सोन्यात भेसळ? हॉलमार्क किती विश्वसनीय आहे आणि ग्राहकांनी भेसळ कशी ओळखावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुरप्रीत सैनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यानं अनेकजण सोनं खरेदी करत आहेत. बहुतेक लोक आपल्या दागिन्यांच्या शुद्धतेची खात्री करण्यासाठी खरेदी करताना हॉलमार्कवर अवलंबून असतात.
पण, हॉलमार्किंग करताना देखरेखीचा अभाव असल्याचा दावा माध्यमांमध्ये कॅगच्या (CAG) एका अहवालाचा हवाला देत करण्यात आला आहे.
या अहवालानुसार, 2020-21 ते 2024-25 या कालावधीत, मानक ब्युरोने (BIS) 83 टक्क्यांहून अधिक नोंदणीकृत सराफांची नियमानुसार वार्षिक तपासणी केली नाही.
पण, तपासणीचा झाली नसली तरी बाजारात विकला जाणारा प्रत्येक दागिना कमी शुद्ध असतो, असा त्याचा अर्थ होत नाही.
पण यानंतर हॉलमार्किंगनंतर नियमांचं पालन किती बारकाईनं केलं जातं असा प्रश्न उपस्थित होतो.
दरम्यान, सोन्यामध्ये रेनियमसारखे जड धातू मिसळले जात असल्याचीही चर्चा आहे. हा धातू काय आहे? त्याबद्दलचे दावे काय आहेत? आणि तज्ज्ञ काय म्हणतात? हे जाणून घेऊयात.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या (WGC) मते, गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत 15 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तसंच लग्नसराईमुळं दागिन्यांच्या मागणीत वाढ होऊ शकते. त्यामुळं, सोन्याची शुद्धता कशी तपासली जाते, हेही खरेदीदारांना माहिती असणं गरजेचं आहे.
BIS ने खरेदीदारांना काय सल्ला दिला?
BIS नं सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये याबाबत काही माहिती दिली आहे. सोन्याच्या दागिन्यांची केवळ चमक नव्हे, तर त्यांची सत्यताही तपासून पाहण्याचं आवाहन त्यात केले आहे.
तसंच बनावट हॉलमार्किंग टाळण्यासाठी, BIS केअर ॲपद्वारे दागिन्यांवरील HUID सत्यापित करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
खरेदीदारांनी 'सतर्क राहावं'आणि HUID ची पडताळणी करण्यासह फक्त BIS हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करावे असंही त्यात म्हटलं आलं आहे.
पण सोशल मीडियावरची ही पोस्ट म्हणजे अगदी सामान्य सल्ला आहे.
हॉलमार्क म्हणजे काय आणि त्याची शुद्धता कशी तपासतात?
हॉलमार्किंग म्हणजे दागिन्यांमधील सोन्याचं प्रमाण तपासणं आणि त्याची अधिकृत नोंद करणं. त्यासाठी सराफ BIS कडे नोंदणी करतात आणि दागिने BIS-मान्यताप्राप्त AHC (असेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर)मध्ये पाठवतात.
तिथं सोन्याच्या शुद्धतेची चाचणी केली जाते. चाचणीत ठरलेल्या कसोट्यांची पूर्तता झाल्यावर, दागिन्यांवर हॉलमार्क लावलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
1 जुलै 2021पासून, हॉलमार्कमध्ये तीन घटक असतात. BIS लोगो, कॅरेट आणि शुद्धता दर्शवणारा क्रमांक (जसे 22K916). तसंच सहा अक्षरी आणि सहा अंकी HUID कोड असतो. दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्याचा एक स्वतंत्र HUID असतो.
22 कॅरेट म्हणजे दागिन्यांमध्ये अंदाजे 91.6 टक्के सोने असते.
रेनियमची चर्चा का होत आहे?
गेल्या आठवड्यात दैनिक भास्करनं केलेल्या एका तपासानंतर सोन्यामध्ये रेनियम पावडर मिसळल्यानंतरही दागिने शुद्धता चाचणीत ते आढळलं नसल्याचा दावा केला होता.
या दाव्यांची अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आलेली नाही. तसंत हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर भेसळ झाल्याचा पुरावा नसल्याचं, माध्यमांनीही स्पष्ट केलं आहे.
रेनियमबद्दलची चिंता ही फक्त भारतापुरती मर्यादित नाही. चीनमध्येही सोन्यात रेनियम असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 'द स्ट्रेट्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, सरकारी वाहिनी सीसीटीव्हीने 26 एप्रिल रोजी याबाबत वृत्त दिलं होतं.
