You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजीव गांधींना किती पगार मिळायचा? सोनिया गांधींशी त्यांची भेट कशी झाली?
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 10 मिनिटे
ही घटना मे 1981 ची आहे. राजीव गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार होते. त्यासाठी ते आपल्या मतदारसंघाचा दौरा करत होते, लोकांच्या भेटीगाठी घेत होते.
काही तासांनंतर त्यांना लखनौहून दिल्लीला जाण्यासाठी विमान पकडायचं होतं. पण तितक्यात 20 किलोमीटर दूर असलेल्या तिलोई येथे 30 ते 40 झोपड्यांना आग लागल्याचं वृत्त समोर आलं.
त्यांनी लखनौला जाण्याऐवजी आपली कार तिलोईकडे वळवली.
तिथे गेल्यानंतर त्यांनी आगीत जळून खाक झालेल्या झोपड्यांमधील रहिवाशांचे सांत्वन केले. दरम्यान, त्यांच्या मागे उभे असलेले संजय सिंह त्यांच्या कानात सतत सांगत होते, "सर, तुमची फ्लाइट चुकेल."
परंतु, राजीव गांधी मात्र लोकांशी बोलतच राहिले. सर्वांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हसत संजय सिंह यांना विचारलं, "इथून लखनौला पोहोचायला किती वेळ लागेल?"
'द लोटस इयर्स - पॉलिटिकल लाइफ इन इंडिया इन द टाइम ऑफ राजीव गांधी' या पुस्तकाचे लेखक अश्विनी भटनागर सांगतात, "संजय सिंह म्हणाले, 'किमान 2 तास लागतील. पण तुम्ही स्वतः गाडी चालवली, तर आपण 1 तास 40 मिनिटांत तिथे पोहोचू.'"
"राजीव गांधी गाडीत बसताच म्हणाले, 'त्यांना कळवा की आपण 1 तास 15 मिनिटांत अमौसी विमानतळावर पोहोचू.' त्यानंतर राजीव गांधींनी गाडी इतक्या वेगाने चालवली की, ती जणू स्पेस शटलसारखी धावत होती. ठरलेल्या वेळेआधीच ते विमानतळावर पोहोचले."
विमान प्रवासात पूर्ण नाव सांगण्यास मनाई
वेगाने गाडी चालवण्याची आवड असलेले राजीव विमान मात्र अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालवत असत. सुरुवातीला ते डकोटा विमान उडवत होते. नंतर त्यांनी बोइंग विमानही उडवायला सुरुवात केली होती.
जेव्हा ते पायलटच्या सीटवर असायचे, तेव्हा कॉकपिटमधून केवळ आपलं पहिलं नाव सांगून प्रवाशांचे स्वागत करत असत.
विमान प्रवासादरम्यान त्यांचं पूर्ण नाव कधीही सांगायचं नाही, अशी स्पष्ट सूचना त्यांच्या सहकाऱ्यांना होती.
त्या काळी त्यांना पायलट म्हणून दरमहा 5 हजार रुपये वेतन मिळत होते. त्यावेळी हे खूप चांगले वेतन मानले जात असत.
सोनियांच्या शेजारी बसण्यासाठी 'लाच'
जेव्हा राजीव गांधी इंजिनिअरिंगचा ट्रायपॉस कोर्स करण्यासाठी केंब्रिजला गेले. तिथे 1965 मध्ये त्यांची भेट इटलीत जन्मलेल्या सोनियांशी झाली.
ते दोघे एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये जायचे.
अश्विनी भटनागर सांगतात, "राजीव गांधींनी रेस्टॉरंटचा मालक चार्ल्स अँटनीला विनंती करून सोनियांच्या शेजारच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था करून घेतली. एका हुशार ग्रीक व्यापाऱ्याप्रमाणे चार्ल्सनेही या कामासाठी त्यांच्याकडून दुप्पट पैसे घेतले."
"नंतर सिमी गरेवाल यांनी राजीव गांधींवर बनवलेल्या चित्रपटात त्यांनी सांगितलं होते, 'मी याआधी कोणालाही इतकं प्रेमात पडलेलं पाहिलं नव्हतं.'"
