वैभव सूर्यवंशी : आर्चरच्या पहिल्या चेंडूवर 'बेबी बॉस'चा षटकार, 14 धावांवर आटोपली पहिली आंतरराष्ट्रीय खेळी

फोटो स्रोत, ANI
आयपीएलमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'बेबी बॉस' अशी ओळख मिळवलेल्या वैभव सूर्यवंशीनं आज (4 जुलै) टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
पहिल्या सामन्यात 10 चेंडू खेळून वैभन 14 धावांवर बाद झाला. त्यात 2 षटकारांचा समावेश होता.
सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय टी 20 क्रिकेट संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा यानं वैभवला कॅप सोपवली आणि तो आजच्या सामन्यात खेळायला उतरणार हे स्पष्ट झालं.
15 वर्षे 99 दिवस या वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत वैभव सूर्यवंशीनं इतिहास घडवला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये वैभव सूर्यवंशीची संघात निवड झाली. पण अंतिम 11 मध्ये तो अद्याप खेळलेला नव्हता.
त्यामुळं अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनावर टीकाही केली होती.
वैभव सूर्यवंशीनं शनिवारी मैदानावर सामन्याच्या पूर्वी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तयारी केल्याचं पाहायला मिळालं.
आयपीएलच्या सामन्यांत तो स्टंपच्या मागे जाऊन तयारी करताना दिसायचा. तसंच चित्र आजही दिसलं त्यामुळं आज त्याचा डेब्यू होणार अशी आशा वाढली होती.
आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार, 14 धावांवर बाद
षटकारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात त्याच्या इनिंगमधील चौथ्या चेंडूवर एका धावेनं झाली.
पण मोठ्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचण्याची परंपरा जणू वैभवनं कायम ठेवली. जोफ्रा आर्चरचा पहिला चेंडू वैभवनं फाईन लेगला थेट षटकारासाठी पाठवला.
त्यानंतर टंगच्या चेंडूवरही त्यानं एक षटकार खेचला.
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची पहिली खेळी फार मोठी ठरली नाही. 10 चेंडूत 14 धावा करून विल जॅकच्या चेंडूवर जोस बटलरनं स्टंपिंग करत त्याला बाद केलं.

फोटो स्रोत, Oli SCARFF / AFP via Getty Images
दरम्यान, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी वैभव सूर्यवंशी या सामन्यातही खेळणार नसल्याचे संकेत दिले होते.
मॉर्ने मॉर्केल यांनी म्हटलं की, टॉप ऑर्डरमधील फलंदाज (संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन) यांपैकी कोणालाही वगळले जाणार नाही.
गेल्या काही महिन्यांपासून संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मॉर्केल म्हणाले, "संजू सॅमसन टी-20 विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. आयपीएल हंगामही त्याच्यासाठी चांगला ठरला. प्रशिक्षक म्हणून आम्हाला आमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे.
एक युवा खेळाडू संधीची वाट पाहत आहे आणि तो अत्यंत रोमांचक आहे. मात्र आम्हाला केवळ टॉप ऑर्डरचा नव्हे, तर संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो."

