कर्जतच्या साईडोंगर प्रकल्पाबाबत वृक्षतोड, वनहक्क आणि पर्यावरणावर टोरेंट पॉवरची पहिली सविस्तर प्रतिक्रिया

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधल्या साई डोंगर पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून सध्या मोठा वाद सुरू आहे.
फोटो कॅप्शन, महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधल्या साई डोंगर पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून सध्या मोठा वाद सुरू आहे.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधल्या साई डोंगर पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून सध्या मोठा वाद सुरू आहे.

या प्रकल्पाला वृक्षतोड, जैवविविधतेचा नाश, प्रकल्पाच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिकांच्या विस्थापनाच्या भीतीमुळे नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत.

वृक्षतोड, आदिवासींचे वनहक्क, पाण्याची उपलब्धता आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने टोरेंट पॉवर कंपनीला काही प्रश्न विचारले होते.

कंपनीने पहिल्यांदाच बीबीसी मराठीला या प्रकल्पासंदर्भात सविस्तर लेखी उत्तरे दिली आहेत.

साईडोंगर प्रकल्प नेमका काय आहे?

कर्जतच्या साईडोंगर इथे प्रस्तावित 3,000 मेगावॅट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज प्रकल्प हा 'वीज ग्रीडची स्थिरता राखणे, वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढवणे आणि अक्षय ऊर्जेचा अधिक वापर शक्य करणे' यासाठी उभारला जात असल्याचे कंपनी सांगितले आहे.

या प्रकल्पाला 12 जानेवारी 2026 रोजी पर्यावरणीय मंजुरी (EC) आणि 10 जुलै 2026 रोजी अंतिम वनमंजुरी (Final Forest Clearance) मिळाली.

प्रकल्पासाठी 233 हेक्टर वनक्षेत्र वळवण्यात येणार असून, त्याची भरपाई म्हणून वनीकरणासाठी सातारा जिल्ह्यातील 253 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे.

3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पर्यावरणीय जनसुनावणीला 442 जण उपस्थित होते, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

प्रकल्पाला विरोध होत आहे? कंपनीने यावर काय म्हटले?

सुरुवातीला काही हितसंबंधी गटांनी दिशाभूल करणारी विधाने केल्यानं प्रकल्पाला विरोध सुरू झाला, असा कंपनीचा दावा आहे.

'हा प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येतो आणि त्यामुळे भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर परिणाम होईल, अशी माहिती पसरवली.

मात्र, प्रकल्पाचे ठिकाण भीमाशंकर मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटरवर आहे. त्यामुळे ज्योतिर्लिंगावर किंवा अभयारण्यावर प्रकल्पाचा कोणताही परिणाम होणार नाही', असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

साईडोंगर 1 प्रकल्पाच्या पर्यावरणीय आघात अहवालावरील फोटो, टोरेंटच्या लोगोसह.
फोटो कॅप्शन, साईडोंगर 1 प्रकल्पाच्या पर्यावरणीय आघात अहवालावरील फोटो, टोरेंटच्या लोगोसह.

वृक्षतोड आणि प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली, त्याविषयी कंपनीनं म्हटलं आहे की 'सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर वन विभागाने वृक्षतोडीची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रकल्पाचे दीर्घकालीन पर्यावरणीय फायदे आणि वीज ग्रीडसाठी त्याचे महत्त्व कंपनीने 25 ऑक्टोबर रोजी प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले आहे.'

गावांचे प्रतिनिधी, बाधित जमीनधारक, ग्रामपंचायती आणि जिल्हा प्रशासनाशी पर्यावरणीय जनसुनावणी, गावपातळीवरील बैठका आणि लेखी निवेदनांच्या माध्यमातून संवाद साधल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

लोकांचा विरोध असताना टोरेंट पॉवर नियोजनानुसार पुढे जाईल की प्रकल्पावर पुनर्विचार करेल? या प्रश्नावर कंपनीने सांगितले, 'प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी आणि वनमंजुरीसह सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प नियोजित पद्धतीने पुढे नेण्याची कंपनीची भूमिका आहे.'