"केंब्रिजमध्ये शिकत असताना राजीव स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आईस्क्रीम विकायचे. सोनिया गांधींना भेटण्यासाठी ते सायकलवरून जायचे. त्यांच्याकडे जुनी फोक्सवॅगन कारही होती. पण तिच्या पेट्रोलचा खर्च त्यांचे मित्र मिळून 'शेअर' करत असत."
सोनियांसाठी नॅपकिनवर लिहिली कविता
राजीव आणि सोनिया यांच्या केंब्रिजमधील भेटींचा उल्लेख प्रसिद्ध पत्रकार रशीद किडवाई यांनी सोनिया गांधी यांच्यावर लिहिलेल्या चरित्रातही केला आहे.
रशीद किडवाई सांगतात, "केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थी रोज व्हर्सिटी रेस्टॉरंटमध्ये जमायचे. सर्वजण बिअर प्यायचे. परंतु, राजीव गांधी एकमेव असे होते, जे त्या बिअरला हातही लावत नसत. त्याच वेळी सोनिया यांचं लक्ष त्या उंच, काळ्या डोळ्यांच्या आणि मोहक हास्य असलेल्या निरागस मुलाकडे गेले."
"दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण होतं. राजीव यांनी पहिल्यांदा एका नॅपकिनवर सोनियांच्या सौंदर्याचं वर्णन करणारी कविता लिहिली आणि वेटरच्या हातून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली."
"कविता मिळाल्यावर सोनिया थोड्या अस्वस्थ झाल्या. पण राजीव यांचा एक जर्मन मित्र, जो सोनियांनाही ओळखत होता, त्यांच्यामध्ये संदेश पोहोचवण्याचं काम त्यानं चोखपणे बजावले होते."
रशीद किडवाई पुढे सांगतात, "विशेष म्हणजे राजीव गांधींनी शेवटपर्यंत सोनियांना आपण भारताच्या पंतप्रधानांचे पुत्र असल्याचं सांगितलं नव्हतं. खूप दिवसांनंतर एका वर्तमानपत्रात इंदिरा गांधींचा फोटो छापून आला. तेव्हा राजीव यांनी सोनियांना, 'हा माझ्या आईचा फोटो आहे,' असं सांगितलं."
"तेव्हा केंब्रिजमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने सोनियांना सांगितलं की, इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान आहेत. तेव्हा सोनियांना पहिल्यांदाच समजलं की, त्या ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्या होत्या, ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे."
मेहमूद आणि राजीव गांधींची भेट
रशीद किडवाई सांगतात की, राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन हे लहानपणापासूनचे मित्र होते. अमिताभ बच्चन मुंबईत स्ट्रगल करत होते, तेव्हा एकदा राजीव त्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यावेळी अमिताभ यांनी राजीव यांची ओळख प्रख्यात विनोदी कलाकार मेहमूद यांच्याशी करून दिली.
रशीद किडवाई सांगतात, "त्या काळात मेहमूद यांना 'कम्पोज'च्या गोळ्या घेण्याची सवय होती आणि ते अनेकदा नशेत असायचे. अमिताभ बच्चन यांनी त्यांची राजीव यांच्याशी ओळख करून दिली. परंतु, मेहमूद हे नशेत असल्यामुळे त्यांची भेट नेमकी कोणाशी होत आहे, हे त्यांना समजलंच नाही."
"मेहमूद यांनी 5 हजार रुपये काढले आणि त्यांचा भाऊ अन्वर यांना ते राजीव यांना देण्यास सांगितले."
"अन्वर यांनी विचारलं की, 'तुम्ही त्यांना पैसे का देत आहात?' त्यावर मेहमूद म्हणाले, 'अमिताभसोबत आलेला हा माणूस त्याच्यापेक्षा खूप गोरा आणि देखणा आहे. एक दिवस तो नक्कीच आंतरराष्ट्रीय स्टार बनेल. हे 5 हजार रुपये माझ्या पुढच्या चित्रपटासाठीची साइनिंग अमाउंट आहे.'"
