तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'देश कुठल्या दिशेला जात आहे', पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांचे वक्तव्य
- जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
- राजधानीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे 25 ते 30 हजार जवान तैनात
- सीजेपीच्या आंदोलनापूर्वी शेकडो जणांना ताब्यात घेतल्याची माहिती
- अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा
- आंदोलनापूर्वी प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
- मेट्रो स्थानकं बंद ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल
दिल्लीत आज (10 ऑक्टोबर) कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातच ताब्यात घेतल्याचं सीजेपीनं म्हटलं आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून अनेक जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिघे पोलिसांच्या ताब्यात असेपर्यंत जंतर-मंतरवरील या आंदोलनाचे नेतृत्व सीजेपीचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत. अभिजीत दिपके यांनी संभाव्य अटकेची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवारी रात्रीच हा व्हीडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता, अशी माहिती सीजेपीकडून देण्यात आली आहे.
पक्षानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, दिल्ली पोलिसांनी पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या या कारवाईचा उद्देश आजच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या नेतृत्वाला आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच निष्प्रभ करणे हा आहे, असं म्हटलं आहे.
सीजेपीने याला नागरिकांच्या मुक्त संचाराच्या अधिकाराचे उघड उल्लंघन असल्याचे म्हटले असून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे.
ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके म्हणाले की, त्यांना अटकेची भीती वाटत नाही आणि ते त्यासाठी तयार आहेत.
दिपके म्हणाले , "देश कोणत्या दिशेने जात आहे हे तुम्ही पाहू शकता. आम्हाला विमानातच ताब्यात घेतले जात आहे, इंदिरा गांधींनीसुद्धा असे कधी केले नव्हते. ही हुकूमशाही आहे, पण आम्ही त्यांना घाबरत नाही."
अभिजीत दिपके अटक करायला आलेल्या पोलिसांना म्हणाले, "आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही अटकेसाठी तयार आहोत."
सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी आणि फिरोज मिठीबोरवाला यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर नियोजित आंदोलनाच्या आयोजकांनी दिली आहे. शनिवारी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असून राजधानीतील अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
'अराजकता पसरवू देणार नाही'; भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची प्रतिक्रिया
भारतीय जनता पार्टीचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या हाकेला "देश अस्थिर करण्याचा प्रयत्न" असे संबोधले आहे.
शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन नवीन म्हणाले, "आज देशात अत्यंत धोकादायक आणि गंभीर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुख-शांतीत राहून भारताच्या विकासाला हातभार लावणाऱ्या 140 कोटी जनतेला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे कोण करत आहे? हे दोन अराजकतावादी गट आहेत. यापैकी एका गटाचे नेतृत्व 'इंडी आघाडी'चे नेते राहुल गांधी करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व अरविंद केजरीवाल यांचे सहकारी असलेल्या सीजेपीकडे आहे."
नितीन नवीन म्हणाले, "मी या दोन्ही गटांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की भारतातील जनता तुमचे हेतू ओळखून आहे. देशात अधिक अस्थिरता कोण निर्माण करू शकतो, याची जी स्पर्धा तुम्ही सुरू केली आहे, ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही."
ते पुढे म्हणाले, "गेल्या 12 वर्षांत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढलं. दहशतवाद मुळापासून संपवण्याचा प्रयत्न केला. नक्षलवादमुक्त भारत घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अजूनही अर्बन नक्षल विचारसरणीचे काही लोक देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत."
नितीन नवीन म्हणाले, "राहुल गांधीजी, तुमचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि इंडी आघाडीचे नेते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, तसेच तथाकथित युवा नेतृत्व जे बोलत आहे, ते देशातील युवक पाहत आहेत."
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
राहुल गांधी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील आपल्या भाषणाचा व्हीडिओ एक्सवर शेअर करत लिहिलं, "ज्ञानेश कुमार जाणार. हे सरकार जाणार. त्यानंतर लोकशाहीची दुरुस्ती करण्याचं काम सुरू होईल."
अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, "हे आणीबाणीपेक्षाही वाईट आहे. आता हे अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे की आपण मोदींच्या राजवटीत पूर्णपणे हुकूमशाहीच्या काळात जगत आहोत. विमानातून उतरताच लोकांना अटक करणं म्हणजे भीतीच्या अशा पातळीचं प्रदर्शन आहे, जी याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती."
ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांना चांगलंच माहीत आहे की ते निवडणुका केवळ मतांची चोरी करून जिंकतात आणि आता ते लोकशाही पूर्णपणे चिरडून हा फसवणुकीचा खेळ वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्ञानेश यांना जावंच लागेल आणि मोदींनाही जावंच लागेल."
शुक्रवारी इंडिया गेटवर रील, शनिवारी पोलिसांच्या ताब्यात; ध्रुव राठी चर्चेत
प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ध्रुव राठी यांच्या एका जवळच्या व्यक्तीने आणि गुरुग्राम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ध्रुव राठी यांना गुरुग्राममधील सेक्टर-56 परिसरातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती बीबीसीचे वार्ताहर दिलनवाज पाशा यांनी दिली आहे.
