तज्ज्ञांचे मत: 'आंदोलनातील CJP समर्थकांना झालेल्या जखमा या पेलेट गनच्या जखमांसारख्याच'

साहिल लोचब ( पत्रकार परिषदेवेळी त्याने आपल्या शरीरावर कुठे जखमा झाल्या हे सांगितले.)

फोटो स्रोत, INC

फोटो कॅप्शन, साहिल लोचब ( पत्रकार परिषदेवेळी त्याने आपल्या शरीरावर कुठे जखमा झाल्या हे सांगितले.)
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

गेल्या आठवड्यात विद्यार्थी आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या काही समर्थकांना झालेल्या जखमा या पेलेट गन्समुळे झाल्याची पुष्टी स्वतंत्ररीत्या काम करणाऱ्या शस्त्रास्त्र तज्ज्ञांनी बीबीसीकडे केली.

बीबीसीने शस्त्रास्त्र तज्ज्ञांची मदत घेऊन जखमांची स्वतंत्ररीत्या पडताळणी करून पाहिली तेव्हा या गोष्टी समोर आल्याचे दिसले.

(सूचना : या लेखातील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.)

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या मागणीसाठी 20 जुलैला हजारो आंदोलक संसद भवनाच्या दिशेनी कूच करत होते. त्यावेळी त्यांच्यावर हिंसक कारवाई झाल्याचं निदर्शनास आलं.

उपस्थित आंदोलकांच्या जमावावर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तीव्रतेने काठ्यांनी, बॅटन्सने हल्ला केल्याच्या दिसले. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापरही झाला.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 60 आंदोलक आणि 118 कर्मचारी या आंदोलनादरम्यान जखमी झाले. जखमींचा प्रत्यक्ष आकडा पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) म्हटले आहे.

माध्यमांनी वृत्त दिले आहे की, आंदोलकांविरोधात पेलेट गन्स वापरण्यात आली होती. आंदोलनाच्या अनेक दिवसानंतर देखील सरकारने या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.

बीबीसीने केलेल्या पडताळणीत हे निश्चित झाले आहे की, रुग्णालयात उपचार घेत असलेले किमान 4 रुग्ण पेलेट गन्समुळे जखमी झाले आहेत.

या जखमा पेलेट गन्सच्या असल्याचे शस्त्रास्त्र तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितले आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पक्ष्यांच्या शिकारीसाठी शॉटगनची रचना करण्यात आलेली असते. त्याला पेलेट गन्स किंवा छर्रे असलेली बंदूक असेही म्हटले जाते. यातून जे शॉट्स फायर केले जातात त्याला 'बर्डशॉट' म्हणतात.

एका शॉटमध्ये धातूचे 200 ते 400 बारीक छर्रे असतात. जेव्हा ते जमावाविरोधात वापरले जातात तेव्हा ते छर्रे त्या भागात असमानरीत्या विखुरले जातात. या बंदुकीचा वापर करण्यास अनेक देशात बंदी आहे.

बीबीसीने अशा 2 जणांसोबत चर्चा केली, ज्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांना झालेल्या जखमा हा सुरक्षा रक्षकांद्वारे फायर करण्यात आलेल्या पेलेट गनमुळे झाल्या आहेत.

बीबीसीने जखमींचे फोटो आणि व्हीडिओ 2 स्वतंंत्र शस्त्रास्त्र तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्सला दाखवले.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीरात अनेक ठिकाणी झालेल्या बारीक जखमा या गोष्टीचं स्पष्ट लक्षण आहे की या जखमा बर्डशॉटमुळे झाल्या आहेत.

झालेल्या जखमा या निश्चितपणे पेलेट गनमुळेच झालेल्या आहेत, असे यूकेत राहणारे शस्त्रास्त्र आणि फॉरेन्सिक वैज्ञानिक फिलीप बॉयस यांनी बीबीसीला सांगितले.