"अन्वर मोठ्याने हसले आणि त्यांनी पुन्हा राजीव गांधी यांची ओळख करून देत म्हटलं की, 'हे काही स्टार वगैरे नाहीत, हे इंदिरा गांधींचे पुत्र आहेत.' हे ऐकताच मेहमूद यांनी लगेच आपले 5 हजार रुपये परत घेतले आणि राजीव यांची माफी मागितली."
"पण पुढे राजीव गांधी खरोखरच स्टार बनले. चित्रपटाच्या क्षेत्रात नाही, तर राजकारणात!"
विमानात असताना इंदिरा गांधींच्या हत्येबद्दल समजलं
संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजीव गांधी इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी राजकारणात आले. परंतु, काही काळातच इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.
त्यावेळी राजीव गांधी पश्चिम बंगालमध्ये होते. ज्या हवाई दलाच्या विमानाने ते दिल्लीला परतले, त्या विमानात शीला दीक्षितदेखील होत्या. याच शीला दीक्षित नंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीही झाल्या.
शीला दीक्षित यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, "विमानाने उड्डाण केल्यानंतर राजीव गांधी कॉकपिटमध्ये पायलटजवळ गेले. तिथून परत आल्यानंतर त्यांनी आम्हाला विमानाच्या मागील भागात बोलावलं आणि 'इंदिराजी आता राहिल्या नाहीत,' असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला 'अशा परिस्थितीत काय केलं जातं?', असं विचारलं."
"प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं की, पूर्वीपासून अशी परंपरा आहे की, सर्वात ज्येष्ठ मंत्र्याला हंगामी पंतप्रधानपदाची शपथ दिली जाते आणि नंतर पंतप्रधानांची निवड केली जाते."
"परंतु, माझे सासरे उमाशंकर दीक्षित यांनी म्हटलं की, ते हंगामी पंतप्रधान नेमण्याचा धोका पत्करणार नाहीत आणि थेट राजीव गांधींनाच पंतप्रधानपदी नियुक्त करतील."
प्रणव मुखर्जींचा सल्ला त्यांच्याच विरोधात गेला
मी शीला दीक्षित यांना विचारलं होतं की, "प्रणव मुखर्जी यांनी सर्वात ज्येष्ठ मंत्र्याला हंगामी पंतप्रधान करण्याचा जो सल्ला दिला, तो त्यांच्याच विरोधात गेला का?"
शीला दीक्षित यांनी यावर उत्तर दिलं, "हो, काही प्रमाणात तो सल्ला त्यांच्या विरोधात गेला. कारण राजीव गांधी सत्तेत आल्यानंतर त्यांनी प्रणव मुखर्जी यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थानच दिले नाही. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्री होते. काही दिवसांनी प्रणव मुखर्जी यांनी पक्षही सोडला. ते त्यावेळी सर्वात ज्येष्ठ मंत्री होते."
"पण मला वाटत नाही की, प्रणव मुखर्जी यांनी स्वतःची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करण्यासाठी तसं मत व्यक्त केलं होतं. ते फक्त पूर्वीची उदाहरणं सांगत होते. पण त्यांच्या विरोधकांनी त्यांचं म्हणणं राजीव गांधींसमोर वेगळ्या पद्धतीने मांडलं."
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना वाचवलं
पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधींनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठं आणि महत्त्वपूर्ण काम केले. पक्षांतरबंदी कायदा लागू करणे, 18 वर्षे वयाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार देणे आणि भारताला एक प्रादेशिक शक्ती बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
अश्विनी भटनागर सांगतात, "पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर राजीव गांधींनी वेगाने निर्णय घेण्यास सुरुवात केली. शिक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि राजकीय व्यवस्था सुधारण्यासोबतच काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्यातील त्यांच्या भाषणातूनही त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडली. त्यांच्या या कामामुळे लोकांना एक प्रकारचा सुखद धक्का बसला."
