मुंबईतल्या आश्रमातून दत्तक गेलेल्या मीना आणि मिनलची गोष्ट; नेदरलँडमध्ये मैत्री, DNA टेस्टनं उलगडलं 'खरं' नातं

डीएनए टेस्टमधून दोघी सख्ख्या बहिणी असल्याचं समोर आल्यानंतर मीना गेल्टिंक आणि मिनल तिजसेन ऑगस्टमध्ये पहिल्यांदा भेटल्या.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डीएनए टेस्टमधून दोघी सख्ख्या बहिणी असल्याचं समोर आल्यानंतर मीना गेल्टिंक आणि मिनल तिजसेन ऑगस्टमध्ये पहिल्यांदा भेटल्या.
    • Author, गीता पांडे
    • Role, वूमेन अफेअर्स एडिटर, भारत
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

या दोघींच्या खऱ्या आयुष्याची गोष्ट एखाद्या सिनेमाची कथा शोभावी अशीच आहे!

भारतात जन्मलेल्या दोन सख्ख्या बहिणींना वेगवेगळ्या कुटुंबांनी दत्तक घेतलं. नेदरलँड या देशात त्या एकाच भागात एकमेकींच्या जवळच लहानाच्या मोठ्या झाल्या.

दोघीही घट्ट मैत्रिणी होत्या.

पुढे दोघींची डीएनए टेस्ट झाली आणि त्यातून जे समोर आलं, ते अगदी एखाद्या सिनेमाची कथा वाटावी असंच.

या दोघीही सख्ख्या बहिणी असल्याचं त्यांना कळलं. दोघीही आता वयाच्या चाळीशीत आहेत.

मीना गेल्टिंक आणि मिनल तिजसेन असं या दोघींची नावं. त्यांचा जन्म 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला झाला.

जन्मानंतर काही महिन्यांतच मुंबईतील दोन वेगवेगळ्या अनाथाश्रमांतून दोघींना वेगवेगळ्या कुटुंबांनी दत्तक घेतलं होतं.

त्या दोघी लहानपणी म्हणजे किशोरवयात पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेटल्या. त्यांच्या पालकांनी ज्या दत्तक संस्थेच्या माध्यमातून त्यांना दत्तक घेतलं होतं, त्या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

भेटल्यानंतर दोघींनाही त्यांच्या दिसण्यात आणि हावभावांमध्ये खूप साम्य असल्याचं जाणवलं.

रियुनियनला भेटल्या आणि पुन्हा संपर्क तुटला

आता 43 वर्षांच्या असलेल्या मीनाला तो दिवस आजही तितकाच स्पष्टपणे आठवतो. त्या सांगतात, "मुख्य कार्यक्रम शनिवारी होता. त्यासाठी दत्तक घेतलेल्या मुलांचे कुटुंब एकत्र येणार होतं. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी सायंकाळी, सर्व दत्तक मुलांना एकत्र आणलं होतं. त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला, गप्पा मारल्या आणि एकत्र जेवणही केलं."

मीना आणि मिनल दोघीही त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत होत्या. त्यांचं एकमेकींसारखं दिसणं पाहून त्यांच्या मित्रांनी दोघींना एकत्र आणलं होतं.

"त्यांनी आम्हाला आरशात स्वतःकडे पाहायला सांगितलं. तेव्हा मला वाटलं, अरे देवा! तिचं नाक अगदी माझ्यासारखंच आहे की. आमचं हसणंही अगदी सारखं आहे. जेवताना मी संपूर्ण वेळ तिच्याकडेच पाहत होते," असं मीनाने नेदरलँड्समधील आपल्या घरातून बीबीसीला सांगितलं.

मीना आणि मिनल यांची पहिली भेट किशोरवयात झाली. नंतर त्यांच्या चांगली मैत्री झाली.

फोटो स्रोत, Meena Geltink

फोटो कॅप्शन, मीना आणि मिनल यांची पहिली भेट किशोरवयात झाली. नंतर त्यांच्या चांगली मैत्री झाली.

दुसऱ्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात दोघींनी एकमेकींचे फोन नंबर आणि पत्ते यांची देवाण-घेवाण केली आणि पुढेही संपर्कात राहण्याचं त्यांनी ठरवलं.