हे शॉट फायर करण्यासाठी '12 गॉज पम्प अ‍ॅक्शन शॉटगन' वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पेलेट गनमध्ये वापरले जाणारे छर्रे ( फाइल )
फोटो कॅप्शन, पेलेट गनमध्ये वापरले जाणारे छर्रे ( फाइल )

"या छर्ऱ्यांच्या जखमा अतिनुकसानदायक असतात, विशेषतः तेव्हा, जेव्हा ते अगदी जवळून फायर केले जाते. या जखमांकडे मी जेव्हा पाहतो (दिल्लीतील) तेव्हा लक्षात येतं की संबंधित शस्त्र जवळून फायर करण्यात आलेले नाही तर किमान 50 फूट अंतरावरून फायरिंग झाले असावे. पण तरीदेखील ते धोकादायक आहे. 100 फूट दुरून जरी फायरिंग झाले असले तरी त्याचा मारा जीवघेणा ठरू शकतो," असे त्यांनी सांगितले.

यूकेतील 'आर्मामेंट रिसर्च सर्व्हिस'चे संचालक एनआर जेन्झेन जोन्स यांनी बीबीसीला सांगितले की आंदोलनादरम्यानचे व्हीडिओ आणि फोटो पाहिले तर लक्षात येतं की पोलिसांनी जमावाच्या नियंत्रणासाठी शॉटगनचा वापर केला. जखमांची छायाचित्रं पाहिली तर हे लक्षात येतं की या जखमा बर्डशॉटमुळे झाल्या आहेत.

कमी प्राणघातक शस्त्रास्त्रांचा वापर म्हणून शॉटगन वापरणे हे अनेक देशात केले जाते. भारतात जमावाच्या नियंत्रणासाठी शॉटगनचा वापर करण्याचा जुना इतिहास आहे.

या बंदुकीत वापरण्यात येणाऱ्या कार्ट्रिजेसमध्ये (काडतुसे) शिसाचे बारीक छर्रे भरले जातात. त्यांनाच बर्डशॉट म्हटले जाते.

जेव्हा शॉटगनमध्ये बर्डशॉट असलेली काडतुसे वापरली जातात तेव्हा त्यांना पेलेट गन्स असे म्हटले जाते.

परंतु, पेलेट गन्स सुरक्षित नसतात. त्यामुळे आयुष्य प्रभावित होऊ शकेल आणि प्रसंगी जीवाला धोका पोहचेल अशा जखमा होऊ शकतात.

या माऱ्यामुळे शरीरात विषारी शिसाचे छर्रे रुतून बसतात आणि शरीर त्यामुळे प्रभावित होऊ शकते. कधी कधी ते शरीरातून सुरक्षितरीत्या काढणे कठीण जाते, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे अनेक देशांनी त्याचा वापर पूर्ण बंद केला आहे किंवा त्यावर प्रतिबंध आहेत.

यूकेत या बंदुकांचा वापर पक्ष्यांची शिकार करण्यासाठी होतो आणि या बंदुका सहज उपलब्ध होतात. 'पण जमावाच्या नियंत्रणासाठी या बंदुकांचा वापर कुठे होत असल्याचे आपल्या माहितीत नाहीये,' असे बॉयस यांनी स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये 2010 पासून पेलेट गनचा वापर होत असल्याचे ह्युमन राइट्स वॉचने अधिकृत आकडेवारीच्या आधारावर निदर्शनास आणून दिले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत हजारो जण जखमी झाले असून किमान 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण दृष्टीहीन झाले आहेत.

जर दिल्लीमध्ये पेलेट गनचा वापर झाला आहे यास दुजोरा मिळाला, तर देशाच्या राजधानीत पहिल्यांदाच नागरिकांवर पेलेट गनचा मारा झाल्याचा हा पहिलाच प्रसंग ठरेल.

'शरीरावर गंभीर जखमा'

बीबीसीने 2 तरुणांशी याबाबत बातचीत केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ते दिल्लीतील मध्यवर्ती असलेला भाग कनॉट प्लेसजवळ जखमी झाले.

हा भाग संसद भवनापासून जवळच आहे. 20 जुलैला सायंकाळी 4 वाजता त्यांना या जखमा झाल्याचे त्यांनी सांगितले.

28 वर्षीय पत्रकार मोहितने (नाव बदलले आहे) बीबीसीला सांगितले, "जेव्हा सुरक्षा रक्षकाने माझ्यावर बंदुकीचा निशाणा साधला तेव्हा मी तोंड विरुद्ध दिशेला केले आणि पळू लागलो. 2-3 सेकंदानंतर माझ्या उजव्या हातावर आणि पाठीवर जळाल्यासारखी वेदना झाली."

