You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास आणि त्याचे चित्रण करण्यास नवऱ्यानेच भाग पाडले; महिलेनी सांगितलं स्वतःसोबत काय घडलं?
- Author, कार्टिन नेई, जेमी बार्टलेट, कविता पुरी आणि रूथ मेयर
- Role, बीबीसी न्यूज इन्व्हेस्टिगेशन्स आणि बीबीसी वेल्स
- Published
- वाचन वेळ: 9 मिनिटे
(महत्त्वाची सूचनाः या बातमीत लैंगिक संबंधांशी संबंधित काही तपशील दिले आहेत.)
आपल्या पतीच्या सांगण्यावरून मी अनिच्छेने एका 'पार्टनर एक्सचेंज' वेबसाईटवर नाव नोंदवलं. पण मी पतीला स्पष्ट सांगितलं होतं की, मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कारमध्ये शारीरिक संबंध ठेवणार नाही, असं रूथ ओ'ग्रेडी यांनी सांगितलं.
पण काही महिन्यांत ती नेमकं तेच करू लागली आणि त्याचे व्हीडिओ बनवून पतीला पाठवू लागली.
या 18 महिन्यांच्या कालावधीत त्या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनोळखी व्यक्तींशी 100 हून अधिक वेळा लैंगिक संबंध ठेवले, असा त्यांचा दावा आहे.
रूथ सांगतात की, त्यांना याचा मानसिक धक्का बसला आहे आणि सतत जुन्या वेदनादायक आठवणी आठवत राहतात.
तीन वर्षांपूर्वी त्यांनी आमच्याशी पहिल्यांदा संपर्क साधला होता. आता त्यांनी खूप विचार करून आपलं पूर्ण नाव सांगत आपली कहाणी सर्वांसमोर शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कहाणी इतर महिलांसाठी इशारा ठरावी, अशी त्यांची इच्छा आहे.
त्या माजी पती ख्रिसवर नाराज आहेत, पण ब्रिटनमधील सर्वात मोठ्या स्विंगिंग वेबसाईटलाही (जोडीदारांची अदलाबदल) त्या जबाबदार धरतात. त्यांचं म्हणणं आहे की त्या वेबसाईटमुळे त्यांच्या पतीला अशा अनेक अनोळखी पुरुषांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली, ज्यांना तो त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सांगू शकत होता.
बीबीसीने या आरोपांबाबत ख्रिसशी संपर्क साधला, पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
स्विंगिंग म्हणजे पार्टनर एक्सचेंज, म्हणजे जोडपी एकमेकांना भेटून आपल्या जोडीदारांची अदलाबदल करतात. परंतु, याचा अर्थ असाही असू शकतो की जोडप्यातील फक्त एक व्यक्ती इतर लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवते.
रूथ यांची कहाणी उघडकीस आल्यापासून बीबीसीने मागील 8 महिन्यांपासून युनायटेड किंगडममधील 'स्विंगिंग' जगताचा तपास सुरू केला आहे. काही लोकांनी आम्हाला ते यात स्वच्छेने सहभागी होतात, असं सांगितलं. परंतु, असं नेहमीच घडत नाही हेही आमच्या तपासात समोर आलं.
'फॅबस्विंगर्स' या वेबसाईटने माझ्या शोषणाला आणखी चालना दिली, असा दावा रूथ यांनी केला.
सर्व पार्टनर एक्सचेंज वेबसाईट्सपेक्षा जास्त लोक भेट देत असलेल्या आणि दरमहा 6 लाख सक्रिय सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या वेबसाईटने आम्हाला सांगितलं की, अशा प्रकारच्या क्रिया किंवा कृतीसाठी संमती (कन्सेंट) ही सर्वात महत्त्वाची अट आहे.
याशिवाय, अलीकडील अनेक गुन्हेगारी अहवालांमध्ये या वेबसाईटचा उल्लेख आढळून आल्याचे युके पोलिसांनी आम्हाला सांगितलं.
रूथ म्हणतात की, त्यांची कहाणी फ्रेंच महिला जिझेल पेलिकॉटसारखी नाही. जिझेलने तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पुरुषांविरुद्ध सार्वजनिक खटला चालवण्याचा आग्रह धरला होता. परंतु, तिच्या प्रकरणानंतर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून रूथ यांना आपली कहाणी सांगण्याचं धाडस झालं.
