You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गीतांजली अंगमो : सोनम वांगचूक यांना हटवल्यानंतर खंबीरपणे त्यांची बाजू मांडणाऱ्या त्यांच्या पत्नी कोण आहेत?
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
NEET पेपरफुटीनंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या सोनम वांगचूक यांना 18 जुलै रोजी जबरदस्तीने हटवण्यात आले. त्यानंतर सोनम वांगचूक यांच्याबद्दलची माहिती देण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो अनेकवेळा माध्यमांसमोर आल्या.
सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून गीतांजली अंगमो या आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक मानल्या जात आहेत.
20 जुलैला संसदेवर मोर्चा काढला गेला. त्यावेळीही त्यांनी या आंदोलनात आपली भूमिका मांडली.
संसदेवर मोर्चा काढताना त्यांना माध्यमांनी विचारले की, तुमच्या मागण्या काय आहेत?
त्यावेळी त्यांनी सांगितले, "आमच्या मागण्या अजूनही त्याच आहेत. येणाऱ्या मान्सून अधिवेशनात चर्चेचा भर शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर असावा. देशातील शिक्षण व्यवस्था जगातील सर्वाधिक चांगली शिक्षण व्यवस्था व्हावी आपण यासाठी ठोस पावलं उचलावीत. तसेच या गोष्टींची सुरुवात शिक्षण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी असणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापासून व्हावी."
गीतांजली यांनी हे देखील म्हटले आहे की, जर सत्ताधारी नेत्यांनी सोनम वांगचूक यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये येऊन हे आश्वासन दिले की, या मान्सून सत्रात शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचा मुद्दा हा प्राधान्याने घेतला जाईल, तर सोनम वांगचूक आपले उपोषण तोडण्यास तयार आहेत.
हे आंदोलन सुरू झाल्यापासून डॉ. गीतांजली यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर येऊन आंदोलनाची भूमिका मांडली. त्याच बरोबर त्यांनी सोनम वांगचूक यांच्या हेल्थ अपडेटदेखील माध्यमांना दिल्या.
डॉ. गीतांजली या कोण आहेत, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
गीतांजली कोण आहेत?
गीतांजली अंगमो या शिक्षणतज्ज्ञ आणि सोशल आंत्रप्रेन्युअर आहेत.
'हिमालयन इंस्टिट्यूट ऑफ अल्टरेनेटिव्ह' या संस्थेच्या त्या सहसंस्थापिका आणि अधिष्ठाता आहेत. त्यांचे पती सोनम वांगचूक हे या संस्थेचे सह-संस्थापक आणि संचालक आहेत.
या संस्थेची स्थापना करण्यासाठी गीतांजली यांनी आपली कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकीर्द सोडल्याचे त्यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे.
डॉ. गीतांजली यांनी भुवनेश्वर येथील झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (XIMB) MBA केले आहे.
गीतांजली यांनी शिक्षणशास्त्रात पीएचडी केली आहे. गीतांजली या श्री. अरविंद घोष यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक आहेत. शिक्षणशास्त्र आणि अरविंद घोषांचे तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी बंगळुरूतील सत्य साई युनिव्हर्सिटीतून पीएचडी केली आहे असे त्यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
त्यानंतर त्यांनी भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध महत्त्वाच्या कॉर्पोरेट पदांवर कार्य केले आहे. असे त्यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे.
गीतांजली या कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत आणि 2009 मध्ये त्यांनी अमेरिकेत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे.
2019 मध्ये त्यांनी (TedX Talks) टेड एक्स टॉक्समध्ये Why be lifelong learner या विषयावर भाषण केले होते.
भारत सरकारकडून पुरस्कार
डॉ. गीतांजली यांना नीती आयोगाकडून पुरस्कार देखील मिळाला आहे.
2022 'वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' या पुरस्काराचे 5वे सत्र होते. या वर्षी देशातील 75 महिलांचा भारत सरकारच्या नीती आयोगातर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यात गीतांजली अंगमो यांचाही समावेश होता.
त्यांना पुरस्कार मिळाल्याची माहिती देताना भारताच्या माहिती आणि प्रसारण विभाग मंत्रालयाच्या PIB ने म्हटले होते, "हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख (HIAL) हे जगातील पहिले 'कर्तृत्वाधिष्ठित विद्यापीठ' (Doer's University) म्हणून ओळखले जाते."
"या विद्यापीठात स्थानिक गरजा आणि परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, संशोधन आणि उद्योजकता यांचा समन्वय सााधला जातो."
"येथे अध्यापनाची पद्धत प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांवर आधारित असून समस्या सोडविण्यावर भर देणारा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारला जातो. या प्रक्रियेत स्थानिक पारंपरिक ज्ञानाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घातली जाते."
पुढे या निवेदनात PIB ने म्हटले, सह-संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अधिष्ठाता (Dean) या नात्याने गीतांजली या संस्थेचे शैक्षणिक नेतृत्व करतात. त्यांनी याद्वारे अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारले आहे. तसेच विविध विद्यापीठ आणि संस्थांसाठी त्यांनी अभ्यासक्रम देखील बनवले आहेत. याशिवाय त्या अनेक प्रकल्पांवर त्या शैक्षणिक धोरण सल्लागार म्हणूनही काम करतात.
सोनम वांगचूक आणि गीतांजली यांची भेट कुठे झाली?
ब्रूट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गीतांजली सांगतात, "माझी आणि सोनम यांची भेट एका एज्युकेशन कॉन्फरन्समध्ये झाली. त्या कॉन्फरन्सदरम्यान आम्ही गप्पात रंगून गेलो. आम्हा दोघांनाही आमचा कामाबद्दल, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान वाटला."
"अनेक लोक आपले आयुष्य, आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जगतात. पण मला अशा ध्येयासाठी काम करायचं होतं जे मला माझ्या आयुष्याहून मोठं वाटेल. जेव्हा मी सोनम यांना भेटले, तेव्हा मला माझ्या आयुष्याचा साथीदार भेटलाय असं जाणवलं."
सोनम वांगचूक तुरुंगात असताना खंबीरपणे साथ
ऑक्टोबर 2025 मध्ये लडाखमध्ये आंदोलन भडकवल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचूक यांना अटक केली होती. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले होते. तसेच या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
या याचिकेवर निकाल येण्याआधीच सुमारे 170 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आणि त्यांची सुटका केली.
2025 मध्ये त्यांनी 35 दिवसांचं उपोषण केलं. त्यातील 15व्या दिवशी, म्हणजे 24 सप्टेंबरला लेहमधील आंदोलन हिंसक झालं. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 जण जखमी झाले होते.
हिंसक आंदोलन झाल्यानंतर 2 दिवसांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी लडाखमध्ये वांगचूक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) ते 170 दिवस तुरुंगात कैद होते. या काळातही त्यांनी वांगचूक यांना भक्कम साथ दिली.
सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात गीतांजली यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असतानाच्या काळातच गृह मंत्रालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)