जनसुनावणीतील आक्षेपांवर काय झाले? गौरकामथची निवड का?

कर्जतच्या साईडोंगर, पाली, पोटल, आंबोट परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. पण या बाधित गावांऐवजी 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रकल्पासाठीची जनसुनावणी 14 किलोमीटर दूर गौरकामथ या गावात घेण्यात आली, यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता.

त्यावर कंपनीनं म्हटलं आहे की, 'जनसुनावणीचे ठिकाण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि जिल्हा प्रशासनाने निश्चित केले होते.

कर्जतमधला साईडोंगर-ढाक परिसर. वर्तुळातील जागेत वृक्षतोड सुरू झाली होती.
फोटो कॅप्शन, कर्जतमधला साईडोंगर-ढाक परिसर. वर्तुळातील जागेत वृक्षतोड सुरू झाली होती.

प्रकल्पाच्या ठिकाणापासूनचे अंतर, नागरिकांना पोहोचण्याची सोय आणि सहभागी होणाऱ्या नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून या ठिकाणाची निवड करण्यात आली होती.

जनसुनावणीचे वेळापत्रक 2 ऑगस्ट 2025 रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करून जाहीर करण्यात आले होते.'

या जनसुनावणीचे इतिवृत्त आणि त्यासंबंधित उत्तरे सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

'जनसुनावणीदरम्यान जमीन, पर्यावरण आणि सामाजिक परिणामांशी संबंधित मुद्द्यांची नोंद करण्यात आली होती. जनसुनावणीचे इतिवृत्त आणि कंपनीने प्रत्येक मुद्द्यावर दिलेली उत्तरे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने (EAC) विचारात घेतली, आणि त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली.'

23 दळी जमीनधारक आदिवासी कुटुंबांच्या वनहक्कांचा प्रश्न

या प्रकल्पासाठी आदिवासींच्या दळी जमिनींच्या व्यवहारावरही स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दळी जमीन हा महाराष्ट्रातील, विशेषतः रायगड जिल्ह्यातील वनक्षेत्रातील एक पारंपरिक व विशेष जमीन प्रकार आहे. ब्रिटिश राजवटीत आदिवासींच्या उपजीविकेसाठी या जमिनी सामूहिकरित्या आदिवासी वाड्यांना कसण्यासाठी देण्यात आल्या होत्या.

कर्जतमध्ये टोरेंटच्या प्रकल्पबाधित क्षेत्रावर 23 दळी जमीनधारक आदिवासी कुटुंब आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कुटुंबांच्या वनहक्कांबाबतचे प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हाताळण्यात आले आहेत.

ढाकच्या डोंगराकडून पाली गावाकडे येणारा रस्ता. टोरेंटचा कर्जतमधला प्रकल्प ज्या परिसरात होत आहे, तिथली ढाक, साईडोंगर, पोटल ही गावं पर्यावरण मंत्रालयाच्या ड्राफ्ट इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये प्रस्तावित आहेत.
फोटो कॅप्शन, ढाकच्या डोंगराकडून पाली गावाकडे येणारा रस्ता. टोरेंटचा कर्जतमधला प्रकल्प ज्या परिसरात होत आहे, तिथली ढाक, साईडोंगर, पोटल ही गावं पर्यावरण मंत्रालयाच्या ड्राफ्ट इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये प्रस्तावित आहेत.

'वनहक्कांशी संबंधित बाबींवर जिल्हास्तरीय समितीचे (DLC) प्रमाणपत्र, ग्रामसभेच्या नोंदी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांच्या आधारे सक्षम जिल्हा प्राधिकरणांकडून प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये वनहक्क कायद्यांतर्गत (FRA) प्रमाणपत्र जारी करण्यात आले.

'वनहक्क आणि उपजीविकेशी संबंधित प्रश्नांचे निराकरण अधिसूचित वनहक्क मंजुरी प्रक्रिया आणि लागू असलेल्या जमीन व नुकसानभरपाईच्या यंत्रणांनुसार केले जात आहे.'