मोहितने सांगितले की, शरीरात सुरू झालेल्या असह्य वेदनानंतर देखील तो पळत होता. तो एका कॅफेत पोहचला. तिथून त्याने पाण्याची बॉटल विकत घेतली आणि त्याच्या जखमा धुवून काढल्या.

'त्याच वेळी माझ्या दंडावर आणि पाठीवर बारीक छिद्रं दिसली. मला जबर धक्का बसला,' असंही त्याने नमूद केलं.

सफदरजंग रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी एक्स रे काढण्यात आले. त्यावेळी दंडात आणि धडाच्या वरच्या भागात बारीक वस्तू रुतल्याचे दिसून आले.

सदर तरुणाने आपला वैद्यकीय अहवाल बीबीसीला दिला आहे. त्यानुसार त्याच्या उजव्या कोपऱ्याजवळ पेलेट गनच्या 26 आणि पाठीच्या बाजूने वरच्या भागात चार जखमा दिसत आहेत. या अहवालात हे देखील नमूद करण्यात आले आहे की, शरीराच्या कोणत्या भागात संबंधित वस्तू रुतल्या आहेत.

नाव न सांगण्याच्या अटीवर 28 वर्षीय पत्रकाराने आपल्यासोबत काय घडले याची माहिती बीबीसीला दिली.

फोटो स्रोत, User Generated

फोटो कॅप्शन, नाव न सांगण्याच्या अटीवर 28 वर्षीय पत्रकाराने आपल्यासोबत काय घडले याची माहिती बीबीसीला दिली.

मोहितने सांगितल्यानुसार, डॉक्टरांनी त्याला सांगितले, "शस्त्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते. पण जर शरीरात या गोष्टी रुतून राहिल्या तर भविष्यात माझ्या शरीराला काय नुकसान होईल किंवा हे विद्रुप व्रण कधी नाहीसे होतील याची मला चिंता सतावते."

"पण मी काही पीडित व्यक्तींचे फोटो पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्याचे बघितले तेव्हा मला मी नशीबवान आहे असे वाटते", असे मोहितने म्हटले.

'चेहऱ्यावर देखील झाल्या जखमा'

गुरुग्राममधील एका फर्ममध्ये काम करणारे शेख इर्शाद मन्सुरी मात्र तितके नशीबवान ठरले नाहीत.

ते कनॉट प्लेसकडून जंतर-मंतरकडे (आंदोलनाचे मुख्य ठिकाण) चालत येत होते, "तेव्हा पोलीस आणि आरएएफने ( रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आणि निमलष्करी दल) कारवाई सुरू केली. त्यांनी जमावाला काठ्यांनी मारण्यास, अश्रुधुराचा मारा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी आणि धडकी भरवणारी स्थिती तयार झाली."

शेख इर्शाद मन्सुरी

फोटो स्रोत, SHAIKH IRSHAD MANSOORI

फोटो कॅप्शन, शेख इर्शाद मन्सुरी

"मी आंदोलकांच्या समुहासोबत होतो आणि आम्ही घोषणाबाजी करत होतो. तेव्हा आरएएफच्या सुरक्षा रक्षकांनी आमच्यावर बंदूक रोखली. आम्हाला वाटलं नाही की, ते बंदूक चालवतील पण नंतर मोठा आवाज झाला. ते छर्रे माझ्या डाव्या भुवईवर आणि हनुवटीवर लागले," मन्सुरी सांगतात.

काही आंदोलकांनी त्यांचा रक्तस्राव थांबवण्यासाठी कापड गुंडाळले आणि बाजूने जाणाऱ्या एका वाहनाला थांबवले आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात नेले.

त्यांनी सांगितले, "स्कॅनद्वारे हे समजते की माझ्या शरीरात 40 हून अधिक छर्रे आहेत. गळ्याजवळ, डाव्या डोळ्याजवळ आणि नाकाजवळ 3 खोलवर जखमा आहेत. हे छर्रे काढावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.'

"दुसऱ्या दिवशी सर्जनने 7 छर्रे काढले, पण गळ्याजवळ असणारा एक छर्रा तसाच सोडून द्यावा लागला कारण तो काढणे खूप धोकादायक होते. ते म्हणाले की, आता हा छर्रा माझ्या शरीराचा भागच आहे. भविष्यात यापासून काही धोका होणार नाही असा विश्वास त्यांनी मला दिलाय."

