You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दक्षिण इराणमध्ये नवे हल्ले केल्याची अमेरिकन लष्कराची माहिती, हल्ल्यांसाठी दिले 'हे' कारण
- Author, टोबी मान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
अमेरिकेच्या लष्करानं सांगितलं आहे की, त्यांनी दक्षिण इराणमध्ये नवीन हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणी क्षेपणास्त्रांची तळे आणि समुद्रात भूसुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटलं आहे की, हे हल्ले आत्म संरक्षणासाठी करण्यात आले होते आणि इराणी सैन्याकडून असलेल्या धोक्यांपासून सैनिकांचे संरक्षण करणं हा त्यामागील उद्देश होता.
सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स म्हणाले की, अमेरिकन सैन्य सध्या सुरू असलेल्या शस्त्रसंधीदरम्यान संयम बाळगून आपल्या सैनिकांचं संरक्षण करणं सुरू ठेवेल.
हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जेव्हा एकीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडीफार प्रगती झाली आहे. परंतु, संघर्ष संपवण्यासाठी कोणताही करार तत्काळ होण्याची शक्यता नाही.
हॉकिन्स म्हणाले की, हे हल्ले बंदर अब्बासजवळ करण्यात आले आहेत. बंदर अब्बास दक्षिणेकडील एक बंदर शहर असून तिथे इराणचा नौदलाचा तळ आहे. तसंच ते होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वसलेलं आहे.
यापूर्वी, इराणच्या सरकारी माध्यमांनी असं वृत्त दिलं होतं की, बंदर अब्बासमध्ये स्फोटांचे आवाज ऐकल्यानंतर स्थानिक अधिकारी तिथे तपास करत होते.
युद्धबंदी दरम्यान हल्ला
अमेरिकेच्या या नव्या हल्ल्यांवर इराणने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
या हल्ल्यांचा अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करारावर काय परिणाम होईल, हेदेखील स्पष्ट नाही.
गेल्या आठवड्याच्या अखेरीस, डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही पक्ष कराराच्या जवळ पोहोचले असल्याचे संकेत दिले होते. परंतु, नंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी वाटाघाटी करणाऱ्यांना घाई न करण्याचं निर्देश दिलेले आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही म्हटलं आहे की, सोमवारपर्यंत करार होण्याची शक्यता आहे.
परंतु, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी उत्तर देताना म्हटलं की, "हे खरं आहे की चर्चा केलेल्या अनेक मुद्द्यांवर आम्ही एका निष्कर्षावर पोहोचलो आहोत. परंतु, करारावर लगेचच स्वाक्षरी होईल असा दावा कोणीही आम्ही करू शकत नाही."
अमेरिकन आणि इराणी सैन्य 8 एप्रिलपासून युद्धविराम पाळत आहेत.
एकीकडे इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवलं आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे नौदल इराणी बंदरांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला चढवला, त्यानंतर हा संघर्ष पश्चिम आशियाभर पसरला.
प्रत्युत्तर म्हणून, इराणने इस्रायल आणि आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे.
या निर्णयामुळे जगभरात तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)