You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज काय सांगतो? जाणून घ्या
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात पाऊस जणू पुन्हा एकदा जरा झोपेतून जागा होतो आहे. गेल्या 24 तासांत कोकण आणि घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह वीजा, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली.
राज्यातल्या या सगळ्या विभागांत पुढच्या चोवीस तासांत हवामान कसं असेल आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी काय अलर्ट दिले आहेत, जाणून घेऊयात.
16 जुलैच्या दुपारी सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यांमध्ये बंगालच्या उपसागरावर आणि ओडिसा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर कमी दाबाची प्रणाली सक्रीय दिसतेय. या वादळाच्या प्रभावामुळे पुढच्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात तसंच मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या जम्मू काश्मीरवर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे पश्चिमेकडून येणारं वादळ सक्रीय आहे आणि 19 जुलैपर्यंत आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. वायव्येकडून येणाऱ्या या वाऱ्यांचा मान्सूनवरही परिणाम होत असतो, त्यामुळे या सिस्टिमवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
बीबीसी वेदर फोरकास्टच्या अंदाजानुसार, पुढच्या काही दिवसांत कोकण आणि घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार 16 तारखेच्या उत्तरार्धासाठी रायगड, रत्नागिरी तसं पुणे आणि साताऱ्याचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्याचा उर्वरीत भाग, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, अहिल्यानगर, बुलढाणा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.
17 तारखेला विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्याचा पठारी भाग, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत यलो अलर्ट दिलेला आहे.
राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. पण कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पाहता, काही भागांत पुढचे तीन चार दिवस थांबून थांबून का होईना पण पाऊस पडू शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.