"10 दिवसाहून अधिक झाले, पण अजूनही माझ्या वेदना कायम आहेत," असं इर्शाद सांगतात.

रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इर्शादच्या जखमा या छर्र्यासारख्या छोट्या वस्तूमुळे झाल्या आहेत.

पण त्यांनी पुढे असेही सांगितले की, हे बंदुकीतून फायर झाले की नाही हे सांगता येणार नाही. हे फॉरेन्सिक तज्ज्ञच तपासणीनंतर सांगू शकतील.

जेव्हा पहिल्यांदा पेलेट गनच्या वापराचा दावा गेल्या आठवड्यात करण्यात आला तेव्हा तो दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळला होता.

हे 'पूर्णतः खोटे आणि दिशाभूल' करणारे आहे असे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांकडे पेलेट गनच नाहीये, असं त्यांनी सांगितलं.

तेव्हापासून भारतीय माध्यमांनी असे म्हटले की, शॉट्स हे आरएएफकडून फायर करण्यात आले होते. आरएएफ हे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या अंतर्गत काम करतं.

बीबीसीने सीआरपीएफचे प्रमुख ग्यानेंद्र प्रताप सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना इमेल केला आहे, पण त्यांनी अद्याप याला उत्तर दिले नाही.

29 जुलैला केंद्र सरकारमधील मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत सांगितले की, गोळ्या झाडण्यात आल्या नाहीत, फक्त अश्रुधुराचा वापर करण्यात आला.

पण पेलेट गन वापरण्यात आली की नाही यावर त्यांनी भाष्य केले नाही.

दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफ हे दोन्ही दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अखत्यारीत येतात तेव्हा त्यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केली, त्यावर जितेंद्र सिंह यांनी वरील उत्तर दिले.

साहिलसोबत काय घडलं?

25 जुलैला राहुल गांधी यांनी साहिल लोचब या दिल्ली विद्यापीठातील 19 वर्षीय तरुणासोबत पत्रकार परिषद घेतली होती. पेलेटमुळे झालेल्या जखमेमुळे तो त्याचा डोळा गमावण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषदेवेळी साहिल

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषदेवेळी साहिल

साहिलच्या चेहऱ्याची एक बाजू आणि उजव्या हाताचा दंड या बारीक छिद्रांनी पूर्णपणे भरून गेला आहे. राहुल गांधी यांनी त्या तरुणाचे टी-शर्ट वर उचलून दाखवले की, अजून अनेक जखमा त्याच्या हाताखालच्या बाजूवर आहेत.

"गेल्या वर्षी पोलीस भरतीच्या परीक्षेचे पेपर फुटले होते. त्यामुळे परीक्षा रद्द झाली होती. त्याच कारणामुळे मी पेपरफुटी विरोधातील आंदोलनात सीजेपीला समर्थन दिले होते," साहिलने माध्यमांना आणि राहुल गांधी यांना व्हीडिओ चॅटहून सांगितले.

त्याने सांगितले की, तो त्याच्या 3 मित्रांसह आंदोलनात गेला होता, पण पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केल्यावर गोंधळ उडाला आणि त्यांची ताटातूट झाली. इतर आंदोलकांसह सुरक्षा रक्षकांच्या दिशेने चालत असताना त्याच्यावर शॉट फायर झाला असे त्याने सांगितले.

"मला हे दिसले नाही की, पेलेट गन कुणी चालवली, पण ते सुरक्षा दल ज्या दिशेनी होते त्या दिशेने आले. माझा डावा डोळा सुजला आणि तो चेहऱ्याबाहेर पडतो की काय असे वाटू लागले. मला माझा उजवा हात उचलताच येत नव्हता. माझ्या शरीरातून खूप रक्त वाहू लागलं होतं आणि काही आंदोलकांनी मला रुग्णालयात नेलं," असं साहिलनं सांगितलं.

त्याने राहुल यांना सांगितले, "माझ्या कुटुंबीयांनी मला आंदोलनाला जाऊ नको असे सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण मी स्वतःला रोखू शकलो नाही."

"मला न्याय हवा आहे. ज्याने पण माझ्यासोबत हे कृत्य केलंय ते लोक सत्तेत राहण्यायोग्य नाहीत," असे त्याने सांगितले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)