मात्र, वनहक्क कायद्यांतर्गत प्रक्रिया आणि प्रमाणपत्राबाबत कंपनीने माहिती दिली असली, तरी PESA कायद्यांतर्गत ग्रामसभांची संमती किंवा सल्लामसलत नेमकी कशी झाली, याबाबत कंपनीने स्वतंत्र तपशील दिलेला नाही. या कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना ग्रामसभेच्या माध्यमातून स्वयंशासन आणि स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले आहेत.

जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या भविष्यातील उपजीविकेसाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार, याबाबतही कंपनीने स्पष्ट माहिती दिलेली नाही.

वृक्षगणना कशी झाली? प्रत्यक्ष किती झाडे तोडली?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रकल्पाने बाधित वनक्षेत्रातील झाडांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन सविस्तर गणना करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

'प्रत्येक झाडाच्या प्रजातीची स्वतंत्र नोंद करण्यात आली आणि प्रकल्पाच्या क्षेत्राशी त्यांचे नकाशाच्या आधारे मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र वन विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आणि वनजमीन वळवण्याच्या मंजुरी प्रक्रियेदरम्यान या नोंदींची छाननी करून पडताळणी केली.

या वृक्षगणनेच्या आधारे वृक्षतोडीची परवानगी देण्यात आली', असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, एकूण किती झाडांची गणना झाली, किती झाडे तोडण्याची परवानगी मिळाली आणि प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली, या प्रश्नावर कंपनीने प्रत्यक्ष आकडेवारी दिलेली नाही.

'वृक्षतोडीचे काम वन विभागाकडून केले जात आहे. एखाद्या विशिष्ट दिवशी प्रत्यक्ष किती झाडे तोडण्यात आली, याची माहिती वन विभागाकडे उपलब्ध असेल', असे कंपनीने उत्तरात म्हटले आहे.

वृक्षगणनेमध्ये एकाच झाडाला दोन वेगवेगळे क्रमांक दिल्याचे आणि जिओटॅगिंगमध्ये अनियमितता असल्याच्या आरोपांविषयी कंपनीने म्हटले आहे की, 'झाडांची गणना, ओळख निश्चित करणे, क्रमांक देणे, जिओटॅगिंग आणि वृक्षतोड या सर्व प्रक्रिया राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली निर्धारित वैधानिक प्रक्रियेनुसार केल्या जातात.

'मात्र, वृक्षतोडीला कायमस्वरूपी स्थगिती देण्यात आली आहे का किंवा पुढील काळात वृक्षतोड सुरू राहणार आहे का, याबाबत कंपनीने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

भरपाई वनीकरणासाठी दिलेल्या जमिनीवर आधीपासून 70 हजार झाडे

नव्या वृक्षारोपणामुळे नैसर्गिक जंगलाची तत्काळ भरपाई होऊ शकत नाही, हे कंपनीने मान्य केले आहे. नव्याने लावलेल्या झाडांना वाढण्यासाठी वेळ लागतो आणि त्यामुळे ही भरपाई टप्प्याटप्प्याने होते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

त्यामुळे पर्यावरणीय नुकसान कमी करण्याच्या उपाययोजनांमध्ये आधीपासून झाडे असलेली जमीन हस्तांतरित करणे, तिचे दीर्घकालीन संरक्षण करणे आणि इतर पर्यावरणीय उपाययोजनांचाही समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

याशिवाय, कंपनी स्वतः प्रकल्पाच्या ग्रीन बेल्टमध्ये, माती-दगड टाकण्याच्या ठिकाणी आणि प्रकल्पाच्या इतर भागांमध्ये सुमारे 60,000 झाडे लावणार आहे.

वरदायिनी देवीचं कुंड म्हणून ओळखली जाणारी ही जागा म्हणजे महासीर माशांचं नैसर्गिक आश्रयस्थान आहे.
फोटो कॅप्शन, वरदायिनी देवीचं कुंड म्हणून ओळखली जाणारी ही जागा म्हणजे महासीर माशांचं नैसर्गिक आश्रयस्थान आहे.