"आज लोक सर्जिकल स्ट्राइकची चर्चा करतात. परंतु, 1988 मध्ये राजीव गांधींनी 4 हजार किलोमीटर दूर असलेल्या मालदीवमध्ये अशीच एक लष्करी कारवाई केली होती. अवघ्या 10 तासांच्या सूचनेवर आग्रा येथून 3 हजार सैनिकांना विमानाने मालदीवमध्ये पाठवलं होतं."
"मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात बंड झालं होतं आणि ते लपून-छपून फिरत होते. भारतीय सैनिकांनी त्यांना पुन्हा सत्तेवर आणलं आणि बंड करणाऱ्या त्यांच्या विरोधकांना अटकही केली."
सॅम पित्रोदा यांच्या मदतीने दूरसंचार क्षेत्रात क्रांती
सॅम पित्रोदा यांच्या मदतीने भारतात झालेल्या दूरसंचार क्रांतीचं मोठं श्रेय राजीव गांधी यांना दिले जाऊ शकते.
बीबीसीशी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले होते, "राजीव गांधी आणि माझी चांगली मैत्री झाली होती. मला ते खूप आवडायचे. ते आमच्याशी प्रेमाने बोलायचे आणि आमचं म्हणणं समजून घ्यायचे. त्यांनी आमच्या मोहिमेला राजकीय पाठिंबा दिला. सी-डॉट सुरू करण्याची कल्पना आमची आणि राजीव गांधी यांची इच्छा होती. त्यासाठी आम्हाला 400 इंजिनिअर्स आणि जागेची आवश्यकता होती."
"आम्ही बंगळुरूमध्ये हार्डवेअर आणि दिल्लीत सॉफ्टवेअर डिझाइन तयार करण्याचं काम सुरू केलं. आम्हाला दिल्लीत जागा मिळत नव्हती, म्हणून राजीव गांधींनी आम्हाला एशियाड व्हिलेजमध्ये जागा दिली. जागा चांगली होती, परंतु तिथे एअर कंडिशनिंग नव्हतं. सॉफ्टवेअरचं काम करण्यासाठी एसीची गरज होती. त्यामुळे आम्ही अकबर हॉटेलमधील दोन मजले घेतले."
"तिथे फर्निचरही नव्हतं. त्यामुळे आम्ही 6 महिने खाटांवर बसूनच काम केलं. आम्ही तरुणांना कामाची संधी दिली आणि त्यांना प्रशिक्षण दिलं. नंतर आमच्या लक्षात आलं की, महिलांची संख्या कमी आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी आम्ही महिलांचीही भरती केली."
नोकरशहांपेक्षा फाइलचं काम चांगलं
राजीव गांधींना प्रशासनाचा आधी कोणताही अनुभव नसतानाही, ते खूप चांगले प्रशासक होते, असं त्यांच्यासोबत काम केलेले माजी कॅबिनेट आणि संरक्षण सचिव नरेशचंद्र म्हणतात.
नरेशचंद्र बीबीसीशी बोलताना म्हणाले होते की, राजीव गांधी तरुण आणि अत्यंत मेहनती होते. ते सरकारी फाईल्स बारकाईने वाचायचे. त्यांची फाईलवरची लिखाणाची पद्धतही (ड्राफ्टिंग) अनेक नोकरशहांपेक्षा चांगली होती. मला वाटतं, ते पुन्हा सत्तेत आले असते, तर त्यांनी आणखी चांगलं काम केलं असतं.
रात्री उशिरापर्यंत काम करायचे राजीव
राजीव गांधी सकाळी लवकर उठत आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचे. एकदा ते एका बैठकीसाठी हैदराबादला गेले होते. त्यावेळी एन.टी. रामाराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
राजीव यांना जवळून ओळखणारे आणि नंतर मुख्य माहिती आयुक्त व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष झालेले वजाहत हबीबुल्लाह आठवण सांगतात, "एन.टी. रामाराव यांच्यासोबत तेलुगू गंगा प्रकल्पावर बैठक होती. रामाराव यांना पहाटे 3 वाजता उठायचं असतं म्हणून ते रात्री साधारण 8 वाजताच झोपायचे. पण ही बैठक रात्री 10 वाजता ठेवण्यात आली होती."
