अवयव दान करायची इच्छा अन् अचानक ओढवला मृत्यू, तरूणामुळं सहा जणांना मिळालं जीवनदान

रक्तस्रावामुळे 25 वर्षीय गौरव 'ब्रेन-डेड' (मेंदू मृत) घोषित झाल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याचे अवयव दान केले.

फोटो स्रोत, Sameer Khan

फोटो कॅप्शन, रक्तस्रावामुळे 25 वर्षीय गौरव 'ब्रेन-डेड' (मेंदू मृत) घोषित झाल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याचे अवयव दान केले.
    • Author, समीर खान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मध्य प्रदेशातील इंदूरमधील 25 वर्षीय गौरवनं आपल्या मृत्यूच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच आपलं अवयव दान करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली होती.

मुलाला 'ब्रेन-डेड' घोषित करण्यात आल्यानंतर खोल दुःखात बुडालेल्या त्याच्या आईला, म्हणजेच कविता दवे यांना, गौरवनं दोन महिन्यांपूर्वी व्यक्त केलेली इच्छा आठवली.

मुलाच्या याच इच्छेचा सन्मान करत कुटुंबीयांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं सहा जणांना नवं आयुष्य मिळालं.

इंदूरच्या या तरुणाचं हृदय, यकृत, किडनी आणि डोळे आता इतरांसाठी जीवनदान देणारे ठरतील.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, अवयवदानासाठी गौरवला 'गार्ड ऑफ ऑनर' अर्थात मानद सलामीसह अखेरचा निरोप देण्यात आला.

सहा जणांचं आयुष्य बदललं

13 जुलै रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे गौरव दवेला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर काही दिवस उपचार करण्यात आले. परंतु, 26 जुलै रोजी डॉक्टरांनी त्याला 'ब्रेन-डेड' घोषित केलं.

एकुलत्या एका मुलाचा अकाली मृत्यू हा या कुटुंबासाठी अत्यंत कठीण क्षण होता.

पण त्याचवेळी, गौरवच्या आई-वडिलांना घरी झालेल्या एका साध्या संभाषणादरम्यान गौरवनं म्हटलेली एक गोष्ट लख्खपणे आठवत होती.

गौरवचे वडील सतीश दवे खाजगी बँकेत काम करतात.

त्यांनी सांगितलं की, "सुमारे दोन महिन्यांपूर्वी आम्ही सर्वजण एकत्र जेवत असताना गौरवनं आपल्या आईला सांगितलं होतं की, जर त्याला कधी काही झालंच, तर त्याचे अवयव दान करण्यात यावेत.

त्यावेळी त्या गोष्टीकडे फारसं कोणाचंच लक्ष गेलं नाही. पण जेव्हा डॉक्टरांनी त्याला 'ब्रेन-डेड' घोषित केलं, तेव्हा त्याच्या आईला ते शब्द आठवले."

त्याच वेळी, इंदूरमध्ये प्रशासनासोबत मिळून अवयवदानास प्रोत्साहन देण्याचं काम करणाऱ्या 'मुस्कान' या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी त्या कुटुंबाची भेट घेतली.

त्यांनी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आणि त्यांना यावर विचार करण्यास प्रोत्साहित केलं.

आपल्या मुलाची इच्छा आणि त्या संस्थेचा सल्ला लक्षात घेऊन, दवे दाम्पत्यानं मुलाच्या अवयवदानास संमती दिली. त्यांच्या या एका निर्णयामुळे इतर सहा जणांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे.

कास्टिंग डायरेक्टर होता गौरव

अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सुशील जैन यांनी सांगितलं की, "कुटुंबाची संमती मिळाल्यानंतर, नॅशनल प्रोटोकॉल आणि वेटिंग लिस्टच्या आधारे हे अवयव कुणाला दिले जातील, याचा निर्णय घेण्यात आला."

त्यांनी सांगितलं की, गौरव दवेचं हृदय अहमदाबादमधील एका हॉस्पीटलमधील एका रूग्णाला प्रत्यारोपित करण्यात आलं.

त्याचं यकृत इंदूरमधील एका रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आलं, तर दोन्ही मूत्रपिंडं त्याच शहरातील रुग्णालयात दाखल असलेल्या दोन रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आली.

त्याचे डोळेही दोन गरजू रुग्णांना दान करण्यात आले. फुफ्फुसेही चेन्नईला पाठवण्याचं नियोजित होतं. परंतु, वाहतूक व व्यवस्थापनाशी संबंधित अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.

आपल्या मुलाला गमावल्यामुळे सतीश दवे अत्यंत दुःखात आहेत, तरीही त्यांना या गोष्टीचा दिलासा आहे की त्यांच्या मुलाचे अवयव अनेक जीवनांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.