याआधी शुक्रवारी उशिरा सायंकाळी ध्रुव राठी यांनी सोशल मीडियावर एक रील पोस्ट केलं होतं. यामध्ये ते इंडिया गेटसमोर फिरताना दिसत होते.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
लाइव्ह लॉ या वृत्तसंकेतस्थळानुसार, शनिवारी सर्वोच्च न्यायालयात एक अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही दिल्ली मेट्रोची अनेक स्थानके बंद ठेवण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
ही अवमान याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव आयएएस गोविंद मोहन, दिल्ली पोलीस आयुक्त आयपीएस अनुराग कुमार आणि डीएमआरसीच्या अध्यक्षा आयएएस डी. थारा यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.
कोणतेही योग्य कारण नसताना रेल्वे सेवा रद्द केल्या जात आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले असून सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं यात म्हटलं आहे.
राजकारणापलीकडेही अनेक संकटं आहेत'- सोनम वांगचूक
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनातील प्रमुख चेहरा होते.
त्या आंदोलनादरम्यान त्यांनी 23 दिवस उपोषण केलं होतं.
यावेळीही ते जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
मात्र, त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, "तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं की आम्ही कुठे आहोत, शांत का आहोत, दिल्लीतील या लढ्यात सहभागी का नाही आहोत? देशावर घोंघावत असलेल्या राजकीय संकटांना तोंड देण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आला आहात. त्याचं मी कौतुक करतो. पण मी एवढंच सांगू इच्छितो की धोके केवळ राजकीयच नाहीत, तर नैसर्गिकही आहेत. फैज साहेबांच्या शैलीत सांगायचं झालं तर ...'और भी ग़म हैं ज़माने में सियासत के सिवा, राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा.'"
ते पुढे म्हणाले, "आपल्याला हवी असलेली सुटका केवळ भेटीगाठींमधून मिळणारी नाही, तर नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचीही गरज आहे. त्यामुळे 'तो मुझसे पहली सी मोहब्बत मेरी महबूब न मांग.'"
ते म्हणाले, "पूर्वीप्रमाणे यावेळी कदाचित मी येऊ शकणार नाही. कारण चूल पेटवायची असेल तेव्हा काडीपेटीतील काडीची गरज असते. पण एकदा चूल पेटली की मग स्वयंपाक सुरू होतो आणि सगळं सुरळीत चालू लागतं. त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही सर्वजण राजकीय समस्यांशी दोन हात कराल आणि आम्ही इथे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यांशी लढू."
सोनम वांगचुक म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे, गेल्या काही महिन्यांत नेपाळमध्ये किती मोठी आपत्ती आली. भोटेकोशी परिसरातील एका हिमनदीचा तलाव फुटल्याने मोठं नुकसान झालं आणि हजारो लोकांचे जीव गेले. त्याआधी सिक्कीममधील लोनाक तलाव फुटल्यामुळे किती मोठा विध्वंस झाला होता, हेही तुम्हाला आठवत असेल."
ते पुढे म्हणाले, "या धोक्यांपासून देशाचं संरक्षण करणंही तितकंच आवश्यक आहे, जितकं तुम्ही सध्या राजकीय आणि लोकशाहीविषयक धोक्यांविरोधात लढत आहात. त्यामुळे शेवटी मी एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करा. जे नेतृत्व करत आहेत, त्यांनी एकजुटीने संघर्ष करावा. एकतेत ताकद असते. वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून नव्हे, तर एकसंघ होऊन लढा."
"आणि जनतेला, विशेषतः तरुणांना मी एवढंच सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत शांततेचा मार्ग सोडू नका."
ते म्हणाले, "बापूंनी दिलेली एक भेट मी दिल्लीत तुमच्यासाठी आणली होती. ती भेट कधीही हातातून जाऊ देऊ नका. कोणतीही आपत्ती आली तरी शांतता कायम ठेवा. विजय तुमचाच होईल. आणि कधीतरी चूल विझलीच, तर त्या काडीपेटीची आणि या नगण्य व्यक्तीची आठवण जरूर काढा."
कॉक्रोच आंदोलनामुळे दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त; काही आंदोलक ताब्यात
जंतर-मंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोक जमू लागले आहेत. दुसरीकडे, पोलीस आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेल्वे स्थानके, हॉटेल्स आणि महत्त्वाच्या सीमावर्ती भागांमध्ये देखरेख वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या प्रवाशांची आणि हॉटेलमध्ये थांबणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे. याशिवाय आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत येणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे.
जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनापूर्वी फिरोज शाह रोड आणि मंडी हाऊस परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) तैनात करण्यात आली आहे. तसेच दिल्ली-नोएडा सीमेवरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अनंत मित्तल यांनी सांगितले की, आंदोलनाच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण जिल्ह्यासह संपूर्ण दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, तपासणी मोहिमांद्वारे अनधिकृत व्यक्तींना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
डीसीपी अनंत मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे हे पोलिसांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध सीमावर्ती भागांमध्ये सुमारे 12 पोलीस पिकेट्स उभारण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिरिक्त पोलीस पिकेट्स तैनात करण्यात आले असून बाहेरील पोलीस चौक्यांचाही वापर करण्यात येत आहे.
