You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागांत आज असं असणार हवामान, जाणून घ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना दिलेला अलर्ट
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
महाराष्ट्रात सध्या मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढचा आठवडाभर कोकण, मध्यम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे.
या सगळ्या विभागांत हवामान कसं असेल आणि कुठल्या जिल्ह्यात काय अलर्ट दिला आहे, जाणून घेऊयात.
19 जुलैला दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांनुसार, सध्या उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून सक्रीय असल्याचं दिसतंय. तर महाराष्ट्रावरही सर्वदूर ढग दाटलेले दिसतात.
Wind and Rain राज्यात विशेषतः कोकणातील किनारी प्रदेश आणि घाट भागात पुढच्या दोन तीन दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पुढच्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो.
दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि कोकण तसंच लगतच्या घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा, वीजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
साताऱ्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्याचा घाट प्रदेश, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे.
तर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली इथे मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे.
20 जुलैसाठी हवामान विभागानं पुणे आणि साताऱ्याच्या घाट प्रदेशात यलो अलर्ट दिला आहे. तर जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली इथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)