"सर्वांना धक्का बसला होता, पण मला अजिबात धक्का बसला नाही," असं रूथ सांगतात.
महत्त्वाची सूचना
- लैंगिक अत्याचाराबाबत माहिती, मदत किंवा समुपदेशन हवे असेल किंवा निराशा वाटत असेल तर या हेल्पलाईन वर मदत उपलब्ध आहे- bbc.co.uk/actionline (UK)
- भारतात महिलांसाठी हेल्पलाईन - राष्ट्रीय महिला आयोग
रूथ इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास कशा तयार झाल्या?
रूथ यांच्या म्हणण्यानुसार, 2008 मध्ये वेल्समध्ये ते पहिल्यांदा भेटल्यानंतर ख्रिस अनेकदा त्यांना इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगायचा, पण त्या नेहमी त्याला नकार द्यायच्या.
नंतर 2021 मध्ये रूथ यांना मानसिक आरोग्याच्या गंभीर त्रासाला सामोरं जावं लागलं. त्या वेळी ख्रिस त्यांचा अधिकृत काळजीवाहू बनला. रूथ म्हणतात की, त्याने मला असं जाणवून दिलं की माझं आयुष्य त्याने अपेक्षित केल्याप्रमाणे घडलं नाही, त्यामुळे मला अपराध्यासारखं वाटायला लागलं.
रूथ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पतीने पुन्हा जोडीदार बदलण्याचा विषय काढला आणि अखेरीस त्यांनी त्याला होकार दिला.
त्या म्हणाल्या, "हे ऐकणाऱ्याला कदाचित विचित्र वाटू शकतं, पण हे सगळं एका रात्रीत घडलेलं नाही. कल्पना करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत 12 वर्षे राहता आणि ती व्यक्ती तुम्हाला हळूहळू एखाद्या गोष्टीसाठी तयार करते."
नंतर या जोडप्यानं 'फॅबस्विंगर' वेबसाईटवर आपली नोंदणी केली. रूथ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वाटलं होतं की ते फक्त इतर जोडप्यांना भेटतील. पण या गोष्टीला वेगळंच वळण लागले.
रूथ या वेबसाईटद्वारे भेटलेल्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत, तर ख्रिस कधी ते सर्व पाहायचा, कधी जवळच थांबून असत, आणि कधी कधी तो तिथे उपस्थितही नसायचा.
या भेटी कधी घरात, कधी बाहेर, कारमध्ये किंवा पार्किंगच्या ठिकाणी होत असत. रूथ यांच्या म्हणण्यानुसार, त्या एकट्याने गेल्या तर त्यांच्याकडून त्या प्रसंगाचे रेकॉर्डिंग करून व्हीडिओ पतीला पाठवण्याची अपेक्षा केली जायची.
रूथ म्हणतात की, काही महिन्यांतच त्या आठवड्यात अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवू लागल्या. कधी कधी त्या एका दिवसात चार-चार वेळा देखील संबंध ठेवू लागल्या होत्या.
त्यांचा दावा आहे की, अनेक भेटींची व्यवस्था त्यांनी स्वतः केल्या होत्या आणि वरवर पाहता त्या पार्टनर एक्सचेंजसाठी उत्सुक असल्यासारख्या दिसत होत्या. पण आता त्या म्हणतात की त्यांना हे कधीच करायचं नव्हतं.
त्यांनी सांगितलं की, मी आपल्या पतीला हे सगळं थांबवायचं असल्याचं सांगितलं होतं. तसंच, या शारीरिक संबंधांमुळे मला भीती वाटत असल्याचं आणि मी खूप त्रासात असल्याचंही अनेकदा त्याला सांगितलं होतं.
त्या सांगतात की, काही वेळा यामध्ये थोडा खंड पडायचा. पण त्यानंतर ख्रिस पुन्हा नवीन भेटी ठरवायचा आणि मी त्यासाठी होकार द्यायची.