अभिजीत दीपके शनिवारी सकाळी मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलन करणे हा आपला मूलभूत अधिकार असल्याचं म्हटलं.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, "मला आश्चर्य वाटतं की पंतप्रधान या देशातील युवा आणि जनतेला इतकं का घाबरत आहेत. सर्व रेल्वे सेवा आणि मेट्रो स्थानकं बंद करण्याची गरज काय होती? त्यांनी इंटरनेट बंद केलं आहे आणि रस्तेही रोखले आहेत."
ते पुढे म्हणाले, "जम्मू-काश्मीरमधून सैन्य आणून दिल्लीत तैनात करण्यात आलं आहे. नक्षलग्रस्त भागांमधून सीआरपीएफचे जवान बोलावून दिल्लीत तैनात करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपल्या देशातील जनतेविरुद्ध युद्ध छेडू इच्छितात का? ज्ञानेश कुमार त्यांना इतके प्रिय आहेत का की ते स्वतःच्या जनतेवर पोलीस आणि सैन्याचा वापर करत आहेत?"
दीपके म्हणाले, "पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. त्यांना भीती वाटते की या घटनेनंतर या देशातील जनता त्यांना मतदान करणार नाही. त्यामुळे केवळ सत्तेत राहण्यासाठी लोकांना रेल्वेमधून ताब्यात घेतलं जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घोषणा करून लोकांना आंदोलनात सहभागी होऊ नये असं सांगितलं जात आहे."
"दिल्ली पोलीस घराघरांत जाऊन लोकांना आंदोलनात सहभागी होऊ नका असं सांगत आहेत. पण आम्ही का सहभागी होऊ नये? आंदोलन करणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे. संविधानातील कलम 19 आम्हाला लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार देतं आणि आम्ही तेच करणार आहोत."
दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना अटक होऊ शकते का, असा प्रश्न दीपके यांना विचारण्यात आला.
त्यावर ते म्हणाले, "जर मला ताब्यात घ्यायचं असेल किंवा अटक करायचं असेल तर करा. मी त्यासाठी तयार आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. यूएपीए लावा, एनएसए लावा. पण आम्ही स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी तसेच या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी लढत राहू."
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर आणि आसपासच्या परिसरात दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, सुरक्षा दलांचे जवान आणि पोलीस व्हॅन तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे.
सीजेपीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मिळालेली नाही. मात्र, सीजेपीच्या नेत्यांनी आपण जंतर-मंतरवर पोहोचणार असल्याचा दावा केला आहे.
पक्षाचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी शुक्रवारी रात्री आपण इतिहास घडवणार असल्याचे म्हटले होते.
आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले होते, "प्रिय कॉक्रोच मित्रांनो! आपण आतापर्यंत किती मोठा प्रवास केला आहे, याचा मला अभिमान आहे. काहीही झाले तरी आपण इतिहास रचणारच!"
ते पुढे म्हणाले, "फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा - हातात संविधान आणि हृदयात गांधी. काहीही झाले तरी आपला हात उचलला जाणार नाही. भारत माता की जय."
याशिवाय, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते योगेंद्र यादव, आयसाच्या अध्यक्षा नेहा बोरा आणि प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यांनीही लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
250 हून अधिक रेल्वे रद्द
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवरून ये-जा करणाऱ्या 250 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असं पीटीआयनं म्हटलं आहे.
तसेच दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला रेल्वे सेवा पूर्णपणे बंद होणार नाहीत याची खात्री करण्यास सांगितले. तसेच मेट्रो सेवा नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवण्याचा विचार करण्याचे निर्देश देत नागरिकांच्या गैरसोयीचा मुद्दाही उपस्थित केला.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडताना रेल्वे गाड्या रद्द करणे आणि मेट्रो स्थानके बंद ठेवणे यामुळे सामान्य नागरिकांच्या हालचालींवर मोठा परिणाम होत असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निर्बंध आवश्यक असले तरी ते प्रमाणबद्ध असावेत, असे सांगितले.
इंटरनेट सेवेवर परिणाम
केंद्रीय गृह मंत्रालयाने जनपथ-कर्तव्य पथ परिसराच्या चार किलोमीटरच्या हद्दीत इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यास मंजुरी दिली आहे. हे निर्बंध 9 ऑक्टोबर रात्रीपासून लागू झाले असून 10 ऑक्टोबर रात्रीपर्यंत कायम राहणार आहेत.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी समर्थकांना शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की आंदोलनाची माहिती वेळेत देण्यात आलेली नव्हती. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्यांमधील अटींचे पालन न केल्यामुळे यावेळी परवानगी नाकारण्यात आली आहे.
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी बीएनएसएस कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सीआरपीएफच्या सुमारे 70 कंपन्याही दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. राजधानीतील परिस्थिती लक्षात घेता आज दिवसभर सुरक्षा यंत्रणा सतर्क राहणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)