महाराष्ट्रात 'इथे' आणखी दोन दिवस रेड अलर्ट; हवामानाचा ताजा अंदाज जाणून घ्या

  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

एकीकडे मध्य भारतात उष्णतेची लाट, दुसरीकडे काश्मिरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बर्फवृष्टी आणि तिसरीकडे दक्षिण भारतात वादळी पाऊस.

भारतात सध्या एकाच वेळी असं वेगवेगळं हवामान पाहायला मिळतंय.

महाराष्ट्रातही एकीकडे मान्सूनपूर्व सरी बरसू लागल्या आहेत, पण विदर्भात काही भागांमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट आहे.

पुढच्या काही दिवसांतलं हवामान कसं असेल, जाणून घेऊयात.

26 मे रोजीच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये पाहिलं तर अंदमान निकोबार बेटं आणि आसपासच्या परिसरात मान्सून अगदी सक्रीय असल्याचं दिसतं. केरळच्या किनाऱ्यावरही ढग जमा होऊ लागले आहेत.

पण मान्सून आजही पुढे सरकलेला नाही. पुढच्या दोन तीन दिवसांतली स्थिती मान्सूनची आगेकूच होण्यासाठी अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरवर्षी साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो.

मान्सूनचं आगमन होण्याआधी दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातही विशेषतः किनारी भागात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, वीजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भात मात्र उष्णतेची तीव्रता कायम आहे. 29 मे पर्यंत इथे कमाल तापमान 45 अंश सेल्सियसच्या आसपास राहील. तर मराठवाड्यातही पारा चाळीस अंशांपेक्षा जास्त राहील.

विदर्भात आणि कोकणातल्या किनारी भागात किमान तापमानही सरासरीपेक्षा वर राहू शकतं. विदर्भात पुढचे 24 तास रात्रीचं तापमनानही 28 ते 30 अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहील. दिवसा उष्णतेची लाट आणि रात्रीही उष्ण वातावरण यांमुळे विदर्भात गर्मीचा त्रास जास्त जाणवतो आहे.

26 मेच्या रात्रीसाठीही अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला आहे. अकोला आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.

27 मे रोजीही अमरावती, वर्धा, चंद्रपूरमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट आहे. तर अकोला, नागपूर, गडचिरोलीमध्य ऑरेंज अलर्ट आणि यवतमाळ, भंडारा, गोंदियामध्ये यलो अलर्ट आहे. रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईतही उद्या उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, बीड, धाराशीव आणि लातूरमध्ये वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)