कंपनीने 253 हेक्टर (सुमारे 625 एकर) खासगी जमीन ही भरपाई वनीकरणासाठी वन विभागाला दिली असल्याचा दावा केला आहे.

ही जागा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असून आधीपासूनच 70,000 झाडे आहेत. याशिवाय वन विभागाकडून आणखी 30,000 झाडे लावण्याचे नियोजन आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

भीमाशंकर अभयारण्य आणि वन्यजीवांवर परिणाम होणार का?

प्रकल्पाचे ठिकाण भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटरवर आहे. अलिबागच्या उपवनसंरक्षकांनी 6 जून 2025 रोजी दिलेल्या पत्रातही हा प्रकल्प अभयारण्य क्षेत्राबाहेर असल्याचे म्हटले आहे.

मात्र हे अंतर जंगली प्राण्यांच्या दृष्टीनं फार मोठं नसल्याचं पर्यावरणप्रेमी सांगतात. इथे वृक्षतोडीनंतर काही प्राणी मृतावस्थेत आढळल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलं होतं.

बीबीसीनं या प्रकल्पामुळे वन्यजीवांवर परिणाम काय होईल, याविषयी कंपनीला प्रश्न विचारले.

बहुतांश पंप्ड स्टोरेज प्रकल्प नद्यांची उगमस्थानं असलेल्या ठिकाणी प्रस्तावित आहेत अशी माहिती परिणीता दांडेकर देतात.
फोटो कॅप्शन, बहुतांश पंप्ड स्टोरेज प्रकल्प नद्यांची उगमस्थानं असलेल्या ठिकाणी प्रस्तावित आहेत अशी माहिती परिणीता दांडेकर देतात.

प्रकल्पाच्या कामात आतापर्यंत वन्यजीव जखमी झाल्याच्या किंवा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत का, या प्रश्नावर कंपनीने म्हटले आहे, 'वृक्षतोडीचे काम वन विभागाकडून केले जात आहे. त्यामुळे वन्यजीव जखमी झाल्याची कोणतीही माहिती असल्यास ती वन विभागाकडे उपलब्ध असेल.'

प्रकल्पाच्या परिसरातील वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांबाबत (Wildlife Corridors) स्वतंत्र अभ्यास झाला आहे का आणि त्याचे निष्कर्ष काय आहेत, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

पर्यावरणीय मंजुरीमधील अटींचे पालन होत असल्याबाबतचे अहवाल दर सहा महिन्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करणे आवश्यक आहे. हे अहवाल कंपनीच्या वेबसाइटवरही प्रसिद्ध करावे लागतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

स्फोट, भूस्खलन आणि बांधकामामुळे घरांना धोका?

प्रकल्पासाठी खोदकाम आणि नियंत्रित स्फोटांची प्रक्रिया मंजूर पर्यावरण व्यवस्थापन आराखड्यानुसार (EMP) तसंच वैधानिक स्फोटक परवानग्या आणि जागेच्या परिस्थितीनुसार निश्चित केलेल्या अभियांत्रिकी नियंत्रणांच्या आधारे केली जाईल' असं कंपनीनं म्हटलं आहे.

पर्यावरणीय मंजुरीमध्ये परवानाधारक किंवा अधिकृत संस्थांकडूनच स्फोट घडवणे, भूस्खलन आणि अतिवृष्टीच्या काळातील सुरक्षिततेची काळजी घेणे तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

'बांधकामाचे नियोजन करताना योग्य स्फोट आराखडा, निरीक्षण आणि जवळच्या इमारती तसेच पाण्याच्या स्रोतांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल. अंतर आणि संभाव्य धोक्याच्या दृष्टीने आवश्यक असेल, तिथे काम सुरू करण्यापूर्वी आसपासच्या बांधकामांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण आणि संबंधितांशी संवाद साधण्याची व्यवस्था केली जाईल', असे कंपनीने सांगितले आहे.

खोदकामातून बाहेर पडणारा दगड आणि मातीचे ढिगारे टाकण्यासाठी वनक्षेत्राबाहेरील जमिनीवर तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्यातले प्रकल्पाच्या बांधकामासाठी उपयोगी ठरणारे साहित्य पुन्हा वापरण्यात येणार आहे असंही कंपनीनं म्हटलं आहे.

