हिजाब न घालता गाणं सादर केलं, इराणच्या प्रसिद्ध गायिकेला 74 चाबकाचे फटके

परस्तू अहमदीचा हा कार्यक्रम डिसेंबर 2024 मध्ये तिच्या यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रसारित करण्यात आला होता.
फोटो कॅप्शन, परस्तू अहमदीचा हा कार्यक्रम डिसेंबर 2024 मध्ये तिच्या यूट्यूब चॅनेलवरून थेट प्रसारित करण्यात आला होता.
    • Author, डेव्हिड ग्रिटेन
    • Author, गोंचेह हबीबिझाद
    • Role, बीबीसी पर्शियन
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हिजाब न घालता यूट्यूबवर गाणं सादर करणाऱ्या इराणची प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदीला 74 चाबकाचे फटके मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या बँडमधील सदस्य आणि कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीममधील 4 जणांनाही ही शिक्षा देण्यात आल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.

तिच्या बचाव पथकातील एका सदस्याने बीबीसीला सांगितलं की, कोम शहरात परस्तू अहमदी, 3 संगीतकार आणि एका निर्मात्याला प्रत्येकी 74 चाबकाचे फटके मारण्यात आले.

29 वर्षीय अहमदीने डिसेंबर 2024 मध्ये थेट प्रसारित केलेल्या एका संगीत कार्यक्रमात बिनबाह्यांचा ड्रेस (स्लीव्हलेस) घातला होता. इराणच्या कायद्यानुसार, महिलांना डोक्यावर स्कार्फ (हिजाब) घालणं आणि 'शालीन' (अंगभर कपडे घालणं) कपडे घालणं बंधनकारक आहे.

याच वर्षी जूनमध्ये कोममधील एका न्यायालयाने अहमदी आणि अन्य 8 जणांना 'अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर' प्रसिद्ध करून 'सार्वजनिक सभ्यतेचा भंग' केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. पण, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

74 चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षेबरोबरच त्यांच्यावर 2 वर्षांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल क्षेत्रात काम करण्यास आणि देश सोडण्यासही बंदी घालण्यात आली.

परस्तू अहमदी यांचा कार्यक्रम डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित करण्यात आला.
फोटो कॅप्शन, परस्तू अहमदी यांचा कार्यक्रम डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित करण्यात आला.

त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, सप्टेंबरच्या अखेरीस कोममधील न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळलं आणि शिक्षा कायम ठेवली.

इराणमधील अनेक कलाकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या शिक्षेचा तीव्र निषेध केला आहे. चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा क्रूर आणि अमानवी असून, ती छळाविरोधात असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सोमवारी (23 नोव्हेंबर) आरोपींच्या वकिलांपैकी एकाने बीबीसीला सांगितलं की, परस्तू अहमदी आणि तिच्यासोबतच्या 4 पुरुष आरोपींना कोम शहरातील 'गुन्हेगारी शिक्षा अंमलबजावणी कार्यालय' या विभागाच्या तिसऱ्या शाखेत चाबकाचे फटके मारण्यात आले.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले, "हा निर्णय रद्द व्हावा किंवा किमान शिक्षा कमी व्हावी अथवा तिची अंमलबजावणी थांबवण्यात यावी, यासाठी आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केले. परंतु, आम्हाला त्यात यश आलं नाही."

"मी आणि इतर वकिलांनी ही शिक्षा लागू करण्यास विलंब व्हावा, यासाठीही प्रयत्न केले. पण, शिक्षेची अंमलबजावणी लगेचच करण्याचा आग्रह संबंधित विभागाने धरला."

इराणमधील सुधारणांच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या 'एतेमाद' या वृत्तपत्राने बचाव पक्षाचे आणखी एक वकील मुस्तफा निली यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. परस्तू अहमदीसोबत फटके मारण्यात आलेल्या 4 जणांची नावं सोहेल फकीह-नासिरी, अमीन ताहेरी, अमीरअली पिरनिया आणि मोहसेन लष्करी अशी आहेत.

अमेरिकेतील 'सेंटर फॉर ह्युमन राइट्स इन इराण' (सीएचआरआय) या संस्थेच्या जनहित विभागाच्या संचालक बहार गंदेहारी म्हणाल्या, "आपल्या आवडीचे कपडे घालणं आणि गाणं सादर करणं यासाठी परस्तू अहमदीला चाबकाचे फटके मारणं म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उघडपणे उल्लंघन करणं आहे."

"याशिवाय, महिलांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि भेदभाव करणारे कायदे व धोरणांना विरोध करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचा इराणी अधिकाऱ्यांचा प्रयत्न यातून दिसून येतो."

इराणचा कायदा इस्लाममधील शरियावर आधारित आहे. या कायद्यानुसार, वयात आलेल्या मुली आणि महिलांना हिजाबने केस झाकणं आणि शरीर दिसणार नाही असे लांब व सैल कपडे घालणं बंधनकारक आहे.

2022 मध्ये महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली होती. महसा अमिनी ही 22 वर्षीय कुर्दिश महिला होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये हिजाब योग्य पद्धतीने न घातल्याच्या आरोपावरून तेहरानमध्ये 'मोरॅलिटी पोलिसांनी' तिला ताब्यात घेतलं होतं.

या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण इराणमध्ये आंदोलनं झाली. या आंदोलनांदरम्यान महिलांनी आपले हिजाब जाळले किंवा ते हवेत भिरकावून निषेध व्यक्त केला होता. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.

तेव्हापासून अनेक महिला आणि मुलींनी या ड्रेस कोडला उघडपणे विरोध करत सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणं पूर्णपणे बंद केलं आहे.

याला उत्तर म्हणून प्रशासनाने वेळोवेळी महिलांना अटक केली, त्यांना इशारे दिले, दुकाने आणि व्यवसाय बंद केले. याशिवाय इतरही कारवाई केली आहे.

परस्तू अहमदी एक सुप्रसिद्ध गायिका आहेत (फाईल फोटो)
फोटो कॅप्शन, परस्तू अहमदी एक सुप्रसिद्ध गायिका आहेत (फाईल फोटो)

यावर्षी जानेवारीत इराणमध्ये आर्थिक संकटामुळे सरकारविरोधी आंदोलनांची नवीन लाट उसळली होती. या आंदोलनांवर सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली. त्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले, तर हजारो जणांना अटक करण्यात आली.

फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणचं युद्ध सुरू झाल्यापासून, आंदोलन करणाऱ्यांना मृत्युदंड देण्याच्या घटनांमध्ये इराणी अधिकाऱ्यांनी वाढ केली आहे.

नॉर्वेतील 'इराण ह्युमन राइट्स' या संस्थेच्या माहितीनुसार, जानेवारीतील आंदोलनांप्रकरणी दोषी ठरवलेल्या किमान 39 पुरुषांना फाशी देण्यात आली आहे. तसेच, 2022 मधील आंदोलनांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आणखी दोघांनाही फाशी देण्यात आली आहे.

याशिवाय, बंदी घातलेल्या विरोधी गटांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या 16 जणांना आणि हेरगिरी किंवा परकीय शक्तींना मदत केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलेल्या आणखी 17 जणांनाही फाशी देण्यात आली आहे.

या संस्थेच्या अहवालानुसार, जानेवारीमध्ये अटक केलेल्या आणखी 121 आंदोलकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना लवकरच फाशी दिली जाण्याचा धोका आहे.

यात 6 महिला आणि 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)