"त्यावेळी या प्रकल्पावरून एन.टी. रामाराव आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद होते. बैठकीच्या वेळी रामाराव यांना खूप झोप येत होती. राजीव गांधी जेव्हा त्यांना विचारायचे, 'याबद्दल तुमचं काय मत आहे?' तेव्हा डोळे मिटलेल्या अवस्थेतच ते म्हणायचे, 'मला हे मान्य नाही.' एवढं बोलून ते पुन्हा डुलकी घेऊ लागायचे."
ही बैठक रात्री सुमारे 11 वाजता संपली. त्यावेळी एन.टी. रामाराव यांनी राजीव गांधींना नम्रपणे म्हटलं, "सर, या बैठकीसाठी एवढ्या उशिरापर्यंत जागल्याबद्दल तुमचे खूप आभार."
"त्यावर राजीव गांधी म्हणाले, 'अरे, अजून फार उशीर झालेला नाही. झोपण्यापूर्वी मला आणखी खूप काम करायचं आहे.' असं म्हणत ते राजभवनातील पायऱ्या झपाझप चढून आपल्या खोलीकडे गेले."
जेव्हा गृह सचिवांना घरी सोडण्यासाठी अडून बसले
अशीच एक घटना 1985 मध्ये घडली होती. राजीव गांधींनी रात्री उशिरा गृह सचिव राम प्रधान यांना फोन केला. त्यावेळी राम प्रधान हे गाढ झोपले होते. त्यांच्या पत्नीने फोन उचलला. राजीव गांधी म्हणाले, "प्रधानजी झोपले आहेत का? मी राजीव गांधी बोलतोय."
त्यांच्या पत्नीने लगेच राम प्रधान यांना उठवलं. राजीव गांधींनी त्यांना विचारलं, "तुमचं घर माझ्या घरापासून किती लांब आहे?"
राम प्रधान यांनी सांगितलं की, ते 2 एबी, पंडारा रोड येथे राहतात. त्यावर राजीव गांधी म्हणाले, "मी तुमच्यासाठी माझी गाडी पाठवत आहे. तुम्ही शक्य तितक्या लवकर इथे या."
त्यावेळी पंजाबचे राज्यपाल सिद्धार्थ शंकर हे काही प्रस्ताव घेऊन राजीव गांधी यांच्या घरी आले होते.
रे यांना त्याच रात्री चंदीगडला परत जायचं होतं. त्यामुळे राजीव गांधींनी गृह सचिवांना इतक्या रात्री बोलावलं होतं. साधारण दोन तास चर्चा झाल्यानंतर रात्री 2 वाजता सर्वजण बाहेर आले. तेव्हा राजीव गांधींनी राम प्रधान यांना आपल्या गाडीत बसायला सांगितलं.
प्रधान यांना वाटलं की, पंतप्रधानांना आपल्याला गेटपर्यंत सोडायचं असेल.
पण राजीव गांधी यांनी गाडी गेटबाहेर काढली आणि अचानक डावीकडे वळवली. त्यानंतर त्यांनी राम प्रधान यांना विचारलं, "पंडारा रोड कोणत्या दिशेला आहे, हे विचारायचं मी विसरलो."
आता प्रधान यांच्या लक्षात आलं की, राजीव गांधी त्यांना घरी सोडायला निघाले आहेत. त्यांनी गाडीचं स्टेअरिंग पकडलं आणि म्हटलं, "सर, तुम्ही गाडी परत फिरवली नाही, तर मी चालत्या गाडीतून खाली उडी मारेन."
प्रधान यांनी त्यांना आठवण करून दिली की, तुम्ही अशा प्रकारचा धोका पत्करणार नाही, असं मला वचन दिलं होतं. मोठ्या प्रयत्नाने राजीव गांधींनी गाडी थांबवली. राम प्रधान दुसऱ्या गाडीत बसून निघून जाईपर्यंत राजीव गांधी तिथेच उभे राहिले होते.