दोघींचं रक्ताचं नातं असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. तरीही त्यांची पहिल्याच भेटीत खूप चांगली मैत्री झाली. अनेक वर्षे त्या एकमेकींना पत्रं लिहित राहिल्या. त्यात त्या अनेकदा एकमेकींना 'बहीण' (सिस) असंच म्हणत, 'कारण त्यांना एकमेकींबद्दल तसं वाटायचं.'

त्या शाळा, मित्रमैत्रिणी, मुलं, बाहेर फिरायला जाणं आणि नाचणं अशा अनेक गोष्टींबद्दल एकमेकींना सांगायच्या. त्या कोणते खेळ खेळतात याबद्दलही बोलायच्या. संगीताची आवडही दोघींची सारखीच होती. विशेष म्हणजे, दोघींनाही बॅकस्ट्रीट बॉईज हा बँड खूप आवडायचा.

यानंतर तब्बल 15 वर्षे त्यांचा एकमेकींशी संपर्क राहिला नाही. आता 3 मुलांची आई असलेली मीना सांगते की, त्यावेळी तिला पहिलं मूल झालं होतं आणि ती त्यात ती गुंतून गेली. तर मिनल फ्रान्समध्ये राहायला गेली.

DNA टेस्ट ठरली निर्णायक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2017 मध्ये मीना भारतातून दत्तक घेतलेल्या मुलांच्या एका कार्यक्रमाला गेली. तिथे तिला डीएनए टेस्टबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तिनेही डीएनए टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला.

साधारण 10 वर्षे तिला कोणताही डीएनए मॅच सापडला नाही. याच वर्षाच्या सुरुवातीला फोनमध्ये जागा (स्पेस) कमी पडत असल्यामुळे मीनाने ते ॲप फोनमधून डिलीट केलं.

"20 मे रोजी मला मिनलचा फेसबुकवर मेसेज आला. तिने विचारलं, 'मला ओळखलं का?' एप्रिलमध्ये ती तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी नेदरलँड्समध्ये आली होती. त्यावेळी तिने डीएनए टेस्ट केली होती. तिने त्या टेस्टच्या निकालाचा स्क्रीनशॉटही मला पाठवला होता," असं मीनाने सांगितलं.

"मी पुन्हा ते ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केलं. मी इतकी घाबरले होते की, लॉगिन करताना 10 वेळा चुकीचा पासवर्ड टाकला."

निकाल अगदी स्पष्ट होता - डीएनए टेस्टमध्ये तिचा '100 टक्के मॅच' झाला होता.

"माझी एक 'सख्खी बहीण' आहे, म्हणजे आमचे आई-वडील एकच आहेत."

"मला जणू अचानक मोठा धक्का बसल्यासारखं झालं. माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. मीना माझ्या आयुष्याचं कोड्याचा ती एक हरवलेला भाग होती, ज्याची मी अनेक वर्षे वाट पाहत होते. आम्ही एकमेकींना बहीण म्हणायचो. या डीएनए मॅचमुळे आम्हाला जे आधीपासूनच वाटत होतं, ते खरं असल्याचं सिद्ध झालं."

मीना आणि मिनल किशोरवयात असतानाचे त्यांचे फोटो पाहत आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मीना आणि मिनल किशोरवयात असतानाचे त्यांचे फोटो पाहत आहेत.

ऑगस्टमधील एका सुंदर दिवशी एका पार्कमध्ये या जुन्या मैत्रिणी, बहिणी म्हणून पहिल्यांदाच भेटल्या.

"तो क्षण खूप खास होता. आम्ही जणू पुन्हा एकत्र आलो आहोत, असंच वाटत होतं. अनेक वर्षांपासून माझ्या आणि मिनलच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. आता मात्र आमचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. सगळं आता योग्य जागी आल्यासारखं वाटतं," असं मीनाने म्हटलं.

रॉयटर्सने त्यांच्या या 'भावूक पुनर्भेटी'बद्दल सांगताना म्हटलं की, त्यांच्या भेटीत "अश्रू, मिठी आणि हसण्याचे क्षण होते. त्यानंतर दोघींनी पहिल्यांदाच एकत्र सेल्फीही घेतली."

फ्रान्समध्ये आपल्या जोडीदारासोबत आणि दोन मुलांसह राहणाऱ्या 44 वर्षीय मिनलने सांगितलं की, एप्रिलमध्ये डीएनए टेस्टचा निकाल आला तेव्हा सुरुवातीला तिला हे समजलं नाही की, हा मॅच 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलेल्या त्याच मुलीशी आहे, जिने तेव्हा तिला घट्ट मिठी मारली होती.