रेनियमच्या आधी सोन्यामध्ये इतर धातूंची भेसळ होण्याबद्दलही चिंता व्यक्त केली जात होती. 2005 मध्ये, सरकारनं लोकसभेत दिलेल्या माहितीत, रुथेनियम आणि इरिडियमसारख्या धातूंची भेसळ शोधण्यासाठी बीआयएसनं (BIS) मानकांमध्ये सुधारणा केली.

फोटो स्रोत, Getty Images
रेनियम हा एक अतिशय जड धातू आहे. त्याला चंदेरी चमक असते. हा धातू 3186 अंश सेल्सिअस तापमानावर वितळतो. समान आकाराच्या तुकड्यांची तुलना केल्यास, रेनियम शुद्ध सोन्यापेक्षा किंचित जड असतो.
त्याचा उपयोग जेट इंजिन टर्बाइन ब्लेडसाठी सुपरअलॉयमध्ये आणि पेट्रोलियम शुद्धीकरणासारख्या औद्योगिक क्षेत्रांत केला जातो.
भेसळीमध्ये त्याचा वापर होण्याचं कारण म्हणजे त्याची किंमत. हा सोन्यापेक्षा खूप जास्त स्वस्त असल्याचं म्हटलं जातं.
यंत्र कशी चूक करू शकते?
सोने प्रतिग्रॅमनुसार विकले जाते. कोणी त्यात स्वस्त, जड धातू मिसळला, तर दागिन्यांचं वजन तेच राहतं आणि त्यासाठी कमी सोनं लागतं. त्यामुळं कमी वापरलेल्या सोन्याचं मूल्य भेसळ करणाऱ्यांच्या खिशात जातं.
दागिन्यांमध्ये अशा धातूंचे मिश्रण केल्याची प्रकरणं यापूर्वीही उघडकीस आली असल्याचं, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे (AIJGF) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं आहे.
त्यांच्या मते, "पूर्वी अशा पावडर एक्सआरएफ चाचणीदरम्यान आढळून यायच्या, त्यामुळे त्याबद्दल कधीच फारशी चिंता वाटली नाही."
XRF म्हणजे 'एक्स-रे फ्लुरोसेन्स'. या तंत्रात दागिन्यांच्या पृष्ठभागावरील धातू आणि त्यांचं प्रमाण निश्चित करण्यासाठी एक्स-रे वापरले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
End of podcast promotion
पंकज अरोरा यांच्या मते, रेनियमची समस्या वेगळी आहे. सोनं सुमारे 1064अंश सेल्सिअस तापमानाला वितळतं. तर रेनियमला वितळण्यासाठी 3000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची आवश्यकता असते.
त्यामुळं, रेनियम सोन्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही आणि दागिन्यांमध्ये एका विशिष्ट ठिकाणी राहू शकते.
"मशीन संपूर्ण दागिने स्कॅन करत नाही. ते फक्त दागिने ठेवलेल्या जागेचीच तपासणी करते. हॉलमार्क सेंटरमध्येसुद्धा तपासणी फक्त काही ठराविक ठिकाणीच केली जाते," असं ते सांगतात.
चाचणीच्या ठिकाणी पावडर उपलब्ध नसेल, तर या चाचणीत दागिन्यांत त्रुटी आढळत नाही. मशीन अचूक असू शकते, परंतु मशीन ज्या ठिकाणी चाचणी करत आहे, त्या ठिकाणी पावडर उपलब्ध नसेल, अशी शक्यता असू शकते.
माध्यमांतील वृत्तानुसार, एक्सआरएफ चाचणीला काही तांत्रिक मर्यादा आहेत. चाचणीचे निकाल हे वापरलेले यंत्र, त्याच्या सेटिंग्ज आणि चाचणीच्या वेळची परिस्थिती यावर अवलंबून असू शकतात.
ग्राहकांच्या जुन्या दागिन्यांच्या चाचणीसाठीच्या 2022 च्या BIS मार्गदर्शक तत्त्वांनुसार, XRF फक्त दागिन्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या सोन्याचं प्रमाण मोजतं.
मात्र, अशी भेसळ लक्षात येतच नाही, याबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत.
ऑल बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंगला यांनी हॉलमार्किंग आणि एक्सआरएफ चाचणीद्वारे अशी भेसळ शोधता येत असल्याचं आयएएनएसला सांगितलं. सोशल मीडियावरील दावे अनावश्यक भीती पसरवत असल्याचंही ते म्हणतात.
इरिडियम आणि रुथेनियमबाबतही अशा चिंता अनेक दशकांपासून व्यक्त केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तुमच्याकडे असलेल्या दागिन्याचं काय?
सध्या तरी मोठ्या प्रमाणावर अशी भेसळ झाल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलनं (GJC) एक निवेदन प्रसिद्ध केलं असून ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही, BIS हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे असं म्हटलंय.
जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी भेसळीचा संशय आल्यास जीजेसीकडे किंवा थेट बीआयएसकडे तक्रार दाखल करता येते, असं सांगितलं.
त्यांनी लोकांना नामांकित सराफांकडून दागिने खरेदी करण्याचा आणि बीआयएस केअर ॲप वापरून हॉलमार्क तपासण्याचा सल्ला दिला.
तज्ज्ञांच्या मते, लग्नासारखी मोठी खरेदी करताना हॉलमार्क नक्कीच तपासला पाहिजे.
खरेदी करण्यापूर्वी सोने कसे तपासावे?
BIS केअर ॲप वापरून HUID तपासा करा. BIS च्या मते, प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून BIS केअर ॲप डाऊनलोड करा आणि "Verify HUID" हा पर्याय निवडा. त्यानंतर, दागिन्यांवर छापलेला सहा-अक्षरी HUID कोड एंटर करा.
ॲपवर दाखवलेली माहिती दागिन्यांशी जुळवा. यामध्ये सराफाचा नोंदणी क्रमांक, दागिन्यांची तपासणी करणारे हॉलमार्किंग केंद्र, दागिन्यांचा प्रकार आणि सोन्याची शुद्धता यांचा समावेश असेल.
BIS दागिन्यांचे एकूण वजन, हॉलमार्कची प्रतिमा आणि दागिन्यांचा फोटो तपासण्याचाही सल्ला देतं. कोणतीही माहिती जुळत नसल्यास, ॲपद्वारे लगेचच तक्रार दाखल करावी.

फोटो स्रोत, Getty Images
वैध जीएसटी बिल घ्यावे. त्यावर कॅरेट, वजन आणि एचयूआयडी (HUID) स्पष्टपणे नमूद केलेले असावे. कच्चे बिल मिळाले, तर सर्वात महत्त्वाचा पुरावाच तुमच्याकडे नसेल.
विश्वासू सराफाकडून दागिने खरेदी करा. कौटुंबिक किंवा नामांकित सराफाकडून दागिने खरेदी करण्याचा सल्ला पंकज अरोरा देतात. म्हणजे बिल हरवल्यास किंवा काही वाद निर्माण झाल्यास, समस्येचे निराकरण करता येतं असं ते सांगतात.
दागिन्यांबाबत काही शंका असल्यास, पुन्हा तपासणी करून घ्या. BIS-मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्र नाममात्र शुल्कात दागिन्यांची तपासणी करून देतं. तिथून लेखी रिपोर्टही मिळतो.
आपले हक्क जाणून घ्या. BIS नियमांनुसार, हॉलमार्क असलेल्या दागिन्याची शुद्धता त्यावर नमूद केलेल्या शुद्धतेपेक्षा कमी असल्याचं आढळलं, तर सराफानं खरेदीदाराला शुद्धतेतील कमतरतेच्या रकमेच्या दुप्पट रक्कम आणि चाचणी शुल्क परत करणं बंधनकारक आहे.
भेसळयुक्त सोनं कुठून येतं?
पंकज अरोरा यांच्या मते, बँकांमार्फत येणाऱ्या सोन्यात काही अडचण नसते. त्यांच्या मते, देशातील 11-12 नियुक्त संस्था बँकांमार्फत सोन्याची आयात करतात आणि प्रत्येक बारला क्रमांक दिला जातो. त्यामुळे ते कोणी निर्यात केलं हे ओळखण्यास मदत होते.
त्यांच्या मते, ही समस्या तस्करीच्या सोन्यामुळं निर्माण होते. "आयात शुल्क वाढवल्यानंतर अवैध सोनं येत आहे. त्याची जबाबदारी कोणावर नसते त्यामुळं शुद्धतेची हमीही कोणी देत नाही."
पण हे त्यांचं मत आहे. बीबीसीने याची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
सराफांना ते याबाबत सल्ला देतात. मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करताना त्याचा एक ग्रॅमचा तुकडा कापून, तो हातोड्याने खूप पातळ करून घ्यावा आणि नंतर यंत्रात तपासून पाहावा, असं ते सांगतात. त्यांच्या मते, हातोड्याने ठोकल्यामुळे धातू प्रसरण पावतो, त्यामुळे यंत्राला तो उचलणे शक्य होतं.
उद्योगांची मागणी आणि बीआयएस बैठक
इकॉनॉमिक टाइम्समधील एका वृत्तानुसार, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) BIS ला एक निवेदन सादर केलं आङे. त्यात तपासणी अचानक आणि अधिक कठोरपण करण्याचे मागणी केली आहे.
नोंदणीशिवाय काम करणाऱ्या सुमारे 4000 रिफायनर्सना BIS च्या देखरेखीखाली आणावं, अशी मागणीही या संघटनेनं केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