फोटो स्रोत, Sameer Khan

फोटो कॅप्शन, आपल्या मुलाला गमावल्यामुळे सतीश दवे अत्यंत दुःखात आहेत, तरीही त्यांना या गोष्टीचा दिलासा मिळतो की त्यांच्या मुलाचे अवयव अनेक जीवनांसाठी आशेचा किरण ठरले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इंदूरच्या खजुरी बाजारमध्ये राहणारा गौरव दवे फिल्म कास्टिंग डायरेक्टर होता. तो मुंबई आणि इंदूर अशा दोन्ही ठिकाणी काम करत होता.

त्याचा मित्र तनय जोशी सांगतो की, "गौरव हा अत्यंत मनमिळाऊ आणि स्वप्नाळू असा व्यक्ती होता. आमची 17 वर्षांची मैत्री होती. त्याला आयुष्यात एक महान व्यक्ती बनायचं होती आणि पहा, मृत्यूनंतरच्या अवयवदानानं त्याला खरोखरच महान बनवलेलं आहे. आज सोशल मीडियावर लोक 'रील्स' बनवून त्याच्या स्मृती जागवत आहेत."

तनय जोशीनं पुढे सांगितलं की, "गौरव त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्यावर आई-वडिलांची आणि बहिणीची जबाबदारी होती. त्याच्या निधनामुळे त्याचं कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे.

दुःखातिरेकामुळे आणि सततच्या रडण्यामुळे त्याची आई अनेकदा बेशुद्ध पडते. तो जाण्यापूर्वी तीन दिवस आधीच आम्हाला समजलं होते की, त्याच्या जगण्याची आता कोणतीही आशा उरलेली नाही.

तेव्हाच आम्ही त्याच्या पालकांशी अवयवदानाबाबत चर्चा केली. अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना हे समाधान मिळालं आहे की, गौरवचा एक अंश आजही इतरांमध्ये जिवंत आहे."

गौरव दवे आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत; मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्याला 'ब्रेन-डेड' घोषित करण्यात आले होते (फाईल फोटो).

फोटो स्रोत, Sameer Khan

फोटो कॅप्शन, गौरव दवे आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत; मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्याला 'ब्रेन-डेड' घोषित करण्यात आले होते (फाईल फोटो).

दोन 'ग्रीन कॉरिडॉर्स'द्वारे अवयवांची ने-आण

'ब्रेन-डेड' घोषित करण्यात आलेल्या गौरवचे अवयव विविध रुग्णालयांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी इंदूरमध्ये 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेचं नियोजन करण्यासाठी प्रशासन, वाहतूक पोलीस, विमानतळ प्राधिकरण आणि डॉक्टरांच्या पथकानं एकत्रितपणे काम केलं.

प्रत्यारोपण करण्यासाठी हृदय नेण्याकरिता अहमदाबादहून इंदूरला एक पथक आलं. विशेष व्यवस्थांच्या अंतर्गत, गौरवचं हृदय अहमदाबादला नेण्यात आलं आणि अवघ्या 171 मिनिटांत त्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. विमानतळ प्राधिकरण, वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशासनानं एकत्रितपणे या संपूर्ण प्रक्रियेचं नियोजन केलं.

मानवी अवयव वेळेवर रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंदूर वाहतूक पोलिसांनी दोन 'ग्रीन कॉरिडॉर' तयार केले.

रुग्णालयात गौरवचा अंतिम निरोप घेताना फुलांचा वर्षाव करण्यात आला.

फोटो स्रोत, Sameer Khan

फोटो कॅप्शन, रुग्णालयात गौरवला अंतिम निरोप देताना फुलांचा वर्षाव करण्यात आला.

27 जुलैच्या सकाळी पहिला ग्रीन कॉरिडॉर सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी अपोलो हॉस्पिटलपासून एअरपोर्टपर्यंत तयार करण्यात आला. फक्त 13 मिनिटांतच हे अंतर कापण्यात आलं.

दुसरा ग्रीन कॉरिडॉर सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी चोइथराम हॉस्पिटलपर्यंत तयार करण्यात आला. हे अंतर अवघ्या 16 मिनिटांत कापण्यात आलं. या दरम्यान असणाऱ्या मार्गांवरील दळणवळण पूर्णपणे रोखण्यात आलं होतं. जेणेकरून, कोणत्याही अडथळ्याशिवाय हे अवयव पोहोचवले जावेत. इंदूरमधील हा 68 वा ग्रीन कॉरिडॉर होता.

इंदूरमध्ये अवयवदानासाठी प्रशासनासोबत काम करणाऱ्या 'मुस्कान' या सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक जितेंद्र बागानी (जीतू) यांनी सांगितलं की, गेल्या दहा वर्षांत शहरात 68 'ग्रीन कॉरिडॉर्स' तयार करण्यात आले आहेत.

शहरात अंदाजे 19 हजार नेत्रदान, 1100 हून अधिक त्वचादान आणि 300 हून अधिक संपूर्ण देहदान झाले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)