर्षाने दिसून येईल.

डिलिमिटेशन

पवार यांनी आणखी एक मुद्दा सांगितला, "घटनादुरुस्तीचा मुद्दा यामध्ये आर्टिकल 368 च्या आधारे आपण जी दोन तृतियांश बहुमताची विशेष घटना दुरुस्ती करतोय त्यात वाढलेल्या लोकसंभेच्या आकड्यातून दोन तृतियांश बहुमत तुम्हाला कधीच मिळणार नाही. मग समजा देशात काळाप्रमाणे येणाऱ्या जीएसटीसारख्या नवीन गोष्टी आहेत, त्यावर तुम्ही कसं काम करणार आहात. तसंच, खरंच 815 खासदारांना अधिवेशनकाळात बोलायची संधी दिली तर त्यांना त्यांचे मुद्दे मांडायला किती वेळ मिळेल? कारण अलिकडच्या काळात अधिवेशनाचा कालावधी कमी झालाय आणि जर त्यात वाढीव खासदार आले तर काय होईल, त्यांना किती वेळ मिळेल, हा मला पडलेला प्रश्न आहे."

केंद्र सरकारने मसुदा जारी केला

केंद्र सरकारने संविधान (132वी दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जारी केला आहे. या पुनर्रचनेनुसार, सर्व राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ होणार आहे.

लोकसभेतील राज्यांच्या प्रतिनिधींची कमाल संख्या 530 वरून 815, तर केंद्रशासित प्रदेशांची संख्या 20 वरून 35 करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच, राज्य विधानसभांची कमाल सदस्यसंख्या 500 वरून 650 करण्यात येणार आहे. हे घटनादुरुस्ती विधेयक सोमवार, 30 नोव्हेंबरला लोकसभेच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 नुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या 815 करण्याचा प्रस्ताव आहे.
फोटो कॅप्शन, संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक 2026 नुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या 815 करण्याचा प्रस्ताव आहे.

विधेयकाच्या मसुद्यानुसार, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना नवीनतम प्रकाशित जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे केली जाईल. तसेच, 2051 पर्यंत जागांचे वाटप आणि मतदारसंघांची पुनर्रचना कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

सध्याच्या तरतुदींनुसार, 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना अपेक्षित होती. मात्र, नव्या प्रस्तावानुसार घटनादुरुस्ती लागू होताना उपलब्ध असलेली नवीनतम जनगणनेची आकडेवारी वापरली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)