You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोलीस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, चकमकीदरम्यान आरोपीला लागली गोळी
दिल्लीतील कालकाजी मंदिराजवळ असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेतील आरोपीला पकडताना चकमक झाली आणि त्यात आरोपी जखमी झाला आहे.
मंगळवारी (22 सप्टेंबर रोजी) या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआय वृत्तसंस्थेनी माहिती दिली की, अमर कॉलनी परिसरात डीएम ऑफिस रोड जवळ पोलिसांनी आरोपाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर तीन राउंड फायर केले.
त्यातील एक गोळी हेड पोलीस काँस्टेबल राजेश यांच्या बुलेटप्रुफ जॅकेटला लागली. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात फायरिंग केली त्यातील एक गोळी आरोपी असिफच्या डाव्या पायावर लागली. आरोपीला तत्काळ एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले.
'पोलीस-वकिलांप्रमाणे वापरली भाषा'
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी एक 17 वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत कालकाजी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेली होती.
मुलगा आणि मुलगी आधी देवीच्या दर्शनाला गेले आणि त्यानंतर जवळच असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये गेले. तिथे तीन जण आले. त्यांनी स्वतःची पोलीस अशी ओळख करून दिली, असे जॉइंट सीपी सदर्न रेंज विजय कुमार यांनी माहिती देताना सांगितले.
पोलीस आणि वकील जशी भाषा बोलतात त्या प्रमाणे ते त्यांच्याशी बोलले. त्यांनी म्हटले की तुम्ही अल्पवयीन आहात आणि काही चुकीचं करत आहात तुमच्याविरोधात केस दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर त्यांनी त्या मुलाला पकडून ठेवले आणि नंतर मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
मुलीने तक्रार दाखल केली आहे आणि तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे असे पोलिसांनी सांगितले.
आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केली?
या प्रकरणात अमर कॉलनी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी टीम तयार केली. या दरम्यान, आसिफच्या हालचालींबाबत टीप मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.
आसिफला अटक करताना त्या ठिकाणी चकमक झाली. पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हे आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. अन्य दोन आरोपी फरार आहेत.
जॉइंट सीपी विजय कुमार यांनी सांगितले की आज सकाळी (मंगळवारी) झालेल्या चकमकीत आरोपी आसिफला पकडण्यात आले आहे. इतर दोन आरोपींना लवकरच पकडण्यात येईल आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
महिलाविरोधातील गुन्ह्यात सर्व महानगरांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर
महिला विरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणात दिल्ली शहर हे देशातील 19 महानगरांत पहिल्या क्रमांकावर आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या क्राइम इन इंडिया 2024 च्या रिपोर्टनुसार दिल्लीत बलात्कार, अपहरण, हुंडाबळी यासारखे गुन्हे सर्वाधिक जास्त नोंदवले गेले आहेत.
रिपोर्टनुसार दिल्लीत 2024 मध्ये महिलांविरोधातील एकूण 13,396 गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यात 1058 गुन्हे बलात्काराचे आहेत. ही संख्या बाकी महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
एनसीआरबीने अद्याप 2025 ची रिपोर्ट प्रसिद्ध केली नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.