पर्यावरणीय अहवालाची स्वतंत्र तपासणी होणार; प्रकल्प सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी अभ्यास

प्रकल्पाच्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवालाची (EIA) स्वतंत्रपणे पडताळणी कशी होणार, असा प्रश्न कंपनीला विचारण्यात आला होता.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, पर्यावरणीय मंजुरी देण्यापूर्वी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि पर्यावरण व्यवस्थापन आराखड्याचा (EIA/EMP) वैधानिक जनसुनावणी प्रक्रियेद्वारे विचार करण्यात आला होता, त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने त्याची तपासणी केली.

याशिवाय, प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाच वर्षांनी पर्यावरणीय परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करणे आणि तटस्थ संस्थेकडून पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणामांचे मूल्यांकन (Post-EIA/SIA Assessment) करणे, अशी अट पर्यावरणीय मंजुरीमध्ये घालण्यात आली आहे.

मात्र, संपूर्ण प्रकल्पाचा ब्लूप्रिंट सार्वजनिक करण्याबाबत कंपनीने सुरक्षेचे कारण दिले आहे. महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांचा संपूर्ण आराखडा दर्शवणारी माहिती सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक करता येत नाही, असे कंपनीने उत्तरात म्हटले आहे.

प्रकल्पासाठी किती पाणी लागणार? कमी पाऊस पडल्यास काय होणार?

या प्रकल्पामुळे परिसरातील पिण्याचे पाणी, सिंचन आणि भूजलावर कोणताही प्रतिकूल परिणाम होण्याची अपेक्षा नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

'पंप्ड स्टोरेजमध्ये मर्यादित प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, कारण तेच पाणी पुन्हा पुन्हा वापरले जाते. पण बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट भरून काढण्यासाठी दरवर्षी एकूण पाण्याच्या केवळ 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्यकता आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

प्रकल्पाच्या सुरुवातीला जलाशय भरण्यासाठी 230 लाख घनमीटर (MCM) पाणी आणि दरवर्षी 30 लाख घनमीटर पाणी आवश्यक असेल. हे पाणी पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रातून गोळा केले जाणार आहे.

'जलसंपदा विभागाच्या जलवैज्ञानिक मूल्यांकनानुसार प्रस्तावित खालच्या धरणाच्या ठिकाणी 90 टक्के विश्वासार्हतेने उपलब्ध होणारे पाणी सुमारे 34.177 दशलक्ष घनमीटर आहे. याउलट दरवर्षी प्रकल्पासाठी केवळ 3 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे.'

साईडोंगर आणि ढाकच्या डोंगरामधून वाहात पाली गावाकडे येणारी पेज नदी. उल्हास नदीची ही उपनदी या परिसरात जपली जाते.
फोटो कॅप्शन, साईडोंगर आणि ढाकच्या डोंगरामधून वाहात पाली गावाकडे येणारी पेज नदी. उल्हास नदीची ही उपनदी या परिसरात जपली जाते.

'खालच्या जलाशयात पाणी साठवले जाणार आहे ते अन्यथा वाहत जाऊन समुद्राला मिळाले असते. त्यामुळे प्रत्यक्षात या जलाशयामुळे भूजल पुनर्भरणासही मदत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.'

महाराष्ट्र शासनाच्या 2023 च्या पंप्ड स्टोरेज प्रकल्प धोरणांतर्गत सक्षम प्राधिकरण असलेल्या जलसंपदा विभागाच्या नाशिक येथील जलवैज्ञानिक विभागाकडून 13 जानेवारी 2025 रोजी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

या प्रमाणपत्रामध्ये या प्रकल्पाचा विद्यमान धरणांतील पाण्याच्या सिंचन किंवा पिण्यासाठी वापरावर परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.

मात्र, कमी पाऊस पडला किंवा दुष्काळ आला आणि पाण्याची उपलब्धता कमी झाली, तर अशा वेळी जलाशयातील पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाईल की पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल, याविषयी कंपनीनं काही म्हटलेलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)