'माझं स्वतःचं अस्तित्वच उरलं नाही, असं वाटायचं'
रूथ यांच्या म्हणण्यानुसार, या भेटींचा त्यांच्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला. त्यांना लैंगिक संबंधांमुळे होणारे काही आजार झाले, त्या गर्भवतीही राहिल्या. तसेच, गर्भपातातून त्या सावरत असतानाच ख्रिसने त्यांना दुसऱ्या एका व्यक्तीसोबत ओरल सेक्स करण्यास भाग पाडलं, असा दावाही त्यांनी केला.
"मला तेव्हा जाणवलं की, ख्रिसला माझ्या शरीराची किंवा मला होत असलेल्या वेदनांची अजिबात पर्वा नव्हती. अनेक पुरुषांकडून माझ्या शरीराचा इतका वापर होत होता की मला संसर्ग होत होते, मी आजारी पडत होते, माझा गर्भपातही झाला. तरीही मला या पुरुषांना भेटत राहावं लागत होतं."
रूथ सांगतात की, अनेकदा विरोध करण्यापेक्षा उत्साह दाखवणं आणि आपल्याकडून अपेक्षित असलेली भूमिका निभावणं हे अधिक सोपं व सुरक्षित वाटायचं, कारण त्यामुळे ती भेट लवकर संपेल असं मला वाटत होतं.
"काही पुरुष माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहतही नसायचे. काही जण तर माझ्याशी एक शब्दही बोलत नसत. जणू काही माझं अस्तित्वच नाही, असं मला वाटायचं," असं त्या म्हणतात.
आता मागे वळून पाहताना, तुम्हाला वाटतं का की त्या शारीरिक संबंधांपैकी एक तरी संबंध परस्पर संमतीने झाला होता?
यावर त्या म्हणतात की, "नाही. मला हे काहीच करायचं नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला त्या वेबसाईटवरही जायचं नव्हतं."
रूथ यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ख्रिसविरोधात 'कोअर्सिव्ह कंट्रोल' (जबरदस्तीने नियंत्रण ठेवणे आणि इतर कायद्यांअंतर्गत) अंतर्गत चौकशी केली. मात्र, त्याच्यावर कोणतेही आरोप दाखल करण्यात आले नाहीत.
पोलिसांनी या जोडप्याच्या व्हॉट्सॲप संदेशांतील काही उदाहरणांकडे लक्ष वेधले, ज्यात रूथ स्विंगिंगबाबत उत्साही दिसून येतात.
रूथ यांची कहाणी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते. लोक कधी कधी नको असतानाही अशा गोष्टींना होकार देतात आणि बाहेरून आनंदीही दिसतात, असं का होतं?
तज्ज्ञांच्या मते, संमतीचा विषय अनेकदा गुंतागुंतीचा असू शकतो.
ऑकलंड विद्यापीठाच्या प्राध्यापक निकोला गेव्ही, या 1980 पासून नको असलेल्या म्हणजेच संमतीशिवाय होणाऱ्या लैंगिक संबंधांवर संशोधन करत आहेत. त्या म्हणतात की, की लोक अनेकदा अशा शारीरिक संबंधांना संमती देताना दिसतात जे त्यांना प्रत्यक्षात नको असतात.
गेव्ही यांचा दावा आहे की, त्यांनी इतर महिलांकडूनही रूथ यांच्यासारख्या कथा ऐकल्या आहेत.
त्या म्हणतात, "ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना नेमकं काय घडलं हे समजायला वेळ लागू शकतो."
'मी तिथून निघून जायला हवं होतं'
आम्हाला असा एक पुरुष सापडला जो पूर्वी 'फॅबस्विंगर' वापरत होता. तो आमच्याशी बोलण्यास तयार झाला.
मार्टिन (हे त्याचं खरं नाव नाही) म्हणतो की, माझी रूथशी कधीही भेट झालेली नाही. मी अनेक वर्षांपासून या वेबसाईटचा वापर करत आहे. त्या माध्यमातून मी सुमारे 50 जणांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. यामध्ये बहुतांश अशा विवाहित महिला होत्या, ज्यांच्या पतींना हे संबंध पाहायची इच्छा होती.
त्याच्या म्हणण्यानुसार, तो नेहमी खात्री करतो की ज्या महिलांना तो भेटतो त्या आनंदी आणि संमतीने सहभागी असतात. पण तो हेही सांगतो की, कधी कधी भेटीसाठी खोलीत गेल्यावर त्याला काहीतरी विचित्र जाणवत असे.