लक्षद्वीपमध्ये जखमी व्हेलला वाचवलं
काही काळानंतर राजीव एका बैठकीसाठी लक्षद्वीपला गेले. त्यावेळी वजाहत हबीबुल्ला हे लक्षद्वीपचे प्रशासक होते.
हबीबुल्ला आठवण सांगतात, "राजीव हे हेलिपॅडकडे जात होते आणि आम्ही त्यांच्यासोबत जीपमध्ये होतो. तेव्हा कोणीतरी दाखवलं की, काही व्हेल मासे पाण्यात अडकले आहेत. तिथे उथळ जलाशय (लॅगून्स) होते."
"पाणी कमी झाल्यावर ते खूप उथळ होतात. व्हेल मासे पाण्यासोबत तिथे आले, पण पाणी कमी झाल्यामुळे त्यांना पुन्हा समुद्रात जाता येत नव्हतं. त्यामुळे ते तिथेच अडकून धडपडत होते."
"राजीव गांधींनी गाडी थांबवली आणि पायजमा व बूट घातलेले असतानाच ते पाण्यात उतरले. मी सूट घातला होता, तरीही धडपडत त्यांच्या मागे पाण्यात गेलो. राजीव यांच्यासोबत आणखी काही लोकही पाण्यात उतरले. त्यांनी सर्वांच्या मदतीने व्हेलला उचललं आणि जिथे खोल पाणी होतं, तिथे नेऊन सोडलं."
बोफोर्स प्रकरणात नाव आल्याने मोठा धक्का
राजीव गांधी यांची कदाचित पहिली मोठी चूक म्हणजे शाहबानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संसदेमध्ये नवीन कायदा करणे. त्यानंतर बोफोर्स प्रकरणात त्यांचं नाव आलं. त्यामुळे त्यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलीन झाली आणि 1989 ची निवडणूक त्यांना गमवावी लागली.
अश्विनी भटनागर सांगतात, "बोफोर्स प्रकरणापासून खोट्या राजकारणाला सुरुवात झाली. त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांनी एक मोठा खोटा दावा केला."
"एका निवडणूक प्रचारसभेत त्यांनी नाट्यमय पद्धतीने कुर्त्याच्या खिशातून एक कागद काढला आणि हवेत दाखवत म्हणाले, 'यावर राजीव गांधींच्या स्विस बँक खात्याचा नंबर आहे. बोफोर्समधून मिळालेली दलाली (लाच) या खात्यात जमा झाली आहे.' त्यांनी कागद वाचणार असल्याचा आव आणला, पण नंतर ते थांबले."
"त्याकाळी भारतातील लोकांचा विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यावर इतका विश्वास होता की, ते जे काही सांगत आहेत, ते खरंच आहे, असंच लोकांना वाटलं. त्यामुळे नंतर बोफोर्सचा मुद्दा बाजूला पडला आणि 'राजीव गांधी चोर आहेत' असा नारा गल्लीबोळातून ऐकू येऊ लागला. आजही बोफोर्स प्रकरणातून नेमकं काय निष्पन्न झालं, हे अनेकांना माहीत नाही."
"न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केलं. आजपर्यंत हे सिद्ध झालेलं नाही की किती पैसे दिले गेले, कोणाला दिले गेले किंवा पैसे दिलेही होते की नाही. व्ही. पी. सिंह यांनी बोफोर्सच्या तोफा खराब असल्याचा आरोप केला होता. परंतु, कारगिल युद्धादरम्यान हा आरोपही खोटा ठरला. कारण कारगिल युद्धात बोफोर्स तोफांनी खूपच महत्त्वाची भूमिका बजावली होती."
(हा लेख यापूर्वी 19 फेब्रुवारी 2020 रोजी प्रकाशित झाला होता. हा लेख अश्विनी भटनागर यांच्या 'लोटस इयर्स' या पुस्तकावर आधारित आहे.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.