'माझ्या आयुष्यात दोन लोक महत्त्वाचे, एक भारतीय आणि एक पाकिस्तानी' असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष का म्हणाले?

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक येथे पाकिस्तान आणि कतारच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा झाली आहे.

या चर्चेपूर्वी पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी सांगितले की, त्यांच्या आयुष्यात "दोन अतिशय महत्त्वाचे लोक आहेत, एक भारतीय आणि एक पाकिस्तानी."

त्यांचा इशारा भारतीय वंशाच्या त्यांच्या पत्नी उषा व्हेन्स आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याकडे होता. मात्र ही गोष्ट आपण गमतीने म्हटलो असे व्हेन्स यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले, "इराणने लेबनॉनमधील आपल्या भरपूर निधी असलेल्या प्रॉक्सी गटांकडून निर्माण होणारा त्रास तत्काळ थांबवला पाहिजे."

यासोबतच ट्रम्प यांनी इशारा देत म्हटले, "जर त्यांनी असे केले नाही, तर आम्ही इराणवर पुन्हा अत्यंत जोरदार हल्ला करू. गेल्या आठवड्यात जसा केला होता, त्याहून अधिक तीव्र."

दरम्यान, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी सांगितले आहे की, "लेबनॉनमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही धोक्याला प्रत्युत्तर देण्याचे निर्देश इस्रायली सैन्याला देण्यात आले आहेत."

17 जून रोजी दोन्ही पक्षांमध्ये स्वाक्षरी झालेल्या 14 कलमी सामंजस्य करारात (MOU) लेबनॉनमधील शस्त्रसंधीचाही समावेश आहे.

जेडी व्हेन्स आणखी काय म्हणाले?

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स म्हणाले, "इस्लामाबाद आणि हे ठिकाण सोडल्यास गेल्या काही महिन्यांपूर्वी इराण आणि अमेरिकेचं नेतृत्व या स्तरावर कधीही भेटलेले नाहीत.

"राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला एक नवीन अध्याय सुरू करण्यास आणि इराणच्या लोकांबरोबरचे आमचे संबंध बदलण्याची आणि त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची जबाबदारी दिली आहे."

ते पुढे म्हणाले, "यातील संदेश असा आहे की जर इराणच्या नेतृत्वानं या भागातील अस्थैर्याला प्रोत्साहन देणं थांबवलं, जर प्रदीर्घ काळापासून असलेली अण्वस्त्र मिळवण्याची इच्छा त्यांनी सोडली, तर अमेरिका या देशाबरोबरचे त्यांचे संबंध पूर्णपणे बदलण्यास तयार आहे. तेच आमचं उद्दिष्टं आहे."

जेडी व्हेन्स म्हणाले, "गेल्या काही तासांमध्ये आम्ही बरीच प्रगती केली आहे. आगामी काळातदेखील आणखी प्रगती होण्याची आशा आहे."

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या प्रदेशात शस्त्रसंधी हवी आहे.

ते म्हणाले, "मला वाटतं की अमेरिका आणि जगभरातील लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आम्ही जिथे आहोत, तिथपर्यंत आपण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं नेतृत्व आणि त्यांची कटिबद्धता यामुळेच पोहोचलो आहोत. त्यांची इच्छा आहे की पुढील 10 वर्षांमधील मध्य पूर्व गेल्या 10 वर्षांपेक्षा वेगळा असला पाहिजे."

आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांचं केलं कौतुक

जेडी व्हेन्स म्हणाले, "आम्ही इथे एका सोप्या उद्देशानं जमलो आहोत. तो म्हणजे, ज्या मध्य पूर्वेत इराण आणि आखाती देशांमध्ये एकतर युद्ध झालं आहे किंवा त्यांचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत, आणि जिथे इराणला या प्रदेशातील अस्थैर्यासाठी जबाबदार मानलं जात राहिलं आहे. त्या मध्य पूर्वेत मुत्सद्देगिरी आणि सहकार्य यांच्याद्वारे बदल घडवणं."

त्यांनी पुढे नमूद केलं, "आता आपण अशा एका भविष्याचं चित्र पाहत आहोत जिथे प्रत्येकजण शांतता आणि समृद्धीला चालना देण्यासाठी मिळून काम करू शकतो."

या चर्चेच्या प्रक्रियेतील पाकिस्तानच्या भूमिकेचं जेडी व्हेन्स यांनी कौतुक केलं. व्हेन्स यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे आभार मानले.

"ते राष्ट्राध्यक्ष आणि माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि चर्चेसाठीच्या चांगल्या प्रयत्नांमुळे आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत," असं व्हेन्स म्हणाले.

ते पुढे म्हणाले की 'जेव्हापासून शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांनी माझे पाकिस्तानात आदरातिथ्य करण्यास सुरुवात केली तेव्हापासून मी त्यांना गमतीने एक गोष्ट म्हणतो. ती म्हणजे माझ्या आयुष्यात दोन महत्त्वाचे लोक आहेत. एक भारतीय आणि दुसरे पाकिस्तानी.'

व्हेन्स यांच्या पत्नी उषा व्हेन्स या भारतीय वंशाच्या आहेत.

जेडी व्हेन्स म्हणाले, "मी फील्ड मार्शल मुनीर यांच्याशी गेल्या काही महिन्यांमध्ये जितकी चर्चा केली आहे, तितकी कदाचित इतर कोणाशीही केलेली नाही. त्यांच्या डिप्लोमॅटिक भूमिकेशिवाय आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. ते निश्चितपणे एक महान लष्करी नेते आहेत. मात्र मला वाटतं की त्यांनी एक उत्तम मुत्सद्दी म्हणून देखील स्वत:ला सिद्ध केलं आहे."

शहबाज शरीफ यांनी काय आशा व्यक्त केली?

चर्चेच्या आधी केलेल्या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करत म्हणाले की ही चर्चा त्यांच्या दूरदृष्टी आणि उत्कृष्ट नेतृत्वामुळेच शक्य झाली.

ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि उत्कृष्ट नेतृत्वामुळे आजची ही बैठक शक्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला वाटतं की आमची चर्चा खूपच उपयुक्त ठरेल आणि मला आशा आहे की यामुळे आगामी काळात खूप चांगली प्रगती होईल."

शहबाज शरीफ म्हणाले की "आम्ही जेव्हा परतू, तेव्हा आमच्याकडे कराराचा एका भक्कम दस्तावेज असेल, अशी मला आशा आहे."

"आशा आहे की आम्ही जेव्हा आपापल्या देशात परतू, तेव्हा आमच्याकडे एक असा दस्तावेज असेल ज्यामुळे जगभरात शांतता, विकास आणि समृद्धीला चालना मिळेल."

शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स आणि कतारच्या पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचबरोबर पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर यांच्या भूमिकेचं देखील कौतुक केलं.

तो म्हणाला की "त्यांची भूमिका मोठी होती. त्यांनी अतिशय संयम आणि कटिबद्धता दाखवली. मला वाटतं की या सर्व प्रयत्नांचाच एकत्रित परिणाम म्हणजे आजची चांगली बैठक आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)