तो मान्य करतो की, त्याला भेटलेल्या जोडप्यांपैकी अर्ध्याहून अधिक महिलांना यात सहभागी व्हायचं नव्हतं.
तो सांगतो की, एकदा एका महिलेला तिचा पती हे सर्व रेकॉर्ड करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आलं. तेव्हा तिच्या डोळ्यांत त्याला भीती दिसली होती.
तो म्हणतो, "मी तिथून निघून जायला हवं होतं. मला लगेच याची तक्रार करायला हवी होती."
त्याने पुढे सांगितलं की, आणखी एका भेटीत एका महिलेवर होकार देण्यासाठी दबाव टाकला जात असल्यासारखं वाटत होतं. त्या महिलेचा पती आणि आणखी एक पुरुष तिला हे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत होते.
आम्ही त्याला विचारलं की, त्या क्षणी आपण एखाद्या महिलेवर तिच्या इच्छेविरोधात जबरदस्ती करत आहोत, याची त्याला कधी जाणीव झाली का?
त्याने यावर उत्तर दिले, "हो."
मार्टिन म्हणाला की, त्या क्षणाआधी मला वाटत होतं की, त्या महिलेची पूर्ण संमती आहे.
संमतीबाबत फॅबस्विंगरचं म्हणणं काय आहे?
आमच्या चौकशीला उत्तर देताना 'फॅबस्विंगर'ने सांगितलं की, ऑनलाईन झालेल्या आधीच्या संभाषणामुळे प्रत्यक्ष भेटीच्या वेळी संमतीची गरज संपते, असा कोणताही विचार हे प्लॅटफॉर्म मान्य करत नाही, त्याला प्रोत्साहन देत नाही आणि ते खपवूनही घेत नाही.
बीबीसीने यूकेतील 45 पोलीस दलांकडे माहितीसाठी अर्ज करून 2023 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत फॅबस्विंगरचा उल्लेख असलेल्या गुन्ह्यांच्या तक्रारींची माहिती मागवली होती.
एप्रिल 2026 पर्यंत 39 पोलीस दलांनी याला प्रतिसाद दिला होता. परंतु, देशातील सर्वात मोठ्या मेट्रोपॉलिटन पोलीस दलाकडून मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.
या प्रतिसादामधून अशा 329 तक्रारी समोर आल्या, ज्यात या वेबसाईटचा उल्लेख होता. यात बलात्कार, इतर गंभीर लैंगिक गुन्हे, जबरदस्तीने नियंत्रण ठेवणे, छळ, ब्लॅकमेल, पाठलाग करणे, हल्ला आणि अश्लील साहित्य बाळगणे यांसारख्या आरोपांचा यात समावेश होता.
प्रतिसाद देणाऱ्या पोलीस दलांनी अशा प्रकरणांमध्ये 26 जणांविरोधात गुन्हे दाखल केले किंवा त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते, ज्यात फॅबस्विंगरचा उल्लेख होता. यापैकी 23 प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे.
या आकडेवारीचा अर्थ असा नाही की, या आरोपांसाठी फॅबस्विंगर वेबसाईटच जबाबदार होती. काही प्रकरणांमध्ये तिचा उल्लेख फक्त घटनेच्या पार्श्वभूमीचा भाग म्हणूनही केलेला असू शकतो. परंतु, या आकडेवारीवरून इतकं दिसून येतं की गंभीर गुन्ह्यांशी संबंधित अनेक पोलीस नोंदींमध्ये या प्लॅटफॉर्मचा वारंवार उल्लेख आढळून आला आहे.
बीबीसीने यूकेमधील इतर कोणत्याही पार्टनर एक्सचेंज वेबसाईटबाबत अशी माहिती मागवली नव्हती.
फॅबस्विंगरने सांगितलं की, संमतीशिवाय होणाऱ्या कोणत्याही कृतींच्या तक्रारी गंभीर मानल्या जातात. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास कंपनी योग्य ती कारवाई करते आणि पोलिसांनाही पूर्ण सहकार्य करते.
या उत्तराचं रूथ यांना आश्चर्य वाटतं.
त्या म्हणतात की, मी फॅबस्विंगरला वेबसाईटवर भेटलेल्या पुरुषांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. यात मला मारहाण किंवा बलात्काराच्या धमक्यांचाही समावेश होता. पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
रूथ आपली कहाणी सार्वजनिक का करत आहे?
घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमधील तज्ज्ञ आणि 'किंग्ज काउन्सिल' ही पदवी मिळालेल्या नामांकित वकील रॅचेल हॉरमन-ब्राउन म्हणतात की, रूथ यांच्या अनुभवाचे त्यांना आश्चर्य वाटत नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेकदा महिलांना त्यांच्यावर कपल स्वॅपसाठी (जोड्यांची अदलाबदल) दबाव टाकला गेल्याच्या तक्रारी ऐकल्या आहेत.
हॉरमन -ब्राउन यांचं मत आहे की, काही जोडीदार पार्टनर स्वॅपचा गैरफायदा घेऊ शकतात. कारण एकदा एखादी व्यक्ती यात सहभागी झाली की तिला तीव्र लज्जेची आणि अपराधीपणाची भावना येऊ शकते. त्यामुळे महिलांकडून तक्रार येण्याची शक्यता खूपच कमी होते.
पार्टनर स्वॅपमध्ये अनेकदा आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ बनवले जातात, जे खूप हानिकारक ठरू शकतात. हॉरमन-ब्राउन यांनी याला नात्यात वापरले जाणारं एक संभाव्य 'शस्त्र' असं म्हटलं आहे.
पीडितांना मदत करणाऱ्या संस्था सांगतात की, त्यांनाही अशाच प्रकारचे अनुभव आणि तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात.
कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी असलेल्या राष्ट्रीय हेल्पलाइनच्या प्रमुख शॅरोले ईस्टॉप म्हणतात की, त्यांना अनेक महिलांचे फोन येतात. या महिला सांगतात की, त्यांच्यावर पार्टनर स्वॅपमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
अनेक महिलांना आपण शोषणाचा सामना करत आहोत, हेच समजत नाही किंवा ते नेमकं कसं सांगायचं हेही कळत नसतं. त्या म्हणतात, "रूथ यांनी आपली कहाणी सांगितल्याने इतर महिलांनाही बोलण्याचे धैर्य मिळेल, त्याचा प्रभाव पडेल, अशी मला आशा आहे."
हे तेव्हा घडलं, जेव्हा रूथ 'ब्लॅक मिरर' या मालिकेचा एक भाग पाहत होत्या. लैंगिक शोषण आणि अनादर दाखवणारा तो भाग पाहताना त्यांच्या मनात एक विचार आला.
रूथ यांच्या म्हणण्यानुसार, ख्रिसला तो भाग मजेशीर वाटला. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, "तू माझ्याबद्दलही असंच विचार करतोस."
फॅबस्विंगरवर सुमारे 18 महिने घालवल्यानंतर रूथ यांनी ख्रिसला वेबसाईट सोडण्यास सांगितलं. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार तो त्यांना सातत्याने इतर पुरुषांना भेटण्यास आणि अशाच प्रकारचे इतर लैंगिक संबंध स्वीकारण्यास सांगत राहिला.
बाहेरून मदत आणि पाठिंबा मिळाल्यानंतर रूथ यांनी पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हळूहळू आपली कागदपत्रं, कपडे आणि पैसे घराबाहेर सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले.
रूथ सांगतात की, या सगळ्याचा माझ्यावर अजूनही खोल परिणाम आहे. आता पुरुषांच्या उपस्थितीत मला खूप अस्वस्थ आणि घाबरल्यासारखं वाटतं. अगदी आंघोळ करतानाही मला फॅबस्विंगरवरील भेटींसाठी तयारी करत असल्याच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.
रूथ आता आपली कहाणी सर्वांसमोर का सांगत आहेत?
रूथ म्हणाल्या की, जर माझी कहाणी ऐकून एका जरी महिलेला हे जाणवलं की ती स्वतःच्या इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करत आहे, ज्या तिला मनापासून करायच्या नाहीत. तर तेही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल.
( या बातमीसंदर्भात जर तुम्हाला बीबीसीच्या पत्रकार कॅतरीन ने यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर catrin.nye@bbc.co.uk यावर इमेल करू शकता अथवा @CatrinNye हे त्यांचे सोशल मीडिया अकाउंट आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.