एल निनोची तीव्रता वाढत जाणार, पण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तात्पुरता दिलासा, राज्यात कसं असेल हवामान?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रात काही भागांत आज 15 जुलैच्या सकाळी हलका पाऊस पडला आहे. पण, राज्यातला बहुतांश भाग, विशेषतः मराठवाड्यातले जिल्हे अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.

पुढच्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रा, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या विभागांत हवामान कसं असेल, त्याविषयी हवामानाचा अंदाज काय सांगतो हे जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एल निनोविषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट.

नॅशनल ओशनिक अँड अटमॉस्फेरिक अडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकीची संस्था पॅसिफिक महासागरातील परिस्थितीवर नजर ठेवून असते.

त्यानुसार यावर्षी आलेला एल निनो नोव्हेंबरपर्यंत आणखी तीव्र होत जाण्याची शक्यता आहे. तसंच अगदी फेब्रुवारी-मार्चपर्यंत एल निनो कायम राहू शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

जगभरातल्या इतर वेदर मॉडेल्सनुसारही हा एल निनो गेल्या दीड शतकातला सर्वात शक्तीशाली एल निनो ठरण्याची शक्यता आहे.

एल निनो आणखी तीव्र होणार असल्यामुळे उष्णतेच्या लाटा, अतीवृष्टी आणि इतर तीव्र हवामान आपत्ती तसंच दुष्काळाचा धोका आणखी वाढला असल्याचा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे.

एल निनोचा प्रभाव आणि वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे देशातल्या आणि राज्यातल्या बहुतांश भागांत मान्सूनमध्ये खंड पडलेला आहे.

पण बंगालच्या उपसागरावरच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि घाटालगतच्या काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

बीबीसी वेदरच्या अंदाजानुसार पुढच्या चोवीस ते 48 तासांत कोकण, घाट प्रदेश आणि विदर्भात तसंच मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातलं कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं तर पावसात थोडी वाढही होऊ शकते.

त्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैच्या उत्तरार्धासाठी मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे.

16 जुलै रोजी हवामान विभागानं पुण्याचा पठारी प्रदेश, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या ते मध्यम पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे. तसंच कोकणातले इतर जिल्हे, नाशिक, आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

पावसानं ब्रेक घेतल्यानं अनेक ठिकाणी तापमानातही थोडी वाढ झालेली आहे. पण पुढच्या दोन तीन दिवसांत त्यातही थोडासा दिलासा मिळू शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.