मिनलने सोशल मीडियावर मीनाचे फोटो पाहिले, तेव्हा तिला सगळं समजलं. "हे पाहून तिला विश्वासच बसला नाही. आम्ही बहिणी होण्याआधी मैत्रिणी होतो. खरं तर आम्ही तेव्हापासूनच बहिणी होतो, केवळ आम्हाला त्याची कल्पना नव्हती," असं तिने म्हटलं.

बायोलॉजिकल आई-वडील जाणून घेण्याचा प्रयत्न

1980 च्या दशकात मीना आणि मिनल यांना दोन वेगवेगळ्या अनाथाश्रमातून नेदरलँड्समधील दोन वेगवेगळ्या दाम्पत्यांनी दत्तक घेतलं होतं.

मीना सांगते की, ती नेदरलँड्समधील एका छोट्या गावात प्रेमळ कुटुंबात वाढली. "माझे आई-वडील एका खासगी शाळेत शिक्षक होते. खरं तर तेच मला शाळेत शिकवायचे. ते खूप प्रेमळ आणि विश्वासू वृत्तीचे होते."

काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं. पण, तिची आई अजूनही त्याच गावात राहते. "आमचं रोज बोलणं होतं. आजही मला तिच्याजवळ सुरक्षित वाटतं," असं मीना सांगते.

2003 मध्ये, मीना 19 वर्षांची असताना, ती आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईतील त्या अनाथाश्रमात गेली होती. त्यांच्यासोबत त्यावेळी गोव्यातून दत्तक घेतलेला त्यांचा भाऊही होता.

त्यांनी सुमारे दोन आठवडे अनाथआश्रमातील कागदपत्रं तपासली. मीनाचे जन्मदाते (बायोलॉजिकल) आई-वडील कोण आहेत, याचा शोध ती घेत होती.

"माझ्यासाठी मी कुठून आले, माझी आई कोण होती, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं. परंतु, अनाथाश्रमाने त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला," असं मीना सांगते.

आता तासन् तास फोनवर गप्पा

मे महिन्यापासून मीना आणि मिनल एक दिवसाआड एकमेकींशी बोलतात. दोघींनी एकमेकींचे जोडीदार, मुलं, भाऊ आणि आई-वडिलांचीही भेट घेतली आहे.

"आम्ही एकमेकींचं वाक्य कसे पूर्ण करतो, डोकं हलवण्याची आमची पद्धत आणि चालण्याची ढबही सारखीच आहे, हे सर्वांच्या लक्षात येतं," असं ती सांगते.

मीना सांगते की, आम्ही दोघी बहिणी आहोत, ही गोष्ट अजूनही त्यांना नीट पटलेली नाही. आता इतकी वर्षं हरवलेल्या वेळेची भरपाई करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत.

"कधी कधी आम्ही दोन-दोन तास बोलत राहतो आणि वेळ कसा जातो, हेच समजतच नाही. अचानक आठवतं की, आपल्याला किराणा सामान घ्यायचं आहे किंवा मुलांना शाळेतून आणायचं आहे."

1990च्या दशकात एका वीकेंड कार्यक्रमात किशोरवयातील मीना आणि मिनल.

फोटो स्रोत, Meena Geltink

फोटो कॅप्शन, 1990च्या दशकात एका वीकेंड कार्यक्रमात किशोरवयातील मीना आणि मिनल.

मीना सांगते की, ती आणि तिची बहीण पुन्हा एकदा त्या ठिकाणी जायला खूप उत्सुक आहेत, जिथून त्यांच्या आयुष्याची ही गोष्ट सुरू झाली.

"आम्हा दोघींना कधीतरी एकत्र भारतात जायला खूप आवडेल. मुंबईच्या रस्त्यांवरही एकत्र फिरायला आम्हाला आवडेल."

"असे अनेक प्रसंग आले, जेव्हा आम्हा दोघींनाही खूप एकटं वाटलं. उदाहरणार्थ, माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा किंवा माझं प्रेमभंग झाला तेव्हा.

अशा वेळी आम्ही एकमेकींसोबत राहू शकलो नाही, याचं मला वाईट वाटतं. आम्ही एकमेकींचं सुख वाटून घेऊ शकलो असतो आणि कठीण काळात एकमेकींना आधार देऊ शकलो असतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)