फोटो स्रोत, Getty Images
मॉर्केलनं म्हटलं होतं की, त्यांनी वैभवला नेट्मध्ये सराव करताना पाहिलं असून, त्यानं त्यांना खूप प्रभावित केलं आहे. वैभवनं इतर खेळाडूंशी चांगला रॅपो बनवला आहे. त्यामुळं जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
इंग्लंड विरोधातील टी-20 मालिकेबाबत बोलायचं झाल्यास, पहिला सामना पावसामुळं रद्द झाला होता.
दुसरा सामना आज (4जुलै) मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या टी-20 मालिकेत एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत.
पण या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीच्या एका पोस्टने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
वैभवने एका फोटोसह फक्त दोन शब्द पोस्ट केले आहेत. 'New Chapter' असं त्यानं पोस्ट केलं. पण या पोस्टमधून तो नेमका कोणत्या नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे, याचे स्पष्ट संकेत मिळत नाही.
त्यामुळं या गूढ पोस्टबाबत टॉस होईपर्यंत काही स्पष्ट समजणार नाही. कारण त्यावेळीच अंतिम प्लेइंग इलेव्हन कोण हे स्पष्ट होईल.
'आयर्लंडविरुद्ध संधी मिळायला हवी होती'-डिव्हिलियर्स
वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पणाची संधी न मिळाल्यामुळं टीम मॅनेजमेंटवर सातत्यानं टीका होत आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स यांनंही आता यावर भाष्य केलं आहे.
ए. बी. डिव्हिलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं की, "तो कधी खेळणार? माझ्या मते आयर्लंडविरुद्धची मालिका वैभव सूर्यवंशीसाठी योग्य संधी होती. त्यातून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळाला असता."
"दुर्दैवानं त्याला संधीच मिळाली नाही. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोसचेट यांच्या सूर्यवंशीला इतर खेळाडूंप्रमाणे प्रक्रियेतून जावं लागंल, या मताशी मी सहमत नाही."
"आयपीएलमध्ये त्यानं ज्या प्रकारे खेळ केला, ते पाहता त्याला मैदानात उतरवण्याची हीच योग्य वेळ होती. विशेषतः आयर्लंडसारख्या कमी रँकिंगच्या संघाविरुद्ध त्याला खेळवून अनुभव देता आला असता."

फोटो स्रोत, Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
काही वृत्तांनुसार, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोसचेट यांनी म्हटलं होतं की, "तो (वैभव सूर्यवंशी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार आहे, यात कोणतीही शंका नाही. पण संजू सॅमसन हा तोच खेळाडू आहे ज्यानं तीन महिन्यांपूर्वी विश्वचषक जिंकण्यात मोठे योगदान दिलं."
भारतीय संघ आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका 2-0 ने हरला होता. तर इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता.
ए.बी.डिव्हिलियर्सच्या मते, "टीम इंडियाला अजून बरीच मेहनत करायची आहे. त्यांना इंग्लंडमध्ये कामगिरी करण्याचा मार्ग शोधावा लागेल. तिथे खेळणं सोपं नाही. तिथं आयपीएलसारखं वातावरण नसतं. तिथं सहज 250-260 धाना होत नाहीत."
"तिथं 140 किंवा 160 धावा होतात आणि रणनीती व योग्य डावपेचांची गरज असते," असंही डिव्हिलियर्सनं म्हटलं.
टीम मॅनेजमेंटवर झाली होती टीका
आयर्लंडविरुद्ध वैभवला संधी न दिल्याबद्दल अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी टीम मॅनेजमेंटवर टीका केली होती.
सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि मोहम्मद कैफ यांसारख्या अनुभवी खेळाडूंनीही वैभवला न खेळवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं की, आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळायला हवी होती. तसंच त्याला लवकरात लवकर अंतिम संघात स्थान द्यायला हवं.
"त्याने आयपीएलमध्ये सगळ्यांची धुलाई केली आहे. कोणत्या वेगवान गोलंदाजाला त्यानं सोडलं? आणि इथे तुम्ही त्याला बाकावर बसवता," असं रवी शास्त्री म्हणाले होते.
ते पुढे म्हणाले, "तो फक्त 15 वर्षांचा आहे. त्याच्या मनात कोणतीही भीती नाही. तो 2-3 ओव्हर्स टिकला तरी अशी सुरुवात करून देतो की मधल्या फळीला त्याचा फायदा होतो. त्याच्यासाठी संघात जागा निर्माण करावीच लागेल."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, इंग्लंडचा सध्याचा कर्णधार हॅरी ब्रूकही वैभवच्या खेळाने प्रभावित झाल्याचं दिसलं.
सामन्यापूर्वी तो म्हणाला, "तो जबरदस्त खेळाडू आहे. वयाच्या 15 व्या वर्षी त्याने जे साध्य केले आहे, ते अप्रतिम आहे. आम्ही त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहोत. जर तो खेळला, तर आमच्याकडे त्याच्यासाठी योजना तयार आहे. आम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील, तरच विजयाची संधी मिळेल."
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीला आपण विचारायला हवे की त्याला आयर्लंडविरुद्ध का खेळवले गेले नाही?"
त्यांच्यासोबत उपस्थित असलेले इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू अॅलिस्टर कुक म्हणाले, "मी तर उद्या एक चाहता म्हणून त्याचा खेळ पाहायला जाणार आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























